भारतीय फॅशन प्रायोगिक आणि नवनिर्मितीच्या आधारावर कायम बदलती आणि नावीन्यपूर्ण राहिली आहे. एकेकाळी एकाच संस्कृतीत प्रचलित असलेली गोष्ट अनेकदा नवीन ओळख घेऊन दुसऱ्या संस्कृतीत रुळलेली आपल्याला पाहायला मिळते. तशाच पद्धतीने वन-पीस ड्रेस, ज्याला बहुतेकदा पूर्णपणे पाश्चात्त्य पोशाख मानले जाते, आता पारंपरिक ट्विस्टसह भारतीय वॉर्डरोबमध्ये सुंदरपणे विलीन झाला आहे.
पूर्वी, वन-पीस हा फक्त कॅज्युअल किंवा पार्टी पोशाख म्हणून पाहिला जात असे, मुख्यतः पाश्चात्त्य फॅशनमध्ये हा प्रकार प्रचलित होता. परंतु, आज डिझायनर्स आणि तरुणींवरही या इंडो-वेस्टर्न फॅशनचा मोठा प्रभाव पडला आहे. इकत, जरी, खण, खादी, चंदेरी, पैठणी आणि अगदी हातमागावरील सुताच्या कापडातसुद्धा आता सुंदर वन-पीस ड्रेस पाहायला मिळतात. वन-पीस हे घालायला, सांभाळायला सोपे आणि अर्थात टिकायलासुद्धा चांगले असतात. शिवाय, साडी किंवा इतर हेवी कपड्यांपेक्षा जरा स्वस्त असतात. साडीला आधुनिक पर्याय म्हणून किंवा घरातल्या घरात छोट्या समारंभांसाठी, ऑफिसचा पोशाख म्हणून अशा अनेक कारणांमुळे सध्या पारंपरिक वन-पीसचा ट्रेंड प्रचलित होतो आहे.
कॉटन आणि खादी वन-पीस
कॉटन हे मुलींचे ऑलटाइम फेव्हरेट फॅब्रिक आहे, कारण ते कुठल्याही ऋतूत घालता येते, टिकायला, वापरायला आणि अगदी दिवसभर घालायलासुद्धा अगदी आरामदायक असते. समारंभांसाठी घालायला थोडे साधे वाटू शकते, पण हल्ली कॉटन बेस वापरून त्यावर पैठणीच्या पदराचे पॅच लावलेले सुरेख वन-पीस पाहायला मिळतात. अगदी मोठ्या समारंभांसाठी नाही तरी घरातल्या घरात कोणी पाहुणे येणार असतील, छोटेखानी कार्यक्रम असेल, पिकनिक असेल तर कॉटन आणि खादीच्या वन-पीसचा पर्याय बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला हव्या त्या जरीच्या कापडाचे पॅच लावून त्याला फेस्टिव्ह लूक देता येतो. कॉटन आणि खादी मुळातच हलके कापड असते त्यामुळे याला पैठणी आणि जरी कॉम्बिनेशन फार सुंदर दिसते.
इंडिगो आणि कलमकारी वन-पीसेस
इंडिगो आणि कलमकारी या भारतीय कापड कलेतील दोन कालातीत परंपरा आहेत आणि जेव्हा ते वन-पीस ड्रेसेसमध्ये वापरले जातात, तेव्हा सहजतेने स्टायलिश लूक तयार होतो.
इंडिगो वन-पीसेस : इंडिगो डाईंग ही भारतातील सर्वात जुन्या नैसर्गिक डाईंग तंत्रांपैकी एक आहे. इंडिगो वन-पीसेस बहुतेकदा हँड-ब्लॉक प्रिंट्स, डब्बू डिझाइन किंवा शिबोरी पॅटर्नसह येतात. ऑक्सिडाइज्ड कानातले, चांदीच्या बांगड्या किंवा ज्यूट हँडबॅग्जसारख्या ॲक्सेसरीज पेअर करत परिधान केलेला इंडिगो कॉटन वन-पीस कॉलेज, ऑफिस किंवा संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी एक आवडता पोशाख बनू शकतो.
कलमकारी : कलमकारी ही हाताने रंगवलेली किंवा ब्लॉक-प्रिंट असलेली प्रिंटची कला आहे. कलमकारी प्रिंटमुळे वन-पीस पोशाखाला एक नवीन आणि स्टायलिश लूक मिळतो. या पोशाखात मुळातच एक सभ्यता आणि फॉर्मल टच आहे, ज्यामुळे ते ऑफिस किंवा बिझिनेस मीटिंग्सलाही उत्तम पर्याय आहेत. यावरचे प्रिंट्स विस्तृत असल्याने, स्टाइलिंग साधी सोपी ठेवता येते – पारंपरिक जुती, टेराकोटा दागिने, अजून लूक ट्रेंडी बनवायचा असेल तर सॉलिड शेड असलेला कॉटन दुपट्टा याने तुमचा लूक छान पूर्ण होतो. कलमकारी वन-पीस सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, प्रदर्शनांसाठी किंवा अगदी रोजच्या स्टेटमेंट पोशाखासाठी उत्तम पर्याय आहेत.
खणाचे वन पीस
खणाच्या कापडाची लोकप्रियता सध्या इतकी आहे की फॅशन विश्व या फॅब्रिकशिवाय अपूर्ण आहे. खण हे पूर्वी फक्त काही विशेषतः रोजच्या उपयोगातल्या वस्तूंसाठी किंवा पारंपरिक पैठण्यांसाठी वापरले जायचे, पण आता कपड्यांपासून ते गिफ्ट देण्यापर्यंत एकही गोष्ट सुटलेली नाही ज्यात खणाचा वापर होत नाही. खणाच्या कापडाची वीण आणि पोत एकसंध असतो, ज्यामुळे त्याला एक वेगळी चमक येते. यामुळे साध्या ड्रेसलाही फेस्टिव्ह लूक मिळतो. हल्ली खण वापरून इतके आधुनिक वन-पीस डिझाइन केले जातात की वेगवेगळ्या फॅशन शोजमध्येही ते वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करून वापरले जातात. खण आणि पैठणी हेही पारंपरिक वन-पीस स्टायलिंगसाठी बेस्ट कॅाम्बिनेशन आहे. मोठ्यांपासून लहान मुलींपर्यंत या कॉम्बिनेशनचे वन-पीस अतिशय सुरेख दिसतात. पारंपरिक थोडी हिल्सची चप्पल, एक लहान नथ किंवा सूट होणारा छोटासा चोकर आणि छोट्या चंद्रकोरीसह एक सुंदर महाराष्ट्रीय फ्यूजन लूक तयार करता येतो. प्लेन वन-पीस आणि त्यावर खण दुपट्टा हेही छान समीकरण आहे. हे वन-पीस लॉन्गसुद्धा छान दिसतात, पण तुम्हाला जर इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर शॉर्ट, गुडघ्यापर्यंतच्या मापाचे वन-पीससुद्धा फार ट्रेंडिंग आणि स्टायलिश दिसतात. गर्ल्स पिकनिक, गेट-टुगेदर अशा समारंभांसाठी ही चांगली आयडिया आहे. तुम्ही लॉन्ग वन-पीसवर समारंभाप्रमाणे कुठल्याही प्रकारचे दागिने स्टाईल करू शकता, हेवी ज्वेलरी म्हणजे तन्मणी, चिंचपेटी किंवा तुमच्या खणाच्या कापडाला थोडीशी मोठी जर असेल तर सोन्याचे दागिने आणि टेम्पल ज्वेलरीसुद्धा छान दिसेल.
पैठणी वन-पीस
महाराष्ट्राचा अभिमान असलेले पैठणी हे सर्वात आलिशान आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे हातमाग कापड आहे. समृद्ध रेशमी पोत, तेजस्वी रंग आणि मोर, पोपट आणि कमळाच्या डिझाइनसारख्या सिग्नेचर बुट्टीचे काम नाजूक आणि सुबक दिसते. पैठणी म्हणजे पूर्वी तरी उच्च दर्जाची पारंपरिक साडी आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत पैठणी दुपट्टा एवढंच प्रचलित होतं. आज हीच खास पैठणी विणण्याची कला वन-पीस ड्रेसमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे.
पैठणी वन-पीसला इंस्टंट राजेशाही लूक देतात. हल्ली रेडीमेड पैठणी ड्रेसही विकत मिळतात किंवा तरुण मुली उत्साहाने शिवून घेतात. डिझायनर बहुतेकदा पैठणी बॉर्डर किंवा पदराच्या बुट्टीचा वापर करून उत्तम स्टाईलचे वन-पीस बनवतात. हे ड्रेस लग्न, साखरपुडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परिपूर्ण आहेत. जिथे तुम्हाला साडीसाठी वेगळा पर्याय हवा आहे, तिथे पैठणी ड्रेस उत्तम आणि सुंदर पर्याय आहेत. शक्यतो पैठणीचे वन-पीस हे मोठ्या समारंभांसाठी वापरले जातात, त्यामुळे यावर तुम्ही बिनधास्तपणे थोडा चांगला मेकअप, हेवी ज्वेलरी स्टाईल करू शकता. आधी म्हटल्याप्रमाणे २-३ फॅब्रिकचे कॉम्बिनेशन्सही छान दिसतात. प्लेन जरीचा वन-पीस आणि त्यामध्ये पैठणी पल्लूचे पॅचवर्क हेही अगदी एलिगंट दिसतं. हल्ली आपण करू त्या स्टाईलचे वन-पीस शिवून मिळतात. पारंपरिक लॉन्ग गाऊन तर छानच दिसतात, पण त्याच बरोबर आता जॅकेट आणि फ्रॉक किंवा लॉन्ग अनारकली गाऊन हेही प्रकार पाहायला मिळतात. तसंच, स्कर्ट टॉप पद्धतीचे वन-पीस ड्रेस, शॉर्ट स्ट्रेट कटचे वन-पीस हे प्रकारसुद्धा प्रचलित आहेत. इंडो-वेस्टर्न लूक करायचा असेल तर हे पर्याय ठीक आहेत, परंतु पैठणी वन-पीस हा पारंपरिक अनारकली लूकमध्येच उठून दिसतो. त्यात तुम्ही संपूर्ण साजशृंगारही करू शकता. कित्येक मुली आपल्या घरातल्या पारंपरिक वस्तूंची आठवण म्हणून जुन्या साड्यांचे असे छान वन-पीस शिवून वापरतात. घरच्या लग्न समारंभांमध्ये, हळदीसाठी असे वन-पीस आणि त्यावर फ्लोरल ज्वेलरी हे अगदी सोज्वळ कॉम्बिनेशन दिसतं.
जरीच्या साड्यांचे वन-पीस
पारंपरिक जरीच्या साड्यांच्या वन-पीसच्या ट्रेंडची लाट सध्या सगळ्यात मोठी आहे. पैठणीबरोबरच नारायण पेठ, सॉफ्ट सिल्क, ब्रोकेड, मुनिया बॉर्डर अशा असंख्य साड्यांच्या फॅब्रिकपासून हल्ली वन-पीस शिवलेही जातात आणि रेडीमेडही मिळतात. प्रत्येक फॅब्रिकचा पोत आणि टिकाऊपणा बघून त्याच्या शिवणकामाची पद्धत बदलते. सॉफ्ट सिल्क आणि मुनिया बॉर्डरच्या साड्या थोड्या पातळ असल्याने त्यांची शिवण जरा टिकाऊ करावी लागते. लॉन्ग अनारकली गाऊनला खालच्या साईडने मोठी बॉर्डर, हातांना बारीक लेसचं पॅचवर्क आणि छान ट्रेंडिंग गळ्याचे डिझाईन असे वन-पीस छान दिसतात.
नारायण पेठ साड्यांचे वन-पीससुद्धा अतिशय देखणे दिसतात. यातले रंगच इतके अप्रतिम असतात की त्याला वेगळ्या कुठल्या पॅचवर्कची जोड द्यावी लागत नाही. हल्ली स्टायलिंगमध्ये पेस्टल रंगांचा ट्रेंड आला आहे, पण खरंतर पारंपरिक वन-पीसच्या फॅशनमध्ये पेस्टल रंग अजिबात चांगले दिसत नाहीत. या कापडांना मुळातच जर आणि चकाकी असते, त्यामुळे गडद रंग जास्त खुलून दिसतात. तरुण मुलीही कॉटन किंवा शिफॉन प्रकार सोडले तर पैठणी आणि जरीच्या फॅब्रिकमध्ये हा पेस्टलचा ट्रेंड मनावर घेत नाहीत. पूर्ण ब्रोकेडच्या साड्या हाही नवीन प्रकार आता आला आहे. त्या पूर्ण भरलेल्या साड्यांच्या फॅब्रिकपासूनच त्याचे वन-पीससुद्धा बनवता येतात. हे जरा ठळक डिझाईनचे असतात, त्यामुळे स्टायलिंग करताना बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, सगळ्यांनाच हे प्रकार चांगले दिसतील असं नाही. अशा पारंपरिक वन-पीसवर इमिटेशन, खऱ्या सोन्याची किंवा टेम्पल ज्वेलरी छान दिसते.
पारंपरिक फ्युजन वन-पीस हे आता फॅशनपेक्षा तरुण मुलींचे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहिले जातात. या फ्युजन प्रकारामुळे फॅशन करताना तरी जुने किंवा नवीन यापैकी एकच निवडण्याची गरज नाही. एकाच वेळी दोन्हींचा मिलाफ फॅशन प्रकारात साधता येऊ शकतो. यातून पारंपरिक सौंदर्याचा वारसा आणि सहज आधुनिक प्रकारातून मिळणारा आत्मविश्वास दोन्ही अनुभवता येतं. फॅशन क्षेत्रातील प्रयोगातून जन्माला आलेला वन-पीस हा प्रकार आता कोणत्या एका प्रांताचा राहिलेला नाही, या प्रकाराने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वन-पीससाठी पारंपरिक फॅब्रिकच लोकप्रिय का?
परंपरा आणि आधुनिकतेचा संगमजरीकाम हे नेहमीच वैभव व श्रीमंतीचं प्रतीक मानलं गेलं आहे. पूर्वी ते प्रामुख्याने साड्यांमध्ये किंवा लेहंग्यामध्ये दिसायचं. आता मात्र जरीचा वापर वनपीसमध्ये होत असून, त्यातून परंपरेचा दिमाख आणि आधुनिकतेची सहजता एकत्र अनुभवता येते.
सणावारासाठी आकर्षक आणि आरामदायी
लग्नसमारंभ, सणवार किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक पोशाखाची गरज असते, पण जड साडी नेसणे सर्वांनाच सोयीचं वाटेल असं नाही. जरीचा वनपीस मात्र हलका, आरामदायी असूनदेखील तितकाच उठावदार दिसतो.
प्रत्येक प्रसंगाला साजेसा
जरीचा वनपीस गरजेनुसार स्टाईल करता येतो. दागिने व मेकअप अधिक केले की लग्नसराईसाठी तो शोभतो, तर साधेपणात तो औपचारिक कार्यक्रम किंवा ऑफिस सेलिब्रेशनसाठीही उठून दिसतो.तरुणाईसाठी ट्रेंडी पर्यायअनेकदा साडी किंवा पारंपरिक पोशाखामुळे प्रगल्भपणा अधिक वाटतो, पण जरीचा वनपीस पारंपरिक वैभव देतानाच तरुणाईला साजेशी स्टायलिश झलक देतो. त्यामुळे तो तरुण पिढीत विशेष लोकप्रिय आहे.
सोशल मीडिया व फॅशनचा प्रभाव
आजकाल डिझायनर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी जरीचे वनपीस फ्युजन वेअर म्हणून दाखवतात. त्यामुळे त्याचा प्रभाव तरुण पिढीवर अधिक पडतो. जरीचा दिमाख आणि वनपीसची सहजता यांचा संगमच त्याला आजची फॅशन-फेव्हरेट निवड बनवते.
स्टायलिंग टिप्स
– कॉटन, इंडिगो व हातमागावरील फॅब्रिकच्या वनपीससोबत ऑक्सिडाईज दागिने व मोजरी वापरावी.
– रेशमी व जरीच्या वनपीसवर सोन्याचे दागिने व मोत्यांचे सेट शोभून दिसतात.
– सणावारी गजरा, पारंपरिक पर्स किंवा पोटली बॅग लूक पूर्ण करतात.
– ऑफिस किंवा कॅज्युअल प्रसंगासाठी हलका मेकअप, काजळ व छोटीशी बिंदी पुरेशी ठरते.