वेदवती चिपळूणकर परांजपे

वैयक्तिक आजारपणामुळे शाळेत सहन करावे लागलेले टक्केटोणपे आणि वाट्याला आलेली हेटाळणी यामुळे खचून न जाता अमेरिकेतील जेलन्स आरनॉल्डने आपलंही आयुष्य सावरलं आणि इतरांचंही आयुष्य सावरण्यासाठी मदत केली.

Phenom Story Trash to content business Kishan Pampalia
फेनम स्टोरी: रद्दीवाला ते कंटेंटवाला
nashik zilla parishad marathi news
नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
isro launched pushpak vehicle,
यूपीएससी सूत्र : ‘पुष्पक’ लाँच व्हेईकलची यशस्वी चाचणी अणि श्रीनगरला मिळालेला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’चा दर्जा , वाचा सविस्तर…
What is Order of Saint Andrew the Apostle conferred upon PM Modi
पंतप्रधान मोदींना रशियात मिळालेल्या ‘सेंट ॲण्ड्र्यू’ सर्वोच्च नागरी पुरस्काराचे महत्त्व काय?
who is victoria starmer solicitor poised to be britains first lady
व्हिक्टोरिया स्टार्मर आहेत तरी कोण? ज्यांना ब्रिटनची फर्स्ट लेडी बनण्याचा मिळणार मान; वाचा सविस्तर
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
Portugal beat Slovenia on penalties sport news
पेनल्टीच्या नाट्यात पोर्तुगालचा विजय; स्लोव्हेनियावर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत

वैयक्तिक आजारपणामुळे शाळेत सहन करावे लागलेले टक्केटोणपे आणि वाट्याला आलेली हेटाळणी यामुळे खचून न जाता अमेरिकेतील जेलन्स आरनॉल्डने आपलंही आयुष्य सावरलं आणि इतरांचंही आयुष्य सावरण्यासाठी मदत केली.

‘अरे कडक्या’, ‘ए बारक्या’, ‘ए ढोले’, ‘ती बघ बोबडी’ अशा अनेक टिप्पण्यांना लहानपणापासून अनेकजण सामोरे जात असतात. शाळेत तर अशी चिडवाचिडवी हमखास चालते. चिडवणारं मूल त्या चिडवण्याला गमतीत घेत असंत, मात्र ज्याला किंवा जिला चिडवलं जातं, तो मुलगा किंवा मुलगी मानसिक त्रास सहन करत असते. हुशार असो किंवा नसो, जाड असो किंवा बारीक असो, उंच असो किंवा बुटका, चिडवणं, हेटाळणी याला तर प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं. त्यातही जेव्हा एखाद्याला इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी सवय किंवा वेगळा मेडिकल प्रॉब्लेम असतो, तेव्हा तर याचा त्रास अधिकच होतो. त्यामुळे कंटाळून शाळा आणि शिक्षणच सोडून देणारे अनेकजण आहेत. मात्र अशातच वेगळा ठरतो जेलन्स आरनॉल्ड!

हेही वाचा >>> बी सेफ बी वाईज

अमेरिकेत जन्मलेला जेलन्स नॉर्मल मुलांसारखा शाळेत जायला लागला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्याला टुरेट सिंड्रोमचं निदान झालं होतं. मेंदूशी संबंधित या आजारात बोलताना आवाज विचित्र येणं, चेहऱ्याच्या अनैच्छिक हालचाली होणं, हातापायाला आणि शरीराला झटके येणं, अशा गोष्टी सतत होत राहतात. यामुळे त्या व्यक्तीच्या लहानसहान हालचालींवर त्याचा परिणाम होतो. हातात वस्तू पकडता येणं, हातात घास घेऊन न सांडता खाणं, पाणी पिणं इतक्या साध्या गोष्टीसुद्धा सततच्या झटक्यांमुळे त्यांना शक्य होत नाहीत. मात्र जेलन्सची ही सुरुवातीची शाळा त्याच्यासाठी छान होती. तिथे त्याला कधीच कोणी चिडवलं नाही, वेगळं वागवलं नाही. त्याच्या सर्व प्रॉब्लेम्ससकट त्याला आहे तसं स्वीकारलं गेलं. दुसऱ्या इयत्तेत असताना त्याला शाळा बदलून मोठ्या शाळेत घालायचा निर्णय घेतला गेला. आणि इथे सगळं गणित बिघडलं. मोठ्या शाळेतली मुलं मात्र त्याला चिडवण्यात अजिबात कमतरता ठेवत नसत. वर्गातला जोकर म्हणून ते त्याला चिडवत असत. त्याच्या शिक्षकांना त्याच्या या मेडिकल प्रॉब्लेमबद्दल कळलं तसं त्याला समजून घेण्याऐवजी त्याच्या एका शिक्षिकेने त्याच्या गळ्यात तसा बोर्डच अडकवून दिला. त्या शिक्षिकेला वाटलं होतं की यामुळे त्याला मदत होईल. बाकीच्या मुलांना कळलं की याला खरीखुरी अडचण आहे, तर ती मुलं कदाचित हे समजून घेऊन त्याच्याशी प्रेमाने वागतील असं त्या शिक्षिकेला वाटलं असावं. मात्र या तिच्या प्रयत्नांचा परिणाम उलटच झाला आणि इतर मुलांनी जेलन्सला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली.

हेही वाचा >>> जुनंच प्रेम, नवं सेलीब्रेशन

जोपर्यंत जेलन्सच्या शाळेतल्या मुलांना त्याच्या मेडिकल कंडिशनबद्दल माहिती नव्हतं, तोपर्यंत ती मुलं त्याला तो मुद्दाम वेडेचाळे करतो आणि वर्गाचा जोकर बनायचा प्रयत्न करतो म्हणून चिडवत होती. जेव्हा त्यांना त्याच्याबद्दल खरं कळलं तेव्हा ती मुलं जेलन्सला आपल्यापेक्षा वेगळं मानायला लागली. त्यातून त्यांनी त्याला जास्त चिडवायला सुरुवात केली आणि त्याच्या मनावर त्याचा इतका परिणाम झाला की त्याची कंडिशन अजून बिघडली. त्याच्या झटक्यांमध्ये तो स्वत:ला इजा करून घ्यायला लागला. इतकं की त्याच्या झटक्यांची तीव्रताही वाढत गेली. त्याच्या डॉक्टरांनी त्याला शाळेतून काढण्याचा सल्ला दिला. काही दिवस त्याच्या पालकांनी त्याला घरी ठेवलं. त्यावेळी केवळ आठ वर्षांच्या असलेल्या जेलन्सने इतरांना हा त्रास सहन करायला लागू नये यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. त्याच्या पालकांनी त्याला पुन्हा जुन्याच शाळेत घातलं आणि जेलन्सने ‘जेलन्स चॅलेंज: बुलिंग नो वे’ अशा नावाने कॅम्पेन सुरू केलं. शाळेत त्यांच्या वेगळेपणामुळे मुलांना होणाऱ्या त्रासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे कॅम्पेन त्याने सुरू केलं. ज्यांना बुलिंगचा सामना करावा लागतो त्यांना धीर देण्यासाठी आणि जी चिडवणारी मुलं असतात त्यांना त्यांच्या चिडवण्याच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देण्यासाठी या कॅम्पेनचा वापर जेलन्स करतो. या कॅम्पेनमार्फत तो ठिकठिकाणी फिरतो, शाळांमध्ये जातो, त्याच्या स्वत:च्या अनुभवाबद्दल बोलतो.

गेली कित्येक वर्ष जेलन्स हे कॅम्पेन नेटाने राबवतो आहे. आता जेलन्स तेवीस वर्षांचा आहे. त्याने वयाच्या आठव्या वर्षी सुरू केलेल्या या प्रयत्नांसाठी त्याला अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. टी.एल.सी. चॅनेलच्या ‘गिव्ह अ लिटल अवॉर्ड्स’चा तो मानकरी आहे. प्रिन्सेस डायना लेगसी अवॉर्ड हा प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विलियम्सच्या हातून मिळालेला पुरस्कार संपूर्ण अमेरिकेत केवळ एकट्या जेलन्सला मिळाला आहे. अशी अनेक अवॉर्ड्स प्राप्त असलेला जेलन्स आरनॉल्ड केवळ शाळेतल्या मुलांसाठीच नव्हे तर अशा पद्धतीने वेगळ्या वागवल्या जाणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्राोत ठरला आहे. जेलन्सची लढाई ही स्वत:पुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याच्या शाळेपासून सुरू झालेला जनजागृतीचा हा प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात विस्तारला गेला आहे. शारीरिक आजार आहे म्हणून जेलन्सची स्वत:ची प्रगतीही कधी थांबली नाही. त्याने त्याचं शिक्षणही सुरू ठेवलं आणि या आपल्यासारखाच आजार असणाऱ्यांना वा व्यंग असणाऱ्यांना केवळ हेटाळणीमुळे येणारं मानसिक नैराश्य आणि त्यातून त्यांच्या आयुष्याची वाटचाल तिथेच थांबून राहू नये यासाठी जेलन्सने केलेले प्रयत्न सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरले आहेत. अनेकांना त्यातून वाट काढण्याची ऊर्जा मिळाली आहे. आणि म्हणूनच जेलनचे छोटया वयापासून केलेले हे प्रयत्न लाखमोलाचे ठरले आहेत.

viva@expressindia.com