तुझ्यावाचून करमेना…!

आज तीन पिढ्यांची मंडळी इंटरनेटपूर्वीचे दिवस आणि इंटरनेट काळाबद्दल तुलना करताना दिसतात. हो

|| गायत्री हसबनीस

इंटरनेट ही संकल्पना आज जगाच्या पातळीवर इतकी रुजली आहे की त्याच्याशिवाय एक सेकंदही आपण बाजूला राहू शकत नाही, कारण सेकंदासेकंदाला जगाच्या पाठीवर काय होतंय याची माहिती आपल्याला हवीच असते. अभ्यासकांच्या मते इंटरनेट या माध्यमाने सर्व वयोगटांतील, सर्व संस्कृतींतील लोकांना एकत्र आणण्याचा चमत्कार घडवला आहे. इंटरनेटने माहिती आणि मनोरंजन यांची नाळ लोकांशी घट्ट बांधली. लोकांच्या कार्यपद्धती सोप्या केल्या. तंत्रज्ञान विकसित झाले आणि गोष्टी भराभर घडू लागल्या.? इंटरनेटच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकायलाही फार वेळ लागत नाही. एकंदरीत लोकांचे करिअर व आयुष्य इंटरनेटने वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. अनेकांना या मायाजालाने एकटं पाडलं तसंच कमकुवतही केलं. अनेकांच्या हातून चुकीची कृतीही घडली. मात्र, या माध्यमाच्या दुरुपयोगापेक्षा सदुपयोगाचे प्रमाण कणभर जास्तच असल्याने इंटरनेट आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. आज ‘जागतिक इंटरनेट दिवस’ आहे, त्यानिमित्ताने या माध्यमाने गेली वीसएक वर्षे आपल्या आयुष्यात जे अढळ स्थान निर्माण केले आहे त्याचा धावता आढावा घेत इंटरनेटची जादू सेलिब्रेट करायला हवी.

जोडली गेलेली नाती

आज तीन पिढ्यांची मंडळी इंटरनेटपूर्वीचे दिवस आणि इंटरनेट काळाबद्दल तुलना करताना दिसतात. होय, खरंच आहे म्हणा ते कारण ज्यांच्या काळात इंटरनेट नव्हते त्यांच्यासाठी तो काळ आणि ज्यांच्या काळात इंटरनेट आले तो काळ सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळच होता आणि आहे. पण या तुलनेपलीकडे गेलो तर नव्या आणि जुन्या पिढीला नव्याने एकत्र जोडले ते याच इंटरनेटने. आज आजी – आजोबांना त्यांची नातवंडे इंटरनेट वापरायला शिकवतात. आजी-आजोबाही आवडीने इंटरनेटचे धडे गिरवताना दिसतात. त्यामुळे तरुण पिढी जेव्हा आपल्या आजी-आजोबांना त्यांच्याच आवडीचे विषय इंटरनेटवर कसे शोधायचे हे शिकवतात तेव्हा पिढीत अंतर आहे असं वाटत नाही. आईवडील आणि त्यांच्या मुलांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतात त्यामुळे दुरावा तिथेही जाणवत नाही. एकीकडे भावाबहिणींचे नाते याच इंटरनेटच्या माध्यमातून  अजूनच दृढ झाले आहे. एकत्र चित्रपट पाहणे, वेब मालिका पाहणे हे तर ओघाने आलेच, पण सेल्फी आणि हितगुज करण्यासाठीही फेसबुक, इन्स्टाग्रामवर एकमेकांना टॅग करून आपले नाते जोपासण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. मित्रमंडळी जेवढी मजा करतात तेवढीच भावंडं करतात. एकमेकांचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. झूमवरून गप्पा, सांगीतिक मैफलींचे घरगुती कार्यक्रमही आयोजले जातात. नातेवाईकांमध्ये ऑनलाइन बौद्धिक चर्चाही रंगतात. त्यामुळे नात्यांचा ओलावा इंटरनेटवर पाहायला मिळत नाही असं कोण म्हणतं? लॉकडाऊनच्या काळात तर या नात्यांना इंटरनेटमुळे वेगळाच ओलावा प्राप्त झाला. 

मार्मिकतेला ‘मीम’वाट मिळाली

आजही पुलं, वपु, आरती प्रभू तरुणाईचे लाडके आहेत. पुलंचे विनोद सोशल मीडियावरून शेअर केले जातात. त्यांच्या कथावाचनाच्या जुन्या व्हिडीओ क्लिप्स हजार वेळा तरी पाहून झाल्या असतील अशी आजची पिढी आहे. याच व्यासपीठावरून स्टॅण्डअप कॉमेडी घराघरात पोहोचली. आणि आपलं म्हणणं मार्मिकतेने मांडायला मीम्सची नवीन वाट मिळाली. राजकीय, सामाजिक, न्याय, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक जाणिवा इथेच तर समृद्ध होऊ लागल्या.? सोशल मीडियाने आणि इंटरनेटने सांस्कृतिक भूक वाढवली. विनोदनिर्मितीची ‘मीम’वाट तरुणाईच्या हातात आली आणि हास्याचे खाद्य चहूकडे मिळू लागले. मीमचा पसारा तर इतका वाढला की जरा काही सामाजिक, राजकीय स्तरावर घडले की मीम्स हे तयारच असतात. किंबहुना अनेकांना मीम्समुळे रोजगारही उपलब्ध झाले, कारण सर्जनशीलतेला तरुण हक्काचा प्रेक्षक या माध्यमातून मिळाला तोही हाऊसफुल्ल ‘वाहवा’ देणारा.

वर्क फ्रॉम होमचे दिवस…

लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना लोकांना अक्षरक्ष: रूटीन करावी लागली. वर्क फ्रॉम होम म्हणजे काय हे माहिती होते, पण इंटरनेटमुळे ते सहजसोपे झाले.? कामातलं काही अडलंय?, ते लगेच गूगल सर्च केलं जाऊ लागलं. अभ्यासासाठी अ‍ॅप संस्कृती मुलांसमोर हजर झाली. मध्यंतरी छडी घेऊन बसणारे कामानिमित्त बाजूला झालेले आईवडील घरातूनच काम करत असल्याने आपल्या पाल्यासोबत बाजूलाच लॅपटॉपचा थाट घेऊन आपली मुलं अभ्यास नीट करतायेत ना?, याकडे आवर्जून लक्ष देऊ लागले. वर्क फ्रॉम होममुळे लोकांना फिटनेसचे वेध लागले. फिटनेस घरी करण्यासाठीदेखील इंटरनेटचा वापर केला गेला. पूर्वी मीटिंग म्हटलं की पटकन काम करून पंधरा मिनिटे आधी मीटिंगला पोहोचण्याची प्रथा होती? आता झूम कॉलमुळे साडेचारची मीटिंग आहे ना मग काय तेव्हाच लॉग इन करू, थोडा उशीर झाला तर वायफाय स्लो होतं म्हणून सांगू. गंमत म्हणजे त्यावर विश्वास ठेवण्यावाचून वरिष्ठांकडेही पर्याय उरला नाही. मैत्रीजनांना आजही विचारलं तर ते आनंदाने सांगतातही, ‘हो! इंटरनेटमुळे वर्क फ्रॉम होम वॉज गोल्डन डेज!’

यंत्र आणि मानवाची मैत्री

आज ‘व्हॉइस कॉल’, ‘मॅपिंग’, ‘व्हॉइस टायपिंग’, ‘व्हिडीओ कॉल’, ‘व्हॉइस चॅटिंग’ म्हणजे आधुनिक काळातील यंत्र आणि मानवाची दोस्ती आहे असंच म्हणावं लागेल, कारण दोघंही एकत्रच असतात. कधी कधी सवंगड्यांच्या मधला दुवा बनतात. कोणा मित्र किंवा मैत्रिणीची आठवण आली, काही महत्त्वाचे सांगायचे झाले तर पटकन व्हॉइस नोट नाहीतर व्हिडीओ कॉल केला जातो. त्यावर रिप्लाय येईल तेव्हा येईल पण या सोयीने मानवाची आणि यंत्राची दोस्ती वाढवली. टाळेबंदीमध्ये तर या मैत्रीला नियमांचेही बंधन नव्हते. ही मैत्री मुकी असली तरी तुझं माझं जमतं म्हणूनच तुझ्यावाचून करमत नाही… अशी अनोखी मैत्री इंटरनेट आणि आपल्यात आज आपण अनुभवतो आहोत. या मैत्रीची भविष्यातील वेगवेगळी बरीवाईट चित्रं आपण साय-फाय सिनेमातून अनुभवलेली आहेत. अगदी यंत्र मानवावर कशी कु रघोडी करतील?, याचं भयचित्रही आपल्यासमोर रंगवलं गेलं आहे. मात्र कितीही काही झालं तरी वास्तवात इंटरनेट नावाची ही जादू सध्या आपल्या आयुष्यात खूप कमालीची ठरली आहे यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Internet is the concept technology developed celebrate the magic of the internet world internet day akp

Next Story
१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट
ताज्या बातम्या