तिच्याकडे मोठय़ा बॅनरचं पाठबळ नाही, कुणी गॉडफादर नाही, सौंदर्यस्पर्धेतला किताब नाही, रूढार्थानं हिंदी चित्रपटसृष्टीतलं स्टार हे बिरुद मिरवण्याचा रुबाबही ती अभावानेच दर्शवते. तरीही तिचे सिनेमे चालतात, ती तरुणाईला भावते. चक्क ‘क्वीन’ बनते. कारण अर्थातच तिचा अभिनय, ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखा आणि भूमिका जगणारी ती. तिची भूमिका आजच्या तरुणाईची भाषा बोलते. बिनधास्त वावरते. कुणी काही म्हणेल म्हणून नाही तर स्वत:ला वाटेल तशीच कृती करते. आजच्या तरुणीप्रमाणे ती आपल्या विचारांशी ठाम असते. कंगना नावाच्या नव्या ‘ट्रेण्ड’विषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका छोटय़ाशा गावातून आलेली ‘ती’ आज तरुणाईच्या मनावर राज्य करतेय. कोणत्याही नटीला हेवा वाटेल अशा प्रकारे तिने आपल्या करिअरचा आलेख उंचावत नेला आहे. ‘हम थोडे बेवफा क्या निकले, आप तो बतचल्लन हो गये’ हे आपल्याच नवऱ्याला सांगणारी तनू असो किंवा ‘में अपने हनीमून पें अकेले आयी हूँ’ असं समोरच्याला बेधडकपणे सांगणारी राणी सध्या तरुणांच्या लाडक्या आहेत. या भूमिका साकारणारी कंगना रनोट तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनू लागली आहे, ते तिच्या लुकमुळे नाही, तर आजच्या तरुणीप्रमाणे आपल्या विचारांशी ठाम राहण्याच्या तिच्या स्वभावामुळे.
हिमाचल प्रदेशातून बॉलीवूडमध्ये ‘हिरॉईन’ बनण्याचं स्वप्न घेऊन आलेली कंगनानं ‘क्वीन’ असल्याचं सिद्ध केलंय. पण हे यश तिच्या चित्रपटांमधील बडा दिग्दर्शक किंवा निर्मात्याच्या नावामुळे मिळालेलं नाही. हे यश त्या व्यक्तिरेखांचं आहे, हे कंगनाही मान्य करते. नाकारलं गेल्याचं दु:ख पचवूनही एकटीच हनीमूनला निघालेली ‘राणी’, एका वेळी चार बॉयफ्रेंड्स बिनधास्त मिरवणारी आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेली ‘तनू’, आपल्या प्रेमासाठी प्रसंगी घरच्यांशी आणि प्रियकराच्या पहिल्या पत्नीशीही लढणारी ‘दत्तो’ या आजच्या तरुणी होत्या. त्यांच्या पेहरावापासून ते त्यांच्या वागण्यापर्यंत, त्यांची भाषा, त्यांची मतं सर्व आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारी होती.
आजची तरुणी पडद्यावर
कंगनाला बेधडक बोलणारी आणि तिच्या विचारांशी प्रामाणिक असलेली तनू आवडली होती. कारण प्रत्यक्ष आयुष्यात कंगना तिच्या नात्यांबद्दल ठाम आहे. बोहल्यावर चढेपर्यंत ज्याच्यासोबत प्रेम असल्याचा दावा करत होती, त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेण्याची धमक तनूमध्ये होती. आई-वडील सांगतात म्हणून नाही, तर स्वत:ला वाटलं म्हणून. दत्तोसुद्धा त्याच विचारांची. ज्याच्याशी लग्न करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाशी भांडली त्यानेच बोहल्यावर उभं असताना ‘मी लग्न नाही करू शकत’ म्हटल्यावर ‘मला हे ठाऊक होतं’ असं म्हणून सहजपणे निघून जाण्याची तयारी, सामथ्र्य तिने दाखवलं.‘मी अबला’ असा भाव तिच्या बॉडीलँग्वेजमधून दिसला नाही. दिसला तो स्पष्टपणा. हा बेधडक स्पष्टपणा मुलींना भावला.
‘आतापर्यंत डबलरोलच्या सिनेमांमध्ये एक जण चांगला आणि एक वाईट असं दाखवलं गेलंय. पण ‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’मध्ये दोघीही स्वभावाने सारख्या आणि ‘अ‍ॅण्टी हिरॉइन’ होत्या. त्यात कुठेही बरोबर किंवा चूक दाखविण्याचा प्रयत्न नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी घडत होत्या,’ असे मुंबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणारी श्रद्धा नंदियार सांगते. ‘क्वीन’मध्येसुद्धा पॅरिसला जाताना ‘मी ट्रिपला जातेय’, असं न म्हणता ‘मी माझ्या हनिमूनला एकटीच आलेय,’ असं ‘राणी’ सांगते. त्यात तिने परिस्थिती स्वीकारल्याचं दिसून आलं. परदेशात तीन मुलांसोबत एकत्र राहताना कोणताही मेलोड्रामा ती करत नाही. दोन्ही चित्रपटांमध्ये नायिकांनी नातं तुटू नये म्हणून हर प्रयत्न केले पण त्यासाठी समोरच्याकडे झुकणे त्यांना पसंत नव्हते. स्वतंत्र करियर करणारी आजची तरुणीसुद्धा हाच विचार करते. ‘मी स्वत: शिकलेली आहे आणि नोकरी करून कमावते आहे. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत मला कोणी नाकारलं तर त्याच्यासाठी रडत बसण्याची माझी तयारी नाही. त्याऐवजी स्वत:चा वेगळा मार्ग निवडण्यास प्राधान्य देईन. हे मला ‘क्वीन’ पाहताना जाणवलं,’ असं इंजिनीअर अपूर्वा जोशी सांगते.
प्रत्यक्ष आयुष्यातही स्पष्टवक्ती कंगना
कंगनाने हा स्पष्टवक्तेपणा केवळ तिच्या व्यक्तिरेखांमध्येच ठेवला असे नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही तिने खरं बोलण्याचं धाडस दाखवलं आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये कित्येकांचा रोषही ओढवून घेतला आहे. बॉलीवूडमध्ये असलेलं पुरुषी वर्चस्वाचं दडपण तिने कधीच घेतलं नाही. कारकीर्दीच्या सुरुवातीला कंगनाने बडय़ा कलाकारांसोबत काम केलं. पण त्याचा उदो उदो न करता ‘मी आत्तापर्यंत सर्वकाही माझ्या मेहनतीवर मिळवलं आहे,’ हे तिचं म्हणणं होतं. कित्येकदा ऑफिसमध्ये काम करताना पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागतो. आपल्या कामाचे श्रेय मिळत नाही, मग अशा वेळी स्वत:च्या निर्णयावर ठाम असणारी कंगना त्यांना आपलीशी वाटू लागली. ‘मुली त्यांचे विचार ठामपणे मांडू शकत नाहीत, असं सतत म्हटलं जातं. पण कंगनाने नेमकी तीच चौकट मोडली. ऑफिसमध्ये कित्येकदा मला काही खटकलं तर बोलता येत नाही. गप्प राहणं मी पसंत करते. म्हणूनच कदाचित मला तिचं आकर्षण वाटतं,’ मुंबईची प्रिया जालन मान्य करते.
नवरा रेडिओ स्टेशनवर काम करत असल्याने प्रत्यक्ष कंगनाला भेटलेल्या पल्लवी डिसिल्व्हाने कंगनाचा स्पष्टवक्तेपणा अनुभवला आहे. ‘मुलाखतीसाठी ती माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आली होती, तेव्हा तिला भेटायची संधी मिळाली होती. तिच्यातला प्रामाणिकपणा जाणवला. पडद्यावरची ती आणि प्रत्यक्षातील तिच्यातील पडदा गळून पडला,’ असे ती सांगते. आज परीकथेतील राजकुमाराची स्वप्ने पाहणाऱ्या ‘हिरॉईन’पेक्षा खऱ्या आयुष्याचा आरसा दाखवणारी ‘अभिनेत्री’ आपल्याला भावत असल्याचं तरुणांना सांगायचंय. त्यामुळे कंगनाचं ‘क्वीन’ होणं आश्चर्याची बाब नक्कीच नाही.
मृणाल भगत-viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut youth first choice
First published on: 12-06-2015 at 01:30 IST