आता तर सिद्धच झालं की! वेस्टर्न फॅशनमधल्या महागातल्या महाग ब्रँडने चक्क पॅरिसच्या मिलान रॅम्पवर आपल्या मॉडेल्सना कोल्हापुरी चप्पल दिल्या. पण क्रेडिट तेवढं कोल्हापुरीला द्यायचं विसरले! सगळं इंटरनेट त्याच चर्चेने भरून गेलं. सेलेब्रिटींनी आपल्या कोल्हापुरी चपला दाखवत त्यांना ‘ओजी कोल्हापुरी’ असा टॅगही दिला. कोल्हापुरी चपलांचा जी. आय. टॅग आणि सोशल मीडियाचे हॅशटॅग यामुळे अखेर ते क्रेडिट कोल्हापुरीला मिळालं. त्यानिमित्ताने जगभर कोल्हापुरीची चर्चा झाली आणि ‘कोल्हापुरी’ हा इंटरनॅशनल ट्रेण्डिंग विषय बनला.
पिढ्यानपिढ्या कोल्हापूरचे कारागीर या टिपिकल कोल्हापुरी चपला बनवत आहेत. वेगवेगळ्या रंगाचे लेदर, टो लूप आणि बेल्टला गोंडा असलेल्या टिपिकल कोल्हापुरी चपला केवळ पुरुष नाही तर बायकांच्याही पायात सहज दिसतात. त्याला वेगन लेदरमध्ये बनवून, वेगवेगळ्या पेस्टल शेड्समध्ये आणून, जरीकाठ आणि सीक्वेन्स लावून, वेगवेगळ्या रंगाचे गोंडे लावून कोल्हापुरी चपलांना अगदी ब्रायडल लुकपर्यंत पोहोचवण्याचं कामही भारतीय डिझायनर्सनी केलं. हाय हिल्स नसलेल्या या फ्लॅट चपला फॅशनच्या कोणत्याही सेट पॅरामीटर्समध्ये बसत नाहीत. त्यांनी स्वत:चं स्टँडर्ड स्वत:च सेट केलं. युनिसेक्स वापरता येणाऱ्या ओ. जी. कोल्हापुरी ही भारताने जगाला दिलेली भेट आहे. कोल्हापुरी हा स्वत:च एक ट्रेण्ड आहे जो कधी आऊटडेटेड होत नाही आणि त्याचा मूळ ढाचा कधीही बदलत नाही. भारतातले लोक पायात कोल्हापुरी चपला घालून जगभर जायला लागले आणि खरं तर कोल्हापुरीची ओळख जगभर झाली. बाहेरचे डिझायनर्स ‘इन्सपिरेशन’साठी भारतात येतात, तेव्हा भारताचे अनेक टिपिकल ट्रेंडस, जे बाहेर जाऊन फॅशन बनतील याची कल्पनाच कोणी केली नसेल असे, लेबलिंग बदलून बाहेर घेऊन जातात. मात्र कोल्हापुरी हे स्वत:च एक फॅशन स्टेटमेंट आहे. त्यामुळे कोल्हापुरी ओळखू येणार नाही असं जगभरात कुठेही शक्य नाही.
टॅन लेदर, ऑरेंज टॅन लेदर, ब्लॅक लेदर, डीप मरून लेदर, मस्टर्ड टॅन लेदर आणि नॅचरल लेदर यामधून बनणारी आणि बेल्टवर लाल किंवा ऑरेंज गोंडा मिरवणारी पारंपरिक कोल्हापुरी अगदी वारकरी आजीपासून ते डबेवाल्या काकांपर्यंत आणि स्ट्रीटवेअरपासून ते ब्रायडल फूटवेअरपर्यंत सगळ्यामध्ये झळकते. कोल्हापुरी बनवण्याची ऐतिहासिक पद्धत, तिचा ठरावीक ढाचा आणि तिच्या शिवणीचा टाका यांमुळे ती ठळकपणे ओळखू येते. पूर्णपणे हाताने बनवली जाणारी कोल्हापुरी चप्पल, दगड, माती, रेती, ऊन, वारा, पाऊस सगळ्या वातावरणाला सहन करून टिकून राहील अशी कोल्हापुरी महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत आहे. एकेकाळी राजे-महाराजांनी नावाजलेली आणि कौतुक केलेली कोल्हापुरी काळाच्या ओघात प्रत्येक कॉमन मॅनच्या दिवसाचा आणि अभिमानाचा भाग बनून गेली. अनेक इंडियन डिझायनर्सनी त्यांच्या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये डिझायनर कोल्हापुरीचा समावेश केला आहे. जरीकाठाचा बेल्ट, एम्ब्रॉयडरी केलेले बेल्ट, बीड्स लावलेले, हँडपेंटेड बेल्ट अशा अनेक व्हरायटी यामध्ये येतात. टो-लूपला मणी, घुंगरू, लटकन किंवा बेल्टच्या शिवणीवर लटकन, घुंगरू किंवा एकापेक्षा जास्त गोंडे लावून ट्रॅडिशनल कोल्हापुरी चपलांना फेस्टिव्ह टच दिला जातो. वेगवेगळ्या आकार, साईज, रंग आणि डिझाईनच्या लेस लावल्या जातात. टो-लूपसोबतच एक फिंगर लूप किंवा ब्रेडेड पट्टीसुद्धा नवीन देण्याचं डिझाइन पारंपरिक कोल्हापुरी चपलांनीच आणलं. कोल्हापुरीचा ब्रॉड बेल्ट, लूप किंवा पट्टी ही ब्रेडेड करून म्हणजे चक्क वेणीसारखी विणून तिच्यातली कलात्मकता अजून वाढवली जाते. टिपिकली हे सगळंच हातानेच केलं जातं. त्यामुळे हँडमेड क्राफ्टच्या यादीत कोल्हापुरी चपलांचा समावेश होतो.
भारतातल्या अनेक डिझायनर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने मॉडीफाय करत कोल्हापुरी आपल्या कलेक्शनमध्ये वापरली. मात्र जेव्हा वेस्टर्न फॅशन ब्रँडने थेट नाव बदलून त्यांना रॅम्पवर आणलं आणि लाखो रुपयांना स्वत:च्या वेबसाइटवर विकलं, तेव्हा त्यांनी आपल्या परंपरेचा अपमान केल्याचं सोशल मीडियाच्या लक्षात आलं. त्यातून एक टर्म अचानक प्रकाशझोतात आली ती म्हणजे ‘कल्चरल अॅप्रोप्रिएशन’. मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या संस्कृतीच्या लोकांनी कमी प्रमाणात असलेल्या, कमी प्रसिद्ध असलेल्या संस्कृतीतून पारंपरिक गोष्टी, संस्कृतीची वैशिष्ट्ये यांची फर्स्ट-कॉपी बनवणं आणि त्याला स्वत:च्या फायद्यासाठी वापरणं याला म्हणतात कल्चरल अॅप्रोप्रिएशन. या फर्स्ट-कॉपी बनवतेवेळी कोणतंही क्रेडिट दिलं जात नाही, ओरिजिनल संस्कृतीची ओळख सांगितली जात नाही आणि त्यांना समाविष्टही करून घेतलं जात नाही.
यानिमित्ताने, चर्चेत आलेल्या कल्चरल अॅप्रोप्रिएशनच्या संकल्पनेनुसार पाहिलं तर अनेक असे ट्रेण्ड्स आहेत जे भारतातून किंवा आशियाई देशांमधून परदेशात गेले आहेत किंवा नेण्यात आले आहेत. सगळ्यांनाच नावाजलं गेलं नसलं तरी यानिमित्ताने कोल्हापुरी जगभर चर्चेत आली आणि जी. आय. टॅग असूनही ओरिजिनॅलिटीच्या युद्धात प्रत्येकाला उतरावंच लागणार हेही सिद्ध झालं.
viva@expressindia.com