लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात भेटलेली सिंड्रेला आठवतेय का? तिचा सुंदर निळा गाऊन, काचेचे बूट, जादुई गॉडमदर आणि प्रिन्स चाìमग हे सगळं डोळ्यासमोर येतं. पण समजा निळ्याशार, झगमगत्या गाऊनऐवजी सिंड्रेला कडक इस्त्रीचा सफेद शर्ट आणि आकाशी फ्लेअर स्कर्ट घालून आली तर? स्वप्नांच्या दुनियेतून खाडकन जागवून कोणी तरी प्रत्यक्षात आणल्यासारखं होईल. गेले कित्येक वष्रे, कित्येक पिढय़ांना भुरळ घालणाऱ्या, कित्येक मुलींच्या कल्पनाविश्वाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रिन्सेसपकी एक सिंड्रेला. लहानपणी प्रत्येकीला तिच्यासारखं व्हावंसं वाटायचं. एखाद्या दिवशी घरातल्यांशी चिडून, गाल फुगवून कोपऱ्यात उदास बसलेली असताना आपलीही जादुई गॉडमदर येईल आणि आपल्यालासुद्धा सुंदर गाऊन आणि काचेचे बूट देईल, हे स्वप्न रंगवत कित्येकींची बालपणं गेली. याच मुली तरुण झाल्यावर करिअर, शिक्षणासाठी रोजची धावपळ करताना त्यांना सिंड्रेलाबद्दल आवर्जून एक प्रश्न पडतो, ‘हे सगळं ठीक आहे, पण काचेच्या हिल्समध्ये ती रात्रभर चालू कशी शकली? तिच्या वजनाने हिल तुटला असता तर? आणि मुख्य म्हणजे शू बाईटचं काय?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेताना मगाशी नमूद केलेली सुटसुटीत कपडय़ांमधील सिंड्रेला हळूहळू साकारली जाते. आजच्या काळच्या नव्या सिंड्रेलाचं रूप काहीसं असंच आहे. परीकथेतील रोमँटिसिझम तिच्या स्वभावात आहेच, पण त्याचबरोबर ती थोडी बिनधास्त आहे. सिंड्रेलाच्या ऑफ शोल्डर गाऊन डोकावणारा तिच्या खांद्यावरचा टॅटू तिच्यातील बंडखोरीपणाची आठवण करून देतो. परिस्थितीनुसार स्वत:ला बदलण्याची तयारी तिच्यात आहे, पण त्याच वेळी काचेच्या हिल्सऐवजी सुटसुटीत स्नीकर्स घालायलासुद्धा ती मागेपुढे पाहत नाही.

यंदाच्या ‘कॅन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने तिच्यातील सिंड्रेलाचं दर्शन देऊन सगळ्यांना थक्क केलं होतं. लांब फ्लेअर असलेल्या बलून शेप आकाशी गाऊनमध्ये ती सिंड्रेलालासुद्धा तगडी स्पर्धा देत होती. तिच्या या गाऊनची चर्चा तर सोशल मीडियावर झालीच, पण त्याहीपेक्षा एका महत्त्वाच्या प्रश्नाने लोकांना सतावलं. ‘एवढय़ा भल्यामोठय़ा गाऊनमध्ये ऐश्वर्या नेमकी चालली कशी, बसली कशी?’ आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणून तिचा गाडीतून उतरतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला होता. यंदा ‘मीट गाला’च्या वेळेस अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेल्या गाऊनचीसुद्धा अशीच चर्चा रंगली. खाकी रंगाच्या लांब ट्रेल असलेला ट्रेंच गाऊन चच्रेचा विषय ठरलाच. पण त्याच वेळी एका मुलाखतीत प्रियांकाने स्वत: कबूल केलं, की ‘रेड काप्रेटवर मिरविण्यापर्यंत ठीक आहे, पण नंतर हा भलामोठा पदर पार्टीत कसा सांभाळणार?’ हा प्रश्न होताच. त्यामुळे रातोरात कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच तिच्या सूचनेवरून डिझायनरने गाऊनचा खालचा ट्रेल झिपच्या साहाय्याने वेगळी करण्याची सोय तिला करून दिली. त्यामुळे रेड काप्रेटवर गाऊनवर आलेली प्रियांका नंतर अख्ख्या कार्यक्रमाची मजा शॉर्ट ड्रेसमध्ये अनुभवू शकली. हे आहे आजच्या सिंड्रेलाचं स्वरूप. मागचं वर्ष कम्फर्ट ड्रेसिंगच्या उबदार कुशीत गेलं. ढगाळ पलॅझो, कॉटन पँट, फ्लेअर मॅक्सी, सुटसुटीत शर्ट ड्रेस, लेिगग हे आणि असे कित्येक आरामदायी कपडय़ांचे ट्रेंड गेल्या वर्षभरात पाहायला मिळाले. आता मात्र वर्षभराचा आळस मागे टाकून फॅशनने कात टाकली आहे. फ्लेअर स्कर्ट्स, फ्लोरल शर्ट्स, मिनी ड्रेस, समर ड्रेसेस पुन्हा डोकावू लागले आहेत. पेस्टल शेड्स, नेट, लेससारखे मखमली कापड परत येऊ लागलं आहे. न्यूड लुकला मागे टाकत फॅन्सी मेकअप, ग्लिटर, शिमर ट्रेंड येतोय. ब्युटी, हेअरस्टाइलमध्ये प्रयोग करायला तरुणाई मागेपुढे पाहत नाही. ही नांदी आहे, नव्या विलासी फॅशनची. हा बदल आला, हातात खुळखुळणाऱ्या पशांमुळे आणि तो खर्च करण्याच्या मुक्त स्वातंत्र्याच्या भावनेतून. १९५०च्या दशकाच्या सुरुवातीला जग दोन महायुद्धाच्या अनुभवातून बाहेर पडत होतं. परिस्थिती कुठे तरी स्थिरस्थावर होत होती. अशा वेळी, तरुण स्त्री-पुरुषांना पुन्हा त्यांचे कपडे, लुक यामध्ये टंचाई, अपूर्णतेची जाणीव नको होती. ऐषोआरामावर वाट्टेल तितका पसा खर्च करायची त्यांची तयारी होती. अशा वेळी ‘डिओर’सारख्या ब्रँडचा जन्म झाला. घेरेदार गाऊन, उंची कापड, डिटेिलग कपडय़ांची सुरुवात झाली. आज तोच ब्रँड आजच्या तरुणीचा विलासीपणा लक्षात घेता, तिला घेरेदार, लेसचा स्कर्ट देतोच पण तिची सोय लक्षात घेऊन सोबत साधासा सफेद टी-शर्ट देतो.

स्वतंत्र करिअर्स, मोकळं वातावरण, गलेलठ्ठ पगार यामुळे आजच्या तरुणाईची चनीची वृत्ती वाढली आहे. पण त्याच वेळी या गोष्टी विकत घेताना ते आपल्या सोयीचा विचारही आवर्जून करतात. त्यामुळे आज पन्नाशीचा रोमँटिसिझमचा काळ परत येत असला, तरी त्यातील कम्फर्ट ही महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून मिळालेला बोल्डनेससुद्धा त्यांच्या लुकमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. उदाहरण घ्यायचं झाल्यास कॅन फेस्टिव्हलमध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोनचा पर्पल गाऊन या रोमँटिसिझमचं उत्तम उदाहरण होतं, पण त्याच वेळी पारदर्शक कापडातील या गाऊनच्या आतून डोकावणारी नाजूक एम्ब्रॉयडरी तिच्यातील बोल्डनेस व्यक्त करत होती. बलून स्लीव्ह, ऑफ शोल्डर ड्रेस यांची सांगड फॉर्मल्ससोबत घातल्यास ते ऑफिसमध्ये उठावदार दिसू शकतात, हे डिझायनर्सनी यंदा सिद्ध केलंय. गुलाबी रंगाचा बोल्डनेस आपण मागच्या आठवडय़ात पाहिलाच. पेन्सिल स्कर्ट, ट्रेच कोटच्या धारदार लुकला नजाकततेची किनार फ्लोरल, नाजूक िपट्र्सने दिली गेली आहे. मागच्या काही वर्षांपासून लग्नामध्ये नववधूला भरजरी लहंग्यांऐवजी सुटसुटीत पोशाख देण्याची सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारंपरिक साडय़ांना पसंती मिळू लागली आहे. आजच्या सिंड्रेलाला रोज ऑफिसमध्ये मीटिंग्स असतात. थकून घरी आल्यावर फॅन्सी ड्रेस घालून पार्टीमध्ये जाण्यापेक्षा ‘नेटफ्लिक्स अँड चिल’ म्हणत आइसक्रीमचा डबा संपवायला ती पसंती देते. पण म्हणून तिच्यातली राजकुमारी हरवली नाही. फॉर्मल शर्टसोबत गळ्यात घातलेला क्रिस्टल नेकपीस याची साक्ष देतो.

viva@expressindia.com