दगडासारख्या कठीण माध्यमाला अतिशय कौशल्यानं आणि नजाकतीनं हाताळणाऱ्या मोजक्याच भारतीय स्त्री शिल्पकारांपैकी ती एक आहे. केवळ कलेच्या हस्तिदंती मनोऱ्यात न राहता सामाजिक जबाबदारीचं भानही जपणारी ही कल्लाकार आहे शिल्पकार रुपाली मदन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या कलाक्षेत्रात शिल्पकार रुपाली मदन हे नाव परिचित आहे. मूळची मुंबईकर रुपाली आणि तिचा नवरा गौतम पाटोळे हे कलाकार जोडपं सध्या पनवेलला राहातं. सध्या रुपालीची स्वयंसेवी संस्था ‘इरा’ ही पनवेलच्या आसपासच्या गावांतल्या आणि तळागाळातल्या महिलांसोबत काम करते आहे. कलेसोबत सामाजिक कामाची आवड असल्यानं पूर्वी धारावीतल्या किंवा खारच्या महिलांसाठी तिने काम केलं होतं. वीरची आई झाल्यावर वर्षभरानं तिने इथल्या महिलांसाठीही काम करणं पुन्हा सुरू केलं. मग हळूहळू इथल्या महिला, गावांची ओळख होऊ  लागली. सिडकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी इथल्या गावकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यांचे पैसे मिळाले तरी भविष्याची तरतूदही व्हायला हवी. त्यामुळं गुणवत्ता असेल तर प्रकल्पग्रस्तांना काही संधी मिळू शकतील, असं निदर्शनास आल्यानंतर ‘सिडको तारा’चा जन्म झाला. त्याअंतर्गत या गावकरी महिलांना रोजगार प्रशिक्षण देणं, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करणं हे तिचं काम सुरू आहे. त्याआधी रुपालीनं नवी मुंबई आर्ट फेस्टिव्हल, नवी मुंबई फोटो फेस्टिव्हलसह विविध कार्यशाळांचं आयोजन केलं होतं. तिच्या कामाची यादी पहिल्यांदा वाचली की तिच्या कलावर्तुळाचा परीघ किती विस्तारलेला आहे याची प्रचीती येते.

कला आणि त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं भान हे रुपालीला स्वत:च्याच जीवन प्रवासातून आलं असावं बहुधा.. रुपालीचं लहानपण जीवनसंघर्षांना तोंड देत घडलं आहे. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवल्यावर डोंगराएवढय़ा अडचणींचा सामना करत ती पुढेपुढे जात राहिली. तिने मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी घेतली. कलेची आवड उपजतच असल्यानं तिने बंगलोरच्या ‘केपीजे प्रभू आर्टिशन्स ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’मध्ये शिल्पकला शिकण्याचं ठरवलं. हा अभ्यासक्रम कॅनरा बँक  पुरस्कृत करते. पंचावन्न मुलांमध्ये या एकटय़ा मुलीनं जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. लाकूड आणि दगड, धातू, टेराकोटा आदी माध्यमांमध्ये ती शिल्प घडवायला शिकली. ‘या माध्यमांत काम करताना मनाची एकाग्रता वाढते, भोवतालच्या जगाचा विसर पडतो. या विषयांचं प्रशिक्षण आपल्याकडच्या कलाविद्यार्थ्यांना सहजासहजी मिळत नाही, ते शिक्षण सुदैवानं मला मिळाल्यानं माझ्या आयुष्यात कलानंदाचा आणि कलाप्रवासाचा श्रीगणेशा झाला,’ असं ती म्हणते.

बंगलोरहून परतल्यावर कॅनरा बँकेकडून मिळालेल्या कर्जाच्या आधारे तिनं कामाला सुरुवात केली. गतिमंद मुलं, अंध महिला, महिला कैदी आदींना शिल्पकला शिकवायला सुरुवात केली. स्वयंसेवी संस्थांसाठी केलेल्या या कामातून पैसे फारसे मिळाले नाहीत, पण आत्मविश्वास आला. ‘आपण यांना शिकवू शकतोय आणि शिकवण्याचा आनंद घेऊ  शकतोय,’ ही महत्त्वाची गोष्ट तिला कळली. तिची ‘स्व’शी जणू नव्यानं ओळख झाली. या सगळ्या गोष्टींनी त्या काळात ती श्रीमंत होत होती. रुपाली सांगते की, ‘या लोकांनी तयार केलेल्या मातीच्या वस्तू भाजण्यासाठी भायखळ्याच्या फर्निसमध्ये जायचे. तिथल्या छोटूभाईंना माझी धडपड जाणवली. एक दिवस ते मला ताडदेवच्या आर्टडेश या आर्ट गॅलरीत घेऊन गेले. तेव्हा मला जाणवलं की, या स्तरावरचं काम मी शिकले आहे पण अजून इथपर्यंतचा प्रवास करणं बाकी आहे.. त्यांनी माझं काम पाहिलं. मला काही काम करायला दिलं आणि माझी पहिली कमाई झाली. त्यानंतर माझ्या कलाप्रवासातला एक टप्पा होता  माझं पहिलं कलाप्रदर्शन. हे प्रदर्शन भर पावसात झालं. कारण एका कलाकाराने त्यांचं प्रदर्शन रद्द केलं होतं. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मांडलेल्या या प्रदर्शनातली बरीच शिल्पं विकली गेली. प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. मग तिनं मागं वळून पाहिलंच नाही. लवासा, अ‍ॅम्बी व्हॅली आदी प्रकल्पांसह अनेक नामवंत आणि आर्ट कलेक्टर्सनी तिच्या कलेला दाद दिली.

काम करताना एक दृष्टिकोन तिनं कायम ठेवला की, त्यात सहजता असावी. ते कंटाळवाणं नसावं. मातीत भर घालत घालत शिल्प घडतं, तर लाकूड किंवा दगडात कोरणं महत्त्वाचं असतं. एकदा कोरलं गेलं की पुन्हा काहीच करता येत नाही. त्यामुळं त्यात काम करताना डोक्यात त्या कामाची प्रतिमा पूर्णपणं तय्यार हवी. ती सांगते की, ‘पारंपरिक शिल्पालाच थोडा रस्टिक टच दिल्यास त्यात वेगळेपणा येईल,’ असा विचार केला. उदाहरणार्थ, शिव हे शिल्प एका दगडात चार भाव दिसतील असं घडवलं. समकालीन, वास्तववादी आणि पारंपरिक कलेचा संगम साधायचा प्रयत्न केला. कलाप्रेमींचा आणि एकंदरच लोकांचा कल समजल्यानं तशा कलाकृती घडवत गेले. एका अधांतरी हातात रुद्राक्षाचे मणी ठेवले नि शिल्पाला नाव दिलं ‘निरंतर ध्यान’. असे वैविध्यपूर्ण हात घडवण्याचं काम खूप केलं. मग ते मदतीचे हात असतील किंवा हाताच्या कोपऱ्यावर विचार करणारी बाई असेल.. ही शिल्पं घडवताना मी वेगवेगळ्या दिशांनी विचार करते. ते लिहून काढते. मग त्यासाठी माध्यम ठरवते नि कामाला सुरुवात करते. मी दगडात सर्वाधिक काम केलंय. लाकडातही केलंय, पण त्यात काही मर्यादा येतात. गेल्या वर्षी एक आठ फुटी दगडी शिल्प मी परदेशी पाठवलं. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा ‘उत्कृष्ट शिल्प’ हा पुरस्कार माझ्या ‘ग्लोबल पीस’ या दगडातल्या कलाकृतीला मिळाला आहे, असं तिने सांगितलं.

‘जहांगीर आर्ट गॅलरी’ते ‘ललित कला अकादमी’ अशा विविध ठिकाणी तिची कलाप्रदर्शनं भरली आहेत. आतापर्यंत दत्ता पाडेकर, ब्रिंदा मिल्लर यांसह अनेकांची दाद तिला वेळोवेळी मिळाली आहे, मिळते आहे. आर्टिस्ट सेंटरमध्ये झालेल्या प्रदर्शनात अजंता-एलोराच्या लेण्यांची शिल्प साकारत एरवी फारसं न केलं जाणारं टेराकोटाच्या माध्यमात दोन-तीन फुटात काम तिने केलं होतं. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी तिच्या या कामाचं कौतुक केलं. आर्ट गॅलरीजवळ व्यंगचित्र काढणाऱ्या आर्टिस्टना तर कधी कोणाला परदेशी कलाप्रदर्शनं बघताना तिची हमखास आठवण येते. या मंडळींचा हा विश्वास तिला खूप महत्त्वाचा वाटतो. रुपालीला आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

रुपालीच्या घरात कलेचं वातावरण आहे. नवरा गौतमची आर्ट गॅलरी आहे. मात्र केवळ कलेच्या हस्तीदंती मनोऱ्यात रमण्यापेक्षा अजूनही खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, हे जाणवून तिनं कला महोत्सव भरवणं सुरू केलं. ती सांगते की, ‘माझा कलाप्रवास एकटीनं करण्यापेक्षा अनेकांना सोबत घेऊन करणं अधिक आनंददायी वाटतं. सांघिक शक्तीवर मी भर देते. त्यातूनच ‘इरा’ या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. कला शिक्षणातून करिअर घडवलं जातं. भारतीय पारंपरिक कलागुणांचं जतन करून त्यांना पुनरुज्जीवित करून समाजासमोर आणण्याच्या दृष्टीनं तिचे प्रयत्न सुरू असतात. अल्पशिक्षित महिला, शाळकरी मुलींना प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्यांना केवळ रोजगाराभिमुख न करता त्यांचा एकूणच व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर भर दिला जातो.’ रुपाली पुढे सांगते की, आपली कला इतरांना शिकवण्याचा आनंद मोठा आहे. अंधांना शिकवताना विविध गोष्टी, वस्तूंची उदाहरणं देत मण्यांची माळ, राख्या तयार करायला सांगायचे किंवा गतिमंदांना शिकवताना त्यांना समजून घेणं आणि त्यांनी साकारलेल्या कलेला दाद देणं, त्यातून त्यांना मिळालेला आनंद बघणं. या आनंदाची परिभाषा खूपच वेगळी आहे. महिलांना शाडूचे गणपती घडवायला शिकवणं आणि त्यांच्या स्वनिर्मितीचा आनंद पाहणं, हाही अनमोल क्षण होता. हा शिकवण्याचा प्रवास मलाही खूप अनुभवसमृद्ध करून गेला,’ असं ती म्हणते. गेल्या वर्षी ओबेरॉय हॉटेलसाठी टेराकोटाचे सहा हजार गणपती घडवून दिल्याचेही तिने सांगितले.

‘सुरुवातीच्या कला प्रवासात कला हेच पॅशन होतं. पुढे लग्न, संसार सुरू झाला. वीरचा जन्म झाल्यावर जवळपास वर्षभर माझा मोबाइल बंदच ठेवला होता. आईपणाचा प्रवास एन्जॉय करून पुन्हा कामाला सुरुवात केली,’ असं सांगणाऱ्या रुपालीचा आता स्वत:चा आर्ट स्टुडिओ आहे. यंदा ‘इरा’ला काळाघोडा महोत्सवामध्ये सहभागी व्हायची संधी मिळणार असून त्याची तयारी सुरू आहे. ‘अ‍ॅपरल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ मध्ये तिला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे. रुपालीला आपल्या कलांचं जतन करायचं आहे. त्यासाठी कलाजाणिवा असणारी एक फळी तयार करायची आहे. २०१९ मध्ये तिचं कलाप्रदर्शन जहांगीरमध्ये भरणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपल्या कलाप्रवासाला एक वेगळी दिशा देणाऱ्या रुपालीला हार्दिक शुभेच्छा.

viva@expressindia.com  

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Craftsman rupali madan navi mumbai arts
First published on: 15-09-2017 at 00:37 IST