थंडीचा महिना म्हणजे तरुणाईसाठी पार्टीचा महिना.. थंडगार वाऱ्यात गरमागरम, चटपटीत पदार्थ खाण्याचे, खिलवण्याचे हे दिवस. अनेक जण या दिवसांमध्ये बॅगपॅक करून भ्रमंतीला निघतात. मन मानेल तिथे राहायचं, आवडीचं खायचं किंवा बनवून एकत्र खात धम्माल करायची हा या दिवसांचा फंडा. थंडीचा मोसम आता कुठे सुरू झाला आहे. गार गार हवेने आपल्याला मऊ दुलईत बंदिस्त करण्याआधी घरच्या घरी करता येतील, अशा चटकदार पदार्थाच्या रेसिपीज खास आपल्यासाठी शेअर केल्या आहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी..

फ्युजन दाबेली

साहित्य : पाव (पावभाजीचे) ८-१०, अनाराचे दाणे पाव वाटी, भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, उकडलेला बटाटा १ नग, बारीक चिरलेला कांदा २ चमचे, मेयॉनीज सॉस १ चमचा, चीज स्लाइस ४ नग, चिली फ्लेक्स १ चमचा, मिक्स हर्बस् १ चमचा, लिंबाचा रस १ चमचा, तळलेले नुडल्स पाव वाटी

कृती : सर्वप्रथम बटाटा, चिमूटभर मीठ, मेयॉनीज सॉस, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, चीज स्लाइस, कांदा, मिक्स हर्बस् एकत्र करून घ्या. त्यानंतर पावाला मधून काप देऊन त्यामध्ये तयार केलेले बटाटय़ाचे मिश्रण त्यावर अनार दाणे, शेंगदाणे घालून त्यात तळलेले नुडल्स घालून चांगले भाजून सव्‍‌र्ह करा.

भरता बिर्याणी

साहित्य : भरिताचे वांगे   १ नग, तांदूळ १ वाटी, पातीचा कांदा १ वाटी, कोिथबीर, मलाईचे दही अर्धी वाटी, साखर चवीनुसार, मोहरी १ चमचा, बारीक चि. लसूण २ चमचे, मीठ चवीनुसार, तेल ४ चमचे, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, लिंबू १ नग

कृती : सर्वप्रथम दीड वाटी पाणी गरम करून उकळी आल्यावर त्यात २ चमचे तेल, हिंग, मीठ घालून अध्रे लिंबू पिळा. नंतर यात धुतलेले तांदूळ घालून मंद आचेवर भात शिजत ठेवा. तोपर्यंत वांगं भाजून त्यात अर्धी वाटी मलाईचे दही, बारीक चिरलेला पातीचा कांदा १ वाटी, चवीनुसार मीठ, कोिथबीर घालून मिश्रण एकत्र करा. त्यावर हिंग, मोहरी, हळद, बारीक चिरलेला लसूण याची फोडणी द्या. भात पूर्णपणे शिजल्यावर दुसऱ्या एका भांडय़ात एक भाताचा थर दुसरा भरिताचा थर असे लावून पुन्हा १५ ते २० मिनिटे मंद आचेवर गरम करा किंवा मायक्रोव्हेव प्रूफ भांडय़ात अशाच प्रकारे बिर्याणी लावून थोडे पाणी शिंपडा व ३२ मिनिटे गरम करून सव्‍‌र्ह करा.

टोफू काठी कबाब

साहित्य : टोफू  १ वाटी, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, कणीक अर्धी वाटी, चाट मसाला १ चमचा, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, कसुरी मेथी १ चमचा तिखट, मीठ चवीनुसार, कोिथबीर, तेल, सूप स्टीक्स ५-६  नग, आमचूर पावडर १ चमचा, ब्रेड क्रम्स पाव वाटी

कृती : टोफू किसून घ्या. नंतर त्यामध्ये आलं-लसणाचा मसाला तयार करून घाला. नंतर त्यात भाजलेली कणीक व कॉर्नस्टार्च घालून गोळा तयार करा व तो गोळा सूप स्टीक्सला लावून ब्रेड क्रम्सवर घोळवून डीपफ्राय करून चाट मसाला घालून सव्‍‌र्ह करा.

मोझेरोला राईस रोल

साहित्य : तांदूळ  २ वाटय़ा, मोझेरोला चीज  १ स्लॅब, मिक्स हर्बस्  १ चमचा, पनीर पाव वाटी, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, हिरवी मिरची  २-३, व्हिनेगर  १ चमचा, साखर  चवीनुसार, लिंबू  १ नग, मीठ चवीनुसार

कृती : सर्वप्रथम पनीरमध्ये मीठ, लिंबू, साखर, कोिथबीर घालून कुस्करून घ्या. मोझेरोला चीजच्या लांब स्लाइस कापून तव्यावर ठेवा. थोडय़ा वितळल्यावर त्यात पनीरचा मसाला घालून गरम असतानाच रोल करा. एका दुसऱ्या भांडय़ात पाणी उकळत ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण, मीठ, लिंबू, व्हिनेगर, साखर, मिक्स हर्बस् घालून तांदूळ घाला. तांदूळ ८० टक्के शिजल्यानंतर त्यात तयार रोल्स घालून मंद आचेवर भात शिजवून घ्या.

व्हेजिटेबल बेक रोल

साहित्य : कणकेचा गोळा २ वाटय़ा, बारीक चिरलेले पनीर अर्धी वाटी, बारीक चिरलेल्या भाज्या अर्धी वाटी, (गाजर, फ्लॉवर, फ्रेंचबीन्स), कांदा   १ नग, पालक अर्धी वाटी, उकडलेला बटाटा १ नग, टोमॅटो कॅचअप, ४ चमचे, सूप स्टीक्स ४ नग, हळद, तिखट चवीनुसार, कसुरी मेथी अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, कोिथबीर ४ चमचे, आमचूर पावडर १ चमचा, धणे-जिरे पावडर १-१ चमचा, मीठ, साखर चवीनुसार, कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी, ब्रेड क्रम्स अर्धी वाटी, दूध पाव वाटी

कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी उकळत ठेवून त्यामध्ये थोडे मीठ घाला. नंतर कणकेची पोळी लाटून ही उकळत्या पाण्यात घालून शिजवून घ्या. एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन आलं-लसूण पेस्ट, कसुरी मेथी, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट घाला. नंतर त्यात भाज्या, पनीर, चवीनुसार साखर, आमचूर पावडर घालून परतून घ्या. उकडलेला बटाटासुद्धा घाला. मिश्रण एकत्र करून मळून त्याचे चौकोनी आकाराचे पॅटिस बनवून त्यावर पुन्हा कॉर्नफ्लोअरचे पाणी टाकून ब्रेडक्रम्समध्ये घोळवून डीप फ्राय करा. तयार पोळीवर थोडे सॉस, बारीक चिरलेला लांब कांदा, पालकाची पाने, तयार कटलेट, सूप स्टीक्स ठेवून रोल करा. त्यावर थोडे दुधाचे ब्रशिंग करून चीज पसरवून पाच मिनिटे बेक करा.

रोटी शोटी कबाब

साहित्य : पनीर २०० ग्रॅम, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, हिरवी मिरची ४-५, कोिथबीर ४ चमचे, चाट मसाला १ चमचा, जिरे १ चमचा, कणीक १ वाटी, इनो १ चमचे, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, हिरवी चटणी ४ चमचे, दही अर्धी वाटी, बटर २ चमचे

कृती : सर्वप्रथम पनीर कुस्करून ठेवा. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोिथबीर घालून त्यामध्ये पनीर, चवीनुसार मीठ, साखर घाला. हा मसाला कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने एका काडीला लावून लांबट गोळा तयार करा. कणकीमध्ये मीठ, इनो घालून चाळून घ्या. नंतर यात थोडे तेल व पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या, याची पोळी लाटून त्यावर मधोमध पनीरची काडी ठेवा. पोळी दुमडून त्याची दोन्ही टोके जुळवून असे तयार कबाब मंद आचेवर शेकून घ्या. सव्‍‌र्ह करतेवेळी आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करून बटर लावा. तयार दही व कचुंबरबरोबर सव्‍‌र्ह करा.

भुना पनीर

साहित्य : सिमला मिरची १ नग, कांदा  १ नग, टोमॅटो  २ नग, पनीर २ वाटया, सफरचंद १ नग, आल-लसूण पेस्ट २ चमचे, मोहरीचे तेल  ४ चमचे, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, कोिथबीर  ४ चमचे, हळद पाव चमचा, काळी मिरी पावडर १ चमचा

कृती : दह्य़ामध्ये हळद, काळी मिरी पावडर, मीठ व मोहरीचे तेल घालून घोटून घ्या. नंतर यात मोठय़ा तुकडय़ांमध्ये सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पनीर, सफरचंद,घालून एकत्र करा. या भाज्या एका सळईला लावून भाजून घ्या. एका पॅनमध्ये हायफ्लेमवर गॅस ठेवून पॅन गरम झाल्यावर थोडय़ा थोडय़ा भाज्या घाला. पॅन गरम असल्यामूळे भाजीवर जाळ येईल. त्यामुळे त्याला खरपूस सुगंध येईल. ब्रेड किंवा रुमाली रोटीबरोबर सव्‍‌र्ह करा.

कॅरमलाईज एॅपल

साहित्य : छोटय़ा आकाराचे सफरचंद ३-४ नग, अक्रोड अर्धी वाटी, साखर ३ वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी, मध ४ चमचे, मीठ चिमूटभर, खोबरा किस पाव वाटी, चॉकलेटचे दाणे पाव वाटी

कृती : सर्वप्रथम सफरचंद आतून पोखरून ठेवा. नंतर त्यामध्ये मिल्क पावडर, अक्रोड व साखरेचे मिश्रण भरून ठेवा. त्याला जाडसर काडी लावून ठेवा. दोन वाटय़ा साखरेत साखर ओली होईल इतपत पाणी घाला. नंतर साखर कॅरामलाईज करून ठेवा. तयार केलेले सफरचंद साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढा. खोबरा किस व चॉकलेटच्या बारीक दाण्यांवर घोळवून मध घालून खायला द्या. यावर तुम्ही काळे तीळ, कॅडबरीचे तुकडेसुद्धा घालू शकता.

सुसॅन टिक्का

साहित्य : मदा १ किलो, आलं-लसूण पेस्ट ४ चमचे, धणे-जीरे पावडर, १-१ चमचा, चाट मसाला १ चमचा, दही १ वाटी, कसुरी मेथी १ चमचा, हळद पाव चमचा, तिखट, मीठ चवीनुसार, कांदा १ नग, टोमॅटो १ नग, सिमला मिरची १ नग, लांब काकडी १ नग, लांब मुळा १ नग, लांब गाजर १ नग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती : १ किलो मदा पाण्यात घट्ट भिजवून त्याला दहा मिनिटांनी नळाखाली धुवावे. असे करत असताना, यातील स्टार्च निघून जाईल व जे उरेल त्यास ‘ग्लूटन’ असे म्हणतात. ते जवळपास २०० ते १५० ग्रॅम असेल. हा पदार्थ पाण्यात विरघळत नाही. यानंतर थोडय़ा  उकळत्या पाण्यात एक चमचा मीठ घालून, त्यात हा पदार्थ सोडावा. ५-७ मिनिटे शिजवल्यानंतर, याचे पाणी काढून तुकडे करावेत. याला ‘सुसॅन’ म्हणतात. दही चांगले फेटून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, कसुरी मेथी टाकून चवीनुसार मीठ घाला. नंतर यामध्ये सुसॅनचे तुकडे घालून मॅरिनेट करा कमीत कमी एक तास. नंतर एका सळईला कांद्याचा तुकडा, सिमला मिरची, टोमॅटो, सुसॅनचा तुकडा असे घालून ग्रील करा. थोडे सरसोचे तेल व चाट मसाला घालून सव्‍‌र्ह करा.