दिवाळीसारखा सण आला की पारंपरिक, पाश्चिमात्य कोणत्याही प्रकारचा पेहराव असू देत आपल्याकडचं वातावरण कसं सिल्की सिल्की होऊन जातं. ‘सिल्क’ या शब्दाबरोबर डोळ्यासमोर उभा राहणारा राजस मिजास, श्रीमंती रंग, चमक, उच्च फॅब्रिक असं सगळं देखणं विश्व जिवंत होतं.
दिवाळीत तर अबालवृद्धांच्या अंगावर हे ‘सिल्क’ चढल्याशिवाय सण पूर्ण होत नाही. आपल्याला कुठल्याही सणात-समारंभात सिल्कचे कपडे हवेच असतात. कित्येक शतकांचा इतिहास असलेलं हे फॅब्रिक काळानुसार त्याचं रूप बदलत राहिलं आहे, पण त्याचा प्रभाव आजही ओसरलेला नाही. आठवडय़ाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी पुन्हा हा सिल्कचा साजशृंगार चढवण्याआधी या सिल्कच्या निर्मितीपासून बदलत गेलेल्या रूपांचा घेतलेला हा आढावा..
परंपरा आणि सणासुदीचा अविभाज्य भाग असलेल्या या सिल्कच्या जन्माची कथा मोठी गमतीशीर आहे. कितीही काही झालं तरी आपल्याला सिल्कचे कपडे हवेच असतात. भारतामध्ये सगळ्यात सुंदर, महाग फॅब्रिक म्हणून सगळ्यांनी डोक्यावर घेतलेल्या सिल्कचा जन्म चीनमध्ये झाला, अशी माहिती ‘कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन’च्या टेक्स्टाइल विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिमा गोयल यांनी दिली. चीनने तीन हजार र्वष सिल्कवर मक्तेदारी गाजवली. त्यानंतर भारतातही सिल्कची मोठी बाजारपेठ उभी राहिली. चीनचा राजा ‘वांग ती’ आणि त्याची पत्नी ‘शी लिंग शी’ ही एकदा मलबारी झाडाखाली चहा पीत बसले होते. तिच्या चहाच्या कपामध्ये अचानक एक किडा पडला. तो खूप प्रयत्न करूनही पटकन निघत नव्हता. किडा कपातून काढायच्या वेळी त्यातून लांब, पातळ, चमकदार रंगाचा दोरा बाहेर येई. अशा पद्धतीने खरं तर सिल्कचा जन्म झाला. राजा आणि राणीने या घडलेल्या गोष्टींचा विचार करून सिल्क बनवण्याची पद्धत शोधली. आणि पुढे अनेक वर्षांनी त्यापासून दोरा, कपडा तयार केला. सुरुवातीच्या काळात सिल्क कपडय़ापेक्षा समाजातील वरच्या वर्गाची ओळख म्हणून जास्त मिरवला जात होता. जे जे उच्चवर्गाकडून वापरले जातं ते आपणही वापरावं, आपणही त्या दर्जापर्यंत पोहोचावं ही भावना सर्वसामान्यपणे कोणत्याही समाजात दिसून येते. सिल्कच्या बाबतीतही हेच घडले. त्याचा सर्वसामान्यांवरचा प्रभाव जसा वाढत गेला तसतसं अगदी त्यांना परवडेल अशा दरांत सिल्क उपलब्ध होऊ लागलं आणि त्याची व्याप्ती वाढली.
चहामध्ये पडलेला किडा म्हणजे रेशमी किडय़ाचा कोश (ककून) होता. तो गरम चहामध्ये पडला त्यामुळे तो काही अंशी उकळला गेला. त्यामध्ये असलेला गम वितळला आणि त्यामुळे सुंदर रेशमी दोरा बाहेर आला. हीच पद्धत पुढे वापरली जाऊ लागली. सिल्क बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. हिंसा पद्धतीमध्ये कोशाला गरम पाण्यात उकळून त्यामधून रेशमचा दोरा काढतात. हा दोरा लांब असतो. यामध्ये कोशातील ककून मारतो, म्हणून याला हिंसा पद्धत म्हणतात. तर अहिंसा पद्धतीमध्ये ककूनला स्वत:हून बाहेर येऊ देतात आणि नंतर उरलेल्या आवरणामधून रेशमाचे दोरे काढतात. हा दोरा मात्र लहान असतो. आणि नंतर या दोऱ्यांपासून सिल्कचा कपडा बनवला जातो. इतक्या महत्प्रयासाने हाती लागणारं हे सिल्क महाग असूनही लोकांना त्याचे आकर्षण का वाटतं? विशेषत: आजच्या काळात जिथे कपडय़ांचे वेगवेगळे प्रकार अगदी ज्यूटपासून डेनिमपर्यंत नानावतार फॅशन म्हणून प्रचलित असताना रॅम्पपासून घरापर्यंत सिल्कचा सोस का, हा प्रश्न सहजपणे पडतो. याविषयी फॅ शन डिझायनर विनय नारकर पारंपरिक कपडय़ांबद्दलचा आपला दृष्टिकोन कारणीभूत असल्याचं सांगतात. विनय नारकर हे पारंपरिक आणि हातमागावर बनवलेल्या कपडय़ांवर काम करतात. ‘काहीही झालं तरी पारंपरिक कपडे वापरायचेच ही भावना समाजातील सगळ्याच स्तरांमध्ये दृढ आहे. सिल्कचे रंग, त्याचा पोत, त्याची चमक हे सगळं देखणं, राजेशाही प्र्रकारात मोडत असल्याने साहजिकच त्याच्यापासून बनवलेले कपडे परिधान केल्यानंतर मिळणारा लुक हा इतर कपडय़ांपेक्षा वरचढच असतो. त्यामुळे कार्यक्रम, सणासुदीला सिल्कशिवाय पर्याय नाही, ही भावना आजही दृढ आहे, असं ते म्हणतात. सिल्कचे कपडे कपाटामध्ये मलमलच्या कपडय़ामध्ये ठेवले तर अनेक र्वष टिकतात. काही महिन्यांनंतर त्याला बाहेर काढून मोकळ्या वातावरणात ठेवले तर ते जास्त काळ टिकतात. सिल्कचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते आपल्याकडेही केवळ साडी आणि पंजाबी ड्रेस या प्रकारापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. त्याला जसं घडवावं तसा अवतार त्याने धारण केला. त्यामुळे सिल्कचा घेरेदार लेहंगा जितका आकर्षित करतो तितकाच सिल्कचा गाऊनही अंगावर खुलून दिसतो. गेल्या काही वर्षांत तर सिल्क चे क्रॉप टॉप, धोती, पलाझो अशा अनेक रूपांत फ्युजन क पडे आधीच लोकप्रिय असल्याने याही दिवाळीत गाऊन, धोती, चुडीदार, साडी, जॅकेट, स्कर्ट, पँट प्रकार कोणताही असो तो सिल्की सिल्कीच चमकणार यात शंका नाही.
viva@expressindia.com