प्रत्येक तरुणीच्या मनात कधी ना कधी हिरे जडवलेला तो क्राऊन डोक्यावर घालावा अशी इच्छा डोकावून जाते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक तरुणी दर वर्षी देशात होणाऱ्या सौंदर्य स्पर्धामध्ये भाग घेतात. २०१७ मध्ये मानुषी छिल्लर या अवघ्या २०वर्षीय तरुणीने आधी ‘मिस इंडिया’ आणि नंतर ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकला. मानुषीच्या पावलावर पाऊल ठेवत अनुकृती वासने ‘मिस इंडिया २०१८’ चा किताब मिळवला आहे. तर स्पर्धेची  फर्स्ट रनर-अप ठरली मीनाक्षी चौधरी आणि दुसरी रनर-अप ठरली श्रेया राव. या तिघींनी त्यांचा ‘मिस इंडिया’ या स्पर्धेचा अनुभव ‘व्हिवा’शी शेअर केला..

१९ जून रोजी ‘फेमिना मिस इंडिया’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि भारताला या वर्षीची ‘मिस इंडिया’ आणि दोन रनर-अप मिळाले. त्यांचा पहिल्या फेरीपासून ते ही स्पर्धा जिंकण्यापर्यंतचा प्रवास, त्यासाठीची काय आणि कशी तयारी केली, स्पर्धेदरम्यान काही अडचणी आल्या का, या सगळ्या प्रवासातून काय शिकायला मिळालं, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांमधून या तिघींचा यशस्वी प्रवास उलगडला. अवघ्या १९व्या वर्षी ‘मिस इंडिया’ झालेली अनुकृति तिच्या प्रवासाबद्दल सांगते, ‘मी खरं तर कधीही अशा कोणत्याही स्पर्धेमध्ये जाण्याचा विचार केला नव्हता, पण मला वेड होतं. मी नेहमी टीव्ही-इंटरनेटवरती या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घ्यायचे. या स्पर्धेत कसा भाग घ्यायचा, त्यासाठी काय तयारी लागते, मला काहीच माहिती नव्हती. माझ्या मैत्रिणीला या स्पर्धेचं ऑडिशन द्यायचं होतं, मी फक्त तिला सोबत म्हणून गेले होते. पण तिच्यासोबत मीही ऑडिशन दिलं आणि पुढच्या फेरीसाठी सिलेक्ट झाले. मी तोपर्यंत काहीही तयारी केली नव्हती. स्टेट ऑडिशन पार पडल्यावर मी तयारीला लागले. मला पायात हिल्स घालून चालतासुद्धा येत नव्हतं, रॅम्पवॉक तर दूरची गोष्ट होती. स्टेट ऑडिशननंतर मी कोणताही क्लास वगैरे न लावता यूटय़ूबच्या मदतीने व्हिडीओ बघून सगळं शिकले’. तीस दिवसांचा हा ‘मिस इंडिया’चा प्रवास आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अनुभव असल्याचे अनुकृतिने सांगितले. ‘मुळात सुरुवातीला मला काहीही येत नव्हतं. बाकीच्या स्पर्धकांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीं येत होत्या, त्यांनी त्याचं ट्रेनिंग घेतलं होतं. पण म्हणून मी स्वत:ला कधीही कमी लेखलं नाही. आणि प्रत्येक दिवशी नवीन काही तरी शिकत पुढे गेले. मी प्रत्येक दिवशी माझे शंभर टक्के द्यायचंच हे ठरवलं होतं. या सगळ्या प्रवासात मला माझ्या घरच्यांनी पूर्ण साथ दिली. मी कधीही तमिळनाडूच्या बाहेर गेले नव्हते, पण या स्पर्धेमुळे मला ही संधी मिळाली. घरच्यांसोबत मला बाकीच्या स्पर्धकांनीही खूप मदत केली. मी लहान असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, त्यांनी मिळून मला शिकवलं. या प्रवासातून मिळालेली ऊर्जा आणि सकारात्मकता मला आयुष्यभर पुरणार आहे,’ असं तिने सांगितलं.

मूळची आंध्र प्रदेशची असलेली आणि आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलेली ‘मिस इंडिया’ची दुसरी रनर-अप श्रेया राव मात्र वर्षभरापासून या स्पर्धेसाठी तयारी करते आहे. ‘मी मागच्या वर्षी एकदा ऑडिशन दिली होती, मी स्टेट फेरीनंतर बाद झाले. पण यामुळे मी खचून न जाता या वर्षी पुन्हा पूर्ण तयारीने स्पर्धेत उतरले आणि त्याचा निकाल सगळ्यांसमोर आहे. मी मागच्या वर्षीची शेवटची फेरी बघितली तेव्हाच मी ठरवलं होतं की मलाही त्या स्टेजवर उभं राहायचं आहे. मी पुन्हा स्पर्धेत भाग घ्यायचा ठरवला तेव्हा माझे पालक फारसे राजी नव्हते. माझं छान शिक्षण झालं आणि जॉबही होता त्यामुळे त्यावरच लक्ष द्यावं असं त्यांना वाटत होतं. तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज मी इथे आहे,’ असं ती म्हणते. स्पर्धेचा एकदा अनुभव घेतल्याचा फायदा झाला असं ती म्हणते. ‘मला मागच्या वर्षी थोडा अनुभव मिळाला होता. आपल्यावर आपल्या राज्याची एवढी मोठी जबाबदारी आहे त्यात आपण कमी पडायला नको हेच ठरवून मी पुढे पुढे गेले,’ असं सांगणारी श्रेया तीस दिवस वेगवेगळ्या भागांतून आलेल्या मुलींबरोबर राहताना त्यांच्या वेगळ्या कल्चर, भाषा, राहण्याच्या खाण्याच्या पद्धती, वागण्याच्या पद्धतींमुळे सुरुवातीला एकत्र राहताना अडचणी आल्याचेही सांगते. ‘नंतर आम्ही सगळेच एकमेकांना छान ओळखू लागलो. कोणत्याही परिस्थितीमधे सकारात्मक विचार केला तरच गोष्टी सोप्या होतात हे मला चांगलंच समजलं आहे,’ असं ती सांगते. ‘मिस इंडिया’ची पहिली रनर-अप ठरलेल्या हरियाणाच्या मीनाक्षी चौधरीचं तर हेच स्वप्न होतं. तिची निवड ‘मिस इंडिया’च्या कॉलेज कॅम्पस स्पर्धेत झाली होती. कॅम्पस स्पर्धेत जिंकल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि या तीस दिवसांच्या स्पर्धेत तर स्वत:ला मोठं होताना मी पाहिलं आहे, असं ती म्हणते. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या स्पर्धकांशी जुळवणूक, एखाद्या फेरीत चूक झाल्यानंतर निराश होणं आणि पुन्हा स्वत:लाच प्रेरणा देत उभं करणं यातून माणूस म्हणून मी वेगळीच घडले आहे, असं मीनाक्षी सांगते. अर्थात आपल्या स्वप्नाला आई-वडिलांचा खूप पाठिंबा होता. त्यांचा विश्वास आणि या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर जी शिकवण मिळाली ती कायम बरोबर असेल, असंही मीनाक्षी विश्वासाने सांगते. देश, प्रांत-भाषा कोणतीही असो, तुम्ही तुमच्या शिक्षणाने, बुद्धीने आणि विश्वासाने केलेल्या तयारीवर जग जिंकू शकता हेच या तिघींनी आपल्या अनुभवातून अधोरेखित केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com