नवीन वर्षांमध्ये अनेक नवीन संकल्प, नवीन योजना आखल्या जातात. कित्येकदा या योजना आपल्या करिअरच्या असतात. नववर्षांच्या निमित्ताने आपण असंच निसर्गाबद्दल प्रेम असलेल्या ध्येयवेडय़ा तरुणाची गोष्ट जाणून घेणार आहोत.
ओमकार अनिल राणे हा काळाचौकी परिसरात राहणारा १९ वर्षांचा तरुण. या वयात त्याला आपल्या समाजाप्रति काही तरी करावंसं वाटलं आणि त्यातूनच जन्म झाला ‘ग्रीन नेचर’ या त्याच्या प्रकल्पाचा. ओमकार अॅनिमेशनच्या पहिल्या वर्षांला शिकतोय म्हणजे त्याला पुढे जाऊन याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. पण त्याचबरोबर नावारूपाला आलेला आपला ‘ग्रीन नेचर’ हा प्रकल्पही त्याला त्याच आवडीने जोपासायचा आहे. काळाचौकी, चिंचपोकळी, लागबाग परिसर म्हणजे गणपती उत्सव थाटामाटात साजरा होणार हे ठरलेलंच असतं. ‘ग्रीन नेचर’ या प्रकल्पाची सुरुवातच गणपतीच्या काळातच झाली. ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येतात, तासन्तास ते रांगेत उभे असतात. तिथेच ते खातात, पितात आणि झोपतात. आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होतो. हाच कचरा पाहून ओमकार आणि त्याच्या इमारतीमध्ये राहायला असलेल्या मित्रांनी मिळून पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात त्यांना दोनशे बाटल्या सापडल्या. त्या नंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील, जिथे जिथे रोज जातो तिथून अशाच बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. या बाटल्या गोळा करून त्यांनी त्यात फक्त झाडं लावायची असंच ठरवलं होतं. पण नंतर त्यांनी त्या बाटल्यांपासून काही ना काही डिझाइन करून मग त्यात झाडं लावायची असं ठरवलं. कारण साधं काम लोकांना आवडत नाही. जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्टिंग काही दिसत नाही तोपर्यंत लोक लक्ष देत नाहीत, असं ओमकार म्हणतो. म्हणून मग त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास शोधून वॉल हँगिंग बनवले. काही बाटल्यांपासून इमारतीच्या दरवाजावर रोबोट बनवले आणि त्यात झाडं लावली. अशा प्रकारे सगळ्या गोष्टींच्या वापर झाडं लावण्यासाठी करण्यात आला.
या प्रकल्पासाठी ओमकारने अजिबात खर्च केला नाही. झाडं लावण्यासाठीची माती त्याने बाजूच्या पडीक मैदानातून घेतली. रोप न वापरता त्यांनी कडधान्य, उपयोगी येतील अशाच झाडांच्या बिया रोवून रोपं बनवली. आणि आता काही छोटी झाडं त्यांचा वर्षांकाल संपल्यामुळे सुकली. ती झाडं काढून आता त्याचा वापर खत बनवण्यासाठी केला जातो आहे. या पूर्ण प्रकल्पाचं काम नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालं. हे बनवताना आजूबाजूच्या लोकांनी बरीच विचारपूस केली, असं ओमकार सांगतो. त्या वेळी आम्ही लोकांना बरेच संदेश दिले, असाच प्रकल्प त्यांनीही करावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, मार्गदर्शन करणं असा प्रवास सुरू झाला. शिवाय येणाऱ्या प्रत्येकाला एकेक तुळशीचं रोप दिलं. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही इमारतीमध्यल्या प्रत्येक घरात तुळशीचं रोप भेट म्हणून दिलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओमकार आणि त्याच्या मित्रांना त्यांच्या घरातल्यांचा , इमारतीमधल्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता. आणि म्हणूनच ओमकार आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येक ठिकाणच्या बाटल्या उचलून तिथेच झाड लावून सुशोभीकरण करून देण्याचं कामही हातात घेतलं आहे.
viva@expressindia.com