मितेश जोशी viva@expressindia.com

२०१८ हे वर्ष एकदम ‘कडक’ गेलं. अनेक नवनवीन प्रयोग पदार्थावर करण्यात आले. नवनवीन फूड ट्रेंड्स खवय्यांच्या ताटात आले. नवनवीन फ्युजन डिशचा जन्म झाला. एकंदरीत हे वर्ष टेस्टी होतं. २०१९ या वर्षांतही अनेक फूड ट्रेंड्स खुणावत आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ विक्रमवीर शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी बोलून येणाऱ्या वर्षांतील खाऊच्या तऱ्हा कशा असतील याचा वेध खास व्हिवाच्या वाचकांसाठी..

२०१९ या वर्षांत खाण्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट अनुभवायला मिळणार आहे ती म्हणजे पुन्हा निसर्गाकडे जाणे. भाजी विकत घेण्यापासून ते जेवणाच्या ताटापर्यंत अनेक नवनवीन व भन्नाट फूड ट्रेंड्स खुणावत असले तरी हे सगळं नैसर्गिक असावं यावर मोठा भर आहे.

नैसर्गिक उत्पादन : सर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल. शेतकरी ते ग्राहक, शेतकऱ्यांचा आठवडा बाजार हे प्रस्थ आजकाल वाढत चाललंय. बडय़ा गृहसंकुलांमध्येदेखील ‘शेतकरी ते ग्राहक’ असा थेट संपर्क साधून ताज्या भाज्या, फळं घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. अनेक शेतकरी शहरी भागात ऑरगॅनिक शॉप्स थाटून बसले आहेत.

नैसर्गिक भाज्या, फळं, पालेभाज्या घ्यायच्या तर त्या शेतकऱ्यांकडूनच हा ट्रेंड २०१९मध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळेल. ज्यात तरुणांचा भावनिक सहभाग असेल. शेतकऱ्यांच्या ऑरगॅनिक शॉप्सची वाढ २०१९मध्ये दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे. आजकाल बरेच तरुण-तरुणी घरातल्या गच्चीमध्येही भाजीपाला पिकवतात.

त्यामुळे गच्चीवरची बाग ही संकल्पनादेखील या वर्षी वाढेल.

 प्रोटिन्सकडे धाव : आजकालची तरुणाई प्रोटिन्सकडे धावत सुटलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाल्याने व ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ वाढत चालल्याने परदेशातले हाय प्रोटिन्स ‘नट्सला’ तरुणाईची अधिक पसंती मिळेल. एवोकॅडो हे हाय प्रोटिन्सने भरलेले फळदेखील भारतात उपलब्ध होऊ  लागलं आहे. त्यामुळे निदान हाय प्रोटिन्सच्या बाबतीत तरी परदेशी भाज्या, फळं फस्त करत तंदुरुस्त राहण्यावर त्यांचा जास्त भर राहील.

हेल्दी न्याहारी : सकाळची न्याहारी इतकी पोटभर करावी की दुपारी जेवणात दोन घास कमी गेले तरी चालेल, अशी वाक्यं सतत मोठय़ांकडून आपल्या कानावर येत असतात. हे वाक्य २०१९ मध्ये खरं ठरेल. तरुणांकडून न्याहारी बऱ्याचदा अनहेल्दी, रेडी टू इट अशा प्रकारचं खाणं खाऊन होते. मॅगी, तळलेले मकेन्स, पास्ता वगैरे वगैरे ही यादी मोठी आहे. ज्याचा शरीराला तोटा होतोय हेही तरुणाईच्या आता लक्षात येऊ  लागलंय. त्यामुळे पुढच्या वर्षी ‘हेल्दी न्याहारी’ हा ट्रेंडच होईल. अनेक कॅ फे, रेस्टॉरंट यांनी मार्केटिंगसाठी त्यांच्या न्याहारीच्या मेन्यूत हेल्दीपणा उतरवलाय. ज्याचा लाभ तरुणाई मोठय़ा प्रमाणात घेताना दिसतेय. सोया बेस स्नॅक्स, कमी तळलेले पदार्थ, आपल्या सोयीप्रमाणे न्यूट्रिशियन बार यांच्याकडे खवय्यांचा कल वाढणार आहे.

चटपटीत प्रयोग : आतापर्यंत भारतात रुळलेल्या कुझिन्सपैकी इटालियन व मेक्सिकन कुझिन हे तरुणाईचं आवडतं कुझिन झालं आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या कुझिनमध्ये यंदाच्या वर्षी अनेक ‘चटपटीत फ्युजन’ प्रयोग करण्यात आले. फ्रेंच फ्राइज पिझ्झा, चिकन करी पिझ्झा, बटर चिकन पिझ्झा, बेझील चीज पिझ्झा वगैरे वगैरे सारख्या फ्युजन डिश तरुणाईच्या जिभेला तृप्ती देऊ  लागल्या. असेच अनेक फ्युजन प्रयोग नव्या वर्षांत सर्वच कुझिनमध्ये शेफवर्ग करणार आहे.

तंदुरीमध्येसुद्धा नवनवीन फ्लेवर्स पुढील वर्षी चाखायला मिळतील. पास्ता हा मैद्याचा असतो पण पास्ता लोकप्रिय असल्याने आता त्यात व्हीट पास्ता, झुकिनी रिबन्स पास्त्याचं हेल्दी प्रस्थ वाढेल.

परदेशी चॉकलेट व डेअरी प्रॉडक्ट्सना मागणी वाढणार : कधीही, केव्हाही, कुठेही, चारचौघात कसेही लाज न बाळगता खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चीज आणि चॉकलेट. चिझाळलेला पिझ्झा व वितळलेले चॉकलेट हा नेहमीच तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. ऑनलाइन शॉपिंग व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने कात टाकल्याने चीजमधले असंख्य आंतरराष्ट्रीय फ्लेवर्स हळूहळू तरुणाईला कळतायेत. बाजारातदेखील सहज दोन-तीन प्रकार उपलब्ध झाले आहेत. नव्या वर्षांत चीजचे अनेक नवनवीन फ्लेवर्स बाजारात उपलब्ध होतील. हीच बाब चॉकलेटचीदेखील असेल. वेगवेगळ्या चवीची दारू, ब्रँडी वापरून चॉकलेटमध्येदेखील नवनवीन प्रयोग घडतील. चॉकलेट गिफ्ट म्हणून देण्याचा ट्रेंड पुढील वर्षांत दुपटीने वाढेल. अनेक डेझर्ट्समध्ये चॉकलेटचा अंतर्भाव वाढेल. ब्राऊनी हा तर खवय्यांचा चविष्ट मामला आहे. त्यामुळे शेफदेखील ब्राऊनीत नवनवीन प्रकार आणण्यासाठी किचनमध्ये कंबर कसताना दिसतायेत. एकंदरीतच चीज व चॉकलेट या नव्या वर्षांत तरुण खवय्यांना जिव्हातृप्ती देणार यात मात्र शंका नाही.

जंक फूडचा पुनर्जन्म : २०१८ या वर्षांत जंक फूडचा पुनर्जन्मच झाला असं म्हणायला हरकत नाही. हेल्दी फू डचा सपाटा वाढला म्हणजे जंक फूड संपेल हा तर्क चुकीचाच. त्यामुळे जंक फूड संपवण्यापेक्षा त्याला हेल्दी कसं बनवता येईल यासाठी शेफमंडळी आणि न्यूट्रिशियन्सचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. म्हणजे पिझ्झाचं रूपांतर कॉर्नफ्लोअर पिझ्झात करण्यात आलं. अशाच प्रकारे हेल्दी बटर चिकन, हेल्दी बर्गर, हेल्दी पिझ्झा असे पदार्थ नव्या वर्षांत थोडय़ा जास्त प्रमाणात चाखायला मिळतील असा अंदाज आहे. भाजणीच्या पिठाने पिझ्झा बेस बनवण्याचा प्रयत्नदेखील केला जातोय. यावरूनच जास्तीत जास्त चटपटीत जंक फूडला स्वादिष्ट हेल्दी फूड करण्याची झटापट सुरू असल्याचे लक्षात येते आहे. अगदी हेल्दी जंक फूड नावाने कॅफे नवीन वर्षांत सुरू झाले तरी नवल वाटायला नको!

कटलरीचाही नवा अवतार : इकोफ्रेंडली पॅकेजिंगसाठी नवीन वर्ष सुवर्णकाळ म्हणून नोंदवलं जाईल. प्लास्टिक आणि थर्माकोलवरच्या बंदीची झळ या क्षेत्रालादेखील लागली. त्यामुळे थर्माकोलच्या डिशची जागा नैसर्गिक पत्रावळींनी तर घेतलीच, परंतु त्याचबरोबर उसाच्या चिपाडापासून बनवलेली ताटं, केळीच्या सालापासून बनवलेली ताटं, सुपारीपासून बनवलेली ताटं यांना मागणी वाढली आहे. एकूणच कटलरी विश्वाने यंदाच्या वर्षी कात टाकली असून त्यात पुढच्या वर्षी वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतील. इटेबल कटलरी हा नवा ट्रेंड वर्षांअखेर खवय्यांच्या भेटीला आलाय. ज्यात जेवण संपल्यावर ताट, चमचा, वाटीही आपल्याला खाऊन फस्त करावी लागणार आहे.

नेहमीच्या खाऊच्या या नवीन तऱ्हा म्हणा किंवा तऱ्हेवाईक खाऊ म्हणा.. आपण पाहिलेले बदल हे मोठय़ा प्रमाणावर दिसून येतील असे आहेत. मात्र यांच्याबरोबरीने दररोजच्या खाण्यातही नित्यनवे बदल होतील. उदाहरणार्थ, रिजनल फूड, ऑइल फ्री फूड आणि लेस स्पाइसी फूड खाण्याकडे तरुणाईचा कल वाढेल. २०१८ हे वर्ष आपला निरोप घेतंय.. खाण्याला आपण बाय-बाय करत नाही आहोत. त्यामुळे नव्या वर्षांत नैसर्गिक, हेल्दी तरी चटपटीत खा आणि खिलवत राहा.. हाच खाऊचा फंडा आहे.