आज फिटनेस ही आवड किंवा गरज राहिली नसून लाइफस्टाइल झाली आहे. त्यामुळे जिम वेअरसोबतच आता मेकअप, फिटनेस अॅक्सेसरीज या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. वापरायला सुटसुटीत आणि सोयीचा असल्याने हा जिम लुक आता इतरत्रही फॅशन म्हणून रुळलाय. हा लुक कसा कॅरी करायचा?
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सरत्या सूर्यासोबत एक संकल्प जगभरात आवर्जून घेतला जातो. ‘यार, पुढच्या वर्षी हे पिझ्झा, बियर, बर्गर सगळं बंद. फिट राहायचं. किमान दोन साइज कमी होऊनच दाखवेन मी.’ मग काय नवीन वर्षांनिमित्त वर्तमानपत्रासोबत आलेल्या तीन-चार जिमच्या कात्रणांपैकी कोण सगळ्यात जास्त सवलत देतंय, कुठल्या जिममध्ये येणारं ‘क्राउड’ चांगलं आहे, याची उजळणी करून एखाद्या जिममध्ये नोंदणी केली जाते. या सगळ्यासोबत येते ती जिमवेअरची खरेदी. त्यानिमित्ताने एरवी ढुंकूनही न पाहिलेल्या स्पोर्ट्सवेअर दुकानांच्या वाऱ्या होतात. जिमवेअरमधील ट्रेण्ड्सची उजळणी होते. सरतशेवटी वर्षांच्या शेवटच्या दिवशी खिशाला पडलेल्या या भल्यामोठय़ा भगदाडाकडे पाहून ‘हे सगळं माझ्यासाठीच आहे,’ असं म्हणत पांघरुणात निजलेले मन नव्या वर्षांच्या पहिल्या पहाटेच्या पहिल्या प्रहरी वाजलेल्या अलार्मला बंद करत फिटनेसची नवी स्वप्न बघते.
आज शहरातल्या कोणत्याही गजबजलेल्या भागामध्ये जा, तिथे हमखास एक जिम दिसेल. पेपरात पहिल्या पानावर येणाऱ्या प्रत्येक हाउसिंग प्रोजेक्टच्या जाहिरातीमध्ये जिम, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट मैदान आणि टेनिस कोर्ट यातील एक किंवा अधिक बाबींचा समावेश असतोच. आदिदास, प्युमा, नायके यांच्यासोबतच आज भारतात नवनवीन फिटनेस ब्रँड्स येत आहेत. कित्येक स्टार्टअप्ससुद्धा योगावेअर, जिमवेअर, स्पोर्टवेअरमध्ये आवर्जून गुंतवणूक करत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांतील टीव्ही, मासिकांमधील खाद्यपदार्थाच्या जाहिराती पाहिल्यास ‘हेल्दी लाइफस्टाइल’वर अधिक भर दिलेला तुम्हाला आवर्जून पाहायला मिळेल.
या सगळ्या बदलाला कारणीभूत एक बाब आहे, ती म्हणजे आज फिटनेस ही केवळ गरज नसून लाइफस्टाइल बनली आहे. त्यामुळे तुम्ही केवळ विशिष्ट व्यायाम, खेळ खेळून उपयोग नाही, तर तो कसा खेळता, कुठे खेळता, जिम करताना कोणते कपडे वापरता हे सगळं महत्त्वाचं ठरू लागलं आहे. तुम्ही रात्रीची ट्रॅकपँट आणि टी-शर्ट घालून सकाळी जिमला जात असाल, तर जिममधील सगळ्यात ‘आउटडेटेड’ व्यक्ती ठरू शकतात. हे प्रकरण फक्त जिमपुरतं नाही, तुमचा जिम लुक बाहेरच्या जगातही तपासला जातो. ‘कसा?’ हा प्रश्न आजच्या सोशल मीडियाच्या जगात कोणी विचारूच नये. पहिल्या दिवशी जिममध्ये जाताच, तिथल्या भल्यामोठय़ा आरशासमोर उभं राहून सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करणं, हे हल्ली जिममध्ये व्यायाम करण्यापेक्षाही महत्त्वाचं ठरू लागलंय. योगाच्या क्लासला जात असाल तर ध्यान लावून बसण्यापूर्वी कोणाला तरी आपला फोटो काढायला सांगणं गरजेचं झालंय. तुम्ही सायकल किती चालवता यापेक्षा एखाद्या छानशा ठिकाणी सायकल, सायकल किट आणि हेल्मेटचा फोटो काढणं महत्त्वाचं झालंय. त्यामुळे साहजिकच फिटनेस लुकसुद्धा ‘ब्रँडेड’ होऊ लागला आहे. मगाशी दिलेली उदाहरणं तर या जीवनशैलीची फक्त सुरुवात आहे. हे स्तोम दिवसेंदिवस वाढू लागलंय.
मागच्या महिन्यात जागतिक बाजारपेठेत एका बॅगची चर्चा चालू होती. तशी ही नेहमीची काळी जिमची बॅग आहे. पण हिचं वैशिष्टय़ म्हणजे या बॅगेत तुमचे जिमचे कपडे युव्ही लाइट्सच्या माध्यमाने स्वच्छ करण्याची सोय आहे. रोज जिमचे कपडे धुण्याची संधी मिळत नाही. पण जिममध्ये घामटलेले कपडे दुसऱ्या दिवशी वापरू शकत नाही ना. अशा वेळी या कपडे, शूजमधील घामाचा वास, ओलावा काढायचं काम ही बॅग करते. तुमच्या घामावर नियंत्रण ठेवणारे ऑरगॅनिक कपडय़ांचे ब्रँड्स भारतात आलेत. ‘बिर्चबॉक्स’, ‘टार्ते’ हे ब्युटी ब्रँड्स परदेशात सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत, ते त्यांच्या स्पोर्ट मेकअपसाठी. म्हणजे व्यायाम किंवा खेळ खेळताना तुमचा मेकअप खराब होऊन लुक बिघडणार नाही याची काळजी हे घेतात. ‘युनी ब्युटी’ने तर खास योगा करतानाच्या मेकअपचं कलेक्शन आणलं आहे. ब्राइट रंगाचे लिपबाम, वॉटरप्रूफ आयलायनर, मस्कारा, कूलिंग प्रायमर, फाउंडेशन असं बरंच काही या कलेक्शनमध्ये पाहायला मिळत. भारतातही लवकरच ही कलेक्शन्स पाहायला मिळतील. ब्रँडेड कपडे, शूज, महागडे फिटनेस गॅजेट्स घेऊन जिमला जाणारी व्यक्ती साहजिकच आपल्या कपडय़ांसोबतच संपूर्ण लुककडेही लक्ष देणार हे साहजिक आहे. त्यामुळे जेल लावून सेट केलेले केस, वर्कआउटनंतरसुद्धा व्यवस्थित राहिलेला मेकअप हे सगळं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. वर्षभरात एकटय़ा अमेरिकेत या ब्रँड्सच्या उत्पादनांची मागणी दुपटीने वाढली आहे. थोडक्यात जगभरात या बाजारपेठेचा आवाका येत्या काही वर्षांमध्ये वाढत जाणार आहे.
आतापर्यंत फिटनेस उत्पादनं म्हणून केवळ जिम, खेळापुरता मर्यादित असलेले हे कपडे, शूज आता दैनंदिन लुकचा महत्त्वाचा भाग ठरू लागले आहेत. व्यायाम करताना आरामदायी ठरणारी जॉगर्स पँट, स्पोर्ट्स ब्रा, टँक टॉप आता जीन्स, फिटेड टॉप्स, पॅडेड ब्राला पर्याय ठरू लागले आहेत. जिमवेअरसोबत सहज घालता येतील, असे सेमी फॉर्मल लुकचे श्रग, जॅकेट्स, बाजारात आली आहेत. लेगिंग्स, जेगिंग हे कम्फर्ट फॅशनचा महत्त्वाचा भाग बनलेत. स्नीकर्सचा ट्रेंड किती विस्तारला आहेच. हे कपडे आणि अॅक्सेसरीज वापरायला सोयीचे असतात. त्यामुळे साहजिकच जिमच्या बाहेरही यांचा कुशलतेने वापर करायला पसंती मिळू लागली आहे. साहजिकच बडे फिटनेस ब्रँड्स आता त्यांच्या कलेक्शन्समध्ये लुक्सचा विचारही आवर्जून करताहेत. त्यामुळे ब्राइट रंग, वेगवेगळे पॅटर्न, स्टाइल्स तुम्हाला फिटनेस कपडय़ांमध्येही आवर्जून पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या जिमला जाताना तुम्ही कोणते कपडे घालताय, यावर एक नजर टाकायला विसरू नका.
जिमवेअर टिप्स..
- जिमवेअर निवडताना ब्राइट रंगांची निवड करा. यामुळे लुकमध्ये फ्रेशनेससुद्धा जाणवतो आणि साहजिकच व्यायाम करतानाही उत्साह येतो. अगदी प्रिंटेड किंवा ब्राइट लेगिंग घालता येणार नसेल, तर काळ्या लेगिंगला ब्राइट रंगाची पट्टी किंवा डिझाइन असलेल्या लेगिंगचा पर्याय असतोच. अर्थात लुकमध्ये समतोल हवाच. टॉप आणि लेगिंग्ज दोन्ही भपकेबाज होणार नाहीत, याची काळजी घ्या.
- स्टायलिश दिसण्याच्या नादात इतरांना अवघडलेपणा येईल, असे कपडे कपडे घालणे टाळा. तोकडे कपडे, घामाने पारदर्शक होणारे टी-शर्ट, अति अंगप्रदर्शन करणारे कपडे यामुळे व्यायामापेक्षा कपडे सांभाळण्यात जास्त वेळ जाऊ शकतो.
- भारतात फिटनेस मेकअप कलेक्शन्स उपलब्ध नसली तरी एरवी घामाने खराब न होणारे मेकअप साहित्य बाजारात उपलब्ध आहे. त्याचा वापर नक्की करू शकता.
- कलरफुल हेअरबँड, रिस्टबँड, सॉक्स अशा छोटय़ा अॅक्सेसरीजकडे आवर्जून लक्ष द्या.
viva@expressindia.com