‘ती’ मूळची कॉम्प्युटर इंजिनीयर. नोकरीनिमित्त परदेशात असताना छंद म्हणून तिनं दागिने तयार करायला सुरुवात केली. सहज म्हणून एक वेबपोर्टल तयार करून त्यावर हे दागिने विक्रीला ठेवले. पंधरा दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शंभरवर दागिने संपलेदेखील. त्यातूनच ‘आद्या’ हा ज्युलरी स्टार्टअप सुरू झाला. पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेचा टच देऊन समकालीन बनवणारी ‘आद्या’ जुन्यातून नव्याकडे या सध्याच्या फॅशन ट्रेण्डला सुसंगत आहे. ‘आद्या’चे शेकडो फॅन्स आहेत आणि त्यामध्ये अनेक सेलेब्रिटीदेखील आहेत. या लोकप्रिय हँडक्राफ्टेड ज्युलरी स्टार्टअपची प्रणेती कल्लाकार आहे सायली मराठे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन दागिने ऑर्डर करण्यासाठी सर्च करताना एका वेबपोर्टलचं नाव पटकन आठवून तसा सर्च केला जातो. कधी ते आपल्याला कुणा मत्रिणीकडून कळलेलं असतं किंवा कधी एखाद्या फेसबुक पेजवर त्याचा रेफरन्स आलेला असतो. हे पोर्टल आहे ‘आद्या’ या ज्युलरी कलेक्शनचं. ‘आद्या’च्या नावाचाही एक किस्साच आहे. ‘आद्या’ची कर्तीधर्ती सायली मराठे तो सांगताना म्हणाली, ‘‘आद्य असं नाव मी विचारपूर्वक निवडलं होतं. आद्य म्हणजे सुरुवात आणि ज्याला कधीच अंत नाही. मात्र इंग्रजी उच्चाराच्या प्रभावामुळं ‘आद्य’चं ‘आद्या’ झालं आणि तेच लोकांच्या तोंडी रुळलं. या वेबपोर्टलमुळं सायलीला देशासह परदेशातील ग्राहकांपर्यंतही पोहोचता आलं. नोकरीच्या निमित्तानं सायली परदेशात राहात होती. तिथं फावल्या वेळात तिनं ज्युलरी मेकिंग किट वापरून पाहिली आणि तिला ज्वेलरी तयार करण्याचा छंद लागला. त्यातूनच ‘आद्या’ हे ऑनलाइन पोर्टल आकाराला आलं.’’ तिच्या कॉम्प्युटर इंजिनीअिरगच्या प्रोफेशनचा हे वेबपोर्टल बनवताना फार उपयोग झाला. सायली सांगते की, ‘‘मी ज्युलरी मेकिंगच्या किट्स आणून बरेच दागिने बनवले होते. भारतात परतल्यावर मी अनेकांना ते गिफ्ट म्हणून दिले. गिफ्ट म्हणून देऊनही माझ्याकडं शंभर दागिने शिल्लक राहिले होते. तेव्हा मत्रिणीनं त्यांचं प्रदर्शन भरविण्याची कल्पना सुचवली. परंतु नोकरी करत असल्यामुळं मला ते शक्य नव्हतं. त्यामुळं ऑनलाइन पेजद्वारे काही प्रतिसाद मिळतोय का, हे बघायचं ठरवलं. त्या फेसबुक पेजला आणि अर्थातच माझ्या ज्युलरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. साधारण दोन आठवडय़ांत सगळे दागिने संपलेदेखील. सुरुवातीचे काही महिने छंद म्हणून मी ज्युलरी करत होते. कामातील चोखपणा, नावीन्य आणि गुणवत्तेमुळं चांगला प्रतिसाद मिळत होता. नोकरी सांभाळून ज्युलरीच्या ऑर्डर्स पूर्ण करत होते.  पूर्ण विचारांती आणि नवऱ्याच्या भक् कम पािठब्यामुळं नोकरी सोडली आणि आद्या ज्युलरीकडं पूर्ण वेळ लक्ष द्यायचं ठरवलं.’’

ऑनलाइन ज्युलरी पोर्टल चालू केल्यानंतर सायली हैद्राबाद, जयपूर आदी अनेक ठिकाणी गेली. तिथं जाऊन ज्युलरी कशी बनवतात, त्याची काय प्रक्रिया आहे, या साऱ्याचा अभ्यास केला. बरोबरीनं अनेक कारखान्यांना भेट दिली. मग व्यवसाय सुरू केला. आता तिच्या हाताखाली काही कारागीर दागिने घडवतात. ‘आद्या’ कलेक्शनमध्ये हॅण्डमेड आणि मोल्डची ज्युलरी उपलब्ध असून त्यात ऑथेंटिक स्टोन्स आणि चांदीचा वापर केला जातो. सायली म्हणते की, ‘‘आमचं प्रत्येक कलेक्शन हे वेगळं आहे. त्यात नेहमीच नावीन्य आढळतं. हे करताना कुठंही कॉम्प्रोमाइज करत नाही. चांगल्या दर्जाचा माल वापरतो.’’ ज्युलरी हाताळायला सोपी आणि वजनाला हलकी असावी, तिच्यावर पाणी किंवा इतर रसायनांचा दुष्परिणाम होऊ नये, ही काळजी घेतली जाते. प्रत्येकीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दागिने तयार करणं हे तिचं वैशिष्टय़. त्यामुळं तिची शरीरयष्टी नि चेहऱ्याचा विचार केला जातो. ज्या पेहरावावर ज्युलरी घालायची आहे, त्याची रंगसंगती आणि डिझाइनचा विचारही सखोलपणे केला जातो. त्यामुळं नुकतीच नोकरी करू लागलेल्या मुलींपासून ते साठीच्या घरातल्या अनेकींना हे दागिने भावतात नि परवडतातदेखील.

सायलीनं काही चित्रपटांसाठीही ज्युलरी डिझायिनग केलेलं आहे. ‘टाइमपास २’ मधील प्रिया बापटची ज्युलरी आणि ‘पोस्टर गर्ल’मधल्या सोनाली कुलकर्णीसाठी तिनं दागिने तयार केले आहेत. चित्रपटाच्या कथानकाची गरज लक्षात घेऊन आणि चित्रपटाच्या टीमशी चर्चा करून ही ज्युलरी घडवली जाते. सायली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि पर्ण पेठे यांची स्टायलिस्ट आहे. ‘आद्या’ची ‘शुभ्रा’ आणि ‘मांगल्यम’ अशी दोन कलेक्शन्स लॉन्च झाली आहेत. अलीकडेच ‘इतिहास कलेक्शन’ लाँच झालं आहे. या कलेक्शनमध्ये महाराष्ट्रातल्या जुन्या दागिन्यांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. त्याविषयी सायली सांगते की, ‘‘महाराष्ट्रातल्या जुन्या दागिन्यांचा बाज लक्षात घेऊन हे कलेक्शन मी तयार केलं आहे. त्यातल्या पारंपरिक कलाकुसरीची सांगड आधुनिक काळाशी कशी घालता येईल, याचा अभ्यास केला. अनेक ऐतिहासिक पुस्तकं वाचली. संदर्भ धुंडाळले. दागिन्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येत्या काही काळात इतर राज्यांतील ऐतिहासिक दागिनेही लॉन्च करण्याचा मानस आहे.’’  मुळात दागिन्यांची खरेदी हा अनेकींसाठी एक जिव्हाळ्याचा प्रसंग असतो. परंपरेचा साज असलेले आधुनिक दागिने असे घरबसल्या ऑनलाइन मिळाले तर बहारच. आद्याचं महत्त्व म्हणूनच जास्त वाढतंय.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handcrafted jewelry startup pioneer sayali marathe
First published on: 17-02-2017 at 00:40 IST