पावसाळा आहे. १५ ऑगस्टच्या साथीने मस्त सुट्टय़ा जमून आल्यात. अशा वेळी भटकंती हवीच; पण सध्या दिवस फक्त भटकंतीचे नाहीत, तर त्यासोबत खाबूगिरी करण्याचेही आहेत. आपल्याकडची अनेक पर्यटन स्थळे तिथल्या खास अशा खाण्याच्या पदार्थामुळे विशेष लोकप्रिय होताना दिसतायत. त्याबद्दलच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहगडावरील गावरान थाळी

पुण्यात राहणाऱ्यांना आणि पुण्यात येणाऱ्यांना पुण्याजवळची काही ऐतिहासिक ठिकाणं नेहमीच साद घालतात. सिंहगड हे एक असंच ठिकाण. हा इतिहासप्रसिद्ध किल्ला आणि त्याचं वैभव पाहण्यासाठी पर्यटक येतातच, पण इथे मिळणाऱ्या दही आणि ताकाचीही पर्यटकांना गोडी लागली आहे. हे दही आणि ताक मातीच्या मडक्यात तयार केलेलं असतं. त्यामुळे दही मस्त घट्ट असतं, शिवाय त्याला छान चव असते. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून महिला आणि मुलं गडावर रोज ताजं दही घेऊन येतात. गड चढून आलेल्या पर्यटकांचा नुसत्या या दह्य़ामुळेच श्रमपरिहार होतो; पण याचसोबत इथे प्रसिद्ध आहे, चुलीवरची गावरान थाळी. आपल्यासमोरच चुलीवर मस्त भाजलेलं वांगं कुस्करून तयार होणारं भरीत, भाकरी, खर्डा आणि दही.. पोटोबा एकदम खूश. यासोबत चविष्ट खुसखुशीत कांदाभजीचीही शिफारस होतेच. या बेतावर पर्यटक तुटून पडतात.

माळशेज घाटातील मका

पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच निसर्गसहलीचे वेध लागतात. डोंगरदऱ्यांतून वाट काढत उंचावरून कोसळणारे फेसाळते धबधबे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. मुरबाडजवळील ‘माळशेज घाट’ हा सगळ्यात लोकप्रिय घाट. याच घाटावर घाटीण देवी मंदिराच्या बाजूला मिळणारा मका ही प्रेक्षकांसाठी पावसाळ्यातील पर्वणीच असते. २० रुपयाला मिळणारा हा मका उकडलेल्या व भाजलेल्या या दोन्ही स्वरूपांत मिळतो.

इथला मका चवीला अतिशय गोड व मऊ  असतो. घाटात ठिकठिकाणी मकेवाले दिसतात; पण घाटीण देवी मंदिराजवळच्या मक्याची सर त्यांना नाही. धबधब्याच्या काठी बसून खाल्लेला, कोळशावर भाजलेला मका, त्यावर चोळलेलं लिंबू, मीठ अशी गरमागरम मेजवानी पावसाळी सहलीचं सार्थक करते.

रायगडावरची पिठलं-भाकर

अखिल शिवप्रेमींचं श्रद्धास्थान असलेला रायगड आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे इथलं भन्नाट पिठलं-भाकर. इथे ट्रेकिंगसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी असते. हा भलाथोरला गड चढून धापा टाकत वर आल्यावर वास येतो, पिठलं-भाकरीचा.

गड पाहून झाल्यावर इथल्या सखू मावशीच्या हातची गरमागरम आणि चविष्ट पिठलं-भाकरी, सोबतीला एका बुक्कीनं फोडलेला कांदा, दगडा-खलबत्त्यात कुटलेली खोबऱ्याची चटणी म्हणजे झक्कास बेत.

जोतिबाच्या डोंगरावरील बासुंदी चहा

पावसाळा म्हटल्यावर चहाचा एक कप आणखी जातोच; पण तो जर बासुंदीचा असेल तर? ऐकायला थोडं वेगळं वाटतं, पण हा प्रकार एकदम चविष्ट असतो. कोल्हापुरातल्या सुप्रसिद्ध जोतिबा डोंगरावर ‘अमृततुल्य बासुंदी चहा’ ही गाडी उभी असते. सध्या ते पर्यटकांचं पसंतीचं ठिकाण झालं आहे. नागमोडी वळणावरून, दाट धुक्या पावसासहित डोंगरावर आल्यावर बासुंदी चहा पिणं म्हणजे आहा. चहा नेमका कसा बनवतात, हे मात्र मालक सांगत नाहीत. पण मृदगंध आणि चहाचा गंध एकत्र घेणं हा निराळा अनुभव आहे, असं पर्यटक सांगतात.

लोणावळ्याचं चिली चीज

पावसाळा म्हटल्यावर आपसूकच पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळतात. भुशी डॅम, राजमाची किल्ला, टायगर हिल पॉइंट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. टायगर हिल पॉइंटवर मिळणारा चीज कॉर्न पकोडा विशेष लोकप्रिय आहे. मका, चीज आणि मसाले यांचं हे चिझी मिश्रण तोंडाला पाणी आणतं. इथली चीज मॅगी आणि चीज कांदाभजीसुद्धा मस्त असते.

घोटीचा भेळभत्ता

सह्य़ाद्रीच्या कुशीत अनेक झक्कास किल्ले आहेत आणि धरणंही. या धरणांपैकी एक म्हणजे, नाशिक आणि मुंबईच्या मध्यावरचं भंडारदरा. डोंगरावरच्या या धरणावर पावसाळ्यात पर्यटकांची भलतीच गर्दी होते. याच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घोटी गावात एक हॉटेलमध्ये अप्रतिम भेळभत्ता मिळतो. घोटीचा भेळभत्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पदार्थामध्ये फरसाण, चटण्या, कांदा, बटाटा, शेव आणि कुरमुरे यांचं अफलातून मिश्रण असतं. या भेळभत्त्याचा एक बकाणा भरल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला आवर्जून गाडी थांबवून खावा, असा हा भेळभत्ता.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon tourist spot food specialty monsoon trip monsoon food
First published on: 11-08-2017 at 01:03 IST