अनिश बिवलकर, म्युनिक, जर्मनी

अमेरिकेत एफडीएची मान्यता असणाऱ्या साठ टक्के अन्नपदार्थावर जर्मनीत बंदी आहे. जर्मनीत लोक खूपच वक्तशीर आहेत. वेळेची तमा नसणारे लोक त्यांना आवडत नाहीत. ‘लेट्स गो डच’ ही संकल्पना जर्मनीतही रुजली आहे. ते बिलाची विभागणी करतात आणि स्वत:चं बिल स्वत: भरतात. अगदी डेटिंगसाठी भेटल्यावरदेखील बिल आपलं आपणच भरायचं असतं.

मी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून अमेरिकेत आठ वर्ष नोकरी व वास्तव्य केलं. आमच्या अमेरिकन कंपनीने माझी बदली जर्मनीतील म्युनिक शहरात केली. गेलं वर्षभर मी आणि माझी बायको अल्पिता इथं राहात आहोत. सुरुवातीच्या काळात काही अचाट प्रश्न समोर उभे राहिले. सगळ्यात पहिली उभी ठाकली भाषेची अडचण. जर्मनांना आपल्या भाषेची इतकी प्रौढी आहे की ते दुसऱ्या कुठल्या भाषेत बोलतच नाहीत. फारच कमी लोकांना इंग्लिश समजतं आणि तेही अगदी मोडकंतोडकं. ब्ल्यूकार्ड काढणं, नेट कनेक्शन घेणं, बँकेत अकाऊंट उघडणं वगैरे व्यावहारिक कामांसाठीचे सगळे फॉर्म डॉइच्चमध्ये आणि लोकांचा थंड कारभार. आता सवयीने आमची डॉइच्च भाषेशी तोंडओळख होऊ  लागली आहे.

मागील काही वर्षांत म्युनिकमध्ये स्टार्टअपचा श्रीगणेशा झाला असून तरुण उद्योजकांच्या व्यवसायाला चांगलाच वाव मिळतो आहे. या शहरात ऑटोमोबाइलपासून ते सॉफ्टवेअपर्यंत आणि कॉफी मशीनपासून ते बीअर मशीनपर्यंत हरएक प्रकारचं संशोधन होत असून अनेक उद्योगधंदे अस्तित्वात आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीचं हे शहर माहेरघर असून, या भागातली ती सर्वात मोठी कंपनी आहे. ‘टीयूएम’ आणि ‘एलएमयू’ या इथल्या सगळ्यात मोठय़ा युनिव्हर्सिटीज आहेत. गेल्या काही वर्षांत इथे इंजिनीरिंग क्षेत्रात फारच चांगलं संशोधन होतं आहे. जर्मन मुलं बहुतांशी वेळा त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण करतात. युरोपियन किंवा अमेरिकन देशांप्रमाणे इथली तरुण मुलं अठराव्या वर्षी घराबाहेर पडतात. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागतात. भविष्याची तरतूद फारशी केली जात नाही, मात्र वर्तमान आयुष्याचा पुरेपूर आनंद उपभोगला जातो. कामाच्या वेळात कठोर मेहनत आणि वीकएण्डला फिरस्ती करणं किंवा मित्रमंडळींसोबत वेळ घालवला जातो. सुट्टय़ा भरपूरच प्रमाणात असल्याने जगभरात फिरायला जायचे बेत आखले जातात. तरुणाई इंग्लिश बोलते. त्यांची मित्रमंडळी जगभर विखुरलेली असतात. एकमेकांच्या संस्कृती-धर्माचा योग्य तो मान राखत ते हँगआऊट करतात. ही तरुणाई खूप फ्रेंडली, मदतीस तत्पर आणि मौजमजेचं जीवन प्रिय असणारी आहे. पाश्चात्त्य देशांतल्या किंवा भारतातील मुलांप्रमाणेच इथल्या मुलांचा पेहराव असतो. ऋतुमानानुसार त्यांचे पोशाख बदलतात. जर्मन पद्धतीच्या लग्नात वधू पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालते. कोणत्याही वयोगटातील जर्मन मंडळींची जीवनशैली खूपच व्यग्र असते.

वर्षांतून एकदा होणाऱ्या ‘ऑक्टोबर फेस्ट’ची जगभरचे लोक आतुरतेने वाट बघत असतात. मोठाली बीअर गार्टन (गार्डन) असतात. पाण्यासारखी बीअर वाहत असते. वीकएण्डला ही गार्टन (गार्डन) अगदी जत्रेसारखी फुललेली दिसतात. बुटर प्रिट्झेल, श्नित्स्झेल, बीअर, बटाटे हे बव्हेरिया भागातलं मुख्य अन्न आहे. दर शुक्रवारी पारंपरिक पद्धतीचे गोड पदार्थ इथे केले जातात. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये सबसिडाइज् पदार्थ मिळतात. इथल्या अन्नपदार्थाचा दर्जाही चांगला असतो. अमेरिकेत एफडीएची मान्यता असणाऱ्या ६० टक्के अन्नपदार्थावर जर्मनीत बंदी आहे. जर्मनीत लोक खूपच वक्तशीर आहेत. वेळेची तमा नसणारे लोक त्यांना आवडत नाहीत. ‘लेट्स गो डच’ ही संकल्पना जर्मनीतही रुजली आहे. ते बिलाची विभागणी करतात आणि स्वत:चं बिल स्वत: भरतात. अगदी डेटिंगसाठी भेटल्यावरदेखील बिल आपलं आपणच भरायचं असतं.

कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही न चुकता व्यायाम केल्याने, धावल्याने हे लोक सुदृढ असतात. फुटबॉल हा जणू धर्म मानला जातो आणि जवळपास प्रत्येकालाच फुटबॉल चांगला खेळता येतो. जर्मनी फुटबॉल विश्वचषक जिंकल्यावर सगळ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला होता. नाचतगात एका हातात बीअर घेऊन आम्ही सेलिब्रेट केलं होतं. फुटबॉलशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, लाँग टेनिससह अनेक खेळ इथे खेळले जातात. थंडीच्या मोसमात स्किइंग, इनडोअर सॉकर इत्यादी खेळ खेळतात. बव्हेरियामध्ये अनेक सुंदर तलाव असून जवळच डोंगरदऱ्याही आहेत. त्यामुळे साहजिकच हायकिंग करायला, बव्हेरियाभोवतालच्या परिसरात हिंडायला-फिरायला अनेकांना खूप आवडतं. जवळपास ९०० एकर पसरलेलं इंग्लिश गार्डन आणि मधून वाहणारी इस्सार नदी हा बहुतेक ैम्युनिकवासीयांचा आवडता टाइमपास आहे. तिथे उन्हाळ्यात लोक सìफग, सन बाथिंगचा आनंद लुटतात. ‘मरीनप्लात्झ’ हे ऐतिहासिक ठिकाण असून इथल्या संग्रहालयांना आवर्जून भेट द्यायला हवी. हा अख्खा परिसर रमतगमत, चालत चालत पाहायला खूप मजा येते.

बहुतांशी वेळा जर्मन लोक ‘नाझी’ या विषयाबद्दलचं बोलणं टाळतात. टिपिकल बव्हेरियन लोक आपण इंग्रजीत संवाद साधायला सुरुवात केली, तरीही इंग्रजी बोलत नाहीत. मात्र आपण त्यांना ‘मी जर्मन बोलू शकत नसल्याने तुम्ही इंग्रजीत बोला’, अशी विनंती केल्यावर ते इंग्रजीत बोलतात. भारतासारखंच इथेही पहिल्यांदा घरी आलेल्या पाहुण्याला आवर्जून भेटवस्तू दिली जाते. मित्रत्वाचं नातं असलं तरी उगीचच कोणी कोणाला घरी बोलवत नाहीत. कुणी बोलावलं तर ती फार मोठी गोष्ट समजली जाते. किंबहुना आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो, असा या कृतीमागचा संकेत समजला जातो. ते नियमांचं पालन कटाक्षाने करतात. काही वेळा काही नियम निर्थक असले तरी त्यांचं पालन केलं जातं. फसवणूक किंवा खोटेपणा हे गुण औषधालाही शोधून सापडत नाहीत. जवळपास सगळ्यांनाच यथास्थित पगार असल्याने व्यावसायिक नीतीनियमांचं ते पालन करतात. म्युनिकमध्ये थेट आल्प्समधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो. रेस्तरॉमध्ये पाण्याचा नळ ही संकल्पनाच अस्तित्वात नसते. एका पाण्याच्या बाटलीसाठी ३.५ युरो मोजावे लागतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथे बीअर पाण्यापेक्षा स्वस्त मिळते.

युरोपात म्युनिक हे मध्यवर्ती ठिकाण मानलं जातं. इटली, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स वगैरे देशांत प्रवास करण्यासाठी म्युनिक सोयीचं ठरतं. खुद्द म्युनिकमधली वाहतूक व्यवस्था महाग असली तरी ती उत्तम दर्जाची आणि अविरत सुरू असते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला मनाई नाही. एकुणात जर्मन लोक नीटनेटक्या राहणीमानाचे असतात. आसपासचा परिसर आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी ते घेतात. यथायोग्य स्वच्छता राखली जाते. इथे फर्निश्ड आणि अनफर्निश्ड घरं भाडय़ाने मिळतात. आपल्याला एक आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे काही वेळा अनफर्निश्ड घरात टॉयलेट नसतं किंवा प्रसंगी स्लॅबवर टाइल्सही लावलेल्या नसतात. कधी कधी उन्हाळ्यात तापमान ३५ अंशाच्या वर जातं. असं असूनही तिथल्या सार्वजनिक वाहतुकीत एसीची सोय केलेली नसते. इतकंच काय बऱ्याचशा जर्मन घरांमध्ये एसी किंवा फॅन लावलेला नसतो. त्यांना कडय़ाक्याचं ऊन सहन करावं लागतं. प्रायव्हसी आणि स्पेसबाबतच्या भूमिकेचा विचार करता हे लोक अमेरिका आणि भारतातील लोकांच्या मानसिकतेच्या मधोमध आहेत. जर्मन इंजिनीअरिंग जगभरात अचूकपणा आणि गुणवत्ता देणाऱ्या कामासाठी नावाजलं जातं. अमेरिकेतील पालकांसारखे घाबरून न राहता इथले पालक मुलांना शाळेत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू देतात. मुलांवर विश्वास टाकतात. इतकंच काय, भारतासारखी इथली मुलंही संध्याकाळी एकत्र खेळतात. इथल्या गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी चांगल्या सोयी आणि खूप प्रकारचे खेळ आहेत. एकत्र कुटुंबपद्धती नसली तरी पालकांना आठवडय़ात किंवा दोन आठवडय़ांत भेटणं होतं.

इथे राहायला आल्यावर सुरुवातीच्या काही महिन्यांतच अमेरिका आणि जर्मनीमधल्या पद्धती, रीतीरिवाजांमधले फरक आमच्या लक्षात येऊ  लागले होते. तिकीट घ्यायला मशीनजवळ आम्ही उभे होतो. अमेरिकेतील पद्धतीनुसार तिकिटाच्या रांगेत उभं राहिल्यावर दोन माणसांत ठरावीक अंतर ठेवायचं असतं. तसे आम्ही उभे राहिलो तर त्यांना ते समजलं नाही आणि ते आमच्यापुढे रांगेत उभे राहिले. साधारणपणे आपण केकशॉपमध्ये गेल्यावर ४ केक, कॉफी, २ ब्रेडची ऑर्डर देतो आणि ते एकदमच मिळतं. जर्मनीत मात्र सगळी ऑर्डर ठरावीक क्रमानेच आणली जाते.

हे शहर संमिश्र संस्कृतींचं आणि वैविध्यतेनं नटलेलं आहे. आशिया आणि आफ्रिकेतील स्थलांतरित, अनेक तुर्किश लोक आणि युरोपभरातील लोकांचे लोंढे रोजगाराच्या शोधार्थ इथे येऊन थडकतात. भारतीयांविषयी ‘म्युनिक’करांना फार आदर वाटतो. काही वैशिष्टय़पूर्ण चालीरीती आणि परंपरा या बायरिश संस्कृतीत नक्की पाहायला मिळतील; त्यांचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

शब्दांकन – राधिका कुंटे

viva@expressindia.com