हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा काही फक्त कवींचा बाणा नाही. अनेक मोठय़ांना छोटं व्हायला आवडतं. त्याला निमित्त ठरणारे काही ब्रॅण्डस् असतात. ओरीओ बिस्कीट्स हा असाच एक ब्रॅण्ड. हा ब्रॅण्ड भारतीयांसाठी तसा खूप अलीकडचा असला तरी जगभरातील बिस्कीटप्रेमींसाठी तो खूप जुना आहे. त्याच ब्रॅण्डची ही कहाणी.

१८९८ साली अमेरिकेतील काही बिस्कीट कंपन्यांनी एकत्र येऊन नॅशनल बिस्कीट कंपनी अर्थात नेबिस्को सुरू केली. या कंपनीनं १९१२ मध्ये आणलेलं सुप्रसिद्ध बिस्कीट म्हणजे ओरिओ. या कंपनीतील फूड सायंटिस्ट सॅम पोर्सेलो याने या बिस्किटाची कल्पना विकसित केली. विशेषकरून डार्क चॉकलेट किंवा व्हाइट चॉकलेट वापरून बिस्कीट बनवण्याचा विचार सॅमचा होता. १९२१ मध्ये या बिस्किटाचं ओरिओ सॅण्डविच आणि १९४८ मध्ये ओरिओ क्रीम सॅण्डविच असं नामकरण होऊन परत ते केवळ ओरिओ या मूळ पदावर आलं. अमेरिकेतील मंडळींचं हे अत्यंत आवडतं बिस्कीट होण्यामागची काही कारणं म्हणजे या बिस्किटाचा आकार, चव आणि क्रीममधला नित्यनवेपणा. विविध प्रसंगानुसार ओरिओमध्ये कायमच विविध बदल केले गेले. स्प्रिंग कुकीज ओरिओवर फुलं, फुलपाखरं यांची तर हॅलोविन स्पेशल कुकीजवर भूतं, मांजरी, कंदील यांची नक्षी कोरलेली असायची. लिमिटेड एडिशन ओरिओ तर बाजारात येताक्षणी खपू लागली होती. डबल स्टफ, मेगास्टफ, फुटबॉल, बीगस्टफ, ओरिओ मिनी, चॉकलेट ओरिओ असे ओरिओचे विविध प्रकार लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना आवडू लागले आणि ब्रॅण्ड ओरिओ लोकप्रिय होत गेला.

भारतात ओरिओ तुलनेनं बरंच उशिरा म्हणजे २०११ मध्ये दाखल झालं. कॅडबरी इंडियाने हे बिस्कीट भारतात आणलं होतं. लहानग्यांच्या हट्टापायी भारतीय घरात शिरलेल्या या बिस्किटानं लहानांसोबत मोठय़ांनाही आपलंसं केलं. अमेरिकेत ओरिओच्या टॅग लाइन होत्या, ओह ओह ओरिओ, फॉर किड इन ऑल ऑफ अस, हू इज द किड विथ ओरिओ कुकी? आणि द वन अ‍ॅण्ड ओन्ली ओरिओ. भारतात जाहिरात करताना ओरिओचं लक्ष्य ग्राहक छोटी मुलंच होती. मुळात हे बिस्कीट खाण्याच्या पद्धतींचं केलेलं वर्णनच खूप गमतीशीर होतं. ट्विस्ट, लिक आणि डंक अशा सूचना देऊन त्या क्रीमवरची दोन बिस्किटं दूर करत त्यातलं क्रीम जिभेने चाखत नंतर क्रीमशिवाय उरलेलं बिस्कीट दुधात बुडवून खाण्यातली गंमत जाहिरातीत अशा प्रकारे दाखवली गेली होती की, मोठी मंडळीही तसं करण्याचा मोह आवरू शकली नाही.

या अमेरिकन बिस्किटाच्या नावाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्नही झाला आहे. फ्रेंच भाषेत ओर हा शब्द सोनं धातूसाठी वापरला जातो. या  बिस्किटांचं जुनं पॅकिंग गोल्डन रंगाचं होतं. त्यामुळे हे नाव मिळालं असं काही जण म्हणतात. तर काहींच्या मते ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ होतो सुंदर, चविष्ट, छान. पण अर्थ काही असो.. या बिस्किटाला अत्यंत प्रेमानं स्वीकारलं गेलं आहे. आज १०० देशात हा ब्रॅण्ड विस्तारला आहे.

सध्याची ओरिओची टॅगलाइन आहे ‘ओन्ली ओरिओ’ ओरिओच्या भारतीय जाहिरातीत बापलेकीचं नातं अगदी  निरागसपणे उलगडलं होतं. रणबीर कपूरच्या ओरिओच्या जाहिरातीही खूप गाजल्या. साधारण १०५ वर्ष जुनं असं हे बिस्कीट जगभरातील प्रसिद्ध ब्रॅण्डपैकी एक. भारतात अशा पद्धतीचं बॉनबॉन बिस्कीट अनेक वर्षे लोकप्रिय आहे. आतलं क्रीम हे त्यातलं विशेष आकर्षण.

तसं पाहायला गेल्यास खाण्यापिण्याच्या सभ्यतेच्या संकल्पनांमध्ये बिस्किटातलं क्रीम चाटून खाणं, बिलकूल बसत नाही. पण ही बिस्किट्स तशीच खाण्यात एक अवखळ मजा आहे. मोठं झाल्यावर अनेक गोष्टींवर आपसूकच अमुक करावे, तमुक करू नये अशा प्रकारची बंधनं येतात. ती झुगारून देण्याचा अनिवार मोहही होतो. ही सुप्त इच्छा पूर्ण होते जेव्हा समोर आलेल्या बिस्किटातील एखादं बिस्कीट आपण उचलतो. इतरांच्या नजरा टाळत आतलं क्रीम तेवढं चाटून नंतर अगदी साळसूदपणे उरलेलं बिस्कीट खायचं नाटक करतो. हे छोटे छोटे क्षणही खूप मोठा आनंद देऊन जातात. त्या आनंदाचा ‘क्रीमी लेअर’ म्हणजे ओन्ली ओरिओ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मि वारंग viva@expressindia.com