पूर्वीच्या काळी कोणाच्या पाठीमागे त्याच्याबद्दल काही बोलणं ही वाईट सवय मानली जायची आणि कोणाला निनावी पत्र पाठवणं वगैरे म्हणजे तर भ्याडपणाच! मात्र आजच्या तरुणाईची सगळीच समीकरणं बदलत असताना ही संकल्पना तरी तशीच कशी काय राहील? टेक्नॉलॉजीमध्ये पुढे असणाऱ्या आजच्या पिढीकडून SayAt.me आणि Sarahah अशा नवनवीन अ‍ॅप्सचा जयकार केला जातो आहे. ज्यावर कोणत्याही व्यक्तीला आपण निनावी राहून संदेश पाठवू शकतो. ज्या व्यक्तीने त्यावर अकाऊंट तयार केलं असेल त्याला आपण आपलं अकाऊंट नसतानाही मेसेज पाठवू शकतो. आपलं नाव-गाव लपवून एखाद्याशी वाटेल तसा संवाद साधण्याची सुविधा देणाऱ्या या अ‍ॅप्सचे लाखो डाऊनलोडर्स आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्याला निनावी संदेश पाठवण्यामागे तरुणाईची मानसिकता नक्की काय असू शकते याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेकांमध्ये असलेला ‘न्यूनगंड’ हेच यामागचं मुख्य कारण असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला एखादी गोष्ट बोलायची आहे, पण ती त्या कोणासमोर प्रत्यक्ष बोलता येणार नाही, अशा प्रकारचा न्यूनगंड असतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलायची असलेली भीती ही अशा अ‍ॅप्सच्या वापराला कारणीभूत ठरते आहे. अशा अ‍ॅप्सवर एखाद्याबद्दल कॉमेंट करणारे तीन वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, असं ते सांगतात. एक म्हणजे जे निनावी राहून काय वाटेल त्या पातळीचं वाईट बोलतात, दुसरे म्हणजे जे तोंडावर प्रेम व्यक्त करू शकत नाहीत असे ‘हिडन’ रोमिओ किंवा ज्युलिएट आणि तिसरे म्हणजे ‘ओळखा पाहू मी कोण’ म्हणून लपाछपी खेळत राहणारे खोडकर मित्र! निनावी राहून वाईट बोलणाऱ्यांना सुज्ञ लोक किंमत देत नाहीत. ‘हिडन’ रोमिओ किंवा ज्युलिएटपर्यंत इच्छा असूनही पोचता येत नाही, कारण ते निनावी असतात आणि लपाछपी खेळणाऱ्या मित्रांना अनेकदा सहजपणे ओळखता येतं. तिसरा प्रकार सोडला तर पहिल्या प्रकारात भ्याडपणा तर दुसऱ्या प्रकारात न्यूनगंड आणि संकोच ही कारणं दिसून येतात, असं भाटवडेकर यांनी सांगितलं.

केवळ या अ‍ॅप्सच्या मागे आपला खरा चेहरा लपवून आपल्या आवडत्या किंवा ओळखीच्या व्यक्तीला मेसेज करणारे लोक या प्रकारात दिसतात असं नाही, तर या अ‍ॅपमुळे आणखी एक गोष्ट विचित्रपणे आणि वेगाने वाढत चाललेली दिसते आहे. मेसेज देणारा एकीकडे तर दुसरीकडे आपल्याला आलेले हे निनावी मेसेजेस सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय अनेकांना लागली आहे. हे शेअर करणाऱ्यांची मानसिकताही इथे लक्षात घ्यायला हवी. आपल्याला आलेले मेसेजेस हे गुप्त मेसेजेस आहेत, फक्त आपल्यापुरतीच आहेत या गोष्टीची कल्पनाच नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्याला असे किती मेसेजेस आले आहेत हे लोकांना दाखवण्यात रस असल्यामुळे म्हणा, पण अशा अ‍ॅप्सवर आलेले सगळे मेसेजेस आणि त्यावर आपली स्वत:ची टिप्पणी लिहून फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट झाली आहे. याउलट ‘मला निनावी राहूनसुद्धा कोणी मेसेज करत नाही’ अशी खंतही अनेकांनी पोस्ट केली आहे. याबद्दल बोलताना डॉ. मनोज भाटवडेकर म्हणाले, सदसद्विवेकबुद्धी न वापरल्यामुळे होणाऱ्या या गोष्टी आहेत. आपल्याशी कोणी बोलत नाही, असं स्वत:ला सांगत राहून त्याचा कॉम्प्लेक्स तयार करायचा आणि तो सतत मनाशी बाळगायचा, ही जशी तरुणांची प्रवृत्ती होत चाललेली आहे. तशीच या अ‍ॅप्समुळे आपल्याला किती जास्त आणि किती छान छान मेसेजेस आले हे दाखवून प्रौढी मिरवायची आणि स्वत:च्या कौतुकातच समाधान मानायचं ही प्रवृत्तीही तरुणाईत बळावत चालली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सातत्याने येत असणारे ‘साराहाह’सारखे अ‍ॅप्स आणि त्याच्या वापराच्या उत्सुकतेपोटी त्यात ओढल्या गेलेल्या तरुणाईने आपल्याभोवती व्हच्र्युअल जग तयार करून घेतलं आहे. या व्हच्र्युअल जगात आणि आजूबाजूच्या प्रत्यक्ष वास्तव जगात असणारं अंतर त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे आपण प्रत्यक्षात कसे आहोत, याची चाचपणी करण्यापेक्षा आभासी जगात आपलं अस्तित्व काय आहे याला अधिक महत्त्व दिलं जातं आहे आणि त्यामुळेच तरुण पिढी सहजपणे अनेक धोकादायक खेळांनाही बळी पडते आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. जितक्या लवकर आपण स्वत:ला आभासी जगातून वास्तवात आणू तितक्या लवकर अशा गोष्टींच्या, खेळाच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणं बंद होईल. त्यामुळे अशा अ‍ॅप्समागचं वास्तव जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा!

viva@expressindia.com  

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media privacy policy sarahah app sayat me identity hide
First published on: 15-09-2017 at 00:39 IST