संपर्कक्रांतीनंतर जग जवळ आलं आणि आता स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर तर ते फारच जवळ आलं. प्रेमाचंही तसंच. सतत एकमेकांच्या संपर्कात (सान्निध्यात नव्हे) राहिलो तरी एकमेकांविषयी विश्वास मात्र कमी होत जातोय. म्हणून तर ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा लास्ट सीन जगप्रसिद्ध होतोय. आजचं प्रेम एकमेकांच्या खूप जवळ आलंय हे खरं. पण तेच तर प्रेमामधलं अंतर ठरत नाहीए ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक जिवलग मित्र पहिल्यांदाच आमच्या सोबत ट्रेकिंगला आला होता. गडाच्या सुळक्यावर पोहोचताना मला म्हणाला, ‘भावा, जाम बरं वाटतंय आज..’ मी म्हटलं, ‘हो नं, किती सुंदर दृश्य आहे नाही, कसली शुद्ध हवा आहे यारा इथे. मस्त वाटतंय!’ त्यावर तो उत्तरला, ‘ते आहेच रे, पण मला वेगळ्याच गोष्टीचं बरं वाटतंय!’ ‘कुठल्या?’ त्याने रेंज नसलेला मोबाइल खिशातून काढला आणि म्हणाला, ‘आज एकदाही बोललो नाही रे तिच्याशी, जाम बरं वाटलं. जिवाला शांतता!’ मी क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि घोळक्यात फुटलेल्या हास्यात मीही सामील झालो. खरं तर त्या दिवशी अशा अर्थाने शांत वाटणाऱ्या माझ्या मित्राची आणि तिथे शहरात तगमगणाऱ्या त्याच्या सखीची मनापासून दया आली.
असाच एक दिवस, नेहमीच्या सवयीने बस उशिरा येणार हे गृहीत धरून बसथांब्यावर ओळखीचे चेहरे शोधू लागलो. तेवढय़ात नजर एका जोडप्यावर गेली. दोघांनी स्वत:ला प्रेमात इतकं झोकून दिलं होतं की, ते विसरूनच गेले, ही जागा आपण अद्याप विकत घेतली नाहीये ते. त्या ‘लडिवाळ’पणाला काही अंत नव्हता. परंतु हळूहळू सरडय़ाचा रंग बदलू लागला. त्याच्या हातातला मोबाइल तिच्या मालकीचा असावा, कारण ती तो हिसकावून घ्यायचा अथक प्रयत्न करत होती. शेवटी त्या पठ्ठय़ाने त्याच्या दोन ‘वत्सल’ हातांपैकी एका हाताने तिला अडवलं आणि उरलेला हात खांद्यापासून लांब नेत वरती काहीशा चिकित्सक नजरेने संशोधन करू लागला. आता सरडा खरच काळा-निळा पडण्याची पाळी आली. त्याच्या एकंदर आवेशावरून त्या नाजूक रुपडय़ाचे आता काही खरं नाही असं वाटू लागलं. तेवढय़ात त्यांचा सोशल अँटेना जागृत झाला. आपल्याकडे अनेक डोळे रोखून बघत आहेत हे जाणवून त्यांनी आपापल्या माना कुशीत घेतल्या आणि तिथून पळ ठोकला. बसथांब्यावर प्रौढांनी ‘काय ही नवीन पिढी..!!’ या अर्थाने माना फिरवल्या, तरुणांनी एकमेकाकडे बघून डोळ्यांनीच टाळ्या दिल्या. या दोन्ही प्रसंगांना अनुरूप अशी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतली चपखल ओळ आठवली.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day special article on relationship
First published on: 12-02-2016 at 01:22 IST