आजच्या डिजिटल जीवनात पोस्ट्स, बातम्या, नोटिफिकेशन्स, व्हिडीओ, मेसेजेस यांच्यातून आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. एकाच वेळी भरमसाट माहिती समोर आल्यामुळे, मेंदूला तिच्यावर प्रक्रिया करणं आणि विश्लेषण करणं कठीण होतं. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणजे माहितीचा अतिरेक ही नवी समस्या बनू पाहते आहे.

एक होता गरीब बिचारा दामू. देवाला त्याची दया आली आणि त्याने दामूला सोन्याच्या मोहरा द्यायचं ठरवलं. अट एवढीच – ‘थांब’ म्हणेपर्यंत देत राहीन. जमिनीवर पडल्या तर मोहरांची माती होईल. दामूने झोळी पसरली. देव देत राहिला, दामू घेत राहिला. झोळी भरत चालली, पण दामू काही थांब म्हणे ना. अजून हवं हा हव्यास काही थांबेना. शेवटी त्या मोहरांच्या वजनाने झोळी फाटली आणि सगळ्या मोहरा जमिनीवर पडून त्याची माती झाली. लहानपणी ऐकलेली गोष्ट. आजची आपली स्थितीही अगदी अशीच आहे. फक्त आपण माहितीचा हव्यास धरलाय. रोज सकाळी उठल्यापासून आपण मोबाइल किंवा लॅपटॉप हातात घेतो, झोळी पसरतो आणि इंटरनेट देवाकडून मिळेल ती माहिती पदरात पाडत राहतो. सोशल मीडियाच्या पोस्ट, यूट्यूबवर पॉडकास्ट, बातम्या, रील्स… किती आणि केवढं… शेवटी मेंदूची क्षमता झोळीसारखी फाटते आणि मिळवलेली माहिती उपयुक्त ठरण्याऐवजी गोंधळ वा मानसिक थकव्याचं कारण बनून मातीमोल ठरते.

कधी तुमचं असं झालंय का… कॉलेज प्रोजेक्टसाठी गूगलवर शोध घ्यायला सुरुवात केली. आधी एक-दोन चांगले लेख मिळाले. मग शोधता शोधता यूट्यूबवर शिफारस केलेले व्हिडीओ, रिसर्च पेपर्स यांच्या ढिगाऱ्यात अख्खा दिवस गेला, पण अजूनही ‘नेमकं काय लिहायचं’ याचं उत्तर मिळालेलं नाही. एक साधा ब्ल्यूटूथ स्पीकर घेतानाही अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखे अनेक शॉपिंग पोर्टल्स, तिथले ‘झकास’ ते ‘भंगार’ असे परस्परविरोधी रिव्ह्यूज. यूट्यूबवर ब्रँडची तुलना करणारे ४० व्हिडीओ आणि मग हे सगळं ढुंढाळूनही काय घ्यावं? हा प्रश्न अधिकच गहन होतो. बातम्यांचंही असंच… एकाच घटनेवर १० न्यूज पोर्टल्सची १० वेगळी मतं असतात, यालाच इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असं म्हटलं जातं.

इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणजे माहितीचा अतिरेक. एकाच वेळी भरमसाट माहिती समोर आल्यामुळे, मेंदूला तिच्यावर प्रक्रिया करणं आणि विश्लेषण करणं कठीण होतं. परिणामी, ज्या उद्देशाने माहिती मिळवली जात होती त्यावर निर्णय घेणं कठीण होतं अशी याची सोपी व्याख्या सांगता येईल. ही संज्ञा जरी आजच्या डिजिटल युगातली वाटत असली, तरी तिचा विचार फार पूर्वीपासून सुरू आहे. ‘भरमसाट पुस्तकं म्हणजेच अडथळा’, असं रोमन तत्त्वज्ज्ञ सेनेका इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणून गेला आहे. विसाव्या शतकात माहितीच्या झपाट्याने वाढणाऱ्या पुरावर बर्ट्राम ग्रॉस यांनी १९६४ मध्ये इशारा दिला होता, ‘जेव्हा माहिती मिळण्याचा वेग निर्णयक्षमतेपेक्षा जास्त होतो, तेव्हा माहितीचं ओझं तयार होतं’. १९७० मध्ये अमेरिकन भविष्यवादी लेखक अल्विन टॉफ्लर यांनी या ओझ्यासाठी ‘इन्फॉर्मेशन ओव्हरलोड’ हा शब्द वापरला आणि पुढे तो जगभर प्रसिद्ध झाला.

माहितीचा विस्फोट हे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचं सर्वात मोठं कारण आहे. ‘साइटइफाय’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या सर्व्हेनुसार इंटरनेटवर १ अब्जाहून अधिक वेबसाइट्स, यूट्यूबवर ४ अब्जाहून अधिक व्हिडीओ असून यात रोज २० लाखांहून अधिक व्हिडीओजची भर पडते आहे. दररोज १०० अब्जांहून अधिक व्हॉट्सअॅप मेसेजेस पाठवले जातात, गूगलवर दररोज अंदाजे १६.४ अब्ज सर्च, स्पॉटीफायवर दररोज ६०,००० नवीन गाणी येतात. स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि २४ ७७ इंटरनेटच्या जमान्यात, पोस्ट्स, बातम्या, नोटिफिकेशन्स, व्हिडीओ, मेसेजेस यांचा अक्षरश: मारा होतो आहे. पूर्वी माहिती मिळवायला कष्ट घ्यावे लागत, पुस्तकं चाळावी लागत, कोणतीही ख्यालीखुशाली पत्रातून, टेलिफोनवरून कळायची. बातम्यांसाठी संध्याकाळी सातच्या बातम्या वा दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांची वाट पाहावी लागायची. आता सगळं एका क्लिकवर हजर! आणि त्यात भर म्हणजे अल्गोरिदम्स. हे इतके सेवातत्पर की आपल्या सर्च हिस्ट्रीच्या आधारे आपण न विचारताच ‘तुम्हाला हे आवडेल बुवा’ म्हणत नवी माहिती घेऊन हजर. त्यामुळे माहितीचा महापूरच आला आहे.

अमेरिकन लेखक जेम्स ग्लीक यांनी ‘द इन्फॉर्मेशन: ए हिस्ट्री, ए थिअरी, अ फ्लड’ या पुस्तकात इन्फॉर्मेशन थिअरी मांडली आहे. ‘प्रचंड प्रमाणात आणि सहज उपलब्ध असणारी माहिती हेच कारण नव्हे तर सतत नवीन माहिती मिळवण्याचा, साठवण्याचा आणि तिचं विश्लेषण करण्याचा आपला हव्यास हे इन्फोर्मेशन ओव्हरलोडचं खरं कारण आहे.

‘इनफॉर्म्ड’ राहणं म्हणजे स्मार्ट असणं, असं एक सामाजिक समीकरण तयार झालं असल्याने कोणत्याही विषयाची सखोल माहिती असणं ही प्रतिष्ठेची बाब वाटू लागली आहे. क्रिकेटची चर्चा सुरू झाली की, ‘काल कोहलीचा स्ट्राइक रेट बघितलास का?’ या प्रश्नावर उत्तर नसेल तर आपण ‘आउटडेटेड’ ठरतो. परिणामी, लाइव्ह स्कोअर, मॅच हायलाइट्स बघत स्वत:ला अपडेट ठेवायचं बंधन येतं. आपण ‘फायनॅन्शियली अनअवेअर’ वाटू नये, म्हणून प्रत्यक्ष गुंतवणूक न करताही रोजचे निफ्टी अपडेट्स, टिप्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्सवरचे फॉरवर्ड्स वाचले जातात. राजकारणातली नवी घटना, लेटेस्ट वेबसिरीज, इन्स्टावरचा नवा ट्रेंड, सध्याची फॅशन. कितीतरी विषय असल्याने माहिती मिळवणं संपतच नाही.

त्यात भर म्हणजे ‘फोमो’. काहीतरी महत्त्वाचं चुकू नये म्हणून प्रत्येक अपडेट, नोटिफिकेशन ‘लगेच’ वाचली जातात. मोबाइल सायलेंटवर ठेवून अभ्यास करत असताना एक मेसेज येतो, ‘ब्रेकिंग : अमुक अभिनेता जेलमध्ये’. या बातमीचा आपल्याशी काही संबंध नसतो, पण तरीही ते वाचल्याशिवाय राहवत नाही. साधी स्मार्ट वॉचची खरेदी असो की करिअरची निवड, जितकी जास्त माहिती मिळेल, तितका योग्य निर्णय घेता येईल असं आपल्याला वाटतं. एका फॅमिली ट्रिपसाठी हॉटेल्स, रूट्स, स्थानिक खाण्याचे पर्याय, ‘टॉप १० अॅक्टिव्हिटीज’… इतकं संशोधन केलं जातं की जणू यात पीएचडीच करायची आहे.

बऱ्याचदा तर ‘हे नंतर उपयोगी पडेल’ या विचाराने आपण माहिती मिळवत राहतो. आता नवीन मोबाइल घ्यायचा नसला तरी जेव्हा तो घ्यायची वेळ येईल तेव्हा माहिती असायला हवी म्हणून ‘२० हजारांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम कॅमेरा फोन’ यासारखे लेख, यूट्यूब व्हिडीओ, रिव्ह्यूज आपण पाहत राहतो. रात्रीच्या जेवणात खिचडी करायची असली तरी इटालियन गार्लिक पास्ताची रेसिपी पाहून ठेवली जाते. पण असं करताना, माहितीचं एक ओझंच आपल्या मनावर आणि निर्णयक्षमतेवर येऊन बसतं.

या माहितीच्या सततच्या माऱ्याचा आपल्या बुद्धीवर आणि मनावर खोल परिणाम होत असतो. इतकी सगळी माहिती सुरुवातीला उपयोगी वाटते, पण कालांतराने मानसिक थकवा जाणवू लागतो. डोकं जड वाटतं, चिडचिड होते, काही वेळा झोपेवरही परिणाम होतो. एकाच वेळी इतकी माहिती समोर आल्यानं नेमकं कुठे लक्ष केंद्रित करायचं हेच कळेनासं होतं. याचा दीर्घकालीन परिणाम एकाग्रता कमी होण्यावर होतो. खरंतर आपण योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती शोधत असतो, पण माहितीच इतकी वाढते की शेवटी गोंधळ वाढतो, निर्णय घेण्यास उशीर होतो, किंवा काही वेळा निर्णय घेणंच टाळलं जातं.

निसर्गाने आपला मेंदू सतत माहिती घेण्यासाठी नाही तर मिळालेल्या माहितीच्या आधारे विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी घडवला आहे, असं अभ्यासक मानतात. उत्क्रांतीच्या प्रवासात जगण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीतून आवश्यक तेवढी माहिती घेऊन पटकन निर्णय घेण्यासाठी मेंदूची रचना झाली आहे. रोजच्या जीवनातही मेंदू असंच कार्य करत असतो. समजा तुम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रांबरोबर बसला आहात. मित्राने घातलेला पिवळा टीशर्ट, मैत्रिणीने लावलेला परफ्यूमचा वास डोळ्यांनी, नाकाने टिपला आहे. गप्पांचे विषय कानाने ऐकले जात आहेत. ओळखी अनोळखी चेहरे सगळं काही मेंदूत नोंदवलं जात आहे. पटकन मित्र म्हणतो ‘अरे १८ तारखेला सबमिशनची तारीख आहे. तेव्हा मेंदू पटकन निर्णय घेतो…हे महत्त्वाचं आहे’. मेंदूचा निर्णय घेणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधून परफ्यूमचा वास, ड्रेसचा रंग हे सगळं आपोआप विसरलं जातं. आणि सबमिशनची तारीख लक्षात ठेवली जाते. गरज संपल्यावर तीसुद्धा विस्मरणात जाते. मेंदूचे हिपोकॅम्पस हे केंद्र मिळालेली माहिती अल्पकालीन की दीर्घकालीन स्मरणात ठेवायची ते ठरवत असतं.

पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे, नाटक पाहणे, गप्पा मारणे अशा क्रियेत मिळणारी माहिती मेंदूच्या ‘प्रोसेसिंग स्पीड’ला अनुरूप असल्याने मेंदू उत्तमपणे कार्य करू शकतो. पण, आजच्या डिजिटल जीवनात दर सेकंदाने मेंदूवर आदळणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करून, त्यानुसार निर्णय घ्यायला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला वेळच मिळत नाही. सततच्या नवीन माहितीमुळे हिपोकॅम्प केंद्रही गोंधळते. कोणती माहिती दीर्घकाळ ठेवायची, कोणती टाकून द्यायची हे नीट होत नाही. परिणामी, बरीच माहिती मेंदू सोडून देतो. एवढी माहिती मिळवूनही ना डोक्यात काही राहात, ना निर्णय घेता येतो. थोडक्यात अति माहितीची माती होते. असं होऊ द्यायचं नसेल, तर आपल्या झोळीत मावेल तितकंच घेणं हे खरं शहाणपण.

इंटरनेटवर माहितीचं महाभांडार आहे आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने’ अशी आपली स्थिती. इंटरनेटवरची प्रत्येक गोष्ट वाचायची, पाहायची, ऐकायची खरंतर गरज नसते. फेसबुकवरच्या सगळ्याच पोस्ट, इन्स्टाग्रामच्या रील्स, कोरावरच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला उपयोगी असतीलच असं नाही. यूट्यूबवर कुर्डुवाडीतील द्राक्षलागवड तंत्र ते जपानची अर्थव्यवस्था अशा सगळ्या विषयांवर पॉडकास्ट पाहून नक्की कोणतं ज्ञान मिळणार. फक्त अपडेटेड राहण्याच्या नादात भारंभार माहिती मिळवण्यापेक्षा मला नेमकी कोणती आणि किती माहिती हवी आहे? हा प्रश्न स्वत: ला विचारणं गरजेचं.

आवश्यक ती माहिती मिळवताना शिस्त लावणंही गरजेचं ठरतं. एका वेळी एकाच मुद्द्याची माहिती मिळवायची सवय माहितीच्या अतिरेकाला काहीशी नियंत्रित करू शकते. आधी थोडक्यात माहिती, मग हळूहळू पुढचे एक एक मुद्दे शोधता येतात. सर्च करताना नेमका, मुद्देसूद प्रश्न विचारल्यास भारंभार माहिती येण्याचं प्रमाण कमी होईल. मणभर माहितीपेक्षा कणभर कृती सरस हेही सूत्र महत्त्वाचं. फिटनेस फ्रीक असाल तर तासनतास व्यायामाचे व्हिडीओ बघण्यापेक्षा २० मिनिटे व्यायाम करून फिटनेस मिळणार आहे. ध्यानाच्या विविध पद्धती, फायदे, त्यांच्या तुलना यात काथ्याकूट करत बसण्यापेक्षा डोळे बंद करून फक्त ५ मिनिटं शांत बसलो तर शांतता मिळणार आहे.

मुळात सगळी माहिती इंटरनेटवरच मिळते हाही एक गैरसमजच. त्यामुळे अधूनमधून सरळ डिजिटल डिटॉक्स करत माहिती मिळवायला पुस्तक वाचावीत, अनुभवी लोकांशी चर्चा कराव्यात, मित्रांशी गप्पा माराव्यात. अनुभवांमधून, संवादांतून आणि चिंतनातूनही खूप काही शिकता येतं.

युवल नोहा हरारी म्हणतात, ‘असंबद्ध माहितीचा भडिमार होत असलेल्या जगात आपल्या विचारांची स्पष्टता हीच शक्ती ठरते’. माहितीच्या महासागरात आपल्या विचारांची नौका भरकटू द्यायची नसेल, तर विचारांचा सुकाणू घट्ट धरून ठेवायला हवा. रुमी म्हणतो तसं ज्ञानी होण्याचं खरं कौशल्य म्हणजे काय दुर्लक्षित करावं हे ओळखणं. यानुसार आजच्या माहितीच्या युगात किती माहिती मिळवायची यापेक्षा कोणती माहिती सोडून द्यायची हे ज्याला कळलं तो खरा शहाणा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com