नववीतला ऋत्विज शाळेतून घरी आला की दप्तर कोपऱ्यात भिरकावतो आणि आधी मोबाइल हातात घेऊन गेम खेळायला सुरुवात करतो. कपडे बदलणे, जेवण, अभ्यास… हे सगळं नंतर. रोहन कॉलेजचा विद्यार्थी असला तरी त्याचीही तीच गत. उलट तो तर रात्र जागूनच काढतो, कारण त्याच्यासाठी खरा गेम तर रात्रीच सुरू होतो. ऋतुजा ऑफिसला जाते, पण तिचा छंद वेगळाच. तिला कँडी क्रश खेळायला इतकं आवडतं की कामाच्या वेळेत दर पंधरा-वीस मिनिटांनी, घरी स्वयंपाक करताना किंवा अगदी सिग्नलला गाडी थांबली आणि एक मिनिट जरी मिळाला तरी ती थोडा गेम खेळूनच घेते.
मैदानावर खेळायला म्हणून जमलेली गँगही आता मैदानी खेळ बाजूला ठेवून कोपऱ्यात बसून मोबाइलवर गेम खेळताना दिसते. कॉलेज कट्टे, सोसायटीचं पार्किंग, कॅफे… कुठेही नजर टाका, हातात मोबाइल घेऊन बसलेले तरुणांचे घोळके हे आता अगदी कॉमन दृश्य झालं आहे. आणि यावर त्यांचं नेहमीचं उत्तर असतं, ‘‘गेमिंग म्हणजे फक्त टाइमपास’’, ‘‘मी फक्त रिलॅक्स व्हायला गेम खेळतो.’’ पण, खरंच हे प्रकरण दिसतं तेवढं साधं-सोपं आहे का?
या वर्षीच्या काही बातम्यांकडे लक्ष दिले तर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे अनेक गंभीर घटना घडत असल्याचे दिसते. फेब्रुवारी २०२५ मध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये एका १५ वर्षीय मुलाने त्याच्या कुटुंबाने मोबाइल गेमिंगवर बंदी घातल्यामुळे आत्महत्या केली. विशाखापट्टणमच्या एका किशोराने आईने गेम खेळू नये म्हणून फोन जप्त केला, या रागातून स्वत:च्या आईचा खून केला. जुलै २०२५ मध्ये नाशिकमध्ये १६ वर्षीय मुलाने ऑनलाइन गेममध्ये पैसे हरवल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. याशिवाय, हैदराबादमध्ये चोरी आणि कर्जबाजारीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये काही तरुण ऑनलाइन गेमिंगमुळे आर्थिक दबावाखाली गुन्ह्यात गुंतल्याचे समोर आले. या काही प्रातिनिधिक बातम्या ऑनलाइन गेमिंगमुळे होणाऱ्या समस्यांची दाहकता दाखवायला पुरेशा आहेत.
आज ऑनलाइन गेमिंग हे केवळ करमणुकीचे साधन राहिलेले नाही, तर ती एक प्रचंड मोठी बाजारपेठ बनली आहे. फॉर्च्यून बिझनेस इन्साइट्सनुसार, २०२४ मध्ये ऑनलाइन गेमिंगचा जागतिक बाजार २०८.३३ अब्ज डॉलर इतका होता. २०२५ च्या अखेरपर्यंत तो २२५.२८ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग हे जगभरातील प्रचंड वाढते उद्याोगक्षेत्र ठरते आहे. या घोडदौडीत भारतही मागे नाही. भारतात २०२५ मध्ये तब्बल ५१.७ कोटी ऑनलाइन गेमर्स असतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर भारताचा गेमिंग बाजार १२.५८ अब्ज डॉलर इतका होईल, असंही या अहवालात नमूद केलं आहे.
आपण खेळ का खेळतो? याचं उत्तर आपल्या मनात दडलं आहे. प्रत्येकाला कुठेतरी आव्हान आवडतं, काहीतरी जिंकण्याचा आनंद हवा असतो. मुळात खेळ ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. खेळांमधून आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताजेपणा आणि सामाजिक कौशल्यं मिळतात. उत्क्रांतीच्या विविध टप्प्यात खेळातून आपली जीवनावश्यक कौशल्ये सुधारली, सामाजिक बंध मजबूत झाले असे अभ्यासक मानतात. आजही खेळ आपल्याला आनंद देतात, ताण हलका करतात आणि जिंकणे-हारणे स्वीकारायला शिकवतात. एकत्र खेळताना मैत्री घट्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो, पण गेल्या दशकभरात या नैसर्गिक मानवी गरजेला नवा डिजिटल चेहरा मिळाला आहे. व्हिडीओ गेम्सपासून प्रू झालेला प्रवास आज स्वस्त स्मार्टफोन आणि उच्च-गती इंटरनेट यांनी बदलला आहे. ऑनलाइन गेमिंग आता घराघरांत पोहोचले आहे. आणि यातून हे करमणुकीचे माध्यम न राहता, त्यामुळे नवनव्या समस्या उभ्या राहत आहेत.
गेमर्सला कायम वाटतं असतं की ते रिलॅक्स व्हायला गेम खेळत आहेत. अभ्यासातून, ऑफिसच्या कामातून दमलेल्या मेंदूला जरा ‘चिल’ करूयात म्हणून खेळले जाणारे हे गेम्स आपल्याला खरंच आराम देतात का? कुठल्याही धोक्याच्या किंवा रोमांचक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून शरीरात अॅड्रेनलाइन (Adrenaline) हे स्ट्रेस हॉर्मोन स्रावले जाते. समजा आपण जंगलातून निवांत चाललो आहोत, अचानक भुकेला वाघ समोर आला तर? ही करो या मरो अशी परिस्थिती आहे. शरीरात अॅड्रेनलाइनची पातळी वाढून हृदयाची गती आणि रक्तदाब वाढेल. मेंदू अल्टर मोडवर जाईल. पुढे होऊ शकणारी दुखापत किंवा ताणाचा सामना करण्यास मदत होण्यासाठी वेदना कमी जाणवतील. स्नायूंना ऊर्जेचा त्वरित पुरवठा होईल. थोडक्यात आणीबाणीला तोंड द्यायला शरीर सज्ज होईल. ऑनलाइन गेम खेळताना देखील हे संप्ररेक स्त्रवले जात असते. रोमांचक परिस्थिती, स्पर्धा आणि जिंकण्याचा ताण यामुळे अॅड्रेनलाईन सतत स्रावते. परिणामी, आपण खरंतर निवांत होत नाही; उलट, शरीर अधिक सतर्क आणि सज्ज झालेले असते. विशेषत: रात्री दीर्घकाळ गेम खेळल्यास याचा झोपेच्या वेळा आणि गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो.
समजा आपल्या पाठीमागे वाघ लागला आहे. कल्पना करा! ही परिस्थिती किती काळ टिकेल? फार वेळ नाही. साधारण १५ ते २० मिनिटांत आपण सुरक्षित ठिकाणी पोहचलेलो असू किंवा त्या वाघोबाच्या पोटात गट्टम झालेलो असू. आणि मुख्य म्हणजे अशी आणीबाणीची स्थिती रोज काही येत नाही. म्हणजे शरीराला अॅड्रेनलाईनची गरज कधीतरी फक्त थोड्या वेळासाठी असते. धोका टळला आणि त्यातून जिवंत असू तर शरीर स्वत:ला शांत करतं, या संप्ररेकांची पातळी सामान्य होते आणि मेंदू – शरीराला विश्रांती मिळते. पण, आता विचार करा, तुम्ही ५ ते ६ तास मोबाईलवर गेम खेळत बसलात. सलग सहा तास शरीराला आणि मेंदूला सतत सज्ज ठेवणे म्हणजे तुमच्या हृदयाची गती जास्त राहणे, स्नायू कडक होणे, रक्तदाब वाढणे आणि डोळ्यांचा थकवा यासारख्या गोष्टींना आमंत्रण देणे. आणि जर हे रोज आणि दीर्घकाळ चालत राहिले, तर याचे परिणाम म्हणून निद्रानाश, मानसिक थकवा, एकाग्रतेत घट, स्नायूंचे दुखणे, डोळ्यांवर ताण अशा दीर्घकालीन आरोग्य समस्या डोकं वर काढू शकतात. मोबाइल गेमिंगच्या नादात अनेक तरुणांचे व्यायाम आणि मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होणे वाढते आहे. यातून स्थूलता, पोटाभोवती चरबी वाढणे, पाठदुखी अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत.
ऑनलाइन गेमिंगमुळे फक्त शरीरावरच नाही, तर मेंदू आणि मनावरही खोलवर परिणाम होतो. अति गेमिंगमुळे सतत चिडचिडेपणा, निराशा किंवा आक्रमकता वाढू शकते. खेळ जिंकला नाही तर संताप, हरलो तर नैराश्य… अशा भावनांचे चढउतार रोजच्या जीवनातही जाणवतात. काही वेळा ही आक्रमकता घरच्या किंवा मित्रांच्या नातेसंबंधांवरही परिणाम करते. याशिवाय, सतत गेमच्या जगात रमल्यामुळे अनेक तरुणांमध्ये पलायनवाद (Escapism) ही प्रवृत्ती वाढताना दिसते. अभ्यासाचा ताण असो किंवा नोकरीमधला तणाव, वास्तवातील समस्या टाळण्यासाठी अनेकजण गेममध्ये गुंतून राहतात. गेममध्ये Level Complete झाली की समाधान मिळतं, पण खऱ्या आयुष्यात Homework Pending किंवा Target Missed कडे दुर्लक्ष होतं आणि मग खऱ्या जीवनातील जबाबदाऱ्या टाळल्या जाण्याची सवय लागू शकते. यापेक्षाही मोठा धोका म्हणजे गेमिंगचं व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. ऑनलाइन गेम डिझाइनमध्ये खेळाडूंना आकर्षित ठेवण्यासाठी अनेक मानसिक संकल्पना वापरल्या जातात. गेम्समधील टास्क फार सोपेही नसतात आणि अगदी अवघडही नसतात. ‘फ्लो स्टेट’ ही अशीच एक महत्त्वाची संकल्पना. त्या गेममधील एखादं आव्हान आणि आपलं कौशल्य यांचा मेळ जमला की आपण त्या गेममध्ये अगदी गुंग होऊन जातो. ‘फ्लो स्टेट’मध्ये प्रवेश करतो. PUBG किंवा Free Fire सारख्या गेम्समध्ये खेळण्याचा वेळ वाढला की कौशल्य वाढतं. आणि असे गेम्स पुन्हा खेळावेसे वाटतात. मल्टिप्लेअर गेम्समध्ये खेळाडूंच्या टीमला जिंकवण्यासाठी सतत गेम खेळायला भाग पडते.
खेळाडूंना सतत गेम खेळायला भाग पाडणारा दुसरा घटक म्हणजे रिवॉर्ड्स. नवीन लेव्हलवर पोहचणे, पॉईंट्स मिळवणे, बॅजेस, ट्रॉफीज, मेडल्स किंवा गेमिंग ‘अवतार’चा लूक बदलण्यासाठी नवीन कपडे, अॅक्सेसरीज मिळवणे… ही काही आभासी बक्षिसे आहेत. तर कधी आपल्या स्कोअरवरून मित्रांशी किंवा जगभरातील खेळाडूंशी तुलना होणे हे सामाजिक बक्षीस आहे, जे आपल्याला मान्यता आणि समाधान देते. काही गेम्समध्ये स्पर्धा जिंकल्यावर खरे पैसे किंवा गिफ्ट कार्ड्स मिळतात. अशी बक्षिसे मिळाली की मेंदूत डोपामिन हे आनंदाचे रसायन स्रावू लागते. अशी आनंदाची भावना वारंवार मिळवण्यासाठी पुन: पुन्हा ती गेम खेळण्याची तीव्र इच्छा होते. ही सततची ‘पुन्हा-पुन्हा खेळण्याची’ इच्छा हळूहळू व्यसन बनते. अशा व्यक्तींना गेम खेळणे थांबवता येत नाही; दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष करणे, अभ्यास किंवा काम बाजूला ठेवणे ही सामान्य बाब ठरते. गेम खेळता न आल्यास किंवा थांबवल्यास त्यांना चिडचिड, अस्वस्थता किंवा राग जाणवतो. यातून चिंता, नैराश्य किंवा एकाकीपणा यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढीस लागतात.
तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे, असे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे डॉ. विष्णू श्रीमंगले सांगतात. विशेषत: १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे अधिक आढळते. या व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होतात; तसेच अभ्यासात लक्ष न लागणे, परीक्षेत अपयश, करिअरकडे दुर्लक्ष करणे अशा समस्या वाढताना दिसतात. या व्यसनाची तीव्रता जाणवू लागल्यावर अनेक पालक आपल्या मुलांना समुपदेशनासाठी संस्थेकडे घेऊन येतात, असे त्यांनी सांगितले.
अति गेमिंग ही आता फक्त सवय किंवा व्यसन न मानता मनोविकार ठरू पाहतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यांच्या आजारांच्या वर्गीकरणाच्या आंतरराष्ट्रीय सूचीच्या ११ व्या आवृत्तीत गेमिंग डिसऑर्डरचा समावेश केला आहे. यातून याची तीव्रता अधोरेखित होते. त्यामुळे ‘फक्त एक लेव्हल अजून’ किंवा ‘फक्त १० मिनिटे’ असे बहाणे देत गेम खेळण्याचा मोह आवरला जात नसेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. गेमिंगच्या अशा व्यसनाची सुरुवात असेल तर संतुलित उपायांनी यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. रोज गेमसाठी ठरावीक वेळ ठरवून त्याचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे ठरते. योग, व्यायाम, मैदानी खेळ यातून शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने झाले की ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या डोपामिनची सवय सुटण्यास मदत होईल.
डॉ. विष्णू श्रीमंगले यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या गेमिंग व्यसनाच्या बाबतीत पालकांचीआणि शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यात मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, पालकांनी मुलांशी संवाद साधून, त्यांना वेगवेगळ्या छंदांमध्ये गुंतवणे, मैदानी खेळ, बोर्ड गेम्स किंवा इतर सर्जनशील उपक्रमांकडे कल वाढविण्यास प्रोत्साहित करणे अत्यंत आवश्यक आहे.
ऑनलाइन गेमिंगमुळे होणारे आर्थिक नुकसान, गैरप्रकार आणि गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ पाहता शासनाने या क्षेत्रावर लक्ष देण्याची गरज भासू लागली होती. याच पार्श्वभूमीवर ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन कायदा, २०२५ या कायद्याच्या माध्यमातून भारतात ऑनलाइन गेमिंगसाठी राष्ट्रीय कायदेशीर चौकट तयार करण्यात आली आहे. याद्वारे ऑनलाइन मनी गेम्स आणि जुगारासारख्या घातक प्रकारावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, इतर ऑनलाइन गेम्समध्येही वापरकर्त्यांची ओळख आणि वय तपासणी, डेटा सुरक्षिततेची हमी, तसेच गेमिंगसाठी वेळेवर मर्यादा यासारखी नियमावली लागू केली गेली आहे. या उपाययोजनांमुळे ऑनलाइन गेमिंग अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
अर्थात, अशा कितीही बाह्य उपाययोजना झाल्या तरी जोपर्यंत व्यक्ती स्वत:वर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत फारसा उपयोग नाही. सहज गंमत म्हणून सुरू झालेला हा प्रवास व्यसन आणि मग मनोविकार कधी होऊ शकतो हे कळतही नाही. यातून आर्थिक तोटे , शिक्षण-करिअरवर परिणाम, नैराश्य असा आयुष्याचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ वेळीच आवरता घेण्याचा निग्रह ठाम असायला हवा.
viva@expressindia.com