विविधतेने नटलेल्या भारतात महाराष्ट्र राज्य निरनिराळ्या परंपरा, संस्कृती आणि लोककलांनी सजलेलं राज्य आहे. या मातीतील लोकसंगीत अक्षरश: नसानसांत भिनते आणि मनात रुजत जाते. सध्या विविध क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असल्याची चर्चा सातत्याने सुरू असते, परंतु दुसरीकडे युवा पिढीतीलच काही मंडळींनी आपल्या मातीशी आणि मातृभाषेशी असलेली नाळ घट्ट जोडलेली आहे हे सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यात सादर केल्या जाणाऱ्या लोकसंगीताशी संबंधित कार्यक्रमांतून दिसून येते आहे. पारंपरिकतेचा गाभा जपून, आधुनिकतेची जोड देत सादर केलेल्या या लोकसंगीत कार्यक्रमांना आबालवृद्धाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
सध्याची युवा पिढी समाजमाध्यमांच्या जाळ्यात गुंतत चालली असून मोबाइल स्क्रीनच्या चौकटीत गुरफटते आहे, हे चित्र बव्हंशी खरे असले तरी याच तरुण मंडळींची विचारस्पंदने कलाविश्वातही कल्पकतेने उमटताना पाहायला मिळत आहेत. यापैकी काही तरुणांनी एकत्र येत महाराष्ट्राला लाभलेला लोककलेचा वैभवशाली वारसा पुढे नेणारे आधुनिक पद्धतीचे लोकसंगीताचे कार्यक्रम व्यावसायिक स्तरावर भव्यदिव्य स्वरूपात सादर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या असे काही लोकसंगीताचे कार्यक्रम लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी ‘वगसम्राज्ञी’ हे नाटक बसविण्याच्या निमित्ताने तरुण मंडळी एकत्र आली आणि लोककलेचा अभ्यास सुरू झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची लोककलेची आवड अधिकच बहरत गेली. फिरोदिया करंडक स्पर्धेनंतरही ‘वगसम्राज्ञी’ नाटकातील मंडळी भेटत होती, या निमित्ताने चर्चा होत राहिली, तसेच महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या ‘लोकसंगीताची वारी’ या कार्यक्रमाला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद मिळून कौतुक होत गेले. या मंडळींनी विविध लोकगीते सादर करीत त्याचे व्हिडिओज समाजमाध्यमांवर अपलोड करायला सुरुवात केली, तेव्हा या व्हिडिओजना उदंड प्रतिसाद मिळाला. परंतु हा कार्यक्रम मर्यादित न राहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि महाराष्ट्राचे लोकसंगीत प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे, या हेतूने व्यावसायिक स्तरावर फोक लोक स्टुडिओ प्रस्तुत ‘फोक लोक – लोकसंगीताचं दान, माय मराठीचं गुणगान’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकसंगीताशी संबंधित ‘फोक लोक’ या कार्यक्रमाची बांधणी ६५ टक्के स्वरचित आणि ३५ टक्के पारंपरिक रचनांसह करण्यात आली आहे. पारंपरिक गोष्टींना आधुनिकतेची जोड देत सादर होणाऱ्या या कार्यक्रमात गण, गौळण, शाहिरी रचना, तमाशाचे विविध अंग, अभंगवाणी, जागरण, शेतकरी गीत, सोंगाड्या, भारूड पाहायला मिळते. या तरुण मंडळींची ऊर्जा व लोकसंगीताचा ताल मनात घर करून जातो. ‘फोक लोक’ हा कार्यक्रम एकूण ३ तासांचा असून मुकुल शिंगाडे याने कार्यक्रमाचे लेखन तसेच सिद्धांत उमरीकरसह दिग्दर्शनही केले आहे. ‘फोक लोक’च्या रंगमंचावर एकूण २१ कलाकार वावरताना दिसतात, तर पडद्यामागे १५ कलाकार मेहनत घेतात, म्हणजेच एकूण ३६ कलाकार लोकसंगीताची वारी पुढे नेतात. या कार्यक्रमाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल बोलताना, आपले जीवन व लोककला यांची एकमेकांबरोबर सांगड घातली गेली आहे. या लोककला आपल्याला नवी ऊर्जा, विचार व उमेद देत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे लोकसंगीत घराघरात पोहोचविणे आवश्यक असल्याचे जाणवल्याने ‘फोक लोक’च्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे मुकुल शिंगाडे व सिद्धांत उमरीकर यांनी सांगितले. ‘सध्या राज्यभर कार्यक्रम करताना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. समाजमाध्यमांचे विविध तोटे आपण पाहतो, मात्र या कार्यक्रमासाठी समाजमाध्यमे एका अर्थी फायदेशीर ठरली आहेत. लोककलेसाठी आयुष्य वाहिलेल्या लोककलावंतांना प्रकाशझोतात आणण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून प्रयत्न करणार आहोत’ असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या मातीतील विविध लोककलाप्रकारांपैकी गोंधळ, शिवगीत, स्फूर्तीगीत अशा जुन्या पारंपरिक रचनांचा मूळ गाभा न हलवता अभिजीत जाधव आणि आमु जाधव या बंधूंनी पंधरा वर्षांपूर्वी ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. जुन्या आणि नवीन रचनांना नव्याने संगीतबद्ध करून आणि त्याला लोकवाद्यांबरोबरच सध्याच्या युवा पिढीला आवडणाऱ्या पाश्चात्त्य वाद्यांची जोड देऊन अनोखा सांगीतिक कलाविष्कार ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमात गण, गौळण, गोंधळ, शिवगीते, लोकगीते, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या विविध गाण्यांचे अभिजीत जाधव आणि आमु जाधव हे बंधू सादरीकरण करतात. संबळ, दिमडी, ढोलकी अशा विविध वाद्यांच्या तालावर शिवकालीन इतिहासाची पाने उलगडत जातात. विशेष बाब म्हणजे जाधव बंधूंच्या पोशाखातही पारंपरिकतेसह आधुनिकतेची जोड दिलेली पाहायला मिळते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गुप्तहेर खात्याची सांकेतिक भाषा ‘करपल्लवी’ची झलकही कार्यक्रमात पाहायला मिळते. तोंडाने एक शब्दही न बोलता केवळ बोटांच्या इशाऱ्यावरती गुप्त संदेश हेरांच्या मार्फत पुढे बहिर्जी नाईकांकडून महाराजांपर्यंत या करपल्लवीच्या माध्यमातून पोहोचवले जायचे. या कार्यक्रमाच्या मंचावर अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांच्यासह एकूण १० कलावंत तसेच वादक आहेत. सध्या या कार्यक्रमाला राज्यात विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य व पराक्रमाचा इतिहास लोकसंगीताच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचा मानस असल्याचे या जाधव बंधूंनी सांगितले.
मनामनात घुमणारा ‘नाद तालवादकांचा’
महाराष्ट्रातील विविध लोककलेचे प्रकार व लोकसंगीत समृद्ध करण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतले. हा वैभवशाली वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत राहिला. बहुसंख्य लेखक, गायक आणि कलाकारांनी लोककलेच्या विविध प्रकारांसह लोकगीते घराघरांत पोहोचवली. परंतु अनेकांना स्वतःच्या ठेक्यावर ताल धरायला भाग पाडणारे आणि विविध गाणी फुलवणारे हात मात्र अपरिचित राहिले. हेच जाणून मराठमोळ्या मातीतील तालवादक घराघरांत पोहोचविण्यासाठी ‘नाद तालवादकांचा’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसिद्ध तालवादक दिवंगत राम जामगावकर यांचा नातू वेदांत जामगावकर याने स्वतःच्याच आजोबांच्या कारकीर्दीवर संशोधन करण्यास सुरुवात केली, तेव्हा वेदांतला तालवाद्ये आणि वादनाच्या विश्वातील विविध गोष्टी उमगल्या. गेली वर्षानुवर्षे गीतकार, संगीतकार व गायकांचे दर्जेदार काम घराघरांत पोहोचत असताना तालवादकांची ओळख मात्र मर्यादितच राहिल्याची जाणीव त्याला झाली आणि ‘नाद तालवादकांचा’ या कार्यक्रमाचा जन्म झाला. महाराष्ट्र ढोलकी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत तालवादक राम जामगावकर, अण्णा जोशी, पंडितराव विधाते, लालाभाऊ गंगावणे, राजाराम जामसंडेकर, पांडुरंग घोटकर आदी विविध तालवादक या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचविण्याचा वसा हाती घेण्यात आला. लोकगीते, अभंग, लावणी गीते, चित्रपट गीते, नाट्याविष्कार, विविध किस्से आणि तालवादकांच्या जुगलबंदीतून पडद्यामागे दडलेले अपरिचित वादकांचे हात हृदयाला स्पर्श करतात आणि ‘नाद तालवादकांचा’ मनामनात घुमतो. १३ वादक, ६ गायक, ८ कलावंत आणि पडद्यामागच्या कलाकारांसह जवळपास ५० जणांनी या कार्यक्रमाचा डोलारा उभा केला आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना व संगीत वेदांत जामगावकर याचे असून लेखन – दिग्दर्शन यश मोडक व किरण फड यांनी केले आहे.