आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात भारतीयांनी असणं, देशाचं किंवा देशातल्या एखाद्या इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करणं, या गोष्टी आता कॉमन आहेत. तरीही दरवर्षी त्यात वेगळेपणा पाहायला मिळतो. कधी स्पोर्ट्स, कधी बुद्धी, कधी सौंदर्य अशा अनेक बाबींमध्ये भारतीय आघाडीवर राहिलेले आहेत. मनोरंजन या क्षेत्रातही भारतीयांनी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केेलेली आहे, पुरस्कार मिळवलेले आहेत, प्रदर्शनाची संधी मिळवलेली आहे. ‘कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ हा असाच एक मोठा, नामांकित आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव! सुरुवातीला कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर केवळ बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला पाहायची सवय असलेल्या भारतीयांना आता वेगवेगळ्या माध्यमातून तिथे पोहोचता येऊ लागलं आहे. इंफ्लुएन्सर्स, बिझनेस वुमन, अॅक्टिव्हिस्ट, फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट अशा विविध क्षेत्रातील अनेक जणी यावेळी कान २०२५च्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाल्या.

मनोरंजन किंवा चित्रपट क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार स्त्रिया यावेळी कान फेस्टिव्हलला उपस्थित होत्या. या प्रत्येकीकडे आपापलं उद्दिष्ट होतं, आपापलं क्षेत्र होतं आणि आपापल्या एक्स्पर्टीज होत्या. ब्यूटी इंफ्लुएन्सर सारा सरोश, टॅबू टॉपिक इंफ्लुएन्सर सिमरन जैन, स्टायलिस्ट साक्षी सिंदवानी, ग्लोबल इंफ्लुएन्सर मासूम मिनावाला, बिझनेसवुमन कनिका टेकरिवाल, फॅशन आंत्रप्रेन्यूर देवांगी निशार पारेख अशा अनेक नॉन-बॉलीवूड सेलिब्रेटेड लेडीजनी कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटची शोभा वाढवली. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘भारत पॅव्हेलियन’ तयार करण्यात आलं आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या एक्स्पर्ट्सची पॅनल डिस्कशन्स, इंडियन सिनेमाचं प्रदर्शन, अशा अनेक इव्हेंट्ससाठी हे भारत पॅव्हेलियन होस्टिंग स्टेज आहे. कनिका टेकरिवाल, देवांगी निशार पारेख आणि साक्षी सिंदवानी यांनी ‘व्हॉइसेस ऑफ इंफ्लुएन्स : क्राफ्ट, क्रिएटिव्हिटी अँड कल्चरल प्रेझेन्स’ या पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग घेतला. फॅशन व्यवसायात भारतीय कल्चरला सामावून घेणारी देवांगी निशार पारेख ‘अजा फॅशन्स’ची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ‘जेट सेट गो’ या एव्हिएशन ट्रेनिंगची फाऊंडर असलेली कनिका टेकरिवाल ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते. साक्षी सिंदवानी ही बॉडी पॉझिटिव्हिटीचं उद्दिष्ट घेऊन चालणारी फॅशन इंफ्लुएन्सर आहे. प्रत्येकीने आपल्या करिअरच्या प्रवासात भारताच्या कल्चरल प्राइडसाठी कसं काम केलं ते या पॅनल डिस्कशनमध्ये मांडलं.

कधीकाळी टीनएजमध्ये कान फेस्टिव्हलमधील सेलिब्रिटींचे मेकअप लुक रीक्रिएट करणारी सारा सरोश पहिल्यांदा कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर प्रत्यक्ष पोहोचली. फोर्ब्सच्या ‘थर्टी अन्डर थर्टी’ यादीत असलेली मासूम मिनावाला यावर्षी सलग तिसऱ्यांदा कान फेस्टिव्हलला उपस्थित होती. आधी फॅशन इंफ्लुएन्सर असलेली मात्र आपल्या कंटेंटमधून टॅबू ठरलेल्या सेक्शुअल हेल्थ, मेनस्ट्रूएशन अशा विषयांबद्दल बोलणारी सिमरन जैन ही ‘अनबाउंड’ या ऑनलाइन शॉपची फाऊंडर आहे. या सगळ्या जणींनी केवळ कान फेस्टिव्हलमध्ये चर्चा परिसंवादात सहभाग घेतला नाही, तर ज्या फॅशनसाठी कानचा रेड कार्पेट ओळखला जातो, त्यावर त्यांनी आपली फॅशन स्टेटमेंट्स टेचात मिरवली.

नेहमी केवळ बॉलीवूड सेलेब्रिटी चर्चेत राहतात, लाइमलाइटमध्ये दिसतात आणि प्रसिद्धही होतात. मात्र कंटेंट क्रिएटर्स, इंफ्लुएन्सर्स, आणि याच्याशी संबंधित बिझनेस सेटअप उभा करणाऱ्या पॉवरफुल पर्सनॅलिटीजसुद्धा आजकाल इंटरनॅशनल स्टेजवर दिसायला लागल्या आहेत आणि प्रसिद्धही व्हायला लागल्या आहेत. त्यांना स्वत:ला रिप्रेझेंट करताना या सगळ्यांनी भारताच्या कल्चर आणि त्यांचे विचारसुद्धा रिप्रेझेंट केले. सिमरन जैनने ‘केज ब्रेकर’ कोर्सेट घालून तिच्या विचारांचा ठामपणा दाखवून दिला. साक्षी सिंदवानी बॉडी पॉझिटिव्हिस्ट आहे.

तिने फिटेड बॉल गाऊन घालून तिच्या बॉडी पॉझिटिव्हिटीच्या स्टेटमेंटला अजून ठळकपणे रिप्रेझेंट केलं. मासूम मिनावाला हिने सिक्वेन्स आणि बीड्सच्या डिझाईन्स असलेला व्हाइट जंपसूट शो केला. तर नॅन्सी त्यागीने स्वत:च डिझाइन केलेला गाऊन रेड कार्पेटवर परिधान केला. सारा सरोशने ट्रॅडिशनल साडीला थोडा ट्विस्ट देत अनोखे डिझाइन केले. गॅलक्सी थीम घेऊन डिझाइन केलेला गाऊन तिने घातला होता तर देवांगी निशार पारेख हिने फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेलं, हाताने विणलेलं भारतातल्या वेगवेगळ्या टेक्स्टाइल प्रकारांचं जॅकेट घातलं होतं. त्यात काठियावाडी स्टिचेस, कच्छचे अजरख, बंगालचे कंथा, पंजाबचे फुलकारी, मध्य प्रदेशचे चंदेरी असे अनेक प्रकार एकत्रित समाविष्ट होते.

भारताच्या या सेलिब्रेटेड लेडीज कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर केवळ ब्रेन्स नव्हे तर ब्यूटीचंसुद्धा कल्चर आणि विचार यांच्यावर ठाम राहून प्रतिनिधित्व करताना यावर्षी दिसत आहेत. याशिवाय, कानच्या रेड कार्पेटवर कायमच अधिकार गाजवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासह बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, ‘लापता लेडीज’ चित्रपटातून नावारूपाला आलेली नवोदित अभिनेत्री नितांशी गोयल, अभिनेत्री अदिती राव हैदरी, मॉडेल – अभिनेत्री उर्वशी रौतेला या बॉलीवूड अभिनेत्रींनीही आपल्या खास शैलीत रेड कार्पेट गाजवले. नीरज घेवान दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमिअर कान फेस्टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटानिमित्ताने कानच्या रेड कार्पेटवर उपस्थित राहिलेल्या जान्हवी कपूरनेही भारतीय आणि पाश्चिमात्य डिझाइन्सचा मिलाफ असलेला ड्रेस परिधान केला होता.

तर ऐश्वर्या रायनेही शुभ्रधवल रंगाची साडी आणि पारंपरिक भारतीय साजशृंगार करून रेड कार्पेटवर येत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. एका अर्थी पहिल्यांदाच कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर निव्वळ स्टाइल स्टेटमेंट म्हणून उपस्थित राहण्यापेक्षा आपल्या प्रेझेन्समधून भारतीय संस्कृतीबरोबरच आपले आचार-विचार यांचं सादरीकरण कसं होईल यावर सेलिब्रिटीजनी जोर दिल्याने ही ‘कान’वारी अनोखी ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com