संशोधनाची आवड एखाद्यात कशी निर्माण होईल, याचे काही ठोकताळे नाहीत. कधी कधी उपजत असलेली निसर्गाची ओढ पुढे जाऊन पर्यावरणविषयक संशोधनात रूपांतरित होते. तर कधी निसर्ग जवळून अनुभवलेला नसतो, समुद्राचं दर्शन कधी झालेलं नसतं, तरी अवचित एका वळणावर अभ्यासाच्या निमित्ताने निसर्गाशी नाळ जोडली जाते आणि मग निसर्गाच्याच विविध पैलूंचा संशोधक म्हणून शोध घेण्याची इच्छा निर्माण होते. निकिता गिलबिले देशपांडे या तरुणीचा समुद्र संशोधक म्हणून झालेला प्रवास असाच रंजक आहे.

पुण्यात जन्मलेल्या आणि तिथेच लहानाची मोठी झालेल्या निकिताला निसर्गाची ओढ होती, निसर्गाचं निरीक्षण, विविध गोष्टींचा संग्रह, त्यांचं रेखाटन अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून ही आवड प्रतिबिंबित होत राहिली. तरी निसर्गाशी संबंधित विषयातच संशोधन करावं इतकी आवड नव्हती. मात्र, झूलॉजी या विषयात बीएस्सी करण्याच्या निमित्ताने निकिता बार्शी (भगवंत नगरी) येथील श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश करती झाली आणि इथेच एक अभ्यासक म्हणून तिची निसर्गाविषयीची आवड दृढ झाली. महाविद्यालयातील विविध स्पर्धा आणि त्यानिमित्ताने पक्ष्यांच्या घरट्यांचे व पंखांचे केलेले संग्रह, तसेच टूकन पक्ष्याचे चित्र रेखाटण्यापासून ते झूलॉजी विषयातील प्रबंध करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तिचा आत्मविश्वास वाढत गेला.

महाविद्यालयात असताना नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरीसारख्या इन्फोटेन्मेन्ट वाहिन्यांनी आकर्षित केल्याचे निकिता सांगते. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना बॉटनी फेस्ट फूड स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. तसंच, झूलॉजी डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बर्ड नेस्टचे प्रकार आणि काही पक्ष्यांच्या पंखांचे संग्रहही तिने सादर केले होते. झूलॉजीच्या शिक्षणाच्या निमित्ताने तिच्या मनात निसर्ग संशोधनाचं बीज रुजलं, पुढे मरिन बायॉलॉजी या विषयात मास्टर डिग्री घेण्याच्या निमित्ताने निकिता कारवारमध्ये पोहोचली आणि तिच्या संशोधक म्हणून सुरू झालेल्या वाटचालीला एक नवं वळण मिळालं.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना सायकलिंग करणं, नवनवीन खाद्यापदार्थ धुंडाळणं हे छंद जोपासण्याबरोबरच प्लास्टिक वेस्ट यावर काय तोडगा काढता येईल, या संदर्भात तिने अभ्यास सुरू केला. त्या बाबतीतले तिने रिसर्च पेपर्स वाचायला सुरुवात केली. या रिसर्च पेपर्सच्या वाचनाच्या आवडीमुळे निकिताला समुद्री बुरशी हा एक वेगळाच विषय अभ्यासासाठी खुला झाला. योगायोगाने मरिन बायॉलॉजीत मास्टर्स करण्याच्या प्रवासात निकिताचे पाऊल कारवारच्या समुद्रकिनाऱ्यांवर पडले. कारवारच्या एका बाजूला असलेल्या पर्वतरांगा, दुसरीकडे समुद्र अशा निसर्गरम्य वातावरणात समुद्री जैवविविधतेचा अभ्यास, कोस्टल क्लीनअप मोहिमा आणि समुद्री बुरशी या विषयावरचा प्रबंध पूर्ण करण्याच्या निमित्ताने मिळालेला अनुभव तिच्यासाठी समृद्ध करणारा ठरला. शिक्षणानंतर थोडा काळ तिने आयटी क्षेत्रातही काम केेले, मात्र संशोधनाची इच्छा तिला पुन्हा निसर्गाकडे घेऊन आली. ‘इकोलॉजिकल सोसायटी’मध्ये फील्ड असिस्टंट म्हणून ‘कोस्टल प्रोजेक्ट २.०’ अंतर्गत निकिताने दापोली परिसरातील वाळूचे किनारे, खडकाळ किनारे आणि कांदळवनातील जैवविविधतेचा अभ्यास केला.

समुद्र संशोधक म्हणून केवळ समुद्री बुरशी आणि जैवविविधतेचा अभ्यास एवढाच तिचा विषय नव्हता. त्यापुढे जाऊन निकिताने एका अनोख्या प्रकल्पावर काम केले. या प्रकल्पांतर्गत दापोली परिसरातील किनाऱ्यावरील जैवविविधतेचा अभ्यास करण्याच्या मुख्य उद्देशाने तिने तेथील भरती-ओहोटीच्या वेळा पाहून विविध वेळांनुसार सर्व्हे मोहिमा केल्या. त्याचबरोबर तेथील मासेमार व रिसॉर्ट मालकांशी बोलून सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणही केले. या प्रकल्पाचे काम हे एकाच वेळी साहसी अनुभव देणारे होते आणि त्याच वेळी वैज्ञानिक दृष्टीचाही कस लागला, असं ती म्हणते. या प्रकल्पासाठी तिने मुरुड बीच, लाडघर बीच, हर्णे बीच, आंजर्ले समुद्रकिनारा, आडे समुद्रकिनारा आणि बुरोंडी समुद्रकिनाऱ्यांचाही अभ्यास केला आहे. या अभ्यासात किनाऱ्यावरील वनस्पती, समुद्री बुरशी, शैवाल, किडे, शंख, पक्षी, लहान प्राणी या सर्वांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली, त्यामुळे या निमित्ताने या घटकांविषयी माझा विशेष अभ्यास झाला, असं ती सांगते. या अभ्यासातून आलेले निष्कर्ष म्हणजे वाळूच्या किनाऱ्यावर आणि खडकाळ किनाऱ्यावरील जैवविविधतेत भिन्नता आढळून आली; काही प्रजाती या केवळ विशिष्ट ठिकाणीच आहेत असंही आढळलं. शिवाय, मासेमारी वा रिसॉर्टिंगसारख्या व्यवसायांमुळे होणारा मानवी वावर आणि कामांचा परिणाम समुद्री जैवविविधतेवरही बऱ्यापैकी होत असल्याचंही लक्षात आल्याचं तिने सांगितलं. कोस्टल क्लीनअप मोहीम आणि जागरूकता उपक्रमामुळे पर्यावरणीय सुधारणा होण्याची शक्यता वाढते, असं ती आवर्जून सांगते.

संशोधक म्हणून सुरू असलेल्या या वाटचालीदरम्यान निकिताला मातृत्वाची गोड बातमी मिळाली. ‘आईपण आणि काम दोन्ही निभावणार’ या निर्धाराने तिने सात महिने काम सुरू ठेवले. सध्या मुलाला वेळ देत असल्याकारणाने तिने नोकरीला पूर्णविराम दिला असला तरी निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यांच्या संशोधनाची तिची ओढ कायम आहे. त्या दृष्टीने तिने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे. निकिताचा प्रवास हा केवळ समुद्रकिनाऱ्यावरील संशोधनापुरता मर्यादित नाही. निसर्गाविषयीची तिची ओढ, स्वप्नांच्या दिशेने केलेला प्रवास आणि आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर न थांबण्याची तिची जिद्द यामुळे तिचा हा कार्यप्रवास इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.

viva@expressindia.com