मितेश रतिश जोशी

देशभर होळीच्या सणाची धूम सुरू आहे. भारतातील काही शहरांमध्ये खास होळी पाहण्यासाठी भ्रमंती केली जाते, ज्यात भारतीयांसह परदेशी पर्यटकांचाही मोठा सहभाग असतो.

होळीच्या निमित्ताने भारतातल्या प्रसिद्ध शहरांना भेट देऊन तिथल्या लोकसंस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक मुसाफिर बाहेर पडतात. होळी आणि राधाकृष्ण यांचं एक अतूट नातं आहे. याच नात्याचं दर्शन उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन, बरसाना, नंदगाव या शहरांमध्ये घडतं. श्री कृष्णाच्या भूमीतील होळीच्या सणाची धूम अनुभवण्यासाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्या ‘होळी स्पेशल टूर’ आयोजित करू लागल्या आहेत. इथल्या होळीतील या मजा-मस्तीची मूळ भावना म्हणजे प्रेम आणि भक्ती. मथुरा – वृंदावनमध्ये आठ दिवस होळी खेळली जाते, त्यामुळे पर्यटकांना भ्रमंतीसाठी बरेच दिवस हाताशी मिळतात. इथल्या होळीला लाठमार होली, फुलों की होली, लड्डू होली अशी नावं आहेत. नावाप्रमाणेच गमतीजमती यामागे दडल्या आहेत.

फाल्गुन महिन्याच्या द्वितीया तिथीला फुलों की होली मथुरेमध्ये साजरी केली जाते. या सणाला फुलेरा दूज असं देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे रंगांनी होळी खेळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे वृंदावनमधील बाकेबिहारी मंदिरात श्रीकृष्णाबरोबर फुलांनी होळी खेळण्याची रीत आहे. वेगवेगळय़ा फुलांच्या पाकळय़ा श्रीकृष्णावर उधळल्या जातात. यामागची दंतकथा अशी आहे की बरेच दिवस भगवान श्रीकृष्ण राधेला भेटायला वृंदावनात गेले नाहीत. त्यामुळे राधा व गोपिका रुसल्या. राधेच्या रुसण्याने मथुरेमधील झाडं, पानं, फुलं अगदी कोमेजून गेली. मथुरेतील सृष्टिचैतन्याला धक्का पोहोचलेला पाहून श्रीकृष्णाने सकल सृष्टी पुन्हा चैतन्यमय केली. सगळीकडे पुन्हा हिरवळ दाटली. रंगीबेरंगी फुलांनी झाडं डोलू लागली. राधेचा रुसवा घालवण्यासाठी श्रीकृष्णांनी राधेच्या अंगावर फुलं उधळली. तेव्हापासून या होळीला सुरुवात झाली, असं सांगितलं जातं.

मथुरेपासून ४२ किलोमीटर अंतरावर राधेचं जन्मस्थान असलेल्या बरसानाची होळी विशेष आकर्षण ठरलं आहे. नंदगावमधील पुरुष राधेच्या मंदिरावर आपला मानाचा झेंडा फडकवण्याच्या निमित्ताने व बरसानाच्या मुलींबरोबर होळी खेळण्याच्या आशेने येतात, पण रंगांऐवजी गोपींकडून त्यांना लाठय़ा-काठय़ा मारल्या जातात. त्यामुळे इथल्या होळीला लाठमार होळी किंवा लठ्ठमार होळी असं म्हणतात. या थट्टा-मस्करीत चाललेल्या लढाईत आपण पकडले जाऊ नयेत यासाठी सगळे पुरुष सर्वतोपरी प्रयत्न करतात. तरीही कुणी एखादा सापडतोच, मग त्याला मुलींकडून चांगलाच चोप मिळतो.  त्यांना स्त्रियांचा पोशाख घालून सार्वजनिक ठिकाणी नृत्य करायला सांगितलं जातं. पर्यटन आणि सुरक्षिततेच्या हितासाठी येथील राज्य पर्यटन मंडळाने पर्यटकांसाठी उत्कृष्ट व्हेंटेज पॉइंट्स उभारले आहेत. शहराच्या बाहेरील बाजूला एक मोठं मोकळं मैदान सणाच्या सर्वात भव्य प्रदर्शनासाठी खुलं केलं जातं.

खरंतर पूर्वीपासून होळीचं दहन केल्यानंतर जी राख शिल्लक राहते, त्यापासून होळी खेळण्याची प्रथा आहे. मात्र एका ठिकाणी होळीच्या राखेपासून होळी न खेळता चक्क स्मशानभूमीतील चितेच्या राखेपासून होळी खेळली जाते. वाराणसीमध्ये जी होळी खेळली जाते त्यात चितेच्या राखेचा समावेश असतो. याविषयी माहिती सांगताना ‘नोमॅडिक ट्राईब्स’ या ट्रॅव्हल कंपनीचा सर्वेसर्वा वैभव खैरे म्हणाला, ‘काशीमध्ये चितेच्या राखेपासून होळी खेळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. ही तेथील एक परंपरा आहे. वाराणसीमध्ये फाल्गुन शुक्ल एकादशी ही रंगभरी एकादशी या नावाने साजरी केली जाते. असं म्हटलं जातं, भगवान शंकराने गौरीबरोबर होळी खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकराच्या भक्तांनी चितेच्या राखेपासून होळी खेळली होती. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. वाराणसीमधील ‘मणिकर्णिका घाट’ म्हणजेच ‘महाश्मशान घाटा’वर लोक एकत्र येऊन बरोबर १२ वाजता श्मशानेश्वर महादेव मंदिरात शंकराची आरती करतात. त्यानंतर जळत असलेल्या चितेमधील गरम राख काढून त्यापासून होळी खेळण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे ही होळी खेळण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. परदेशी पर्यटकही खास या होळीसाठी येतात’.

काशीमधील रस्ते या काळात स्मशानभूमीच्या राखेने भरलेले आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे कोणी तोंडावर राख चोळतं आहे, तर कोणी चितेच्या भस्मात न्हाऊन निघालं आहे असं दृश्य ठिकठिकाणी दिसत असल्याचं वैभव सांगतो. काही जण गळय़ात मानवी कवटीची माळ घालून, जिवंत साप धरून नाचत असतात. तर कोणी प्राण्यांची कातडी घालून ढोल वाजवतात. एकीकडे चिता जळत असते तर दुसरीकडे लोक त्याच्या राखेची होळी खेळतात. सुख आणि दु:ख, भीती आणि आनंद यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर काशीला येऊन ही होळी पाहायलाच हवी, असं वैभवने सांगितलं.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची रीत असली तरी नाशिकमध्ये मात्र रंगपंचमी साजरी केली जाते. रहाडीची अनोखी प्रथा फक्त नाशिकमध्येच आढळते. नाशिकमध्ये हेरिटेज वॉक घेणारी ‘इरा सेंटर ऑफ इंडिक स्टडीज’ची अनिता जोशी याविषयी सांगते, ‘रंगोत्सवासाठी पेशवेकाळापासून विविध भागांत रहाडींची म्हणजे दगडी बांधीव हौदांची निर्मिती करण्यात आली होती. पेशवेकाळात अशा १८ रहाडी होत्या. सध्या तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, तांबट आळी, शनी चौक, मधली आळी आणि जुनी तांबट आळी अशा सहा रहाडी उरल्या आहेत. पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारीत असणाऱ्या या रहाडींची जबाबदारी नंतर विविध तालमी आणि स्थानिक मंडळांकडे आली. शनी चौकात गुलाबी, दिल्ली दरवाजाजवळ केशरी, तिवंधा चौकात पिवळा असा प्रत्येक रहाडीचा रंग वेगळा. या रहाडीच्या पूजेचा, पहिली उडी मारण्याचा मान देखील ठरलेला असतो. रंगपंचमीला रहाडीत धप्पा मारून आला नाही तो नाशिककरच नाही. अशी ही अनोखी होळी पाहण्यासाठी नाशिककर तर एकत्र येतातच, पण मुंबई-पुण्यातील लोक हा उत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात’.

गोव्याच्या होळीला पारंपरिक व सेलिब्रेशन असे दोन रंग आहेत. होळीच्या सुट्टीच्या निमित्ताने एन्जॉय करण्यासाठी तरुण पर्यटक आवर्जून गोव्याला भेट देतात. गोव्यातील शिमगोत्सव चौदा दिवस चालतो. दसऱ्याच्या दिवशी शत्रूंशी लढून होळीच्या वेळी घरी परतलेल्या योद्धयांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. एक प्रकारे गोव्यातील शिमगा हे पौराणिक कथा आणि सांस्कृतिक कार्निव्हल यांचं मिश्रण आहे. धाकटो शिमगा (छोटा शिमगा) आणि थोरलो शिमगा (मोठा शिमगा) असे याचे दोन भाग आहेत. धाकटो शिमगा हा सण बहुतेक शेतकरी, मजूर मिळून गावांमध्ये साजरा करतात. त्याचवेळी थोरलो शिमगा हा सगळे पारंपरिक गाणी आणि नृत्य करत एकत्र साजरा करतात. इथे होळीच्या संध्याकाळी  सुरू होणारी परेड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. फ्लोटिंग स्ट्रीट परेड (गोवा फ्लोटिंग परेड) हे शिमगा उत्सवाचं मुख्य आकर्षण आहे. या परेडमध्ये गोवा आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेशी निगडित भव्य झांकी दाखवली जातात. यात हिंदू देवी-देवतांची झलकही पाहायला मिळते. परेडमध्ये भाग घेणारे लोक पौराणिक देवांपासून ते राक्षस आणि आत्म्यापर्यंत विविध पात्रांच्या पोशाखात येतात. वेगवेगळय़ा गावात रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू असतात. कार्निव्हलमध्ये घोडा मोडणी, फुगडी आणि रोमटामेल या गोव्यातील लोकनृत्यांसह पर्यटकांचं मनोरंजन केलं जातं.

दक्षिण गोव्यातील ‘शेनी उजो’ ही होळीदेखील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रिबदू आहे. शेनी म्हणजे शेणी तर उजो म्हणजे अग्नी. मळकर्णे गावात ही होळी साजरी केली जाते. गावातील काही तरुण होळीच्या रात्री मल्लिकार्जुनाच्या देवळासमोर एकत्र येतात. यावेळी होळीची माडी (फोफळीचे कांड) वाजत-गाजत आणली जाते. देवळासमोरील मांडावर ती उभी केली जाते आणि तिथूनच होळीला सुरुवात होते. या होळीच्या माडीवर गावातील तरुण चढतात. खाली असलेले लोक पेटलेली शेणी त्या तरुणांवर फेकून मारतात. माडीवर शेण्या फेकून मारल्या की त्या आपटून आगीच्या ठिणग्या उडतात. ही वेगळय़ा प्रकारची होळी पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची गर्दी जमते.

कुठे रंग तर कुठे फुलं, कुठे धूळ तर कुठे चिताभस्म. सण एकच पण त्याची नावं अनेक. आनंद एक पण तो साजरा करण्याच्या तऱ्हा अनेक. सरतेशेवटी लोकसंस्कृतीचा आनंद देणारा हा ‘कलरफुल सफरनामा’ हा एक वेगळाच जिवंत रसरशीत अनुभव म्हणायला हवा.  

viva@expressindia.com