वेदवती चिपळूणकर परांजपे
जगभरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे आदर्श घ्यावेत. प्रत्येकाचा काळ वेगळा, वेळ वेगळी आणि पद्धत वेगळी.. प्रत्येक जण ‘फेनम’ अर्थात प्रसिद्ध आणि यशस्वी आहे. या प्रसिद्ध व्यक्तींमधल्या आपल्या काळाशी सुसंगत, वयाशी आणि विचारांशी मिळत्याजुळत्या आणि कामात वेगळेपणा असणाऱ्या तरुणाईची आपण ‘फेनम स्टोरी’ या सदरातून ओळख करून घेणार आहोत. जगाने ज्यांना नावाजले आणि गौरवले आहे अशा या ‘फेनम’ तरुण मंडळींच्या कथा टीनएजरपासून ते पेन्शनरांपर्यंत सगळय़ांना प्रेरणादायी ठरतील.
पर्यावरणप्रेमी असल्याचे कौतुक अनेकजण स्वत:साठी स्वत:च मिरवत असतात. मात्र ज्यांनी त्या प्रेमापोटी काही नवीन शोध लावले, काही नवीन प्रयोग केले त्यांना जगाने नावाजले आहे. संपूर्ण जग ज्याला इको-इनोव्हेटर म्हणून ओळखतं असा परम जग्गी. शाळेत असतानाच गाडीतून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडपासून ऑक्सिजन बनवण्याचे मशीन बनवणारा परम जग्गी याने ‘फोर्ब्स’च्या ‘थर्टी अन्डर थर्टी’ या यादीत दोन वेळा समाविष्ट होण्याचा मान मिळवलेला आहे.
वडील मोठे उद्योगपती असून परमने डॉक्टर व्हावं असं त्यांना वाटत होतं. केवळ सतरा वर्षांचा असताना शोध लावणाऱ्या परमला मात्र इंजिनीयरच व्हायचं होतं. पर्यावरण आणि अर्थशास्त्र अशा दोन विषयांचं शिक्षण त्याने एकत्रच घेतलं आहे. पर्यावरणावर आधारित काहीतरी कल्पक बनवण्याची त्याची इच्छा होती आणि ते व्यावसायिकदृष्टय़ा बाजारातदेखील उपलब्ध करून देण्याची त्याची आकांक्षा होती. त्यासाठी त्याने स्वत:चं पहिलं संशोधन जे कार्बन डायऑक्साइडपासून ऑक्सिजन बनवतं ते उपकरण बाजारात आणलं. त्यातून त्याला या बाजाराचं गणित कळलं. आणि मग केवळ पर्यावरणपूरक संशोधन करून आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ करायची हे त्याचं ध्येय त्याने मनाशी पक्कं केलं. या ध्येयातूनच त्याने ‘इकोव्हिएट’ ही स्वत:ची कंपनी सुरू केली. पर्यावरणपूरक संशोधन करण्याचं उद्दिष्ट असलेली ही कंपनी पर्यावरणस्नेही सॉफ्टवेअर आणि प्रॉडक्टस बनवते.
कारच्या कार्बन डायऑक्साइडपासून ऑक्सिजन बनवणाऱ्या परम जग्गीच्या मोबाइल अल्गे डिव्हाइसला उड2 ४ुी हे नाव दिले आहे. या संशोधनाचं पेटंटदेखील त्याच्याकडे आहे. कारच्या सायलेन्सरमध्ये बसवलं जाणारं हे उपकरण कारचं कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन पन्नास टक्क्यांनी कमी करतं. या उपकरणामध्ये जिवंत अल्गे अर्थात शेवाळ वर्गातील वनस्पतीचा वापर केलेला आहे. कारमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड या शेवाळांच्या मधून पुढे जातो आणि फोटोसिन्थेसिस अर्थात प्रकाश-संश्लेषण या माध्यमातून तो कार्बन डायऑक्साइड हा ऑक्सिजनमध्ये रूपांतरित होतो. अशा पद्धतीने कारमधून कार्बन डायऑक्साइडऐवजी ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. याच संशोधनासाठी परम जग्गीला वयाच्या केवळ सतराव्या वर्षी ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळालं होतं.
सध्या हॅच-अॅप्स नावाची कंपनी परम जग्गी याने सुरू केली आहे. सॉफ्टवेअर, अॅप्स इत्यादी बनवणे हे केवळ मोठय़ा इंजिनीयर्सच्या टीमने करायचे काम आहे हा गैरसमज मोडून काढण्यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे. नो-कोड मोबाइल अॅप बिल्डर हे त्याचं पहिलं प्रॉडक्ट होतं. बुद्धी आणि इंटरेस्ट असलेल्या प्रत्येकाला स्वत:ची वेबसाइट आणि अॅप बनवता आलं पाहिजे या उद्देशाने ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून अवघड वाटणारं तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट त्याला साध्य करायचं आहे.
पर्यावरणाच्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणासाठी कठोर मेहनत घेणाऱ्या परम जग्गीने हा आदर्श नवीन तरुणाईसाठी घालून दिलेला आहे.
viva@expressindia.com