जगभरात सगळीकडेच फॅशन वीकची धामधूम सुरू झाली आहे. सध्या पॅरिस फॅशन वीकची चर्चा सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकपासून ते बीटीएसचा प्रसिद्ध गायक जिमिनच्या शर्टलेस एन्ट्रीपर्यंत पॅरिस फॅशन वीकमध्ये घडणाऱ्या नवनव्या गोष्टींची चर्चा सुरू असताना आपल्याकडेही लॅक्मे फॅशन वीकची गजबज सुरू झाली आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये नेक्स्ट जनरेशन काय करणार हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो. यंदा जेन नेक्स्टमध्ये काय पाहायला मिळणार याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

लॅक्मे फॅशन वीक हा दरवर्षी होणारा फॅशनचा सोहळाच मानला गेला आहे. अनेक डिझायनर्स आपापली नवीन कल्पना घेऊन प्रत्येक वर्षी दोन वेळा आपली कलेक्शन्स सादर करत असतात. याच फॅशन सोहळ्यात दर वेळी लॅक्मे फॅशन वीकच्या प्रत्येक सीझनमध्ये नवीन जनरेशनसुद्धा आपली कला आणि प्रतिभा दाखवत असते. लॅक्मे फॅशन वीकच्या विंटर फेस्टिव्ह सीझन २०२५ मध्ये अनेक नेक्स्ट जेन आपली कलेक्शन सादर करणार आहेत. प्रत्येक वेळी नेक्स्ट जनरेशन युनिक कल्पना घेऊन आपली डिझाइन्स सादर करते. यावेळीही अनुराग मेहता, निकिता म्हैसाळकर, महिमा महाजन, गाछ अशा लेबल्स नेक्स्ट जेन म्हणून पदार्पण करत आहेत.

एक्सपेरिमेन्टल डिझाइन्स हा यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. फॅब्रिकची हटके कॉम्बिनेशन्स, रंगांची युनिक जुळवाजुळव, एम्ब्रॉयडरीचे वेगळे पॅटर्न्स, वेगवेगळे सिक्वेन्स, लेसेस अशा कॉम्बिनेशन्स वापरून यावेळची डिझाइन्स सादर होतील. साधारणत: एकमेकांसोबत न वापरली जाणारी रंगांची कॉम्बिनेशन्स यावेळी वापरली जाऊन एक्सपेरिमेन्टल डिझाइन्स तयार होतील. दोन वेगवेगळ्या प्रकारची साधारणत: एकमेकांसोबत न वापरली जाणारी फॅब्रिक, जशी डेनिम आणि कॉटन, सिल्क आणि नेट अशा पद्धतीची फॅब्रिक वापरून युनिक पॅटर्न्स बनवले जात आहेत. डेनिम वन-पीसला नेटचे केप, डेनिम जंपसूटला कॉटनचे स्लीव्ह्स, डेनिम वन पीसवर सिक्वेन्स, अशा पद्धतीची अर्बन आणि त्याच वेळी चकाकणारी फेस्टिव्ह दिसतील अशी डिझाइन्स नेक्स्ट जनरेशन प्रेझेंट करत आहे. या फेस्टिव्ह वाटतील अशा डिझाईन्सना पॉकेट, बेल्ट असे युटीलिटी आणि त्याचसोबत स्टेटमेंट पीस अशा उद्देशाने केलेली डिझाईन्स आहेत. डेनिमवर सिक्वेन्स लावून पूर्वीच्या काळी लहान मुलींचे फ्रॉक शिवले जायचे. त्यालाच थोडं मॉडर्नाइज पद्धतीने आणि मॉडीफाय करून दिसावीत अशा पद्धतीची ही डिझाइन्स नेक्स्ट जेन डिझायनर्सकडून सादर केलेली पाहायला मिळणार आहेत.

शीअर फॅब्रिकचे केप्स आणि त्यावर एम्ब्रॉयडरीचे पॅच, सिक्वेन्स, फ्रिल्स अशा डिझाइन्सना डेनिम, कॉटन, किंवा सिल्क वन पीस सोबत पेअर करून कॅज्युअल अधिक फेस्टिव्ह अशा दोन्ही पद्धतीचा लुक यातून पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे सेफ एक्सपेरीमेन्ट काही नेक्स्ट जनरेशन डिझायनर्स ट्राय करत आहेत. मात्र केवळ सेफ डिझाईन्स नाही तर टॉर्न स्लीवह्स, टॉर्न बॉडी, अशा पद्धतीची डिझाइन्ससुद्धा जेन नेक्स्टने यावेळी कलेक्शनमध्ये आणली आहेत. टॉर्न कपड्यांवरही सिक्वेन्स, फ्रिल, एम्ब्रॉयडरी, असे पिसेस लावणं हे यावेळी स्टेटमेंट पीस म्हणून डिझाईन्समध्ये दिसून येईल.

फॅब्रिकवर नेहमीची कॉमन प्रिंट न घेता अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट घेऊन ती डिझाईन्समध्ये वापरली जात आहेत. त्यातही कलर कॉम्बिनेशन्सचे अॅबस्ट्रॅक्ट प्रयोग केले जात आहेत. डार्क कलर्ससोबत फ्रेश, फ्लोरोसंट आणि व्हायब्रंट रंग अशी कॉम्बिनेशन्स वापरली जात आहेत. काळा आणि फ्लोरोसंट पिंक, येलो, ऑरेंज अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांमधून डिझाईनमधले नवीन थीम्स आणि फ्युचर समोर येईल, असं म्हणायला हरकत नाही. वन पीससोबत दुपट्टा, स्कार्फ अशा पेअरिंगचेसुद्धा प्रयोग होत आहेत.

टेक-फ्युचरच्या या नव्या युगात अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होताना दिसतात. तसंच अशक्य वाटणारी फॅब्रिक कॉम्बिनेशन्स, कलर कॉम्बिनेशन्स, आऊटफिट पीस कॉम्बिनेशन्स यांच्यावर प्रयोग करत करत संपूर्ण स्टाइल स्टेटमेंट बदलून टाकणारं फ्युचर जेन नेक्स्ट डिझायनर्सच्या रूपाने फॅशन विश्वात उभं राहताना दिसतं आहे. या डिझाइन्समध्ये नेक्स्ट जनरेशनच्या वृत्ती आणि स्वभावाचंही प्रतिबिंब पाहायला मिळतं, असं म्हणता येईल. बेडरपणे जगाला भिडण्याचा स्वभाव, बोल्ड डिसिजन्स घेण्याची हिंमत, प्रयोगांना अभिमानाने मिरवण्याचा आत्मविश्वास अशा सगळ्याच गोष्टी नेक्स्ट जनरेशनच्या डिझाइन्समध्ये पाहायला मिळत आहेत. स्वत: प्रयोग करण्याची हिंमत दाखवणं आणि त्या प्रयोगांची लाज न वाटता ते कॅरी करणं हा नेक्स्ट जनरेशनचा बिनधास्तपणा त्यांच्या डिझाइन्समध्ये दिसून येतो आहे.

लॅक्मे फॅशन वीकच्या या यंदाच्या नव्या पर्वात जेन नेक्स्टकडून वेगवेगळे प्रयोग आणि नवनवीन अॅबस्ट्रॅक्ट डिझाइन्सचे हे नवे प्रयोगच आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे हा लॅक्मे फॅशन वीक खऱ्या अर्थाने एक्सपेरिमेन्टल ठरणार हे निश्चित.

viva@expressindia.com