निसर्गाशी असलेली जवळीक, संशोधनाची ओढ, समाजासाठी शाश्वत विचारांची जाणीव आणि पर्यावरणासाठी असलेली तळमळ यांचं प्रतीक म्हणजे डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे. वनस्पतीशास्त्राच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले, संशोधन, शिक्षण आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख समन्वय साधणारे डॉ. मकरंद ऐतवडे हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी या गावात जन्मलेले डॉ. ऐतवडे यांचं शिक्षण कोल्हापूरमध्येच झालं. न्यू कॉलेजमध्ये बीएस्सी पदवी घेतल्यानंतर डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्रात त्यांचा प्रवास सुरू झाला. शिवाजी विद्यापीठातून एम. फिल. व पीएच.डी. करताना त्यांनी पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पतींवर सखोल संशोधन केलं. पुढे प्रा. एस. आर. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करताना त्यांनी विविध दुर्मीळ वनस्पतींचा शोध घेतला.
त्यांनी शोधलेल्या म्युक्युना संजप्पी, व्हिग्ना सह्याद्रीयाना, बेगोनिया हंडीभडगनाथेन्सिस, बेगोनिया बाचूळकरी अशा प्रजातींना केवळ विज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर इतिहास, संस्कृती आणि त्यांचे मार्गदर्शक यांचा सन्मान करत त्यांचीच नावे देण्यात आली. त्यांनी केलेला हा प्रयत्न म्हणजे संशोधक म्हणून अभ्यासमूल्ये जपण्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एकंदरीत विज्ञान मूल्यांशी असलेलं त्यांचं नातं अधोरेखित करणारा आहे.
‘झाडं लावण्यापेक्षा त्यांचा अधिवास असणारी जंगलं वाचवणं महत्त्वाचं’, असं ठाम मत डॉ. ऐतवडे सातत्याने मांडतात. निसर्गाचं मूळ वैभव जंगलं आणि त्यातील जैवविविधतेत आहे, हे ते आपल्या प्रत्येक व्याख्यानातून ठामपणे सांगतात. पश्चिम घाटातील जैववैविध्यावर विशेष भर देत आजवर त्यांनी अनेक उपक्रम, लेख आणि प्रबोधनपर मोहिमा राबवल्या आहेत. डॉ. ऐतवडे यांनी कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात समन्वयक म्हणून काम करताना ग्रीन कॉर्नर, पर्यावरणपूरक दसरा-रक्षाबंधन, वेटलँड डे, अभ्यास सहली अशा उपक्रमांची सुरुवात केली. यामुळे महाविद्यालयीन पातळीवर पर्यावरणाविषयीची जाणीव वाढली. सध्या मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. ऐतवडे अध्यापन आणि संशोधनाचे आपले काम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी सदैव सक्रिय असतात. त्यांनी आतापर्यंत १७ संशोधनपर लेख, २९ पुस्तके लिहिली असून त्यातील ‘झाड लावताना’ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.
देशी झाडांबाबत जागरूकता निर्माण करणारे हे त्यांचे आणखी एक विशेष काम. देशी झाडांची माहिती देणारे ‘झाड लावताना’ हे त्यांचे मार्गदर्शक पुस्तक राज्यभर पोहोचले. विविध रेडिओ कार्यक्रम, वृत्तपत्रे, दिवाळी अंक, मासिके या माध्यमातून डॉ. ऐतवडे यांनी शिवाजी महाराजांचे पर्यावरण विचार, शाहू महाराजांचे शेतीविषयक आणि पर्यावरणविषयक कार्य, पश्चिम घाटातील जैवविविधता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकच्या समस्या, औषधी व सुगंधी वनस्पती, रानभाज्या, वनस्पतींचे अफवांमधून रक्षण अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. या विविध विषयांवर त्यांनी ठिकठिकाणी व्याख्यानेही दिलेली आहेत.
पर्यावरणविषयक जनजागृती ही केवळ लेखन आणि व्याख्यानातून करणे पुरेसे नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करणे महत्त्वाचे ठरते. डॉ. मकरंद ऐतवडे हे प्रत्यक्ष अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम झपाटून करत आहेत. वन विभागाच्या सहकार्याने वणवामुक्त गाव अभियानही ते शाहूवाडी तालुक्यात राबवत आहेत. त्यांचा ‘कोल्हापूरचे वृक्षवैभव’ हा व्हॉट्सअॅप समूह म्हणजे वनस्पती अभ्यासकांचं ज्ञानपीठ ठरलं आहे. वनस्पतींची शास्त्रीय ओळख करून देऊन अनेकांचे संशोधन सुलभ करण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत.
आज घरांमध्ये दिसणाऱ्या शोभिवंत वनस्पती विदेशी असतात, यावर समाधान मानणाऱ्या समाजाला डॉ. ऐतवडे यांचं संशोधन आणि साहित्य हे देशी शोभिवंत वनस्पतींची नवी ओळख करून देत आहे. प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांच्यासह त्यांनी देशी शोभिवंत वनस्पतींवर लिहिण्याची मोहीम सुरू केली आहे. डॉ. मकरंद ऐतवडे यांचं कार्य म्हणजे विज्ञान, निसर्ग, शिक्षण आणि समाजभान यांचा उत्कृष्ट संगम आहे. ‘वनस्पती हा विषय पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता, जीवनाशी जोडून घेत शिकविणे’ हे त्यांचे ध्येय, त्यांचं कार्य आणि भविष्यकालीन दृष्टी निश्चितच प्रेरणादायी आहे. भावी पिढीला निसर्गपूर्ण जीवन जगता यावं यासाठी ते अखंड झटत आहेत. त्यांचा विचार स्पष्ट आहे – ‘वन वाचवले तरच जीवन वाचेल!’.