– मृण्मयी पाथरे

‘काय मग? तुमच्या लग्नाला जवळपास दोन-तीन वर्ष झाली ना? पाळणा हलवण्याचा विचार कधी करताय? तुम्हा दोघांचीही वयं वाढायच्या आधी, पटकन निर्णय घेऊन टाका. नंतर उगाचच कॉम्प्लिकेशन्स नको. मूल झाल्यावर पण तारुण्य एन्जॉय करता येतंच की! आजकालच्या पिढीला मूल जन्माला घालणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं, असं वाटतं. पण असं काही नाहीये गं! प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट वेळ असते. त्यामुळे काय घ्यायचा तो निर्णय पटपट घ्या एकदाचा!’ शेजारच्या काकू प्रियाला काळजीपोटी सांगत होत्या. हे ऐकून प्रियाला प्रचंड मानसिक त्रास व्हायला लागला. तिच्या मनात नकारात्मक विचारांचं वादळ सुरू झालं. काकूंना काहीही न सांगता ती उठून तिच्या घरी निघून गेली. प्रिया आणि तिचा जोडीदार – प्रणित गेल्या एका वर्षांपासून बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करत होते. खरंतर, काही महिन्यांपूर्वी ते दोघेही रूटीन चेकअपला गेले असताना प्रणितच्या रिपोर्ट्समध्ये प्रजनन क्षमतेत अडचणी (fertility challenges) आढळून आल्या होत्या. त्यामुळे आता पुढे काय करायचं हा विचार त्यांना सारखा भेडसावत होता.

आराध्या आणि अद्वैत, हे विशीतील जोडपं सध्या बाळाचा विचार करतं आहे. आतापर्यंत बाळ व्हावं यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आणि दोनदा आराध्या गरोदरही होती. पण गरोदरपणातील पहिल्या त्रमासिक काळात (trimester) तिने मिसकॅरेज (miscarriage) अनुभवलं. तर दुसऱ्या वेळेस, काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे तिची प्रेग्नन्सी वैद्यकीय पद्धतीने (medical termination of pregnancy) थांबवावी लागली. या सगळय़ाचा त्या दोघांना आतल्या आत भयानक त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पथ्य पाळलं, व्यायाम केला, ताणतणावावर नियंत्रण ठेवलं, तरी आपलं काही ‘चुकतंय का’ असं त्यांना राहून राहून वाटायचं. ते दोघं जरी एकमेकांना दोष देत नसले, तरी आपण एकत्र पाहिलेलं स्वप्न साध्य का होत नाहीये, या विचाराने त्यांना पछाडलं होतं. त्यांच्या नातेवाईकांना हे कळल्यावर त्यांनी शेकडो घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय, इतर डॉक्टरांचे नंबर न विचारता सुचवले. पण त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल मात्र कोणीच विचारपूस केली नाही.

प्रेग्नन्सी दरम्यान कोणाला गर्भपात झाला, तर कित्येकदा त्या व्यक्तीचं शारीरिक आरोग्य कसं पुन्हा पुढच्या गरोदरपणासाठी सुदृढ करता येईल, यावर इतरांचा भर असतो. त्या व्यक्तीच्या भावना गर्भपात झाल्यानंतरचे काही दिवस समजूनही घेतल्या जातात, मात्र ‘जगात कित्येक जण या अनुभवातून जातात. दु:खं तर सगळय़ांनाच असतात. पण आपलं दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा पुढच्या वाटचालीवर कसं लक्ष केंद्रित करता येईल, याचा विचार कर’, असे सल्लेही काही काळानंतर ऐकायला मिळतात. काही जणांना अशा सल्ल्यांनी आधार मिळतो, पण काही जणांना अशा सल्ल्यांमुळे आपल्या भावना कोणीच समजून घेत नाही, असंही वाटू शकतं. यंदा आपलं बाळाचं स्वप्न साकार झालं नाही, याचा अर्थ पुढच्या वेळेस बाळ जन्माला आल्यानंतर मागची सगळी दु:खं आपण विसरून जाऊ, असं क्वचितच होतं. आपल्या आयुष्यातील लहान-मोठे चढउतार आपल्या मनाच्या कप्प्यात कुठे ना कुठे साठवले गेलेले असतात. त्यामुळे आपल्या स्मृतीतून हे चढउतार तसे पटकन मिटवले जात नाहीत.      

आपल्या आजूबाजूला अशी काही जोडपी असली, तरीही आपल्या समाजात गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींबद्दल (विशेषत: पुरुषांमध्ये आढळणाऱ्या फर्टिलिटी चॅलेंजबद्दल) कित्येक जण उघडपणे बोलायला आढेवेढे घेतात. आणि त्यांचं घाबरणं साहजिकच आहे! आपला समाज कित्येकदा केवळ नैसर्गिक गर्भधारणेचं आणि ‘आपल्याच रक्ताचं बाळ’ असण्याचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे मूल दत्तक घेणं, आय.व्ही.एफ. (IVF) ट्रीटमेंट घेणं, शुक्राणू (स्पर्म) किंवा गर्भाशयातील अंडी डोनेट करणं किंवा त्यांना काही काळासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रिझव्‍‌र्ह करून त्यांचा वापर काही वर्षांनी करणं, सरोगसी अशा अनेक पर्यायांना बहुतेकदा दुय्यम लेखलं जातं. 

अगदी एखाद्या व्यक्तीने सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याचा विचार जरी केलाच, तरी त्यांनी इतर नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करून प्रयत्न केले आहेत का?, याबद्दल प्रश्न हमखास विचारले जातात. नैसर्गिकरीत्या मूल होण्यासाठी प्रजननक्षमता असेल, तर तुम्ही मूल दत्तक का घेत आहात किंवा सरोगसीबद्दल विचार का करत आहात?, अशा प्रश्नांची सरबत्तीसुद्धा कित्येकदा सुरू होते. मुळात, आपल्याला मूल हवं आहे की नको आहे, जर हवं असलं तर कधी हवं आहे आणि कोणत्या पद्धतीने हवं आहे, याचा विचार करण्याची मुभा अनेक जणांना हवी असते. पण आपल्या समाजाच्या अलिखित नियमांमुळे आणि अपेक्षांमुळे कित्येक जोडपी त्यांचे विचार ‘समोरच्या माणसाने आपल्याला जजमेंटल नजरेने पाहिलं तर?’ या भीतीपोटी सांगत नाहीत.

बरं, कोणतीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात फर्टिलिटी चॅलेंज अनुभवत असेल, तर कित्येक जण त्या व्यक्तीला आणि तिच्या राहणीमानाला (lifestyle) दोष देऊन पटकन मोकळे होतात. कधीकधी या अडचणी आनुवंशिक असतात. त्यामुळे आधीच आपल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने बाळ होण्यास अडथळा निर्माण होत आहे, याबद्दल बऱ्याच जणांना गिल्टी वाटत असतं. आपल्यात काहीतरी ‘कमतरता’ किंवा ‘खोट’ आहे, असं कित्येक जणांना वाटत राहतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, कामावरील फोकस अशा कित्येक गोष्टींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यात इतर लोकं काय म्हणतील यामुळे ताणतणावात अधिक भर पडते. प्रत्येक जण आपापलं आयुष्य आपापल्या परीने जगण्याचा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. आणि या अडचणी माहीत नसल्यामुळे आपण आपला हेतू भले कितीही चांगला असला, तरी काही विशिष्ट प्रश्नं विचारतो किंवा सल्ले देतो, जे इतरांच्या जिव्हारी लागू शकतात. त्यामुळे ‘गुड न्यूज कधी देताय?’ हा प्रश्न विचारण्याऐवजी ‘कसे आहात?’ हा साधा सोपा प्रश्न विचारला तर? आणि ‘तुम्हाला काही लागलंच तर नक्की सांगा मला!’ असं बोललो तर? बघुया एकदा असं बोलण्याचा प्रयत्न करून!

viva@expressindia.com