शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत सध्या आपण मंगोलियात हॉल्ट घेतलाय.
मंगोलियाची राजधानी म्हणजे ‘उलान बातर’. तुम्हाला तिथली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मंगोलियाची  ४५ टक्के लोकसंख्या ही त्यांच्या या राजधानीत राहते. तिबेटियन बौद्ध धर्म इथल्या बहुतेक लोकांनी अंगीकारलेला दिसतो. खरं तर रानोमाळी भटकणाऱ्या या योद्धा जमाती आणि त्यांनी अंगीकारलाय शांतीचा, अिहसक असा बौद्ध धर्म. हे एक भन्नाट कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतं.
मुळात भटक्या जमातींचा देश असल्यामुळे या लोकांकडे असलेल्या पाचही (उंट, घोडी, शेळी, मेंढी, गाय) पाळीव प्राण्यांच्या दुधाचा उपयोग यांनी जेवणात मस्त प्रकारे केलेला दिसतो. ताजं दूध तर वापरलं जातंच, शिवाय दूध सुकवून, आंबवून त्यांचे वेगवेगळे टिकणारे पदार्थ बनवले जातात. जेव्हा थंडी वाढते तेव्हा शरीराला प्रोटिन्स आणि उष्णता मिळावी म्हणून हे पदार्थ खाल्ले जातात.
मंगोलियन चहा (सुतो साई) हे मंगोलियन माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे पेय आहे. नाष्टा आणि दुपारच्या, रात्रीच्या जेवणांत हा चहा प्यायला जातो. चहा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर आल्याचा मस्त गरमागरम वाफाळता चहा आला असेल तर जरा थांबा. हा चहा जरा वेगळ्या प्रकारचा असतो बरं का! या चहात घालतात – मीठ, दूध, ग्रीन टी आणि पाणी!
आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली ती म्हणजे यांचं राहण्याचं ठिकाण. खूप पूर्वीपासून उंटाच्या कातडीपासून बनवलेल्या एक प्रकारच्या तंबूमध्ये इथल्या लोकांना राहायला आवडतं. थंडीत ऊब देणाऱ्या आणि गरमीत थंडावा देणाऱ्या या तंबूंची रचना वैशिष्टय़पूर्ण असते. प्रत्येक तंबूची रचना ही सारखीच, वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून ही रचना विकसित झालेली आहे. दक्षिणेला दरवाजा, पश्चिमेला  पाहुण्यांसाठी जागा इत्यादी जागा त्यांच्या ठरलेल्या असतात.
या तंबूत जाण्याच्या, येण्याच्या, राहायच्या, खाण्याच्या विशिष्ट रीतीभाती असतात आणि त्या कटाक्षानी पाळल्या जातात. माझ्यासारखा माणूस तिथे पाहुणा म्हणून गेला तर मला वाटतं रात्रभर तंबूच्या बाहेरच झोपावं लागेल.. ते जाऊ द्या, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही कित्येक शहरी मंगोलियन हे त्यांच्या आवडत्या तंबूतच राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुझ (मंगोलियन डम्पलिंग)
पारीसाठी साहित्य  : मदा- १ वाटी, मीठ – पाव टी स्पून, कोमट पाणी – आवश्यकतेनुसार
सारणासाठी साहित्य : तेल – १ टी स्पून, मटण खिमा – १ कप, बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम आकाराचा, पातीचा कांदा बारीक कापलेला – २, बारीक चिरलेले लसूण – ३, धनापूड – अर्धा टी स्पून,  मीठ – चवीनुसार, काळी मीरी पूड – २ चिमूट, शाह जिरे – अर्धा टी स्पून
कृती : पारीसाठी दिलेले साहित्य एकत्र करून, कणकेसारखे मळून घ्या. एका बाउलमध्ये सारणासाठी दिलेले मटणाचे साहित्य एकत्र करा. कणकेचे छोटे गोळे करून लाटून घ्या. त्यामध्ये तयार सारणाचे छोटे गोळे भरून पारी सर्व बाजूने बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व डम्पलिंग करून १५  मिनीट स्टीम करून घ्या. केचप किंवा सोया सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

मंगोलियन चिकन विथ ब्रोकोली
साहित्य : चिकनचे तुकडे  – ३ कप, सोया सॉस –  पाव कप, तेल – २ टी स्पून, बारीक चिरलेलं आलं – १ टी स्पून, बारीक चिरलेले लसूण – ३ टी स्पून, पाणी – ४ टेबल स्पून, राइस वाइन वीनेगर – २ टेबलस्पून (ऑप्शनल),  ब्राऊन शुगर -पाव कप, रेड चिली फ्लेक्स –  अर्धा टी स्पून, स्टार फुल – १ तुकडा, कॉर्नफ्लॉवर – १ टेबलस्पून, पातीचा कांदा १ लांब कापलेला – ३ टी स्पून, ब्रोकोली – ३   कप, ब्राउन राइस (उकडून घेतलेला) – ३ कप, तिळाचे तेल – १ टी स्पून.
कृती : एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे सोयासॉस टाकून मॅरिनेशन करायला ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं, लसूण, स्टारफुल परतून घ्या.  नंतर त्यात पाणी, राइस वाइन, ब्राऊन शुगर, रेड चिली फ्लेक्स टाकून उकळी आणा. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले चिकन आणि ब्रोकोली टाकून परतून घ्या. व तिळाचे तेल टाका. मग त्यात पातीचा कांदा टाकून एकजीव करा. सॉसच्या पॅनमध्ये चिकन आणि ब्रोकोली टाकून सॉस गरम करा. उकळी आल्यावर त्यात कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचे मिश्रण टाका. सॉस घट्ट करून घ्या. आणि पातीचा कांदा व ब्राऊन राइस टाकून सव्‍‌र्ह करा.


आजची  सजावट

हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..

गाजराचे फुलपाखरू (Carrot Butterfly)
१. चित्रात दाखवल्याप्रमाणे गाजर डायमंड आकारात कापून घ्या. व त्यावर शेप कट करून घ्या.  २.गाजराचे दोन पातळ स्लाइस कापून घ्या. पण दोन्ही स्लाइसचे खालचे टोक जुळलेले ठेवा. ३.चित्रात दाखवल्याप्रमाणे फुलपाखराचे कट द्या. आणि छोटा भाग खाचेत खोचून घ्या. अशा प्रकारे फुलपाखरू तयार करून घ्या.
http://www.devwratjategaonkar.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mongolian food
First published on: 21-02-2014 at 01:04 IST