नवं दशक नव्या दिशा : सौरभ करंदीकर

चंद्राचं काय घेऊन बसलात? पृथ्वीवरचे प्रश्न सोडवा! चंद्रावरून काय आणणार, दगड? अशी टीका नेहमीच केली जाते. चंद्रावर परत जायचं तर त्यासाठी तसंच सबळ कारण हवं. खरं तर चंद्रावर जाण्यासाठी कारणांची कमी नाही. मात्र त्याबद्दल सर्वाना पुरेसं माहिती नाही, कारण चंद्रावर कसे गेलो? या शौर्यकथांच्या गदारोळात का गेलो? याची चर्चा फारशी होत नाही.

चंद्र नसता तर लेखक, कवी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, भयकथाकार, विज्ञान कथाकार या साऱ्यांची मोठी पंचाईतच झाली असती. मानवासाठी चंद्र हा आकर्षण, प्रेम, कुतूहल, भीती अशा अनेक भावनांचं प्रतीक आहे. सृजनशीलतेच्या वाटा आणि समुद्राच्या लाटा चंद्राविना आकारच घेऊ शकत नाहीत. अशा चंद्राकडे झेपावण्याची इच्छा मानवजातीला झाली नसती तरच नवल. विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरेसं प्रगत झाल्यानंतर चंद्रावर कसं जाता येईल याची उत्तरं माणूस शोधू लागला.

चंद्रावर स्वारी (साहित्यविश्वात नव्हे, प्रत्यक्ष) म्हटलं की आपल्याला अपोलो, नील आर्मस्ट्राँग, नासा, इत्यादी ‘अमेरिकन’ गोष्टींची आठवण होते. आर्थिक प्रगती, तांत्रिक गुणवत्ता याबरोबरच आत्मस्तुती आणि स्वप्रदर्शनात अग्रेसर असल्याने कुठल्याही गोष्टीची ‘लाइन यहांसे शुरू होती है’ असं अमेरिका नेहमीच जगाला जाणवून देतं. परंतु चंद्रावर ‘पोहोचण्याचा’ पहिला मान त्यांचा नसून सोव्हिएत रशियाचा आहे, या गोष्टीचा इतिहासाला विसर पडलेला आहे. नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या पृष्ठभागावर १९६९ साली उतरला, परंतु त्याच्या जवळपास १० वर्ष आधी रशियाचं ‘लुना २’ नावाचं मानवरहित यान चंद्रावर आदळलं. हो, आदळलं, उतरलं नाही, परंतु त्यांचंच ‘लुना ९’ मात्र १९६६ साली अलगद उतरलं. अमेरिकेचं, चंद्राच्या पृष्ठभागाची टेहेळणी करणारं ‘सव्‍‌र्हेयर’ मात्र काही महिन्यांनंतर तिथे दाखल झालं.

रशिया आणि अमेरिकेपाठोपाठ चीन, जपान, युरोपियन युनियन, लक्झेम्बर्ग आणि स्वत: आपण चंद्रावर स्वाऱ्या केलेल्या आहेत. या सर्व स्वाऱ्यांवर अब्जावधी खर्च झालेले आहेत. अमेरिकेच्या चंद्र मोहिमा सुरू झाल्या त्या काळात असलेला समाजाचा आणि राज्यकर्त्यांचा उत्साह कालांतराने ओसरू लागला. १९७२ सालच्या डिसेंबर महिन्यात मानवाने चंद्रावरचं आपलं पाऊल उचललं ते आजतागायत पुन्हा तिथे पडलेलं नाही. १९५०च्या दशकापासून ते आजपर्यंत आपण चंद्राबद्दल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माहिती मिळवलेली आहे, परंतु पन्नास वर्षांत पुन्हा त्या गावी जायची तयारी आपण दाखवलेली नाही.

चंद्राचं काय घेऊन बसलात? पृथ्वीवरचे प्रश्न सोडवा! चंद्रावरून काय आणणार, दगड? अशी टीका नेहमीच केली जाते. चंद्रावर परत जायचं तर त्यासाठी तसंच सबळ कारण हवं. खरं तर चंद्रावर जाण्यासाठी कारणांची कमी नाही. मात्र त्याबद्दल सर्वाना पुरेसं माहिती नाही, कारण चंद्रावर कसे गेलो? या शौर्यकथांच्या गदारोळात का गेलो? याची चर्चा फारशी होत नाही.

भारतासारख्या विकसनशील देशानेसुद्धा ‘चांद्रयान १’ आणि ‘चांद्रयान २’ या मोहिमा आखल्या. त्यामागे काहीतरी गणितं असणारच. या साऱ्याच्या मागे दोन मोठी कारणं आहेत. एक म्हणजे मंगळ आणि बा अवकाशात झेपावण्यासाठी चंद्र हे एक महत्त्वाचं स्टेशन ठरणार आहे. चंद्राचं कमकुवत गुरुत्वाकर्षण आणि त्याची भ्रमणगती यामुळे इतर ग्रहांवर जाण्यासाठी अवकाशयानांचं प्रक्षेपण तिथून करताना ऊर्जेचा कमीत कमी वापर करावा लागेल. त्यामुळे त्या स्टेशनवर कुणाचं वर्चस्व असेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

दुसरं आणि भविष्यात कदाचित महत्त्वाचं ठरू शकेल असं कारण म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याच्या भूगर्भात असलेली विविध द्रव्य आणि खनिजं. मानवाने आतापर्यंत चंद्रावरून ३८० किलो दगड आणि धूळ यांचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत. त्यापैकी बरेचसे नमुने जगभरातील विविध संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत, तर सुमारे १५ टक्के नमुन्यांवर प्रयोग करून चंद्राची रासायनिक जडणघडण जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की चंद्र हा ४५% ऑक्सिजनने बनलेला आहे! म्हणजे ऑक्सिजन वायू नव्हे! तसं असतं तर मानवजात चंद्रावर ‘शिफ्ट’ व्हायला एका पायावर तयार झाली असती. परंतु ऑक्साइड्सच्या आणि इतर मिश्र स्वरूपात ऑक्सिजनचे अणू चंद्राच्या कणाकणात सामावलेले आहेत. रासायनिक प्रक्रिया करून हा ऑक्सिजन नक्कीच वेगळा करता येईल आणि वापरता येईल असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय सिलिकॉन, थोरियम आणि अल्युमिनियम हे खनिज पदार्थ चंद्रावर मुबलक प्रमाणात आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चंद्रावर आढळणारं दुर्मीळ मृदेचं प्रमाण. रेअर अर्थ, म्हणजेच दुर्मीळ मृदा या नावाने ओळखली जाणारी संयुगं इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. पृथीवर ही खनिज संयुगं मिळवण्यासाठी खाणींमधून अतोनात उपसा करावा लागतो. असं खाणकाम  पर्यावरणासाठी धोकादायक, खर्चीक तर असतंच, परंतु ते पर्यावरणासाठी देखील घातक ठरतं. चंद्रावर या मृदेचं प्रमाण अनेक पटींनी अधिक आहे, इतकंच नाही तर काही सर्वेक्षणादरम्यान ते चक्क पृष्ठभागावर आढळून आलं आहे. त्यामुळे चंद्रावर या कारणासाठी देखील उद्योजकांचा डोळा आहे.

आता चंद्रावर परत जावं असं सर्वाना वाटू लागलंय याला एका परीने भारत कारणीभूत ठरला आहे. (अर्थातच पाश्चिमात्य देश हे श्रेय चटकन कबूल करणार नाहीत. ‘चांद्रयान १ आणि २’ यांनी चंद्रावर पाणी आहे, हा शोध लावला आहे. आणि थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल ६० कोटी टन बर्फ आतापर्यंत आढळून आलं आहे. यामुळे मानव चंद्रावर दीर्घकाळ वास्तव्य करू शकेल असा आत्मविश्वास नव्याने तग धरू लागला आहे. नगरपालिकेकडून पाण्याचं कनेक्शन मिळालं रे मिळालं की एखाद्या नवीन इमारतीवर ग्राहकांची जशी झडप पडते, तशीच काहीशी गत चंद्राची होणार हे नक्की!

चंद्रावर पुन्हा स्वारी करण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाला नासाने ‘आर्टेमिस’ असं नाव दिलेलं आहे. ग्रीक संस्कृतीत आर्टेमिस ही चंद्राची, वन्यजीवांची तसेच ‘शिकारी’ची देवता समजली जाते. चंद्राच्या शिकारीला निघालेल्या या आर्टेमिस मोहिमेबद्दल आणि चंद्रावरच्या भावी वास्तव्यात संभवणाऱ्या काही धोक्यांबद्दल पुढल्या लेखात जाणून घेऊ.

viva@expressindia.com