मी एकवीस वर्षांची मुलगी आहे. फेसबुक अ‍ॅडिक्टेड होते. गेल्या तीन वर्षांमध्ये मी सतत एका मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तो माझा रिलेटिव्ह आहे. पण आम्ही आधी कधी भेटलो नव्हतो. फेसबुकवर मैत्री आणि प्रेम झालं. मागच्या वर्षी आम्ही भेटलो आणि त्यानं मला प्रपोज केलं. मीपण हो म्हणाले. पण रिलेशनशिपमध्ये मी इतकी कम्फर्टेबल नव्हते. कारण मी जरा फ्री-माइन्डेड मुलगी आहे, सो माझे खूप फ्रेंड्स आहेत. मग त्याला ते आवडेना. आमची भांडणं होऊ लागली. माझ्या घरी माझ्या लग्नाचं सुरू होतं. मी त्या टेन्शनमध्ये होते. एक दिवस खूप भांडण झालं. मी रागात त्याला म्हटलं की मी आईला सांगते, पण त्यानं मला इग्नोअर केलं. आईला सांगितल्यावर तिनं मला त्या रिलेशनशिपमधले ड्रॉबॅक्स सांगितले, मला ते पटले. मी ब्रेक-अप केलं, पण आता माझ्या मनात गिल्ट आहे की, मी अशा मुलाच्या प्रेमात पडले जो मला कधी समजूच शकला नाही. त्याच्यासाठी मी सगळ्या जगाला सोडायला तयार होते. प्लीज हेल्प मी.     
पूजा
फर्स्ट ऑफ ऑल, पूजा काँग्रॅच्युलेशन्स. अशासाठी, की तू वेळीच जागी झालीस. आईनं सांगितलेलं तुला फॉच्र्युनेटली पटलंही, कारण अनेकदा अशा वेळी ‘आईला काय कळतंय, ती समजूच शकत नाही माझ्या भावना,’ असं वाटतं मुलींना. मला वाटतं की, तुला हे पटलं कारण कुठे तरी तुझा निर्णय ऑलरेडी झाला होता. आईच्या शब्दांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं एवढंच.
नाती जुळवणं आणि ती टिकवणं ही किती अवघड आणि जबाबदारीची गोष्ट असते नाही? एखाद्या व्यक्तीला आपण आता ओळखलं, असं म्हणेम्हणेपर्यंत मनात शंका उत्पन्न करणारा एक नवीनच पैलू समोर येतो. अगदी लग्नाला वीस-पंचवीस र्वष झालेल्यांनाही नवीन साक्षात्कार होत असतात. रिलेशनशिपच्या सुरुवातीला दोघांचाही काहीसा सावध पवित्रा असतो. एस्पेशली फेसबुकसारख्या माध्यमातून संवाद साधताना फक्त गुडी-गुडी छबी प्रोजेक्ट केली जाते. म्हणतात ना की, ‘आयकार्डवरच्या फोटोइतकं कुणी कुरूप नसतं आणि फेसबुकवर दिसणाऱ्या चित्रासारखं कुणी परफेक्ट नसतं.’ आपण मागच्या एका व्हिवामध्ये म्हटल्याप्रमाणे गर्लफ्रेंड आणि बायको या दोघींकडून मुलांच्या खूप वेगवेगळ्या अपेक्षा असतात. गर्लफ्रेंडबाबतीत चालणाऱ्या गोष्टी बायकोबाबत चालत नाहीत. फेसबुकवर तुम्ही तीन र्वष कॉन्टॅक्टमध्ये होतात. म्हणजे तुला खूप मित्रमैत्रिणी आहेत याची त्याला कल्पना असणार. पण तरीही प्रपोज केल्यानंतर मात्र त्याला ते आवडेनासं, पचेनासं झालं.
आणि पूजा, हे ब्रेकअप नुकतंच झालंय का? कारण नवीन असताना या घटना वाटतात तितक्या अ‍ॅक्सेप्ट करायला सोप्या नसतात. काही वेळा निंदानालस्ती करून, त्या व्यक्तीला कमी लेखून याला तोंड दिलं जातं. काही जण मात्र याबाबत स्वत:ला ब्लेम करत राहतात. ब्रेकअप जरी तू केलं असलंस तरी तुला कुठे तरी रिजेक्टेड वाटलं असणार, आयुष्यातल्या या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत आपण घोडचूक केली म्हणजे आपल्याला नीट निर्णय घेताच येत नाहीत की काय असा आत्मविश्वास गमावूनही बसली असशील. मग आता पुढे काय? काळ हेच या सगळ्यावरचं औषध आहे. थोडं थांब, काही वेळ जाऊ दे. मनात सुडाची भावना न ठेवता तुमची रिलेशनशिप शांतपणे, स्टेप बाय स्टेप अ‍ॅनेलाइझ करून बघ. हे नातं असंच पुढे गेलं असतं तर काय सिच्युएशन उद्भवली असती याचा विचार कर. हा रिझल्ट टाळण्यासाठी तू कुठल्या स्टेजला काही वेगळा निर्णय घेऊ शकली असतीस का हेही आठव. तो कसा वागणार यावर तुझं नियंत्रण नाही, तुझं नियंत्रण फक्त तुझ्या प्रतिक्रियांवर असणार. त्या सेन्सिबल ठेव म्हणजे झालं. स्वत:ला बिझी ठेव म्हणजे सतत मनात निगेटिव्ह विचार येत राहणार नाहीत. हे ब्रेकअप करून चूक केली की काय असं तर तुला वाटत नाहीये ना?
एकदा निर्णय चुकला म्हणून आता मनासारखं दान पडणारच नाही असं नाही. या अनुभवातून तावूनसुलाखून निघून तुला धडा मिळालाय. पुढच्या वेळी तू अधिक शहाणपणानं, सावधपणे आणि सुरक्षितपणानं हा महत्त्वाचा डिसिजन घेशील याची मला खात्री आहे.
Life goes on… Whether you choose to move on and take a chance in the unknown. Or stay behind, locked in the past, thinking of what could have been!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open up life goes on
First published on: 30-05-2014 at 01:11 IST