मेकओव्हर करून देणाऱ्या ब्युटी पार्लर्सचाच हल्ली मेकओव्हर झालाय. पर्सनल टच असलेल्या घरगुती पार्लरची जागा प्रोफेशनल मल्टी सिटी एडिशन असलेल्या ब्रँडेड पार्लर्सनी घेतली आहे. कसा झाला हा बदल?
कोणत्याही क्षेत्रातील स्त्री असो; पण आयुष्यात एकदा तरी दोन गोष्टींशी कधीना कधीतरी तिचा संबंध येतोच. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरं म्हणजे अर्थातच ब्युटी पार्लर !!! आपण छान दिसावं, रूपवान असावं अशी प्रत्येकीची इच्छा असते. हजारो वर्षांपूर्वी अगदी राजेरजवाडय़ांच्या काळातही महाराण्यांसाठी दाग-दागिने, सौंदर्य प्रसाधनासाठी अत्तरे अशा सौंदर्यवर्धक गोष्टींची रेलचेल असे. सामान्य स्त्रियासुद्धा फुलं माळून, टपोरं गंध लावून स्वतला सजवत. ठाकर जमातीतील आदिवासी स्त्रियादेखील रानातल्या गोष्टी वेचून सौंदर्य अलंकार बनवताना आपण पाहतो. थोडक्यात काय तर सौंदर्य आणि स्त्री यांचं समीकरण काही नवीन नाही. सजण्या-नटण्याची हौस प्रत्येक स्त्रीला असते आणि ती हौस पुरवली जाते असं ठिकाण म्हणजे ब्युटी पार्लर. आज गल्लोगल्ली अनेक ब्युटी पार्लर्स दिसतात. काळानुसार या पार्लरच्या स्वरूपातही मोठे बदल होत गेले.
पूर्वी छोटय़ा जागेत, लहानशा एखाद्या घरात पार्लर्स असायची. आयब्रोज, लग्न समारंभाला एखादी हेअर स्टाइल आणि हलकासा मेकअप तेही अगदी ठरावीक वर्गातल्या स्त्रिया. असं अतिशय मोजकं स्वरूप असायचं. नंतर छोटय़ा खोलीमधून एका स्वतंत्र गाळ्यामध्ये आणि आता तर थेट म्युझिक, एसी वेगवेगळी सेक्शन्स असलेली आधुनिक सोयींनी युक्त आलिशान बहुमजली, बहुशाखीय पार्लर आली आहेत. ब्युटी पार्लरची आता एक इंडस्ट्री झाली आहे. घरगुती पार्लर ते इंडस्ट्री असा हा प्रवास, प्रत्येक टप्प्यावर इंटरेस्टिंग बदल होत आलाय. हा बदल फक्त पार्लरच्या इंटिरिअरपुरता मर्यादित नाही तर बदललेल्या सामाजिक दृष्टिकोनाचाही आहे. आपल्या शरीराची काळजी घेऊन स्वत:ला जगासमोर प्रेझेंटेबल ठेवण्याबाबत स्त्रियांमध्ये आलेल्या आत्मभानाचेही ते एक प्रतीकच म्हणावे लागेल!
हा बदल जवळून पाहिलेल्या, महाराष्ट्रात ब्युटी पार्लरची संकल्पना ज्यांनी रुजवली आणि एक इंडस्ट्री म्हणून सौंदर्यसाधनेच्या जगताकडे लोकांना पाहायला लावलं अशा माया परांजपे याविषयी म्हणाल्या, ‘‘मुंबईमध्ये १९९८ साली आमच्या बंगल्यात मी पार्लर सुरू केलं. त्या काळात ब्युटी पार्लर म्हणजे काय? तिकडे काय चालतं? हे मराठी स्त्रियांना अजिबात माहीत नव्हतं. मेकअपशिवाय पार्लर ही संकल्पनाच लोकांना माहिती नव्हती. कारण त्या काळात हेअर ड्रेसिंग सलून्स जास्त होते आणि त्यामध्ये काम करणाऱ्या चायनीज मुली होत्या. ख्रिश्चन, पारसीसुद्धा होत्या; पण मध्यमवर्गीय मराठी तर अजिबात नव्हत्या आणि असल्या तरीही त्या हेअर स्टाइल करत असत. हेअर कटिंग करत नसत. या क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून लोक पाहत नव्हते. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली.’’ माया परांजपे यांनी १९६८ मध्ये मुंबईत आणि १९७६ मध्ये पुण्यात सर्वप्रथम पार्लरची स्थापन केली. गेली ४८ वर्षे त्या या व्यवसायात आहेत. ‘‘१९६६ साली मी एका कॉस्मेटिक कंपनीमध्ये ब्युटी कौन्सेलर म्हणून काम करत असताना कॉस्मेटिक्सकडे पाहण्याचा मराठी मध्यमवर्गीय स्त्रियांचा जो प्रतिसाद दिसला तो प्रचंड होता. त्यामुळे शिकायची आणि सुंदर दिसण्याची स्त्रियांमध्ये असलेली आस्था मी पाहिली होती; पण त्यांना कुठे शिकावं? काय शिकावं हे माहीत नव्हतं. आता मुलींना नोकरीसाठी बाहेर पडावं लागतं त्यामुळे प्रेझेंटेशन आणि ग्रुिमग या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. हा प्रकार २० वर्षांपूर्वी नव्हता. आज यामध्ये ‘स्पा’ इंडस्ट्रीचं झालेलं पदार्पण हा ब्युटी पार्लरच्या जगतात झपाटय़ाने झालेल्या बदलाचं लक्षण आहे. ब्युटीसंदर्भातील सगळ्याच गोष्टींना आलेला वेलनेस हा मुद्दा आज नवीन आहे’’, परांजपे सांगतात.
पार्लरमध्ये झालेला आणखीन एक बदल म्हणजेच  सौंदर्याला शास्त्रोक्त पद्धतीचं आवरण देण्याकडे आजच्या बहुतांशी पार्लर्सचा कल दिसतो. हल्ली बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांच्या किंवा कॉस्मेटॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ग्राहकाला दिल्या जातात. फक्त चेहऱ्याशी निगडित नाही तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचे, एरोबिक्सचे, थेरपीचे प्रकारही ब्युटी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कला आणि विज्ञान यांचा मेळ घातला जातोय. लॅक्मे ब्युटी सलोनचे (कल्याण)मॅनेजर अफताब मांडलिक म्हणतात, ‘‘कॉर्पोरेट क्षेत्रातल्या स्त्रियांप्रमाणे आता गृहिणीदेखील मोठय़ा प्रमाणात पार्लरमध्ये येऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊ लागल्या आहेत त्यामुळे ती जागरूकता आता सर्व स्तरांतील स्त्रियांमध्ये आली आहे. आज ऑरगॅनिक म्हणजेच केमिकल्स नसलेल्या ट्रीटमेंट्सचा ट्रेंड असल्याने ग्राहकांचा पार्लरवरील विश्वास वाढतो आहे. राहणीमान उंचावल्यामुळे लोक पसे देऊन दर्जेदार ट्रीटमेंट्स करून घेत आहेत  आणि स्वतसाठी वेळ काढत आहेत. आजची तरुण पिढी मोठय़ा संख्येने या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. ग्राहकांचा पार्लरकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय.’’
मुलींप्रमाणे आता मुलंदेखील पार्लरमध्ये काम करताना दिसतात. बऱ्याच ठिकाणी मुलींचा मेकअप, हेअरकटिंग करण्यासाठी मुलं असतात. त्यामुळे अलीकडे युनिसेक्स हा पार्लरचा ट्रेंड तरुणांमध्ये बराच लोकप्रिय होत आहे. एक काळ असा होता जेव्हा पार्लरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांकडे आणि तिथे काम करणारया स्त्री-पुरुषांकडे तितक्याशा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात नसे; पण जागतिकीकरणानंतरच्या अलीकडील काही वर्षांत या क्षेत्रात काम करण्यासाठी तरुण लोक सरसावू लागले. ब्युटी पार्लरचे खास अभ्यासक्रम, कोस्रेस सुरू झाले. बहुतांश पार्लरमध्ये आज फोनवरून अपॉइंटमेंट घेऊन आपल्या वेळेप्रमाणे जायची सोयदेखील केलेली आहे. पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना खास ड्रेस कोड देऊन प्रोफेशनल स्वरूप दिलं जात आहे. विविध प्रकाशयोजना आणि लाइट म्युझिक यांच्या सहाय्याने हल्ली पार्लर अधिक मॉडर्न होताहेत जेणेकरून. ग्राहकांना आरामदायी वाटेल असं सगळं केलं जातंय. ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वाला, तो काम करत असलेल्या प्रोफेशनला सूट होईल अशा प्रकारे मेकअप, हेअर कट करण्याकडे सध्याच्या पार्लर्सचा कल आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीही आता लक्षात घेतल्या जातात. सगळ्यात लेटेस्ट ट्रेंड म्हणजे ई ब्युटी पार्लर्स.. विविध सौंदर्यक्षेत्रातील कंपन्या हेअर स्टाइल्स, मसाज, मेकअप असे धडे आता यूटय़ूबवर जाहिरातींच्या माध्यमातून देताना आपण पाहतोय. सिने-फॅशन दुनियेतला लुक आता सर्वसामान्य लोकांनादेखील सहज उपलब्ध होतोय तो पार्लर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या प्रगतीमुळेच!! एकंदरीत काय बदलत्या काळानुसार आता ब्युटी पार्लरच्या स्वरूपाचादेखील मेकओव्हर झाला आहे.