नीलेश अडसूळ
ढोल-ताशाचा गजर झाला की आपसूकच पावले थिरकू लागतात. गणपती बाप्पा म्हटले की ‘मोरया’ हे श्वासोच्छ्वासाइतके सहज बाहेर पडते. ही थिरकणारी पावले, हा दुमदुमणारा आवाज म्हणजे मंडळाचे ‘कार्यकर्ते’.  या कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अजूनही काही बरा नाही. आणि जेव्हा ते दारावर वर्गणीसाठी येतात तेव्हा तर कहरच. पण हेच कार्यकर्ते अडीनडीला, मदतीला दत्त म्हणून उभे ठाकतात, हेही विसरून चालणार नाही. याच कामातून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, माणूसपण घडत असते. अनेकांसाठी मंडळात जाऊन काम करणे, रात्रभर जागणे हे ‘बिघडणे’ मानले जाते, पण इथल्या कामाचा आवाका पाहिला तर खऱ्या अर्थाने ‘घडणे’ ते हेच आहे असे वाटते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाची बारा-पंधरा वर्षे सरली, मिसरूड फुटू लागले आणि जगरहाटीचा खेळ कळू लागला की घडण्या-बिघडण्याचा काळ  सुरू होतो. याच वयात प्रामुख्याने मुले घरात सहा तास आणि बाहेर १८ तास वावरत असतात. शाळा, शिकवण्या आवरल्या की या वयातली खरी शाळा भरते. नाक्यावर, कट्टय़ावर, मैदानात, एखाद्या कोपऱ्यावर अगदी कुठेही. इथेच खरे गिरवले जातात घडण्या-बिघडण्याचे धडे. अंगात रग असल्याने खोडय़ा, टवाळक्या सुरू असतातच, पण नेतृत्व, राजकारण, समाजकारण, सामाजिक कामे याचीही पायाभरणी अशाच खुल्या शाळेत होत असते. बऱ्याचदा हा मार्ग गणेशोत्सव मंडळातून सुरू होतो.

गणेशोत्सवाला दोन महिने बाकी असतानाच ठिकठिकाणी गणेशमूर्ती कार्यशाळा उभारल्या जातात. शाळा सुटल्यावर आजही तासन्तास मुले त्या कार्यशाळेत रेंगाळताना दिसतात. ही परंपरा अगदी जुनी आहे. या बुद्धीच्या देवतेचे तरुणाईला आकर्षण भारीच. हीच आवड मग त्यांना मंडळापर्यंत घेऊन जाते आणि नवे जगच त्यांच्यापुढे खुले होते. मंडळ म्हणजे शिवराळ वाचा, अरेरावी, दंगा, बेशिस्ती ही चुकीची समजूत गेली कित्येक वर्षे आपल्या मनावर बिंबवली जाते आहे. एखादा कार्यकर्ता तसा असतोही, पण समाजात उभे राहून परिस्थितीशी दोन हात करताना कधी तरी अशा स्वभावाची व्यक्तीही आपल्याला हवीच असते की. नाना स्वभावाच्या, तऱ्हेच्या, जातीच्या, धर्माच्या माणसांनी भरलेले हे एक कुटुंबच असते. एकदा तुम्ही मंडळाचे झालात की मंडळ तुमचे होते. मग तुमच्या घरच्या कार्यालाही ही सगळी कार्यकर्ते मंडळी कंबर कसून काम करत असतात. एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांचा विचार करणे,  समुदायाने राहणे याचे आधी प्राथमिक शिक्षण सुरू होते.

एकदा आपण चार माणसांत राहू लागलो की मत मांडायची, बोलायची, अगदी भांडायचीही सवय होते. एकलकोंडी, कुणाशीही न बोलणारी, वाद-विवादापासून लांब राहणारी मुले मंडळात येऊन बोलू लागल्याचे अनेक किस्से प्रत्येक मंडळात दिसतील. अगदी त्या मुद्दय़ावरून त्यांची मस्करीही केली जाते. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे काम चालावे तसे या मंडळांचे काम चालते. पूर्वनियोजन, उत्सव आणि आवराआवर  या महत्त्वाच्या टप्प्यात सर्व कामे सुरू असतात. उत्सवासाठी लागणारा खर्च पाहून त्यानुसार वर्गणी, देणगीदार गाठले जातात. मूर्ती, मंडप, सजावट, रोषणाई, देखावे, वाजंत्री यांच्या भेटीगाठी घेऊन भावताव करत त्या मार्गी लावल्या जातात. तरीही शेवटच्या क्षणी बरेच काम अर्धवट राहिलेले असतेच. मग अशा वेळी कार्यकर्त्यांमधूनच कलाकार पुढे येतात. कुणी सुतार होऊन लाकडाला आकार देतो, तर कुणी इलेक्ट्रिशियन होऊन वायरीशी खेळू लागतो. कुणी रंगारी होतो, तर कुणी कला दिग्दर्शक. अगदी झाडलोट, केरवारा अशी बारीकसारीक कामेही सर्वाना करावी लागतात. इथे कोणतेही काम कमी प्रतीचे मानले जात नाही आणि कोणताही कार्यकर्ता कामापेक्षा मोठा मानला जात नाही.

एकदा आपण कार्यकर्ता म्हणून कसदार आणि अनुभवी झालो की एखाद्या मंत्रिमंडळाप्रमाणे विविध खाती आपल्याकडे दिली जातात.  इथले अध्यक्षपद ‘मुख्यमंत्री’ पद मिळण्याइतकेच सुखद असते. गृह खाते घेणारा मंडळाच्या, उत्सवाच्या सुरक्षेची, परवानग्या मिळवण्याची जबाबदारी पार पाडतो. महिला व बालकल्याण खाते घेणारा महिला मंडळाचे संघटन, हळदी-कुंकवाचे व्यवस्थापन, लहान मुलांच्या स्पर्धा असे सगळे उपक्रम राबवतो. मंडळात अर्थ खात्याची जबाबदारी घेणारा खजिनदार खऱ्या अर्थाने मंडळाचा डोलारा सांभाळत असतो. अगदी उत्सव होऊन गेला तरी झालेल्या खर्चाचे हिशोब, बाकी असलेल्या देणग्या, अहवाल, जमाखर्च या गोष्टी अगदी दिवाळी उजाडली तरी सुरू असतात.

हल्ली स्वत:च्या कामातून पाच मिनिटे वेळ काढतानाही लोक हजारदा विचार करतात, इथे तर काम, व्यवसाय, घरदार सांभाळून हे कार्यकर्ते मोठय़ा दिमाखात उत्सव करत असतात, रात्रीचा दिवस करून. वरकरणी उत्सव दहा दिवसांचा दिसत असला तरी त्याची सुरुवात विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच होत असते. विसर्जनानंतर महिनाभर सगळी आवराआवर करण्यात जातो. मंडळाचे साहित्य, रथ, टेबल, खुच्र्या सगळ्या जागच्या जागी ठेवल्या जातात. गणपती जिथे बसतो ती जागा स्वच्छ करून घेतली जाते. मग वेध लागतात ते पुढल्या वर्षीचे आणि पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात. विशेष म्हणजे केवळ उत्सव हे ध्येय कार्यकर्ता कधीच बाळगत नाही. सामाजिक बांधिलकी जोपासत हा उत्सव साजरा होत असतो. आज बहुतांशी मंडळे विविध सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहेत. आपल्या विभागातल्या, शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक संकटात ते मदतीसाठी उभे असतात. मग तो करोनाकाळ असो, दुष्काळ किंवा पूरस्थिती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ हा असा परीघ आहे तिथे बि-घडण्याची नाही तर घडण्याची प्रक्रिया होत असते.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation of ganesh festival mandals prepare to celebrate ganeshotsav zws
First published on: 03-09-2021 at 00:05 IST