तेजश्री गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेन्स वेअरचा मास्टर, असंख्य प्रकारच्या प्रिंट्सचा वापर करणारा, ग्राहकाला गार्मेट्सबरोबर संपूर्ण लुक देणारा म्हणून ओळखला जाणारा फॅशन डिझायनर म्हणजे अजय कुमार. स्वत:च्या कलेक्शनची नेहमीच दखल घ्यायला लावणारा अजय कुमार फॅशन इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्टर अजय कुमार’ म्हणून प्रसिद्ध आहे.

आपल्या आवडीच्या विषयात ठरवून, शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्या क्षेत्राचा गमभन करणारी आणि मग एकेक पायरी वर चढत आपली ओळख निर्माण करणारी अशी काही प्रतिभावान मंडळी असतात. फॅशनविश्वात अशापद्धतीने आपला ठसा उमटवणारा डिझायनर अजय कुमार हाही या प्रतिभावंतांपैकी एक म्हणायला हवा. अजयने शास्त्रशुद्ध पद्धतीने फॅशनचा अभ्यास केला आहे. कॉलेजमध्ये फॅशनचे धडे गिरवत असतानाच त्याला‘मोस्ट प्रॅक्टिकल मेन्सवेअर कलेक्शन अवॉर्ड’ मिळाला होता. त्यानंतर तर अशा अनेक पुरस्कारांची रांगच त्याच्याकडे लागली होती. पदवीधर झाल्यावर त्याने युनिस्टाइल इमेजेस, ब्लॅकबेरी, इंडिगो नेशन, रीड अँड टेलर, आणि शेवटी ‘हेड ऑफ डिझाइन’ या पदावर पीटर इंग्लंड सारख्या प्रतिष्ठित मॅन्सवेअर ब्रँडसाठी काम के ले. पुरेसा अनुभव गोळा केल्यानंतर आपली वेगळी वाट निर्माण करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला..

२०१४ मध्ये अजयने नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने त्याच्या नावाला स्वतंत्र ओळख मिळाली. या प्रवासाविषयी अजय सांगतो, ‘मी चार वर्षांपूर्वी लक्मे फॅशन वीकमध्ये ‘जेन नेक्ट डिझायनर’ म्हणून लाँच झालो होतो. तेव्हापासून ते आताच्या क्षणापर्यंतचा प्रवास खूप सुंदर आहे. मी आपल्या देशात तर कलेक्शन सादर करतोच पण चीन, श्रीलंका अशा देशांमध्येही कलेक्शन सादर केलं आहे’. अजय मेन्स वेअरसाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्याहूनही त्याच्या गार्मेट्सवरील प्रिंट्ससाठी तो जास्त प्रसिद्ध आहे. आपण शक्यतो एका प्रिंटेड गार्मेंटवर दुसरं प्रिंटेड गार्मेंट घालत नाही. पण अजय कुमारने ‘प्रिंट ऑन प्रिंट’चा ट्रेण्ड सेट केला. याखेरीज मेन्स वेअरमध्ये प्रिंट्सचा वापर करण्याचा ट्रेण्ड सेट होण्याचे श्रेयही काही प्रमाणात अजयकडेच जाते. त्याच्या या प्रिंट्सच्या कल्पनेबद्दल तो म्हणतो, ‘माझा ब्रॅण्ड प्रस्थापित करताना असं काय करता येईल ज्यामुळे आपला ब्रॅण्ड ओळखला जाऊ  शकेल हा विचार मला सतत सतावत होता. हा भारतीय ब्रॅण्ड आहे त्यामुळे यात काहीतरी भारतीयच हवं हे माझ्या मनाशी पक्कं होतं, पण त्याच वेळी मला मॉडर्न पद्धतीने भारत दाखवायचा होता. मला स्वत:ला रंग, प्रिंट्स आधीपासून खूप आवडतात. रंग, प्रिंट्स ही अशी माध्यमं आहेत ज्यामुळे आपण सहज एक्स्प्रेस होऊ  शकतो. म्हणून मी प्रिंट्सलाच ब्रॅण्डचा यूएसपी बनवलं. माझ्या प्रत्येक कलेक्शनमध्ये भारतीय प्रिंट्सचा एक तरी भाग असतोच’. अजयने फक्त भारतीय प्रिंट्सच नाहीत तर भारतीय कपडे वापरून इंडो-वेस्टर्न लुक्स डिझाइन के ले आहेत.

‘आमच्या ब्रॅण्डअंतर्गत आम्ही  भारतीय कापड वापरतोच पण त्याचबरोबर ते कापड लोकल मार्के टमधून खरेदी करण्याकडे आमचा कटाक्ष असतो. यामागचं कारण म्हणजे तेव्हाच आपल्या लोकांना त्यातून आर्थिक फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बाहेरून मागवल्या जाणाऱ्या कापडावर होणारा अवाढव्य खर्चही वाचतो’, हेही तो मोकळेपणाने सांगतो. कलेक्शनसाठी प्रामुख्याने कॉटन, खादी असे भारतीय कापड वापरतो, पण नेहमी त्याला मॉर्डन टच द्यायचा आपला प्रयत्न असतो असे त्याने सांगितले. आमचे रंग, प्रिंट्स आणि कापड भारतीय ठेवून गार्मेटचे सिल्हाऊट्स वेस्टर्न पद्धतीने डिझाइन करत हा इंडो-वेस्टर्न लूक तयार करतो, असं तो म्हणतो. अजयला नुकताच ‘बेस्ट डिझायनर ऑफ द इअर’ हा अवॉर्ड चीनमध्ये मिळाला. त्याबद्दल तो म्हणतो, हा अनुभव खूपच सुंदर आणि कायम लक्षात राहील असा आहे. त्यांच्याकडून आमंत्रण आल्यावर मला खरंतर प्रश्न पडला होता की माझी निवड का झाली असेल? तेव्हा त्यांनी सागितलं की गार्मेट्स कितीही इंडो-वेस्टर्न असले तरी तुमच्या प्रिंट्स भारतीय आहेत. आणि आम्ही अशाच डिझायनरच्या शोधात आहोत जो भारतीय कल्चर मॉडर्न रूपाने प्रेझेंट करतो. भारतामधून मी फक्त एकटाच डिझायनर होतो ज्याला आमंत्रित करण्यात आलं होतं, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही.

अजय कुमारने डिझाइन केलेले कपडे अनेकदा ‘डेक्कन हेराल्ड’, ‘द हिंदू’ आणि ‘फ्रंट इंडिया’, ‘व्होग चायना’, ‘जीक्यू इंडिया’, ‘एले इंडिया’ यांसारख्या टॉप फॅशन मासिकांवरील कव्हर पेजवर झळकले आहेत. सलमान खान, फरहान अख्तर, आयुषमान खुराना, हृतिक रोशन, रोहित खंडेलवाल अशा अनेक सेलिब्रिटींसाठी त्याने कपडे डिझाइन केले आहेत. कपडे डिझाइन करता करता अजय शूज, स्टोल अशा अ‍ॅक्सेसरीजही डिझाइन करत ग्राहकाला संपूर्ण लुक देण्याचा प्रयत्न करतो आहे.  ‘मला माझ्या ग्राहकाने लुक कॅरी करण्यासाठी अजून दुसऱ्या कुठल्या कलेक्शनचा शोध घ्यावा असं वाटत नाही. माझा ब्रॅण्ड हा फक्त फॅशन नाही तोलाइफस्टाइल ब्रॅण्ड आहे. त्यामुळे याअंतर्गत संपूर्ण लुक समोरच्याला डिझाइन करून देता यावा हा माझा आग्रह आहे. त्यांना प्रत्येक प्रसंगात वापरता येतील अशा नानाविध गोष्टी आम्ही डिझाइन करतो. अनेकदा कपडे एकाकडून, शूज दुसऱ्याच शॉपमधून आणि बॅग किंवा इतर गोष्टी तिसऱ्याच कोणाकडून घेतल्या तर त्या फॅशनवर जो लुक अपेक्षित असतो तो पूर्ण फसण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा त्यामुळे गार्मेटचा संपूर्ण लुक डल दिसतो. म्हणून मी विचारपूर्वक संपूर्ण लुक माझ्या ग्राहकाला देतो. किंबहूना ती आजची गरज आहे’, असं तो म्हणतो.

आपल्या आजवरच्या अनुभवांवरून तो स्वत:वर, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या कामाशी बांधील राहा, असं ठामपणे सांगतो. ‘आजूबाजूला अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वेगळं करायला बघतात, पण अजिबात त्या गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका’, असा सल्ला तो देतो. त्याचबरोबर फॅशनच्याच क्षेत्रात नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला तुमचा यूएसपी शोधता आला पाहिजे, विकसित करता आला पाहिजे. तुमचा लुक, फील हा तुम्हीच निश्चित करायला हवा. तरच लोक तुमचा ब्रॅण्ड ओळखू लागतील. खूप काम करा आणि कोणत्याही बाबतीत तडजोड करू नका. ज्या क्षणी तुम्ही तडजोड कराल त्यावेळी तुम्ही तुमच्या कलेक्शनच्या आत्म्यासोबत तडजोड करताय हे लक्षात ठेवा’, असं तो अंमळ बजावून सांगतो.

फॅशनच्याच क्षेत्रात नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला तुमचा यूएसपी शोधता आला पाहिजे, विकसित करता आला पाहिजे. तुमचा लुक, फील हा तुम्हीच निश्चित करायला हवा. तरच लोक तुमचा ब्रॅण्ड ओळखू लागतील. खूप काम करा आणि कोणत्याही बाबतीत तडजोड करू  नका.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prince of prints the ajay kumar
First published on: 15-02-2019 at 01:18 IST