एकांकिकांच्या स्वरूपात आशय आणि तंत्रानुरूप होत गेलेले बदल आत्मसात करत एकांकिकांच्या मंचावर घट्ट पाय रोवून उभं राहण्याला तरुणाईने प्राधान्य दिलं आहे. एकांकिकांमधील तरुणाईचा सर्जनशील, वैचारिक सहभाग याचं प्रतिबिंब दाखवणारा आणि त्यांना कलाक्षेत्राच्या व्यावसायिक संधी खुली करून देणारा मंच म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा गेल्या काही वर्षांत नावारूपाला आली आहे. दरवर्षी या मंचावर येणाऱ्या नवनवीन कलाकारांसह लेखक – दिग्दर्शकांनी ही स्पर्धा एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवली आहे.

विविधांगी विषयांवरील सादरीकरण, भव्यदिव्य नेपथ्य, लक्षवेधी प्रकाशयोजना, वैशिष्टय़पूर्ण वेशभूषा व रंगभूषा आणि ‘अरे आवाज कुणाचा. . .’ या आरोळीने दणाणलेले नाटय़गृह अशा उत्साहपूर्ण वातावरणात राज्यात ठिकठिकाणी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सध्या सुरू आहे. ही स्पर्धा नेहमीच तरुण रंगकर्मीच्या प्रयत्नांना साथ देत सभोवताली घडणाऱ्या घडामोडींना वाचा फोडणारी ठरली आहे. शहरांसह विशेषत: ग्रामीण भागातील तरुण रंगकर्मीना या स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. गेली काही वर्ष सातत्याने लोकांकिकेमध्ये सहभागी झालेला छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी व लेखक – दिग्दर्शक रावबा गजमल सांगतो ‘एक लेखक व दिग्दर्शक म्हणून स्वत:ला आजमावण्याचा प्रयत्न मी  ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून केला. लोभीपणा आणि पोटाची भूक माणसाला कोणत्याही थराला  घेऊन जाऊ शकते याची जाणीव करून देणारी ‘म्हसणातलं सोनं’ आणि जंगलतोड व जंगल अतिक्रमणावर आधारित ‘भक्षक’ या एकांकिका मी सुरुवातीच्या काळात सादर केल्या. शहरी भागातील खर्चीक एकांकिकांच्या गर्दीत ग्रामीण भागातील एकांकिका टिकणार नाहीत असं मनोमन वाटत होतं, पण एकांकिका झाल्यानंतर त्यावर चर्चा, समीक्षण झालं. परिपूर्ण एकांकिका असा विशेष उल्लेख करत प्रेक्षकांसह परीक्षकांनी कौतुक केले आणि तेव्हा जाणवलं की ‘लोकसत्ता’ आपल्या प्रयत्नांना साथ देत असून ग्रामीण भागातील तरुण रंगकर्मीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आजवर या स्पर्धेमध्ये चांगल्याच एकांकिका सादर झाल्या आहेत. नामांकित लेखकांच्या कथांवर आधारित, शाब्दिक पठडीतील एकांकिका सुरुवातीला जास्त पाहायला मिळाल्या. कालांतराने शाब्दिकतेऐवजी दृश्यात्मकता, घटनात्मक व वातावरण निर्मिती साधणाऱ्या एकांकिका सादर होऊ लागल्या. त्यानंतर एकंदरीत काल्पनिक व वास्तववादी विषयांवर आधारित एकांकिकांकडे कल वाढला’.  आशयघन एकांकिकांमुळे लेखकांबरोबरच दिग्दर्शकही मजबूत झाले. शिवाय, ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचा प्रेक्षकवर्ग हा संपूर्ण महाराष्ट्रातील असल्यामुळे लोकांकिकेच्या मंचावर सादरीकरण केल्यावर आपली एकांकिका ही क्षणार्धात राज्यभर पोहोचते, असंही रावबाने सांगितलं.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
MHADA Lottery 20 percent of house price given MHADA housing scheme Maharashtra government
२० टक्क्यांतील घरांच्या वाढीव किमतीवर नियंत्रण! प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

तरुणाईची कल्पकता व दमदार कौशल्याने भरलेल्या या स्पर्धेने आजवर अनेक कलाकारांसह लेखक – दिग्दर्शकही घडवले आणि त्यांच्यासाठी कला क्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून नाटय़क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कल्पनाशक्तीला जोर देत निरनिराळय़ा विषयांवर एकांकिका लिहिल्या व दिग्दर्शितही केल्या. या नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्रेक्षकांसह परीक्षकांनीही दाद दिली. याविषयी लेखक चैतन्य सरदेशपांडे सांगतो ‘सध्या चांगले लेखक असणं ही मनोरंजनसृष्टीची गरज बनली आहे. लोकांकिका या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले लेखक घडत असून ही स्पर्धा त्यांना प्रोत्साहन देते आहे. सध्याच्या घडीला आशयघन संहितांवर आधारित एकांकिका जास्त असून मांडण्याची पद्धतही खूपच बदलते आहे. जगाकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलत चालला असल्यामुळे चांगले विषय हे एकांकिकांमधून मांडले जात आहेत. एकांकिका क्षेत्र हे विस्तृत असल्यामुळे कोणताही लेखक मांडणीच्या बाबतीत आखडता हात घेत नाही. चांगला आशय पाहायला आणि सादर करायला मिळत असल्यामुळे एकांकिका क्षेत्राकडे तरुणाई मोठय़ा प्रमाणात आकर्षित होते आहे’. तुम्ही आशय किती प्रामाणिकपणे मांडता त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, असंही चैतन्य सांगतो. ‘चाळ संस्कृतीच्या पॅटर्नमधील एकांकिकाही वेगळय़ा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर एकच एकांकिका ही हृदयस्पर्शी आणि विनोदी अशा दोन्ही स्वरूपात मांडली जात आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन असल्यामुळे विद्यार्थिदशेतील २० ते २२ वर्षांचे नवोदित लेखक स्वत: एकांकिका लिहू लागले आहेत ही सुखावह बाब असून त्यांचे भविष्य उज्वल आहे’ असेही त्याने सांगितले.  

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेत दिग्दर्शनही वेगळय़ा धाटणीचे पाहायला मिळते. काही एकांकिकांचे विषय हे यापूर्वी हाताळलेले असतात, परंतु तरीही त्या एकांकिकांची अनोखी मांडणी ही लक्षवेधी ठरते. लेखक – दिग्दर्शक अजय पाटीलच्या मते एकांकिकांचे बरेचसे विषय हे नातेसंबंध, चाळसंस्कृती व त्यामधील गोष्टी, जातीभेद – धर्मभेद, पाणी आदी ठरावीक गोष्टींवर आधारित असतात, पण सध्याच्या घडीला या गोष्टी समाजात पुन्हा अनुभवायला मिळत असल्यामुळे ते विषय मांडले जात आहेत. विषय जुना असला तरी नव्या पद्धतीने केलेले सादरीकरण हे महत्त्वपूर्ण ठरते. ‘एक दिग्दर्शक म्हणून मला सर्वच प्रकारातील एकांकिका पाहायला आवडतात, एकाच प्रकारामध्ये अडकू नये असे मला वाटते. एकांकिकेतील संदेश हा नेहमीच गांभीर्याने पोहोचवण्यापेक्षा हलक्या – फुलक्या पद्धतीने पोहोचवला तरी तो भावतो. प्रेक्षकांना ‘गिमिक्स’ आवडतं, पण दिग्दर्शकाने एखाद्या व्यक्तिरेखेवर घेतलेली मेहनतही महत्त्वाची असते. मी २०१६ पासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होत असून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एक लेखक – दिग्दर्शक म्हणून मी या स्पर्धेतून घडत गेलो’ असे अजयने सांगितले.

नवोदित कलाकारांच्या प्रयत्नांना आत्मविश्वासाचे पाठबळ देऊन ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आजवर दर्जेदार लेखक – दिग्दर्शक घडवले. या स्पर्धेत वैविध्यपूर्ण आशयांवर आधारित एकांकिकांची केलेली अनोखी मांडणी नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे यंदा आशयाच्या दृष्टीने व तांत्रिकदृष्टय़ा लोकांकिकाच्या मंचावर कसे अनोखे प्रयोग केले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संहिता निवडताना विचार करणे गरजेचे. . .

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत असते. राज्याच्या विविध भागातील निरनिराळय़ा भाषेतील एकांकिका या मंचावर सादर होत असतात. संबंधित भागात भेडसावणारे प्रश्न स्थानिक भाषेत मांडले जातात. नाटकासह भाषा, कला व संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. दिग्दर्शक रणजित पाटील म्हणतात की, ‘शहरी भागांत खूप साऱ्या एकांकिका स्पर्धा होतात, परंतु ग्रामीण भागातील कलाकारांना लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेच्या माध्यमातून वाव मिळतो. मी २००० पासून एकांकिका करतो आहे. काळानुसार निश्चितच एकांकिका क्षेत्रात बदल घडत गेले. तांत्रिकदृष्टय़ा सशक्तपणा आला आहे. नेपथ्य, प्रकाशयोजनेत नवीन प्रयोग होत आहेत. भरपूर नेपथ्य लावूनही चांगल्या एकांकिका सादर होत आहेत. सध्याच्या पिढीकडे कौशल्य, कोणतीही गोष्ट आत्मसात करण्याची शक्ती अधिक आहे, पण संयम नाही आहे. एकांकिकेसाठी वेळ देणे गरजेचे आहे. पूर्वीपेक्षा आताची पिढी एकांकिकेची मांडणी उत्तम करते आहे. सध्या सर्व गोष्टी चटकन उपलब्ध होत आहेत, त्यामुळे वाचन कमी झाले आहे. मराठी साहित्य वाचणे, नाटक पाहणे आवश्यक आहे. उत्तम संहिता निवडताना दहा वेळा विचार करावा, आपला समूह आणि समूहातील कलाकारांना साजेशी संहिता निवडावी, ते सध्या होत नाही.’

viva@expressindia.com