मी आता जॉब करत आहे. मला लहानपणापासूनच खूप आणि चटकन राग येतो. जर मला खोटं ठरवलं तर जास्तच. मग मी पाहत नाही कोण आहे, कुठे आहे. कधी कधी माझं नुकसान होतं, पण समोरचा जर चिडण्यासारखा वागत असेल तर काय करणार? मी बसने प्रवास करते आणि रोज काही ना काही होत असतं. कंडक्टर, प्रवासी कधी कधी राग येण्यासारखं वागतात, बोलतात. मग अशा लोकांना का सहन करायचं? मला या सगळ्याचा मानसिक त्रास होतो. मी बोलले, तर मी खूप आगाऊ आहे असं वाटतं पण लोकच तसे वागतात, त्याला मी काय करू?
-प्रियांका

हाय प्रियांका, तुझा सात्त्विक संताप तुझ्या शब्दाशब्दातून व्यक्त होतोय. तसा तुझा दिवस स्ट्रेसफुल असणार. रोजचा बसनं प्रवास हीच एक परीक्षा बघणारी गोष्ट असते. त्यातून जॉब. तू सांगतेस त्या मूळच्या रागीट स्वभावासाठी आगीत तेल.
या रागाचीसुद्धा गंमत असते. असून अडचण, नसून खोळंबा. राग येत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्याबद्दल गिल्टी वाटून घेण्याचं कारण नाही. प्रमाणात राग आवश्यक असतो. तो नसेल तर कशाचंच काही वाटणार नाही, सगळं आहे तसं स्वीकारलं जाईल. स्वसंरक्षणासाठीही तो जरुरी असतो. राग या भावनेपेक्षाही तो हाताळला कसा जातो यावर सगळं अवलंबून असतं. एका महान तत्त्ववेत्त्यानं म्हटलंय, की रागावणं सोपं आहे, पण कुणावर, कधी, किती आणि कसं रागवावं हे समजणं मात्र अवघड आहे. प्रमाणाबाहेर आणि चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झालेल्या रागामुळे छातीत धडधड होणं, ब्लडप्रेशर वाढणं, हातपाय थरथरणं अशी शारीरिक लक्षणं दिसून येतात. शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच. आपला सगळा दिवस खराब जातो. तुझ्या मेलमध्येही तू तुझं नुकसान होतं, मानसिक त्रास होतो असंच लिहिलंयस, त्यातून काही फायदा झाल्याचं नाही. संतापून हेच हाती लागणार असेल तर काय उपयोग?
संताप आपल्या रिलेशनशिप्सना आणि क्वालिटी ऑफ लाइफला हानीकारक असतो. तू काही दिवसांनी कदाचित तुझ्या आयुष्याच्या एका नव्या फेजमध्ये प्रवेश करशील, लग्न करून नवी नाती जोडशील. अशा वेळी हा संताप आवरणं तुला फारच जरुरीचं वाटायला लागेल.
राग आल्यानंतर पश्चात्ताप होत असेल तर रागावर आपलं नियंत्रण असण्याऐवजी तो रागच आपल्याला कंट्रोल करतोय हे निश्चित. अँगर मॅनेजमेंटविषयी तुला अनेक ठिकाणांहून हवी तितकी माहिती मिळेल. पण काही बेसिक नियम लक्षात ठेवलेस तर तुला हा जो हताशपणा येतोय तो नक्की कमी होईल. रागाचे काही वॉर्निग सिग्नल्स ओळखायला शिकलं पाहिजे.
राग का आला, कसा आला याचा विचार करत बसण्याऐवजी आपला फोकस रागाच्या कारणांपासून दूर नेऊन ती परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याकडे वळवला पाहिजे. मला हवं तसंच लोकांनी वागलं पाहिजे, तसं ते वागले नाहीत तर ती फार भयंकर गोष्ट आहे असे टोकाचे निष्कर्ष जेव्हा आपण काढतो तेव्हा खूप चीड येते. पण खरं बघायला गेलं तर दुसऱ्यांच्या वागण्यावर आपलं नियंत्रण नसतं. आपण नियंत्रण फक्त आपल्या प्रतिक्रियेवर ठेवू शकतो.
रिअ‍ॅक्ट करण्याऐवजी रिस्पॉण्ड करणं म्हणजे ताबडतोब काही तरी न बोलता थोडय़ा वेळानं, विचार करून बोलणं असं रेकमेण्ड केलं गेलंय. कारण रिअ‍ॅक्ट करतो तेव्हा आपल्या बोलण्यावर, त्यातल्या शब्दांवर आणि ते शब्द बोलण्याच्या पद्धतीवर आपला कंट्रोल राहत नाही. दुसऱ्याला अनेकदा आपण दुखावून बसतो. मग भले आपला तो उद्देश नसेलही. आणि म्हणतात ना, बाण जिथून सुटतो तिथं काही खूण राहत नाही पण जिथे जाऊन लागतो तिथे मात्र जखम होते.
तुला परिस्थितीचा, लोकांच्या वागण्याचा राग येतो ना, मग त्यासाठी असं काही तरी कर की ज्यामुळे त्यात बदल घडेल. नुसतीच चिडचिड करून स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा हे बरं. उदा. बसमध्ये कंडक्टरच्या बोलण्याचा तुला राग येतो, कंडक्टर कशावरून बोलतो? सुट्टय़ा पैशांवरून, कधी पास आणला नाही म्हणून वगैरे? त्याच्या बोलण्याला व्हॅलिड रीझन असेलही. गर्दीच्या वेळी जवळ सुट्टे पैसे ठेवणं, कधी कधी वैताग आला तर विनोदाचा आधार घेणं, फारसं मनावर न घेणं असं काही तुला करता येईल. खोल श्वास घेणं, तोंडातून शब्द बाहेर येण्याआधी एक पॉझ घेणं किंवा दहापर्यंत आकडे मोजणं, त्या परिस्थितीपासून थोडा वेळ दूर जाणं यांचाही उपयोग होतो. व्यायाम केल्यानंही मनात साचलेलं फ्रस्ट्रेशन वाहून जातं. आणखी एक करण्यासारखी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना डायरी लिहून त्या-त्या दिवसाचा आढावा घ्यायचा म्हणजे कुठल्या पाइंटला अ‍ॅक्ट केल्यानं रागावणं टाळता आलं असतं ते कळेल.
राग कितीही अनअव्हॉडेबल असला तरी तो एखाद्या पाळीव प्राण्यासारखा मॅनेज करून चॅनलाइज केला तरच उपयुक्त ठरतो.Anger is a feeling that makes your mouth work faster than your mind.

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.