साडी हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. साडी अजिबात न आवडणाऱ्या स्त्रिया क्वचितच सापडतील. कालांतराने आता साडी नेसायची सवय कमी झाली आहे, परंतु आजही तरुणीसुद्धा अगदी हौशीने साड्या नेसतात. भारतात पारंपरिक साडीत इतके अप्रतिम प्रकार आहेत की प्रत्येक काळातली साडी हा एक वेगळा अभ्यास ठरेल. त्यामुळे सहज प्रेमात पडतील अशा साड्या समोर असताना त्याविषयीचं प्रेम खचितच कमी झालेलं नाही. साडी नेसायला वेळ नाही ही तक्रार मात्र वाढते आहे, त्यावरही ‘रेडी’मेड साडीच्या रूपात फॅशनेबल उत्तर मिळालं आहे.

पूर्वी साडी हा प्रकार भरजरी, शाही, काठपदरी अशाच पद्धतीने पाहायला मिळायचा, परंतु आता अगदी सहज, विशेषत: ऑफिसवेअर साड्या जास्त प्रचलित होत आहेत. पूर्वीपासून महाराष्ट्र व त्याच्या बाहेरच्या साड्यांचे प्रकार म्हणजे नारायण पेठ, बनारसी सिल्क शालू, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, साऊथ सिल्क, गज्जी सिल्क, शाही पैठणी या साड्या लोकप्रिय आहेत, सध्या या साड्यांबरोबरच सहज नेसता येतील अशा हलक्या कॉटन, राजस्थानी बांधणी, प्युअर सिल्क, साऊथ कॉटन, शिफॉन, पार्टीवेअर साड्या भरपूर ट्रेंडी आहेत.

साडी ही फक्त स्त्रियांची ओळख न राहता, एक स्टाइल स्टेटमेंट झालं आहे. त्यामुळे साडी स्त्रियांच्या आवडीची नक्कीच आहे, परंतु साडी नेसायला आणि नंतर तयार व्हायला लागणारा वेळ यामुळे ती वारंवार सहजतेने नेसली जाऊ शकत नाही, अशी तक्रार असते.

तरुण पिढी कुठल्याच गोष्टीत मागे पडत नाही त्यामुळे या समस्येवरही युनिक सोल्युशन त्यांनी शोधून काढलं आहे ते म्हणजे रेडीमेड १ मिनिट साडीचं. खरंतर हा ट्रेंड सध्या भरपूर लोकप्रिय आहे. मात्र अजूनही रेडीमेड साडी नेहमीच्या साड्यांसारखी चापूनचोपून बसते का? अशा साडीसाठी साइझचा विचार करावा लागतो का? ब्लाउजचे पॅटर्न कसे शोधायचे असे अनेक प्रश्न अनेकींच्या मनात असतात. त्यामुळे हा ट्रेंड नेमका काय आहे आणि नक्की उपयोगाचा आहे का ते पाहूया.

रेडीमेड साडी म्हणजे अगदी शब्दश: जी नेसायला लागत नाही अशी साडी. जिथे आपण साडी आत खोचतो, तिथे रेडीमेड साडीला पॅन्टसारखे बक्कल असतात. आणि हे बक्कल ५ एक्सएल साइझपर्यंत उपलब्ध आहेत, त्यामुळे साइझचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या नेहमीच्या नेसायच्या साड्याच अशा पद्धतीने रेडीमेड शिवून मिळतात. त्यामुळे तुमच्या आवडीची आणि साइझची साडी सहज निवडता येते. हे बक्कल लावलं की त्यातच साडीच्या निऱ्या बसतात. म्हणूनच ही साडी सोप्पी कारण मुख्य निऱ्या बसवण्याचं काम अगदी १ सेकंदात होतं. फक्त पदर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने नीट पिन-अप केला की साडी नेसून तयार. ब्लाउजचं म्हणाल तर आपल्या नेहमीच्या साडीसारखंच या साडीचंही ब्लाउजचं कापड काढून घेऊन त्याचा ब्लाउज शिवून मिळतो.

रेडीमेड साडी हा कुठलाही वेगळा स्वतंत्र प्रकार नाही. तुम्ही कुठलीही हवी ती साधी साडी अशा पद्धतीने रेडीमेड बनवून घेऊ शकता. ही साडी ड्रेप झाल्यावर अगदी ओरिजिनल नेसलेल्या साडीसारखी दिसते. घरातल्या एखाद्या समारंभासाठी ते अगदी लग्नासाठीसुद्धा तुम्ही अशी साडी परिधान करू शकता. ऑफिसवेअर म्हणून तर ही साडी अगदी बेस्ट पर्याय आहे.

रेडीमेड साडी वापरताना काय काळजी घ्याल:

● साडीचे कापड तुमची आवड आणि गरजेप्रमाणे निवडा. शिफॉन, जॉर्जेटसारख्या पातळ साड्यांसाठी आत पेटीकोट घातला तर त्या साड्या व्यवस्थित बसतील.

● जाड कापडाच्या आणि भरजरी रेडीमेड साड्यांना स्वतंत्रपणे पेटीकोट वापरावा लागत नाही, अशा साड्यांना अस्तरासारखा पेटीकोट असतो.

● या साड्या शिवलेल्या असल्याने आत टाइट लेगिंग्स घातली तरी चालू शकते. आजकाल इलॅस्टिक शेपवेअर मिळतात त्याचाही उपयोग होऊ शकतो.

● आपल्या नेहमीच्या साड्यांसारखाच भरजरी साड्यांचा पदर छान प्लेट्स काढून लावला तर छान दिसतो. तसंच शिफॉनसारख्या हलक्या साड्यांचे पदर सोडले तर अधिक खुलून दिसतील.

● रेडीमेड साड्यांमध्ये काही साड्या अटॅच्ड ब्लाउजसहित येतात. म्हणजे अगदी कोटासारखे ब्लाउज चढवायचे आणि खाली निऱ्यांचा भाग पिन-अप करून पदर लावायचा. ही पूर्ण रेडीमेड साडी असल्याने त्यात वेगळा ब्लाउज घेण्याची गरज भासत नाही.

● या साड्यांमध्ये तसा साइझचा प्रश्न येत नाही, परंतु तुम्हाला परफेक्ट साइझ हवीच असेल तर आपण पंजाबी ड्रेसच्या पॅन्टसाठी किंवा जीन्ससाठी जसं माप घेतो तसं माप घेता येईल.

● काही ठिकाणी तुम्हाला रेडीमेड साड्या लगेच तासा – दोन तासांत शिवून मिळतात, काही ठिकाणी तुम्हाला त्याची ऑर्डर द्यावी लागते.

तरुण पिढीवर आणि सोपी पण स्टायलिश वेशभूषा पसंत करणाऱ्या स्त्रियांवर या साड्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या भारतीय पारंपरिक पोशाखांच्या बाजारपेठेत रेडीमेड साड्यांची मागणी वाढते आहे. दरवर्षी सुमारे साडेबारा टक्क्यांनी या साड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. विशेषत: शहरी भागात या साड्यांना खूप मागणी आहे. पारंपरिक लुक आणि नेसण्यास सुलभ या दोन गोष्टींमुळे तरुणींमध्येही रेडीमेड साड्यांचा प्रकार अधिक लोकप्रिय होत आहे. सध्या डिझायनर्स साडी-गाऊन हायब्रिड्स आणि वन-मिनिट साड्यांसारख्या नव्या ट्रेंडवर काम करत आहेत. त्यामुळे पारंपरिक लुकला मॉडर्न टच देणाऱ्या रेडीमेड साड्यांचेही वेगळे नवे पर्याय बाजारात उपलब्ध होत आहेत. यातही पर्यावरणपूरक फॅब्रिक आणि रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनवलेल्या साड्यांची मागणी वाढते आहे.

रेडीमेड साड्या नेसण्यासाठी सोप्या असल्यामुळे अनेक महिला त्यांची निवड करतात. विशेषत: ज्या महिलांना पारंपरिक साडी नेसणे अवघड जाते, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय, अनेक प्रकारच्या डिझाइन्स, फॅब्रिक्स आणि स्टाइल्स उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार साडी निवडण्याचा चांगला पर्याय मिळतो. त्याचबरोबर फिटिंग आणि कम्फर्ट दोन्ही गोष्टींसाठी या साड्यांना पसंती दिली जाते. या साड्यांमध्ये निऱ्या आणि पदर आधीच शिवलेला असल्याने त्यासाठीही फार मेहनत करावी लागत नाही.

रेडीमेड साडी हा एक असा ट्रेंड आहे, जो पारंपरिकता आणि आधुनिकतेच्या मिश्रणातून तयार झाला आहे. सहज नेसता येणाऱ्या, तरीही आकर्षक दिसणाऱ्या या साड्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. भविष्यात डिझायनर्स आणि ब्रँड्स अधिक नावीन्यपूर्ण डिझाइन्स रेडीमेड साड्यांमध्ये आणतील, ज्यामुळे भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही रेडीमेड साड्यांची लोकप्रियता वाढणार यात शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com