मी १९ वर्षांचा आहे, थर्ड ईयर इंजिनीयिरगला. माझी मैत्रीण सध्या बारावीत आहे. ती माझी फॅमिली फ्रेण्ड आहे, पण रिलेशनमध्ये मी तिचा काका लागतो. आम्ही बेस्ट फ्रेण्ड्स आहोत हे तिनंपण अ‍ॅक्सेप्ट केलं आहे. आमच्या आई-बाबांना माहीत आहे आम्ही बोलतो ते. मी प्रपोज करण्याआधीच तिनं मला प्रपोज केलं. मी ‘हो’पण म्हणालो. डाऊट असा आहे की काका-पुतणीचं रिलेशन बरोबर आहे की चुकीचं आहे? मी ही रिलेशनशिप पुढे कंटिन्यू करू शकतो ना? भविष्यात काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? प्लीज हेल्प.आदित्य
हॅलो आदित्य,
थोडय़ाच दिवसात तू टीनएजला रामराम करशील. अ‍ॅक्च्युअल प्रौढ जबाबदाऱ्या हळूहळू तुझ्याकडे चालत येतील. लग्न ही त्यातलीच एक समाजमान्य जबाबदारी. लग्न म्हटलं की त्यात एकाहून अधिक व्यक्तींचा, दोन कुटुंबांचा सहभाग असतो. भविष्यात त्यात आणखी काही जणांची भर पडणार असते. इन फॅक्ट, स्थिर समाजाचं एकक म्हणून लग्नसंस्था, कुटुंबसंस्था उदयाला आली. तू विचारलेला प्रश्न तुमची रिलेशनशिप पक्की करण्याआधी तुला पडला आणि तू तो विचारायचं धाडस केलंस, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे.
तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला तुला काही वैद्यकीय फॅक्ट्स सांगायला लागतील. नात्यातल्या लग्नांचा सर्वात मोठा परिणाम होणाऱ्या बाळावर होतो. बाळ तयार होण्यासाठी एक स्त्रीबीज आणि एक पुरुषबीज एकत्र यायला लागतात. त्यामुळे होणाऱ्या बाळामधल्या जीन्सच्या दोन सेट्समधली निम्मी जनुकं/जीन्स आईकडून तर निम्मी वडिलांकडून येतात. प्रकट होणाऱ्या निरनिराळ्या कॅरॅक्टरिस्टिक्स या जीन्सवर अवलंबून असतात. जनुकांमध्ये जसे अनेक गुण असतात तसेच अनेक दोषही असतात. अनेक दोष हे सुप्तावस्थेत असतात, म्हणजे जोडीच्या चांगल्या जीन्समुळे ते दबून राहतात. जेव्हा नात्यात लग्नं होतात, तेव्हा जीन्सचे दोन्ही सेट्स दोषी असण्याची शक्यता साहजिकच वाढते. कारण नात्यातल्या लोकांमधले जीन्स एकसारखे असतात. अशा वेळी होणाऱ्या बाळामध्ये जन्मजात दोष, मतिमंदत्व किंवा व्यंग येऊ शकतं. जितकं नातं जास्त जवळचं तितका धोका अधिक. हे टाळण्यासाठी नात्यात लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. आमच्याकडे जर एखादे जन्मजात व्यंग असलेलं बाळ आलं तर आम्ही पहिला प्रश्न विचारतो, तो म्हणजे लग्न नात्यात आहे का?
पूर्वीच्या काळी ही शास्त्रीय कारणं माहीत नसतानाही सगोत्र विवाह, म्हणजे एका गोत्रातले विवाह निषिद्ध मानले जात. कारण एकाच गोत्रातल्या लोकांमधले जीन्स एकसारखे असण्याची शक्यता किती तरी पटीनं वाढते. काही विशिष्ट समाजांमध्ये जन्मजात व्यंगांचं आणि मतिमंदत्वाचं प्रमाण जास्त दिसून येतं. कारण त्यांच्या नियमाप्रमाणे समाजाबाहेर लग्न करायला बंदी असते आणि म्हणून त्याच-त्याच कुटुंबांमध्ये सोयरीक होत राहते. तर काही समाजांमध्ये मामा-भाची किंवा आत्याच्या मुलीशी लग्न करायची मोकळीक देतात, कारण त्यांचं गोत्र वेगवेगळं असतं. पण तरीही त्यांच्यामधली अनेक जीन्स सेम असतात. त्यामुळे काही लग्नांच्या बाबतीत एक प्रश्नचिन्हच आहे. तुझ्या बाबतीत हे सगळं कुठपर्यंत लागू होईल, की होणार नाही माहीत नाही, कारण तुमचं नातं किती जवळचं/सख्खं आहे हे तू स्पेसिफाय केलेलं नाहीस. तू तिलाही या सगळ्या फॅक्ट्सविषयी सांग. कदाचित तिला यातली काहीच कल्पना नसेल. मगच पुढचा काही निर्णय घ्या. एखाद्या वैद्यकीय तज्ज्ञाशी प्रत्यक्ष चर्चा करणं अधिक उपयोगाचं होईल. शिवाय मला नेहमी असं वाटतं की पती किंवा पत्नी बनवण्यासाठी अनेक मुला-मुलींचे पर्याय उपलब्ध असतात. पण आई, बहीण, कझिन, मावशी, शिक्षक इतकंच नव्हे तर खरी मैत्रीण अशा अनेक भूमिकांमध्ये फक्त काही ठरावीक व्यक्तीच बसू शकतात, त्यासाठी ऑप्शन्स नसतात. मग या भूमिकांची एकमेकांत गल्लत कशाला करायची? एखादी मुलगी चांगली मैत्रीण झाली की लगेच तिला प्रपोजच करायला हवं असं नाही. कारण प्रपोज करणं म्हणजे प्रमोशन देणं नव्हे, हो की नाही?
what counts in making a happy marriage is not so much how compatible you are, but how you deal with incompatibility.- George Levinger

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship with relations
First published on: 04-07-2014 at 04:27 IST