scorecardresearch

अवकाशाशी जडले नाते : ये अंतरिक्ष नहीं आसाँ

अंतराळात अंतराळवीर म्हणून जाणं हे प्रत्येक खगोलप्रेमीचं स्वप्न असतं, पण अंतराळात जाणं, तिथं राहणं आणि परत येणं हे वाटतं तितकं सोपं नाही.

viva3 space
अवकाशाशी जडले नाते : ये अंतरिक्ष नहीं आसाँ

विनय जोशी

अंतराळात अंतराळवीर म्हणून जाणं हे प्रत्येक खगोलप्रेमीचं स्वप्न असतं, पण अंतराळात जाणं, तिथं राहणं आणि परत येणं हे वाटतं तितकं सोपं नाही. अंतराळात वातावरणाचा अभाव, घातक रेडिएशन, शून्यवत गुरुत्वाकर्षण अशी प्रतिकूल परिस्थिती असते. याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम मानवी शरीरावर होतो.

‘‘तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे?’’ या बालपणीच्या फेमस प्रश्नाला दहापैकी सहा जणांचं उत्तर ‘अ‍ॅस्ट्रोनॉट’ असं असेल. कदाचित गूढ अंतराळाचं आणि अंतराळवीरांच्या ‘स्वॅग’चं आकर्षण हे यामागचं कारण असावं. पुढे भलेही इंजिनीअर, डॉक्टर असा धोपटमार्ग चोखाळला तरी एखादा साय-फाय मूव्ही पाहिला की मनातली ही सुप्त इच्छा नक्कीच जागी होते. पण अंतराळात जाणं, तिथं राहणं आणि सुखरूप परत येणं हे वाटतं तितकं सोपं नाही. अंतराळात झेपावताना सहन कराव्या लागणाऱ्या प्रचंड रेटय़ापासून तर पृथ्वीच्या वातावरणात परत येताना होणाऱ्या घर्षण आणि उष्णतेपर्यंत अंतराळवीरांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. वर्षांनुवर्ष पृथ्वीवर राहिल्याने मानवी शरीर पृथ्वीवर राहण्यास अनुकूल बनलं आहे. अंतराळात गेल्यावर हे अनुकूलन गडबडतं. अंतराळात हवा नाही, पाणी नाही, सृष्टिसौंदर्य तर अजिबातच नाही. सभोवताली पसरलेला अंधार, घातक किरणोत्सार, निर्वातावस्था, शून्यवत गुरुत्वाकर्षण अशा अनेक समस्या तिथं आहेत.

अंतराळात वातावरण आणि ऑक्सिजनचा अभाव आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनशिवाय जगणं निव्वळ अशक्य आहे, पण फक्त ऑक्सिजन पुरवून भागणार नाही. भूपृष्ठावर वातावरणाचा दाब १०१ किलो पास्कल असतो. अंतराळात हा दाब जवळपास शून्य होतो. अशा निर्वात स्थितीत एका सेकंदाच्या आत फुप्फुसातील हवा बाहेर निघून जाईल. शरीरातल्या वेगवेगळय़ा द्रवांमध्ये विरघळलेले वायू स्नायूंना बाजूला सारत प्रसरण पावतील. रक्तातल्या ऑक्सिजनचे बुडबुडे तयार होतील. वातावरणीय दाबाच्या अभावाने शरीरातील पाणी उकळू लागेल. आणि शरीर हवा भरलेल्या फुग्यासारखे फुगेल. १९६५ मध्ये नासाच्या प्रयोगशाळेत कृत्रिम निर्वात कक्षात जिम ले ब्लांक यांच्यावर परीक्षण चालू होते. त्या वेळी अपघाताने त्यांचा स्पेससूट निकामी झाला. १५ सेकंदांत स्थिती नियंत्रणात आणून ब्लांक यांना वाचवण्यात आलं. अंतराळात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचं सुरक्षा कवच नाही. त्यामुळे सूर्यापासून निर्माण होणारी अतिनील किरणं, सौरवात, कॉस्मिक किरणं यांचा मोठा धोका आहे. अशा किरणोत्सर्गाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कॅन्सर होऊ शकतो. याव्यतिरिक्त अशनींशी व उल्कांशी टक्कर होण्याचा धोकादेखील आहेच. वातावरणाच्या अभावामुळे तिथं तापमानात प्रचंड तफावत जाणवते. सूर्यप्रकाशात तापमान १२० अंश सेल्सियसपर्यंत तर सावलीत -१२७ अंश सेल्सियसपेक्षाही खाली जाऊ शकते. 

हे सगळे धोके लक्षात घेऊन स्पेस स्टेशनची रचना केली जाते. याच्या आत वेगवेगळय़ा जीवनरक्षक सिस्टीमद्वारे योग्य दाब, ऑक्सिजनचा पुरवठा, योग्य तापमान, आद्र्रता राखत अनुकूल वातावरण बनवलं जातं. तरी पण पृथ्वीसारखं गुरुत्वाकर्षण मात्र तिथं तयार करता येत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपण पृथ्वीवर उभे राहू शकतो, चालू शकतो. अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाच्या अवस्थेत अंतराळवीर कायम अधांतरी तरंगत असतात. दीर्घकाळ अशा अवस्थेत राहिल्यास मानवी शरीरावर लक्षणीय परिणाम होऊ लागतात. हाडांची घनता कमी होत हाडे ठिसूळ होऊ लागतात. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. स्नायूंना कमी कार्य असल्याने ते आकुंचन पावू लागतात आणि कमजोर होऊ शकतात. परिणामी फ्रॅक्चर आणि इतर जखमांचा धोका वाढू शकतो. अंतराळात संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यासाठी हृदयाला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयाच्या स्नायूचा आकार आणि ताकद कमी होऊ लागते. रक्तदाब कमी होतो आणि विशेषत: पायाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. शरीराचा तोल सांभाळणारी आणि दिशाज्ञान करून देणारी कानामधली वेस्टिब्युलर प्रणाली गडबडते. त्यामुळे मळमळणं, गोंधळणं असे त्रास होतात. गुरुत्वाच्या अभावामुळे द्रवपदार्थ शरीराच्या वरच्या भागात जमा होऊ लागतात. परिणामी चेहरा आणि पाय यांना सूज येऊ शकते. दृष्टी थोडी अंधूक होऊ शकते. लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होत अंतराळवीरांना संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता वाढते.

यातील मळमळणं, गोंधळणं अशा काही परिणामांवर शरीर अनुकूलन साधते, पण इतर परिणामांची मात्रा कमी करायला योग्य व्यायाम, खास डाएट अशा काही  बाबींवर विशेष लक्ष द्यावं लागतं. अंतराळवीरांना पृथ्वीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने बनवलेल्या ट्रेड मिल, सायकल, अर्गोमीटर यांसारख्या उपकरणावर दररोज दोन तास व्यायाम करावा लागतो. ट्रेडमिलवर धावणं, स्थिर सायकिलग अशा कार्डिओ एक्सरसाइजद्वारे हृदयाचं कार्य व्यवस्थित राखलं जातं. स्नायूंची मजबुती राखण्यासाठी स्ट्रेचिंग आणि वेटलिफ्टिंग प्रकार केले जातात. तोल राखण्यास काही योगासनांद्वारे मदत होते. अंतराळवीरांना आहारातून सगळी पोषणद्रव्यं आणि गरज पडली तर सप्लिमेंट देऊन आरोग्य चांगलं राखलं जातं.

अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शारीरिकच नाही तर मानसिक तणावांनाही सामोरं जावं लागतं. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पृथ्वीवर सभोवतालची इतर माणसं, निसर्ग, प्राणी यांना पाहात आपण प्रतिक्रिया देत असतो. अंतराळात स्पेस स्टेशन सोडून दुसरं काहीच दिसत नाही. लाखो वर्षांपासून मानवाच्या शरीरात ज्या नैसर्गिक प्रेरणा रुजल्या आहेत, त्यांचा अवकाशात गेल्यावर गोंधळ उडतो. यामुळे नैराश्य, आकलन अक्षमता, मनोबल खचणं यांसारखे मानसशास्त्रीय आजार होऊ शकतात. पृथ्वीवर आपलं जैविक घडय़ाळ हे पृथ्वीच्या परिवलन गतीशी समरूप असतं. म्हणून उठणं, झोपणं, भूक लागणं या क्रिया यांचा ताळमेळ राहतो. अंतराळात याची गडबड उडते. दिवस-रात्र यांच्या अभावाने झोपेचं चक्र बिघडतं. स्टेशनमधील मर्यादित जागेमुळे तिथं राहणं बंदिवास वाटू लागतो. दीर्घकाळ घरापासून लांब राहिल्याने अंतराळवीर होमसिक होतात. सिस्टीममध्ये बिघाड होण्याची भीती, ऑक्सिजन संपण्याची भीती, स्टेशनवर एखादी अशनी धडकण्याची भीती अशी अनेक दडपणं कायम मनावर असतात. स्टेशनमध्ये दिसतं तेवढंच जग खरं, बाकी सब झूट! असा सोलिपसीझम सिंड्रोम मनात घर करतो. या सगळय़ांवर मात करण्यासाठी अंतराळवीरांचं मन सकारात्मक कामात गुंतवणं गरजेचं ठरतं.

अंतराळवीर पृथ्वीवर परत आल्यावरदेखील यातील बऱ्याच शारीरिक आणि मानसिक समस्या काही काळ त्यांचा पिच्छा पुरवतात. ‘ग्रॅव्हिटी’ फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीराला लगेच जमिनीवर उभं राहून संतुलन सांभाळता येत नाही. पुन्हा गुरुत्वाकर्षणाशी अनुकूलन साधायला शरीराला वेळ लागतो. बरेच दिवस अंतराळवीर गुरुत्वाकर्षण आहे हे विसरून हातातील वस्तू  चक्क सोडून देतात. नासाचे अंतराळवीर स्कॉट केली यांच्या शब्दांत सांगायचं तर गुरुत्व सोडताना जेवढा त्रास होत नाही तेवढा गुरुत्वात परत आल्यावर होतो!

या सगळय़ा अडचणींना तोंड देत अंतराळात राहणं हे सोम्यागोम्याचं काम नाही. डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशा तज्ज्ञांच्या समित्यांद्वारे अंतराळवीरांची निवड केली जाते. अनेक मानसशास्त्रीय परीक्षा आणि वैद्यकीय चाचण्या घेऊन शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त उमेदवार निवडले जातात. स्पेस मिशनप्रमाणे त्यांना कठोर प्रशिक्षण दिलं जातं. अंतराळात राहण्याच्या दृष्टीने शारीरिक तयारी करून घेतली जाते. त्याचबरोबर स्पेस स्टेशनच्या विविध सिस्टीम चालवणं आणि देखभाल याचंही तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं. थोडक्यात काय, तर हे अंतराळ प्रकरण दिसतं तितकं सोप नाहीये. जिगर मुरादाबादीच्या प्रसिद्ध शेरमध्ये सांगायचं तर ‘‘ये अंतरिक्ष नहीं आसाँ इतना ही समझ लीजे इक अंधेरा दरिया है और तैरते रेहना है।’’ इतके धोके पत्करून अंतराळात जाणाऱ्या आणि दीर्घकाळ तिथं राहणाऱ्या अंतराळवीरांना खतरों कें खिलाडी म्हटलं पाहिजे!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या