सध्याच्या ब्रँडेड जगण्याला खुणावत अनेक भारतीय ब्रँड्स उदयाला आले आहेत. काही मोजके ब्रँड्स परदेशातही लोकप्रिय झाले आहेत. अशाच काही लोकप्रिय ब्रँडमागचा चेहरा, त्यांची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’नं केलाय. ब्रँडची गोष्ट सांगणारा ‘ब्रँडमागचा चेहरा’ या लेखमालिकेच्या निमित्ताने पुढच्या काही अंकातून तुम्हाला भेटत राहील.
वर्षांतून दोन-तीनदाच बाजारपेठेत होणारी खरेदीसाठीची चक्कर.. एकाच ताग्यातून शिवलेले एकसारखे ड्रेस, शिंप्याकडून खास सांगून करून घेतलेली ‘लेटेश्ट’ फॅशन, बरोबरच्या मंडळींचा पेशन्स बघत दुकाना-दुकानांतून चाललेली पायपीट आणि हे नको, ते दाखवा असं म्हणत टेबलापलीकडच्या दुकानदाराच्या पेशन्सची परीक्षा घेणारी खरेदी, ‘पुलं’नी वर्णिलेला- ग्राहकाला सगळ्यात तुच्छ गोष्ट मानणारा पुणेकर दुकानदार.. आजच्या तरुण पिढीला हे सगळं ऐकूनच माहिती असेल, कारण खरेदीचं ‘शॉपिंग’ झालं तसा त्या प्रक्रियेचा चेहरामोहरासुद्धा बदलला. मॉल संस्कृती आपल्याकडे रुजून  आता दशकभराहून अधिक काळ लोटला आहे. शहरी मध्यमवर्गीय अशा मोकळ्याढाकळ्या खरेदीला चांगलाच सरावलाय. आता जमाना आहे ब्रँडेड शॉपिंगचा.
खरेदी हा आता मनोरंजनाचा एक पर्याय झालाय. आपण सगळे अधिक सजगपणे, चोखंदळपणे खरेदी करायला लागलोय आणि आपले पर्याय, प्राधान्य, वेगळेपण जपण्यासाठी वेगवेगळे निकष ठरवायला लागलोय. त्यातूनच ब्रँडेड जगण्याची सुरुवात झालीय. ज्याला ‘ब्रँड-कॉन्शसनेस’ म्हणता येईल ती जागरूकता वाढली आहे. कुणी याला तरुणाईची क्रेझ म्हणेल, तर कुणी लाइफस्टाइलचा भाग. कुणाला ती काळाची गरज वाटेल.  ज्या इटालियन, फ्रेंच, अमेरिकन ब्रँड्सची नावं केवळ सेलेब्रिटींच्या तोंडी ऐकली ती आता आपल्यालाही सहज उपलब्ध असतात. ब्रँडचं अस्तित्व आता केवळ कपडय़ापुरतं मर्यादित नाही. दागिने, बॅग, शूज, गॉगल, घडय़ाळ अशा अ‍ॅक्सेसरीजमध्ये ते आहे. हेल्थकेअर, ब्युटीकेअरमध्येही ब्रँडिंग आलं. हल्ली आपल्याला व्यायामही ब्रँडेड लागतो आणि खाणंही ब्रँडेड  रेस्टॉरंटमधलंच रुचतं.
खरेदीचं ‘शॉपिंग’ झालं आणि त्याबरोबर आलेले हे बदल टिपत नवीन जीवनशैली अंगवळणी पडू लागले, तेव्हाच साधारण लोकसत्ताची ‘व्हिवा’ पुरवणी सुरू झाली. ‘व्हिवा’च्या आजच्या वर्धापन दिन विशेष पुरवणीत म्हणूनच आपलं हे ‘ब्रँडेड जगणं’ मांडायचा प्रयत्न केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rise of indian brands
First published on: 19-06-2014 at 01:30 IST