स्वतला उत्तम प्रेझेंट करायला हवं, पर्सनॅलिटीबरोबर ट्रेण्डीही राहता आलं पाहिजे. असं मानणाऱ्या फॅशनप्रेमी तरुणांना फॅशन जगात काय चाललंय याची तंतोतंत सगळी माहिती असते. ऋतू कोणताही असो जगात जो ट्रेण्ड चाललाय त्याला फॉलो करणाऱ्या या तरुण मंडळींचं विंटर शॉपिंग प्लॅनिंग काय आहेत जाणू या त्यांच्याचकडून..

श्रुतिका मोहन
थंडी हळूहळू जाणवू लागल्यावर माझा अडगळीत पडलेला स्वेटर फायनली परवाच आईने बाहेर काढला आणि बघते तर काय तो थोडा आखूड झाला होता. मग काय आईकडे नवीन स्वेटरसाठी हट्ट करण्याची गरजच पडली नाही. लागलीच मार्केटमध्ये जाऊन मस्त हायनेक पिंक कलरचा टकाटक स्वेटर खरेदी केला. हिवाळ्यात त्वचा जास्त फुटते म्हणून सोबत हातमोजे, पायमोजे, विंटर शूज अशी लहान-मोठी शॉपिंग ही करून टाकली. थंडी म्हटलं की अंगावर शहारे येतात आणि दुसरीकडे थंडी म्हणजे स्वेटर-मफलरचे रंगीत वातावरण जे थंडीला दूर पळवतात.

प्रज्ञा करंदीकर
फॅशन आली म्हणजे शॉपिंग आली आणि शॉपिंग म्हटल्यावर मी ऑल टाइम रेडी असते. उबदार कपडय़ांमध्येही आता खूप व्हरायटी उपलब्ध आहेत. यंदाच्या हिवाळ्यात मी  बोचणाऱ्या थंडीपासून बचावासाठी तसेच माझी छबी वेगळी असावी यासाठी माझ्याकडे उत्तमोत्तम विंटर कलेक्शन असावं यासाठी विशेष प्रयत्न करतेय. यंदाच्या हिवाळ्यात आम्ही घरातल्या सगळ्यांनी थर्माकोट खरेदी केलाय जेणेकरून  थंडीची तीव्रता कमी जाणवेल आणि आपले स्टाइल स्टेटमेंटही कायम राखता येईल.

अभय करंदीकर
थंडीचा माहोल सुरू झालाय आता हळूहळू स्टोल वापरणाऱ्या मुली आपल्या आजूबाजूला दिसायला लागतील किंवा जॅकेट्स घालून फिरणारी मुलं दिसू लागतील. विंटरमधल्या या विशिष्ट प्रकारच्या कपडय़ांची फॅशन एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे पटकन फैलावते. नवी फॅशन आल्यावर आधीच्या फॅशनचं नामोनिशान उरत नाही. पण ही फॅशन प्रत्येक स्टेटसमध्ये फॉलो केली जाते. गुलाबी थंडीतील गुलाबी फॅशन प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. यंदा मी खास विंटर जॅकेट्सची खरेदी केली आहे. फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोडला विंटर जॅकेट्स ३०० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

सूरज येवगे
दिवाळी संपली की थंडीची मी आतुरतेने वाट पाहत असतो. असं म्हणतात, मुली शॉपिंगसाठी वेडय़ा असतात पण एक सांगतो, मुलं-मुलींपेक्षा जास्त शॉिपगप्रेमी असतात. याचं एक उत्तम उदाहरण मी आहे. मी दरवर्षी मित्रांसोबत मॉल्समध्ये जाऊन दणक्यात विंटर शॉपिंग करतो. कॉलेजच्या दिवसांत थंडीचा महिना येण्याआधी घरून महिनोन्महिने आधी मिळालेला पॉकेटमनी मी आधीपासूनच विंटर शॉपिंगसाठी जमा करून ठेवायचो. परंतु आता जॉब लागल्याने हवी तेवढी आणि हवी तिथे थंडीसाठी शॉपिंग करण्याची संधी गवसली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली गोरेगावकर
आय लव्ह विंटर..थंडीच्या दिवसात शॉपिंगची मजा काही औरच असते. कारण या मोसमात गडद रंगांच्या वुलन कपडय़ांची बाजारात रेलचेल असते आणि मला कपडय़ांमध्ये डार्क शेड्स खूप आवडतात, कारण ते माझ्यावर उठून दिसतात. मला कलर्समध्ये एक्स्पेरिमेंट करायला खूप आवडतं. स्वेटर्स, काíडगन्सची कलरफूल रेंज बाजारात आली आहे. यंदा मी माझ्या प्रत्येक कुर्त्यांवर मॅचिंग असे विविध रंगांचे स्कार्फ खरेदी केले आहेत. आपल्याकडे कलर्सच्या एवढय़ा प्रचंड शेड्स आहेत त्यांचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे. आपल्या रंगाला काय छान दिसेल, कपडय़ांचा कुठला प्रकार सूट होईल एवढं जरी ओळखता आलं तरी विंटर फॅशन मस्त कॅरी करता येईल.