हाय मृण्मयी,
माझं वय २२ आहे. मी काहीशी लठ्ठ आहे. माझी उंची ५.२ फूट असून वजन ६० किलो आहे. वर्ण गोरा आहे. मला नुकताच एका बँकेत जॉब लागला आहे. इतके दिवस कॉलेज गोइंग गर्ल असल्यामुळे मला फॉर्मल ड्रेसिंगबद्दल फारसा सेन्स नाही. ऑफिससाठी कुठल्या स्टाइलचे कपडे, कसा लूक, कशी ड्रेसिंग स्टाइल हवी? प्लीज गाइड करा.
पूजा
प्रिय पूजा,
तुझ्यासाठी आदर्श स्टाइल म्हणजे सेमी फॉर्मल किंवा स्मार्ट कॅज्युअल. यामध्ये टी-शर्ट अजिबात येत नाही. पारंपरिक सलवार-कुर्ता किंवा ट्राउझर्स आणि शर्ट फॉर्मलमध्ये मोडतात. बँकेत नोकरी आहे, म्हणजे अगदी प्युअर फॉर्मल ड्रेसिंग कम्पलसरी नसावं, अर्थात ते तुझ्या प्रोफाइलवर अवलंबून आहे. माझ्या मते, तू काही अगदी लठ्ठ नाहीस. तुझ्या उंचीच्या मानाने वजन व्यवस्थित आहे. पण बांधा थोडा स्थूलतेकडे झुकणारा आहे, असं म्हणता येईल.
ड्रेसिंग स्टाइल ठरवताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो ड्रेस तुम्ही कुठे वापरणार आहात. तुझा जॉब बँकेतला आहे. म्हणजे मला वाटतं, बहुतेक वेळा ग्राहकांशी संपर्क असणारा असेल. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांपुढे एक जबाबदार ऑफिसर अशी इमेज निर्माण करणं आणि ती टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे. या इमेज बिल्डिंगमध्ये ड्रेसिंग स्टाइल महत्त्वाची भूमिका निभावते. याचा अर्थ असा नाही की, तू एखादी टिपिकल ड्रेसिंग स्टाइलच फॉलो केली पाहिजेस, पण स्टाइल करताना जबाबदारीचं एक बेसिक भान मात्र सोडता कामा नये. फॉर्मल ड्रेसिंगला काही बेसिक कट्स आणि रंग असतात. साधेपणा हे फॉर्मल्सचं वैशिष्टय़ आहे. पण म्हणजे अगदीच साधासुधा ड्रेस म्हणजे फॉर्मल, असं काही नाही. कारण ते खूपच बोअिरग वाटू शकतं. म्हणून मी सेमी फॉर्मल्सचा पर्याय दिलाय. याचा अर्थ साधेपणा जपायचा, पण फॉर्मल्समधले तेच ते कट्स फॉलो करायची आवश्यकता नाही. थोडे वेगळे रंग वापरून फॉर्मल्सनासुद्धा आकर्षक बनवता येतं. स्ट्रेट कट किंवा व्ही शेप सिलोएट फॉर्मल आणि सेमी फॉर्मल ड्रेसिंगमध्ये शोभून दिसतात. पण तू अजून तरुण आहेस. त्यामुळे तुला ए लाइन किंवा फ्लेअर्ड सिलोएट्ससुद्धा ट्राय करायला हरकत नाही. पण ते अनुक्रमे खूप गर्लिश आणि ड्रेसी दिसतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. रिच कॉटन, लिनन आणि सिल्कचं कापड फॉर्मलसाठी सुटेबल असतं. पण बँकेत तू खरं कर कुठल्याही प्रकारचं कापड फॉर्मल म्हणून वापरू शकतेस. अगदी टिश्यू किंवा वेलवेट, नेट असे ड्रेसी फॅब्रिक मात्र टाळायलाच हवेत. फॉर्मलमधले नेहमीचे रंग म्हणजे काळा, पांढरा, क्रीम, बेज, नेव्ही ब्लू, इंग्लिश ग्रीन, मरून, ब्राऊन, ग्रे हे आहेत. पण या रंगाची कॉम्बिनेशन करून आणखी काही फ्रेश रंगसंगती वापरायला हरकत नाही. हे सगळे रंग तुझ्या वर्णाला उठून दिसणारे आहेत. पेस्टल शेड्सही वापरायला हरकत नाही. फक्त अगदी भडक रंग टाळायला हवेत. ते कामाच्या ठिकाणी शोभून दिसत नाहीत. म्हणजे तुला आवडत असेल तर लाल रंगसुद्धा वापरलास तरी चालेल. पण ब्लड रेड शेड किंवा फ्लॅशी, भडक लाल रंगाचा टॉप किंवा ड्रेस नको.
स्टाइल्समध्ये स्टॅण्ड कॉलर किंवा मॅण्डेरिन कॉलर फॉर्मल्समध्ये वापरली जाते. पण एक लक्षात ठेव -स्टॅण्ड कॉलर किंवा कुठल्याही प्रकारचा कॉलरचा टॉप घातलास तर आणखी जाड दिसू शकशील. कारण त्या पॅटर्नमध्ये नेकलाइन झाकली जाते. त्यातून तुला कॉलरचा पॅटर्न वापरायचा असेल तर लो लाइंग कॉलरवाले टॉप्स वापर. बाह्य़ा साध्याच हव्यात. थोडे पफ असलेल्या स्लीव्हज चालतील. नॅरो किंवा लेग-ओ मटन स्टाइलसुद्धा चांगली दिसेल. बेल, बॅट, किमोनो, बटरफ्लाय अशा मोठय़ा झालरीसारख्या बाह्य़ा मात्र चालणार नाहीत. खूप सजावट किंवा वर्क असलेले ड्रेस आणि टॉप्स कामाच्या ठिकाणी घालू नयेत. त्यामुळे उगाच स्टायलीश फ्रील, झालर, रिबन्स, प्लीट्स अशी सजावट नको. थोडय़ा प्रमाणात असलेली फॅशनेबल वाटेल. पण अतिरेक नको. सिम्पल योकचे कपडे हवेत.
सिम्पल कपडे वापरण्यात एक गंमत आहे. साध्या कपडय़ांबरोबर तू बोल्ड अ‍ॅक्सेसरीज वापरू शकतेस. अ‍ॅक्सेसरीज म्हणजे फक्त दागिने असा इथे अर्थ नाही. ज्वेलरी मिनिमम हवी. अगदी बेसिक दागिनेच खरं तर कामाच्या ठिकाणी वापरायला हवेत. तरीही साधा ड्रेस असेल तर एखादा बोल्ड नेक पीस किंवा ब्रेसलेट वापरायला हरकत नाही. अ‍ॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग किंवा पर्स, बेल्ट, फूटवेअर, स्कार्फ आणि गॉगल्स याचा समावेश होतो. ड्रेस साधा असेल तरीही बोल्ड हॅण्डबॅग वापरली तर तुमचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. साध्या शर्टबरोबर शिफॉनचा स्कार्फ वापरला तर स्मार्ट वाटतो आणि प्रभावी ड्रेसिंग स्टाइल ठरते.
फॉर्मल ड्रेसिंगमध्ये हेअरस्टाइल व्यवस्थित हवी. केस मोकळे सोडलेले नसावेत. डोळ्यांवर येणारे, विस्कटलेले नसावेत. ते फॉर्मल आऊटफिट्सवर शोभत नाही. टिक-टॅक पिन वापरून बांधलेले किंवा क्लच लावून बांधलेले केस असावेत. केस लांब असतील तर पोनीटेल किंवा बन घालायला हरकत नाही. फ्रेंच प्लीट पण क्लासी दिसते. मेक-अप अगदी बेसिक हवा. तुझं नेहमीचं फेस क्रीम आणि पावडर पुरेशी आहे. वापरायची सवय असल्यास मॅट लिपस्टिक आणि बारीकशी काजळाची किंवा आय लायनरची लाइन असली की झालं. उगाच भरमसाट मेक-अप फॉर्मल ड्रेसिंगला मारक ठरतो. नखं व्यवस्थित कापलेली हवीत. नेलपेंट लावलेलं असलं नसलं तरी नखांची निगा राखलेली हवी.
लेटेस्ट स्टाइलबद्दल अपडेट्स घेत राहा. ग्राहकांशी थेट संपर्क असलेलं जॉब प्रोफाइल असेल किंवा वरिष्ठांबरोबर ऊठबस असेल तर लेटेस्ट आणि परफेक्ट ड्रेसिंग स्टाइल हवी. नक्कीच याचा चांगला प्रभाव पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart formal style
First published on: 19-09-2014 at 01:07 IST