नवं दशक नव्या दिशा : चंद्राची शिकार २

१९८० मध्ये डेनिस होप नावाच्या एका व्यापाऱ्याने चंद्रावरचे ‘प्लॉट्स’ विकायला सुरुवात केली.

सौरभ करंदीकर
१९८० मध्ये डेनिस होप नावाच्या एका व्यापाऱ्याने चंद्रावरचे ‘प्लॉट्स’ विकायला सुरुवात केली. ‘बा अंतराळ करारात कुठल्याही ‘देशाने’ चंद्रावर हक्क सांगू नये असं असलं तरी कुठल्याही ‘व्यक्तीने’ असं म्हटलेलं नाही, त्यामुळे मला जमिनी विकायचा अधिकार नाही काय?’, अशा आशयाचं पत्र त्याने युनोला पाठवलं. ज्याला आजपर्यंत उत्तर मिळालेलं नाही.

२०११ साली मंगळावर ‘क्युरिऑसिटी’ नावाची रोव्हर (बग्गी) उतरली तेव्हा सोशल मीडियावर अनेक मजेशीर अफवा पसरल्या होत्या. ‘मंगळावर पाणी सापडलं!’, ‘मंगळावर जीवसृष्टी आहे!’, ‘बग्गीची चाकं एलियन्सनी पळवली’ इत्यादी. परंतु आपल्याकडे व्हायरल झालेली बातमी म्हणजे ‘मंगळावर अमूक साहेबांच्या नावाचा सातबाराचा उतारा सापडला!’ एखाद्या ग्रहावर (किंवा उपग्रहावर) मानवाचं पाऊल पडण्याआधीच एखाद्या राजकारण्याने तिथल्या जमिनीचा एखादा तुकडा हडप करून ठेवावा, हा विनोद वाटतो तितका अतक्र्य नाही.

मागील लेखात आपण पाहिलं की पृथ्वीभोवती अब्जावधी वर्ष भ्रमण करणाऱ्या चंद्रावर अनेक मौल्यवान द्रव्यं आढळून आली आहेत. चंद्रावर आपला हक्क सांगण्यासाठी चढाओढ होणार हे जाणून युनोने १९६७ साली बा अंतराळ करार आंतरराष्ट्रीय मंचावर ठेवला. कोणत्याही देशाला अंतराळातील कुठल्याही निसर्गनिर्मित वस्तूवर मालकी हक्क सांगता येणार नाही हा प्रस्ताव १११ देशांनी मान्य केला. अर्थात, चंद्रावरील उत्खनन, अंतराळात शस्त्रांचा वापर, इत्यादी मुद्दे यात फारसे स्पष्ट केले गेले नाहीत.

एखादा कायदा अस्तित्वात आला की लागलीच त्यातील  पळवाटा शोधल्या जातात. उदाहरणार्थ १९८० मध्ये डेनिस होप नावाच्या एका व्यापाऱ्याने चंद्रावरचे ‘प्लॉट्स’ विकायला सुरुवात केली. ‘बा अंतराळ करारात कुठल्याही ‘देशाने’ चंद्रावर हक्क सांगू नये असं असलं तरी कुठल्याही ‘व्यक्तीने’ असं म्हटलेलं नाही, त्यामुळे मला जमिनी विकायचा अधिकार नाही काय?’, अशा आशयाचं पत्र त्याने युनोला पाठवलं. ज्याला आजपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. प्रति एकर २४ डॉलर्स या भावाने आतापर्यंत डेनिस होपने अनेकांना जमिनी विकल्या आहेत. टॉम क्रूझ, जॉन ट्रॅव्होल्टा, निकोल किडमन इतकंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन, जॉर्ज बुश (पहिले) आणि जिमी कार्टर आणि यासारखी प्रसिद्ध तसंच श्रीमंत माणसं  या ‘स्कीम’चे लाभार्थी ठरले आणि होप कोटय़धीश झाला! हा माणूस चक्रम आहे की चतुर, याबाबत मतमतांतरं असू शकतात, परंतु येणाऱ्या काळाची पावलं या स्कीममध्ये नक्कीच दिसत आहेत.

२०१७ साली अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने ‘आर्टेमिस’ कार्यक्रमाची घोषणा केली. २०२३ पर्यंत चंद्रावर पहिली महिला आणि पुढचा पुरुष पाठवणे, आणि चंद्रावर मानवाचा कायमस्वरूपी तळ उभारणे, ही या कार्यक्रमाची उद्दिष्टं आहेत. मात्र या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाला, शासकीय तसेच खासगी संस्थेला ‘आर्टेमिस अकॉर्डस’ नावाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. ‘आर्टेमिस अकॉर्डस’च्या अंतर्गत चंद्रावर तसेच सभोवतालच्या अंतराळात एकमेकांना सर्वतोपरी साहाय्य करणे, माहितीची पारदर्शक देवाणघेवाण करणे, कठीण प्रसंगी मदत करणे, एकमेकांच्या कार्यात अडथळा न आणणे, इत्यादी गोष्टी बंधनकारक आहेत. आतापर्यंत १३ देशांनी या करारनाम्यावर सह्य केल्या आहेत.

चंद्रावर वास्तव्य करणं सोपं नाही, सौर वारे, किरणोत्सर्ग, कमालीचं विषम तपमान, वातावरणाचं रक्षक कवच नसल्याने कधीही आदळणाऱ्या बंदुकीच्या गोळीसारख्या सूक्ष्म उल्का, इत्यादी धोके कमी की काय, म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ देखील मनुष्यासाठी घातक ठरली आहे. ही धूळ वरवर मऊ वाटली तरी त्याचे कण कमालीचे धारदार आहेत. अंतराळवीरांचे कपडे, काही छोटी यंत्रं, इतकंच नाही तर अंतराळवीरांच्या श्वसनमार्गात गेल्यास त्यांच्या फुप्फुसांनादेखील ही चंद्रधूळ इजा करू शकते. यामुळेच चंद्रावर खाणकाम करणं तितकंसं सोपं नाही. गुरुत्वाकर्षण कमी असल्याने उत्खननादरम्यान उडालेली प्राणघातक धूळ बसायलादेखील अधिक वेळ लागेल, त्यामुळे पृथ्वीवर खाणीत वापरतात तशी यंत्रसामुग्री इथे वापरणं शक्य नाही.

हे सारं असूनदेखील आर्टेमिस कार्यक्रम जोराने पुढे सरकत आहे. नासाबरोबरच इलॉन मस्क, जेफ बेझोससारखे उद्योगपती या कार्यक्रमातील विशिष्ट गोष्टींच्या निर्मितीत गुंतले आहेत. आतापर्यंत नासाने वापरलेल्या अग्निबाणांपेक्षा अधिक शक्तिशाली प्रक्षेपण प्रणाली, चंद्रावर उतरणारी यानं, चंद्रावरील तळ, या साऱ्यांची रचना केली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील मोहिमांच्या माध्यमातून माणसाने अवकाशात दीर्घकाळ वास्तव्य कसं करावं याचे धडे घेतले आहेत. ‘आय एस एस’ अजून १० र्वष कार्यरत असेल. त्यानंतर त्याची जागा दुसरं एखादं स्टेशन घेईलच, परंतु त्याचबरोबर चंद्राच्या कक्षेतदेखील ‘लुनार गेटवे’ नावाचं नवं कोरं स्पेस स्टेशन भ्रमण करत असेल. चंद्राच्या भेटीला येणाऱ्या यानांसाठी, तसेच चंद्रावरून पुढे मंगळाकडे आणि इतर ग्रहांकडे जाणाऱ्या यानांसाठीदेखील ‘गेटवे’ हे स्थानक महत्त्वाचं ठरेल. अमेरिकेबरोबरच कॅनडा, जपान, रशिया आणि युरोपियन युनियन यांनी या स्टेशनच्या बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. भूतकाळाची जाण ठेवून (इस्रोच्या चांद्रयानाने चंद्रावर पाणी शोधलं म्हणून) भारतालादेखील या बांधणीत पाणीपुरवठा आणि जलसिंचनासाठी ‘एक्स्पर्ट’ म्हणून नेमणं उचित ठरेल!

चंद्रावर आढळणारी विविध संयुगं, सिलिकॉन, अल्युमिनियम आणि थोरियमसारखी मूलद्रव्यं, हीलियम -३ नावाचं भविष्यात महत्त्वाचं ठरू शकेल असं इंधन या साऱ्यांवर कब्जा करण्याचे घाट घातले जात आहेत. चंद्रावर आढळणाऱ्या द्रव्यांचा वापर तिथेच करणं आणि ते पदार्थ पृथ्वीवर घेऊन येणं या दोन्ही बाबींचा तौलनिक अभ्यास केला जातो आहे.

चंद्राचं उत्खनन आणि व्यापारीकरण अटळ आहे. मानवी भावभावनांच्या ‘साक्षीला’ असलेला अस्पर्श शीतल चंद्र पाहणारी आपली कदाचित शेवटची पिढी असेल. त्यानंतर त्याचा चेहरामोहरा कसा असेल ते सांगणं कठीण आहे. तत्पूर्वी मनसोक्त ‘चंद्रदर्शन’ करून घ्यावं ही नम्र विनंती..

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Space rumors in social media life mars ssh

ताज्या बातम्या