शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. युरोपीय खाद्यसंस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या स्पेनच्या दौऱ्यावर आजपासून जाऊ या..
आजपासून जो आपला स्टॉप ओव्हर आहे, त्याबद्दल काय सांगावं.. युरोपच्या पूर्ण खाद्यसंस्कृतीवर प्रभाव टाकणारा असा हा देश ‘स्पेन’. आमच्या ‘क्वीन एलिझाबेथ – टू’ हय़ा इंटरनॅशनल क्रूझ लाइनरच्या वर्ल्ड क्रूझ निमित्ताने बऱ्याच वेळा, बार्सिलोना, कॅनरी आइलंडमध्ये जाणं झालं आणि तिथल्या अविस्मरणीय अशा आठवणी आहेत. किनाऱ्यावरचं निळंशार स्वच्छ पाणी, अतिशय स्वच्छ, सुंदर असे दगडी रस्ते, रस्त्यावरची छोटी दुकानं, बार, नीटनेटक्या इमारती आणि प्रेमळ माणसं.
कधी रस्त्याच्या कडेला तुम्हाला एखादा फ्लािमको डान्स बघायला मिळतो, तर कधी एखादा मस्त मौला हॅट आणि सूट घालून अतिशय सहजतेने गिटारच्या तारा छेडून आपल्याला मंत्रमुग्ध करतो. इथली लाइफस्टाइल कोणालाही आवडण्यासारखी आहे. सकाळचा लाइट ब्रेकफास्ट- कॉफी, क्रॉइझो, फळं, ज्यूस असं साधंसं पण मस्त.
दुपारचं जेवण म्हणजे दिवसातलं सगळय़ात महत्त्वाचं मिल. यात भरपूर व्हरायटी असते. दीड ते दोन तास चालणारं हे जेवण ४ ते ५ कोस्रेसमध्ये सव्र्ह केलं जातं. ‘वाइन’ येथील जेवणाचा अविभाज्य भाग असतो. जेवणानंतरचा सगळय़ात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सिएस्ता’. गप्पांच्या नादात भरपूर जेवण झाल्यानंतर ते पचवण्यास दुपारची मस्त कडक झोप म्हणजे ‘सिएस्ता’. अर्थात असा ‘सिएस्ता’ आपल्याकडे आहेच की- वामकुक्षीच्या स्वरूपात. स्पेनमध्ये रात्रीचं जेवण मात्र अतिशय कमी असतं. स्पेनमध्ये भाताचं उत्पादन जास्त असल्यामुळे अगणित भाताचे प्रकार इथे केले जातात. सगळ्यात फेमस डिश म्हणजे – पाएआ. आणि हीच स्पेनची ‘नॅशनल डिश’.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ फिल्म बघताना स्पेनच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या चित्रपटात तिथला दरवर्षी होणारा ‘टोमाटीना’ फेस्टिवल दाखवला आहे. बुनॉल येथे होणारा हा फेस्टिवल खूप धमाल असतो. ट्रकच्या ट्रक टोमॅटो इथे आणले जातात. होळी किंवा रंगपंचमीमध्ये जसं आपण एकमेकांवर रंग उधळतो, तसं इथे एकमेकांवर टोमॅटो फेकले जातात. साधारण दोन-अडीच तासांची ही टोमॅटॉची धुळवड संपली की, संपूर्ण गांव रस्ते हे टोमॅटोमय होतात आणि पाइपने पाणी मारून हे रस्ते स्वच्छ धुतले जातात. टोमॅटोमधल्या अॅसिडमुळे रस्ते अगदी स्वच्छ होऊन चमकायला लागतात.
स्पॅनिश ऑमलेट
साहित्य : ऑलिव्ह ऑइल – १ टीस्पून, बटाटय़ाचे काप – १ मध्यम पार्सले – २ टीस्पून, मीठ – चवीनुसार, अंडी – ३, कांदा (मोठे तुकडे) – १ मध्यम आकाराचा.
कृती : जास्ती तेला मध्ये (ऑलिव्ह ऑइल) कांदा आणि बटाटय़ाचे तुकडे परतून घ्या. थोडे शिजू दय़ा. अंडी फेटून त्यात आता परतलेले कांदे, बटाटे, पार्सले, मीठ टाकून परत फेटून घ्या. आता त्याचे जाडसर असे ऑमलेट बनवा. तयार झाले तुमचे स्पेनचे प्रसिद्ध स्पॅनिश ऑमलेट.
स्पानिश पाएआ
हय़ा अगणित रेसिपीज आहेत. आपण एक डिलिशियस रेसिपी बघूया.
साहित्य : ऑलिव्ह ऑइल – ५- ६ टीस्पून, पॅपरिका पावडर – १ टीस्पून, (किंवा लाल मिरची पूड), िलबाचा रस – दीड टीस्पून, रंगीत सिमला मिरची (लांबट कापलेल्या) – १ वाटी, ओरिगॅनो – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, काळीमिरीपूड – चवीनुसार, बोनलेस चिकन तुकडे – १ वाटी, प्रॉन्स (साफ केलेले) -अर्धी वाटी, मटार दाणे -अर्धी वाटी, उकडलेली फरसबी (तुकडे) -अर्धी वाटी, लसूण (चिरलेले) – २ टीस्पून, चिली फ्लेक्स – अर्धा टीस्पून, उकडा तांदूळ – दीड वाटी, चिकन स्टॉक – ४ वाटी, केशर – १ चिमूट, तेजपान – १, पार्सले (चिरलेले) – २ टीस्पून (ऑप्शनल..पाहिजे असल्यास)
कृती : पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करा, चिकन आणि सिमला मिरच्या तेलात २ मिनिटे परतून घ्या. वेगळं काढून ठेवा. आता प्रॉन्ससुद्धा परतून वेगळे काढून ठेवा. आता त्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलात लसूण आणि तेजपान परतून घ्या. आता त्यात तांदूळ टाकून थोडा परतून घ्या. आता पॅपरिका, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, केशर, काळीमिरी पूड टाका. चिकन स्टॉक टाकून भात शिजवून घ्या. आता चिकन, स्टॉक, प्रॉन्स, मटर, बिन्सचे तुकडे घाला. नीट सगळं मिक्स करून मीठ टाकून िलबाचा रस मिक्स करा आणि गरमागरम सव्र्ह करा.
आजची सजावट : लेमन ट्विस्ट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
साहित्य : लिंबू, बर्फ
कृती : १. एका मध्यम आकाराच्या लिंबाचा वरचा भाग कापून घ्या.
२. कापलेल्या लिंबाची साल बारीक रेषेसारखी कापून वेगळी करा.
३. बर्फाच्या पाण्यात जरा वेळ ठेवून हाताने ट्विस्ट करा. पुन्हा बर्फाच्या पाण्यात ठेवा. लेमन ट्विस्टचा उपयोग कॉकटेल गार्निशिंगसाठी करता येईल.