|| प्रियांका वाघुले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरागस चेहऱ्याची, आनंदी अशी सुरुची आडारकर जेव्हा ‘का रे दुरावा’, ‘अंजली’, ‘झेप स्वप्नांची’ या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झाली तेव्हा अशीच हसतमुख मुलगी किंवा सून आपल्या घरात हवी, असाच आग्रही सूर घराघरातून उमटला इतकी तिची ही प्रतिमा लोकप्रिय आहे. मात्र ही प्रतिमा केवळ भूमिकेपुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्षातही मन-बुद्धी शांत ठेवणे, निरागसता टिकवून ठेवणे गरजेचे वाटत असल्याने त्यासाठीच फिटनेसला महत्त्व देत असल्याचे सुरुची सांगते.

सध्या ‘एक घर मंतरलेले’ या मालिकेत काम करणारी सुरुची अशा भूमिका साकारताना मुळात स्वत:त ते आत्मसात करून घेणे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपण शांत असणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगते. आपली मानसिक अशांतता आपल्या भूमिकेच्या आड येऊ नये यासाठी प्रयत्न करावेच लागतात, असं ती सांगते. यात नियमित व्यायाम किंवा फिटनेस प्रकारांची मदत होते, असं ती म्हणते. मुळात एक कलाकार म्हणून नाही तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसाठी फिटनेस महत्त्वाचा आहे, एक्सरसाइज करणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं ती सांगते. मानसिक संतुलन साधण्यासाठी आणि शरीर-मन ताजंतवानं ठेवण्यासाठी आपल्याला जो शक्य आहे तो फिटनेस प्रकार करायला हवा. त्यासाठी जिमलाच गेले पाहिजे, असा माझा आग्रह नाही हेही तिने स्पष्ट केलं.

अभिनेत्री म्हणून ती जिममध्ये जाऊन वेट एक्सरसाइज आणि ट्रेनिंग घेते. लंजेस आणि इतर वेट वर्कआऊट्स नित्यनेमाने ती करते. मात्र जेव्हा जिममध्ये जाणं शक्य नसेल तेव्हाही मी जॉगिंग, रनिंग किंवा वॉक करते. आज व्यायामाचे अनेक पर्याय मुलामुलींकडे आहेत. जिमचा कंटाळा येत असेल तर झुम्बासारखा फिटनेस प्रकारही घरच्या घरी मुलं-मुली करू शकतात. तुम्ही ऑनलाइन झुम्बा सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाइन प्रशिक्षक घेऊनही झुम्बाचा सराव करता येतो. माऊंटन क्लाईम्बिंग हाही एक पर्याय आहे.

आपल्याकडे फिटनेस प्रकार भरपूर आहेत मात्र सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे हा विचार फारसा रुजलेला नाही. कुठल्याही वयात मेटॅबॉलिझम, लो डायजेशनसारख्या अनेक शारीरिक समस्या असतात. त्यामुळे आपली बॉडी लीन आणि स्ट्रॉन्ग असणं हे गरजेचंच आहे. त्यासाठी जिम असो किंवा अन्य कुठलाही फिटनेस प्रकार निवडून तो सातत्याने केला गेला पाहिजे. आठवडय़ातून किमान चार वेळा मी व्यायाम करेन, या विचाराने ते केलेच पाहिजे. जिमला जाणे परवडत नसेल तर एकही रुपया इन्व्हेस्ट न करता जॉगिंग, रनिंगसारखे व्यायाम करता येतात. सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. तो केव्हाही, कुठेही आणि कुठल्याही वयात करता येतो. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत कुठला प्रकार आहे, यापेक्षाही आपण ते सातत्याने करायला हवं हा निर्धार झाला पाहिजे, असं ती ठामपणे सांगते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suruchi adarkar
First published on: 24-05-2019 at 00:06 IST