तिकीट काढावं लागत नाही ना चांगल्या सीटसाठी धडपड..  डोळे मिटले की मनोरंजन सुरू. की ‘मार्ग’दर्शन? निर्माण करण्यावर असते. म्हणूनच डू क्रिएट स्वीट ड्रिम्स..
चांगल्या झोपेच्या पाठोपाठ काय येतं? माझ्या मनात तरी स्वप्नं! किती अद्भुत जादू वाटते ना स्वप्न म्हणजे. एक्सक्लुझिव्हली फक्त आपल्यासाठी होणारा आपल्या पापण्यांमध्ये दडलेला खेळ. रोजचा प्रयोग नवा, ताजा आणि वेगळा. कोण असतं दिग्दर्शक या सिनेमाचं? काय असतात स्वप्नं- त्याचे अर्थ? घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब, मनातली कविता की आपली असुरक्षितता फक्त? मला हल्ली खूप स्वप्नं नाही पडत. पण पडली तर बरीच सूचक असतात. गंमत म्हणजे आपण स्थिर असलो तर स्वप्नंसुद्धा तशीच असतात. हळुवार. तरल. पण जरा भीती दाटली असेल कशाची तर स्वप्नांची गाडी भलतीकडेच सुटते.
माझ्या भाचीला लहान असताना पडलेलं पहिलं स्वप्नं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे अजूनही. तिच्या स्वप्नात कार्टूनमधल्या टेलिटबीज्च्या व्यक्तिरेखा आल्या होत्या वाटतं. जाग आल्यावर ती रोजच्यासारखी पांघरुणात खेळत बसली नाही, तर ताडकन उठून स्वैपाकघरात आली. आणि इकडे तिकडे बघत शोधायला लागली. विचारायला लागली- टेलीटबीज् कुथे गेले? डायनिंग टेबलाकडे हात दाखवून, खुच्र्या हलवून सारखी म्हणायला लागली. कुथे गेले. खाऊ खात होते ना. मग लक्षात आलं. तिला स्वप्न पडत होतं. त्यामुळे ती अविश्वासानं बराच वेळ इकडे तिकडे बघत होती. मला ती कल्पनाच इतकी रम्य वाटली- सत्य आणि स्वप्न यातला फरक न कळणं.
आपल्याला कधी कळायला लागतो हा फरक? आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतं? आपला विश्वास कमी होतो का? किती तरी जणांना जन्मभर परीक्षेची स्वप्नं पडतात. पेपर लिहिताना पेनातली शाई संपली, उत्तर आठवत नाही, बस मिळत नाही, उशीर होतोय, गणितं सुटत नाहीत.. आपण खरंच शालेय जीवनाचा इतका धसका घेतलेला असतो का- की पन्नाशी उलटली तरी परीक्षा आणि पेपरच येत राहतात मनात? पूर्वी बहुतेक वेळेला मी स्वप्नात संकटांचा सामना करत असायचे. भुयारं, काटय़ाकुटय़ांचे रस्ते, घोंघावणारं वादळ. अशीच परिस्थिती असायची. आणि मी बाजीप्रभू देशपांडेंसारखी प्राणपणांनी झुंजत असायचे. एखादा अक्राळविक्राळ प्राणी मागे लागलेला असायचा. त्याच्यापासून पळत असायचे, कुणाचं तरी रक्षण करत असायचे, जिवलगांना काही होऊ नये म्हणून स्वप्नात मीच त्यांची लक्ष्मणरेषा व्हायचे. भणाण वाऱ्यात मी सतत कुणाला तरी वाचवत असायचे.
आता मी स्वप्नांशी संवाद साधलाय. त्यांची समजूत घातलीए. की घाबरू नका. आयुष्य फार सुंदर आहे. फक्त कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे यासाठी जन्माला आलो नाहीए आपण. फार अमूल्य क्षण आपल्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतात. त्या क्षणांना कवटाळलं पाहिजे, ते क्षण मन:पूर्वक जगले पाहिजेत. त्यांच्याकडे उरकून टाकण्याच्या भावनेनं पाहिलं- तर तेही मग फारसे आपल्या वाटय़ाला जात नाहीत. वाट फक्त संकटं संपण्याचीच पाहिली- तर संकटांवरही आपल्या आयुष्यात येत राहण्याची जबाबदारी येऊन पडते. अक्षरश: काहीही निघतं मग. चप्पल तुटण्यापासून, विमान चुकणे, दागिने-पर्स हरविणे असं विचित्र घडतं काही तरी.
मानसशास्त्र म्हणतं- स्वप्नांचा सरळ सरळ आपल्या मनोवस्थेशी संबंध असतो. त्यातून अनेकदा स्वच्छपणे मनाचा थांग घेता येतो. कुठली तरी विचित्र भीती, असुरक्षितता, राग- याची नाळ स्वप्नात सापडते. त्यामुळे एखादा आजार किंवा सवय याचं कोडं उलगडतं- त्याचा निचरा करता येतो. पण शास्त्रीय उत्तरं माहिती नसताना त्याचे काव्यार्थ शोधणंही मला फार गोड वाटतं. उदा. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात दिसला तर त्यांना दीर्घायुष्य लाभतं किंवा साप दिसला तर काही तरी शुभ घडतं- असं मानणं म्हणजे मनाची समजूत घालणंच ना? आपल्या नकळत सुप्त मनात काही अघटित विचार येतात- यासाठी आपण स्वत:ला अपराधी मानू नये म्हणून.
चला, त्यामुळे आपलं स्वप्न सिनेमे बनवताना स्वत:ला दोषी मानणं थांबवू या. कुणाचंही अहित चिंतत नाही आपण. चुकून वाटलेल्या एखाद्या निगेटिव्ह विचाराला सहजपणे प्रवाहात वाहू देणं सगळ्यात चांगलं. त्यासाठी स्वत:ला कोसलं सारखं- तर स्वप्नंही गढूळ होतात. देवळात जाताना कसं आपण- चपला काढून भाविक वृत्तीनं- देवाला शरण होत जातो. तसंच झोपेकडे जाताना स्वत:बद्दल जरा प्रेम वाटून घेतलं तर काय हरकत आहे? कित्ती काम करतो आपण. आप्तस्वकीयांसाठी किती धडपडतो. बऱ्याचदा आपला त्याग आपण कुणाला सांगतही नाही. पण स्वत:सुद्धा त्याची नोंद न घेणं अन्यायकारक आहे. झोपताना दोन मिनिटं स्वत:चे आभार मानून बघूया. मनातल्या मनात आपल्याच पाठीवर थोपटून बघूया. काय बिशाद आहे स्वप्नांची- आपल्याला भीती दाखवण्याची? सुंदरता आपण निर्माण करण्यावर असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweet dreams
First published on: 07-06-2013 at 01:08 IST