‘आली लहर केला महाकहर’ असं म्हणत कट्टय़ाकट्टय़ांवर आत्तापासून  कुठं कुठं जायचं सेलिब्रेशनला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सगळेच गुंग झाले आहेत.
वर्षभर कल्ला करीत घालवलेल्या या वर्षांला निरोपसुद्धा कल्ला करतच दिला गेला पाहिजे. त्यामुळे नवीन वर्षांचं स्वागत अगदी उत्साहात साजरं करण्यासाठी तरुणाई सज्ज झालीये. आता थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनची चर्चा तर होणारच ना!!! ‘आली लहर केला महाकहर’ असं म्हणत कट्टय़ाकट्टय़ांवर आत्तापासून कुठं कुठं जायचं सेलिब्रेशनला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सगळेच गुंग झाले आहेत. तुमच्या या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी आमची थोडी ही मदत.

@सी फेस : चर्नी रोड ते मरीन ड्राइव्हचा संपूर्ण पट्टा म्हणजे सी-फेस साइडला ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी एकदम ‘दे धमाल’ माहोल असतो. साधारणत: संध्याकाळी ७- ८ वाजल्यापासून लोक विशेषत: तरुण मुलं-मुली जमायला सुरुवात होते. मग काही जण आपापल्या गाडीमध्ये मोठय़ाने गाणी लावतात तर कधी ओर्केस्ट्रा असतो आणि काही ग्रुप्स त्या गाण्यांवर तिथेच ताल धरतात. १० वाजल्यापासून गर्दी वाढते. लाइटिंग, लेझर शो यांनी हा परिसर उजळलेला असतो. १२ च्या ठोक्याला होणारी आतषबाजी लक्ष वेधून घेणारी असते. आजूबाजूला बरीच हॉटेल्स असल्यामुळे पार्टी माहोल आपोआपच बनून जातो.
@बँड स्टँड : त्याचप्रमाणे बांद्रामधील बँड स्टँण्ड हा परिसरदेखील ३१ ला गजबजून गेलेला असतो. या ठिकाणीदेखील मरीन ड्राइव्हप्रमाणे सी फेस आहे. त्यामुळे समुद्र किनारी न्यू ईअर साजरं करायला येणारे अनेक लोक आहेत.
@जुहू : समुद्रकिनाऱ्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे जुहू चौपाटी. परंतु ३१ डिसेंबरला इथे खूप गर्दी असते. त्यामुळे ज्यांना गर्दी टाळायची आहे अशांना कदाचित हा स्पॉट तेवढा आवडू शकणार नाही.
@नारळीबाग : सेन्ट्रल आणि वेस्टर्न अशा दोघांनाही मध्यवर्ती असलेलं ठिकाण म्हणजे दादर! दादरमध्ये शिवाजी पार्क येथील नारळी बागेत खास इअर एंडनिमित्त तरुणाई एकमेकांना भेटतात. काही वर्ष एकमेकांच्या संपर्कात नसलेल्या सवंगडय़ांचीही इथे हमखास भेट होते. संध्याकाळी ७- ८ वाजल्यापासून १२ पर्यंत नारळी बागेला एक वेगळंच उत्साहाचं उधाण आलेलं असतं.
@थीम पार्क : ज्यांना आपला ‘थर्टीफर्स्ट’ समुद्रकिनाऱ्यावर घालवायचा नसेल त्यांच्यासाठी थीम पार्क हादेखील एक चांगला पर्याय आहे.  एस्सेल वर्ल्ड किंवा आता खोपोली जवळ नवीनच झालेला इमेजिका हे भव्य थीम पार्क तुम्हाला थ्रििलग अनुभव नक्की देऊ शकतील.
@कॅमा पार्क : तसंच तुम्ही थोडं अंधेरी साइडला गेलात तर तिथे वेगळंच सिलीब्रेशन दिसतं. कॅमा पार्क इथे माणसासारखं बुजगावणं बनवून त्याला जाळलं जातं. असं करून आपण आपल्या सर्व चुका, कर्म त्या अग्नीत जाळून नव्या वर्षांची नवीन सुरुवात करू, अशी मनोभावना असते. त्यानंतर मग पार्टी आलीच.जेवण-खाणं, नाच-गाणं आलंच! शिवाय तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनपासून इतर अनेक छोटेमोठे खेळ होतात. अगदी पहाटेपर्यंत.
@ठाणे : ठाण्याचं विचाराल तर संपूर्ण शहरात फक्त आणि फक्त सेलिब्रेशन असतं. त्यात सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे तलावपाळी. १२ वाजता चालणारी आतषबाजी, जल्लोष.उत्साहाने रसरसलेले वातावरण.संपूर्ण तलावालगतचा रस्ता भरलेला असतो. तुम्ही जरी एकटे गेलात तरी हरकत नाही. कोणीतरी ओळखीचं भेटतंच! तसंच अलीकडे ‘युनायटेड २१’, ’फ्युजन धाबा’ यांसारख्या डान्स-मस्तीच्या ठिकाणीसुद्धा गर्दी जमू लागलीये. परेल, बांद्रासारख्या ठिकाणांची’ पब संस्कृती’ तुम्हाला मानवत असल्यास इथे येण्यास हरकत नाही.

तुम्हाला या गोंगाटापासून दूर जायचं असेल आणि ३१ डिसेंबरच्या थंड रात्री चांदण्यात राहणं पसंत असेल तर सरळ बॅग उचलून एखाद्या नाइट ट्रेकला जावं.अशा वेळी एखाद्या डोंगरावर / गडावर राहून सूर्योदय होताच परतणं हासुद्धा एक सुखद अनुभव असतो. अर्थात त्या वास्तूचा मान राखून मद्यपान नाही केलं तर!  या सर्व एन्जॉयमेंटप्रमाणे काही फ्रेंड्स ३१ च्या मुहूर्तावर काहीतरी विधायक कार्य करायचं असं ठरवून नवीन वर्षांचे संकल्प करतात. असाच काही संकल्प केला तर यंदाचं वर्ष सत्कारणी लावल्याचं समाधान नक्की मिळेल.