नमस्कार,
मी तेवीस वर्षांची वर्किंग लेडी असून, माझं वजन ४५ किलो आणि उंची ५ फूट ४ इंच आहे, मला माझा लुक फॅशनेबल करायचा आहे. खरं तर मी नेहमी सलवार कमीझच घालते, पण मला काही तरी वेगळं घालायची करायची इच्छा आहे. फॅशनेबल लुकबद्दल आपण मला काही सुचवू शकाल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाय,
एकंदरीत तू केलेल्या वर्णनावरून तू चांगलीच स्लिम आणि ट्रिम असली पाहिजेस. त्यामुळे तुला कोणती विशिष्ट ड्रेसिंग स्टाइल सूट होणारच नाही, असे टेन्शन घेण्याची काही गरज नाही आणि जर तुला फॅशनेबल दिसायचं असेल तर, घातलेले कपडे इंडियन स्टाइलचे आहेत की वेस्टर्न याचाही काही संबंध नाही. नेहमीच्या सलवार कमीझमध्येही तू तितकीच फॅशनेबल दिसू शकशील. ड्रेसिंग स्टाइल्समध्ये थोडाफार बदल करावा लागेल इतकंच. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना मी नेहमीच सुचवत असते की सर्वात प्रथम आपल्या शहरातील लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड्सवर सतत नजर ठेवा. हे तुम्हा तरुण मुलामुलींना सहज जमेल. बाजारात आलेल्या नवनवीन स्टाइल्सच्या कपडय़ांवर लक्ष ठेवा. फॅशनबद्दलची माहिती देणारी मासिकं वरचेवर चाळत राहा, या सर्वासाठी आपल्या गुडफ्रेण्डचा म्हणजे इंटरनेटचा आधार घ्या. एकदा का तुझ्या वयाच्या मुलींमध्ये कोणत्या ड्रेसिंग स्टाइलची चलती आहे याचा अंदाज तुला आला, की मग काहीच कठीण नाही.
अर्थात तू नोकरी करणारी युवती आहेस, हे लक्षात घेऊन तुझ्या कामाच्या ठिकाणी ड्रेसकोडसंबंधी काही संकेत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी करायच्या ड्रेसिंग स्टाइल्ससाठी सर्वसाधारण नियम म्हणजे फार भडक रंगांचे किंवा अतिझगमगीत कपडे घालू नयेत. तसेच शरीराचे प्रदर्शन करणारे किंवा तंग कपडेही हमखास टाळावेत. उदाहरणार्थ खोल गळ्याचे, हॉल्टर नेक्स प्रकारचे टॉप्स, कुर्तीज, झिरझिरीत(पारदर्शक) किंवा भरजरी कापडाचे ड्रेसेस, असे कपडे कामाच्या ठिकाणी मुळीच शोभून दिसत नाहीत.
आता तुझ्या फॅशनेबल लुकबद्दल बोलूया. आपल्या व्यक्तिमत्त्वातील बदल ही क्रमाक्रमाने घडणारी प्रक्रिया आहे आणि ती तशीच असायला हवी. कारण एखाद्याचा मेकओव्हर होतो, त्याप्रमाणे आपल्या स्टायिलगमध्ये अचानकपणे झालेला आमूलाग्र बदल आपल्या संपर्कातील लोकांना धक्का देऊन जातो. ते त्यांना आवडतेच असे नाही. शिवाय त्यामुळे पाहणाऱ्यांच्या मनात संभ्रमही निर्माण होतो. अर्थात या सर्वाला तुझी तयारी असेल तर गो फॉर मेकओव्हर. नाही तर ही बदलाची प्रक्रिया सावकाश कर. पहिल्यांदा तुझ्या सलवार-कमीझच्या नेहमीच्या स्टायिलगमध्ये बदल कर. उदाहरणार्थ लेगिंग्ज आणि कुर्ती, टय़ुनिक्स किंवा धोती, नाही तर पतियाळा स्टाइल पॅण्ट असं काही तरी ज्याची सध्या फॅशन आहे, असे कॉम्बिनेशन वापरून बघ. प्रिण्टेड लेगिंग्ज आणि प्लेन कुर्ता ट्राय कर. खरे तर फार छान, छान प्रकारचे टय़ुनिक्स पॅटर्न आजकाल मुली घालताना दिसतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फार साध्या, छोटय़ा बदलांमुळेही आपण स्टायलिश दिसू शकतो. हल्ली जॉर्जेट, शिफॉन या कापडांचे ड्रेसेस इन आहेत. ‘अनारकली’ ड्रेस प्रकारही अजून आवडीने घातला जातो. अर्थात रोजच्या वापरासाठी नाही, पण सण-समारंभांतून तो चांगलाच उठून दिसतो. एक लक्षात घ्यायला हवे की, फॅशन सतत बदलत राहते. अगदी दर आठवडय़ाला नित्यनवीन स्टाइल्स, आपल्या अवतीभवती दाखल होत असतात. नवनवीन कट्स, नेकलाइन्स, स्लीव्हज, कुर्तीजच्या उंचीतील बदल, सलवारींचे प्रकार, वेगवेगळे रंग आणि कापडांचे प्रकार यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. आजूबाजूच्या मोठमोठय़ा मॉल्स, शॉपर्स स्टॉप, पॅन्टालून्ससारख्या शोरूम्समधून असणाऱ्या एथनिक आणि वेस्टर्न वेअरमधील बदलत्या फॅशन प्रकारांवर वरचेवर नजर फिरवायला हवी. तसेच अशा ठिकाणी येणाऱ्या मुली, महिला कोणत्या स्टाइल्सच्या कपडय़ांचे शॉिपग करतात हेही पाहायला हवे. या सर्वाचा अंदाज घेऊन तू तुझ्यासाठी पूर्ण एथनिक किंवा इंडोवेस्टर्न ड्रेसेसचे प्रकार निवडू शकतेस. हे सर्व केल्यानंतर साहजिकच तुझी स्टायलिश दिसण्याची इच्छा आणि प्रक्रिया वेग घेईल.
कपडय़ांबरोबरच त्यांवर सूट करणारे अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरी यांकडेही लक्ष द्यायला हवे, तरच तुझा लुक कम्प्लिट फॅशनेबल होण्यास मदत होईल. एखाद्या प्रसिद्ध ‘ब्युटी सलाँ’ला भेट दे, अत्याधुनिक हेअरस्टाइल्स, हेअरकट, ब्युटीटिप्स यांची माहिती घे. यामुळे फॅशनेबल होण्यासाठी स्वत:त बदल घडवून आणणे तुझ्यासाठी फार सोपे होईल. जस्ट वॉच, अवघ्या एक-दोन महिन्यांत तू निवडलेल्या नवीन फॅशनच्या सलवार-कमीझ किंवा इंडो वेस्टर्न ड्रेस प्रकारांमध्ये तू अगदी सहज कम्फर्टेबल फील करशील.
एकदा तुझ्यात आत्मविश्वास आला की स्टायिलगचा आणखी एखादा नवीन प्रकार ट्राय कर. आपल्याला कपडय़ांचे कोणते प्रकार आणि त्यातली कोणती स्टाइल सूट करते (शोभून दिसते) हे तूच ठरव. उदाहरणार्थ सलवार-कमीझऐवजी तू जीन्स आणि टॉपचा पर्याय निवडलास तर सध्या जीन्समधील लेटेस्ट फॅशन कोणती आहे, टॉप्समधील कोणती आहे? कोणता रंग कोणत्या प्रकारचे कापड इन आहे, तसेच त्यावर शोभणाऱ्या ट्रेण्डी दागिन्यांचाही विचार कर आणि त्यानुसार निवड कर. याच सर्व गोष्टींचा विचार दुसऱ्या कोणत्याही स्टाइलचे कपडे निवडताना करावा लागेल इतकेच. सलवार-कमीझऐवजी जर तू आधी, इंडोवेस्टर्न स्टाइल प्रकार ट्राय केला असशील तर मग जीन्स-कुर्ती किंवा टॉप घालायला तुला नक्कीच आवडेल. कपडय़ांच्या एका स्टाइलमध्ये सरावलीस की नवीन प्रकार ट्राय कर, पण नवनवीन स्टाइलचे कपडे वापरताना आधीचे कपडे प्रकार ही घालायला विसरू नकोस.
मला नक्की काय सांगायचेय हे समजायला हवे असेल तर ‘क्वीन’, ‘इश्क विश्क’, ‘मैं हू ना’, ‘कुछ कुछ होता है’ हे चित्रपट नक्की पाहा. शेवटी ‘जैसे जिसकी सोच’ हेच खरे. एक गोष्ट मात्र नक्की ‘एनी िथग विच यू कॅरी वेल, बिकम्स ए स्टाइल फॉर यू.’ तेव्हा गुडबाय आणि तुझ्यातील बदलासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips from fashion experts
First published on: 21-11-2014 at 02:27 IST