टीम व्हिवा

फॅशनचा ट्रेण्ड कुठून जन्म घेईल याची कल्पनाही करता येणं सध्याच्या घडीला अशक्य आहे. आईच्या कपाटातील रेशमी साडया, खणांच्या साडया, थंडीतलं जुन्या ठेवणीचं स्वेटर, मफलर, अगदी ताईचा एखादा जुना वनपीस, कॉलेजमध्ये वापरलेला टॉप कधीतरी बाहेर पडतो. आणि नावीन्याचा अनुभव देत फॅशन म्हणून मिरवलाही जातो. असंच तरुणाईच्या कॉलेज जीवनातील आठवणींचा भाग असलेलं वर्सिटी जॅकेट नामक प्रकरण सध्या अचानक ट्रेण्डमध्ये आलं आहे..

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

जॅकेट हा प्रकार तसाही तरुणाईच्या फॅशन डायरीतला ऑलटाईम हिट आणि फेव्हरेट म्हणता येईल असा ट्रेण्ड. जॅकेट अंगात घालून मिरवण्यासाठी कुठलातरी एखादा ठरावीक सीझनच असायला हवा असंही काही नाही. डेनिम, लेदरचे जॅकेट्स घालून मिरवणारी तरुणाई जॅकेटच्या विविध प्रकारांच्या प्रेमात आहे. आणि तरीही त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेल्या या जॅकेटचा एक जुनाच अवतार पुन्हा एकदा नव्याने त्यांच्या फॅशन रुटीनचा भाग होऊ पाहतो आहे. वर्सिटी जॅकेट नावाने लोकप्रिय असलेला हा प्रकार मुळचा खेळात रुची असणाऱ्या आणि हायस्कूल काळाशी जोडल्या गेलेल्या पिढीचा आहे. एकदा तुम्ही हायस्कूलमधून बाहेर पडलात की तुमची ही वर्सिटी जॅकेट्स कपाटात बंद होतात. कित्येकांना मग आता आपल्याला हे जॅकेट होईल का? हा विचार सतावतो. आणि आता हे जॅकेट काय घालायचं असाही विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर तो बाजूला सारा. तुमच्या आठवणींचा भाग असलेलं हे वर्सिटी जॅकेट आता रोजची फॅशन स्टेटमेंट म्हणूनही तुम्ही मिरवू शकता.

वर्सिटी जॅकेटची ही कल्पना हार्वर्ड विद्यापीठाने जन्माला घातली असं म्हटलं जातं. हार्वर्डच्या बेसबॉल प्लेअर्सच्या टीमसाठी ही जॅकेट्स पहिल्यांदा बनवून घेण्यात आली होती. या जॅकेट्सवर एच हे अद्याक्षर कोरलेलं होतं. सुरुवातीला फक्त बेसबॉल खेळणाऱ्यांनाच ही जॅकेट्स वापरण्याची संधी मिळत होती. त्यातही जे चांगले खेळतायेत त्यांना त्यांचे जॅकेट्स मानाने त्यांच्याकडे दिले जात असत. तर इतरांना मात्र हे जॅकेट्स हार्वर्ड युनिव्हर्सिटीला परत करावं लागत असे. हळूहळू या अशाप्रकारच्या जॅकेट्सचा फंडा इतर युनिवर्सिटीजनीसुद्धा आजमवायला सुरुवात केली. युनिवर्सिटीकडून मिळणारं जॅकेट म्हणून वर्सिटी जॅकेट्स नावानेच ते लोकप्रिय झालं. सुरुवातीला दोनच रंगात मिळणारं ठरावीक पद्धतीचं हे जॅकेट काळानुरूप इतर जॅकेट्सप्रमाणे बदलत गेलं. नेहमीच्या बॉम्बर जॅकेट, लेदर जॅकेट, कार्डिगन, पफ जॅकेट्स अशा वेगवेगळया प्रकारात वर्सिटी जॅकेट्स मिळू लागली. पांढरा रंग आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा दुसरा रंग किंवा पेस्टल आणि डार्क अशा दोन रंगांचं कॉम्बिनेशन, झिपर जॅकेटप्रमाणे असलेली नेहमीची झिप स्टाइल असे मूळच्या वर्सिटी जॅकेटच्या साच्याला धक्का न लावता त्यातले नवनवीन प्रकार मार्केटमध्ये येत गेले. सुरुवातीला या जॅकेट्सना पॉकेट नव्हते. पुढे दोन्ही साईडला झिपर जॅकेट्स किंवा हुडीच्या स्टाईलप्रमाणे पॉकेट्सही डिझाईन केले गेले. वेगवेगळे रंग आणि वेगवेगळया आद्याक्षरांची डिझाईन्स अशी कल्पक रचना करत हे जॅकेट्स अधिकाधिक आकर्षक होत गेले. मात्र थंडीतच हे जॅकेट्स वापरण्याचा प्रघात तसाच राहिला.

वर्सिटी जॅकेटचा हा ट्रेण्ड पुन्हा येण्यासाठी नेहमीप्रमाणे यावेळीही बॉलीवूड कलाकार आणि सेलिब्रिटी कारणीभूत ठरले आहेत. सध्या या प्रकारची जॅकेट्स नामांकित फॅशन ब्रॅण्ड्सनी बाजारात आणली आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीच्या महागडया फॅशन ब्रॅण्ड्सपासून अगदी स्ट्रीट फॅशनपर्यंत सगळीकडे ही वर्सिटी जॅकेट्स नाना रंगात आणि ढंगात पाहायला मिळत आहेत. यातही ओव्हरसाईज जॅकेटपासून ते टिपिकल काळया-पांढऱ्या रंगाचे, पुढे वा मागे मोठमोठाले आकडे असलेले, लेदरचे जॅकेट्स उपलब्ध आहेत. जीन्स, कार्गो पॅन्ट वा अगदी शॉर्ट्सवरही वर्सिटी जॅकेट पेअर करत हटके लूक साधता येत असल्याने हे जॅकेट्स तरुण पिढीच्या पसंतीस उतरले आहेत. या वर्सिटी जॅकेटचा ट्रेण्डचा उगम पुन्हा हॉलीवूडमधूनच झाला असला तरी बॉलीवूडमधील तरुण कलाकारांनी हा ट्रेण्ड गेल्या काही महिन्यांपासून उचलून धरला आहे.

‘द आर्चीज’ या नेटफ्लिक्सवरील वेबमालिकेच्या निमित्ताने अभिनेता वेदांग रैना आणि अभिनेत्री खुशी कपूर यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर वर्सिटी जॅकेटमधील फोटो पोस्ट केले होते. खुशी कपूरने लाईट ब्राऊन रंगाचं वेगळंच वर्सिटी जॅकेट घातलं होतं. ओव्हरसाईज वर्सिटी जॅकेट आणि रोझी मेकअप करत तिने तिचा लुक पूर्ण केला होता. तर वेदांगने पांढरा आणि निळया रंगाचं कॉम्बिनेशन असलेलं वर्सिटी जॅकेट घातलं होतं. त्यावर ‘द आर्चीज’च्या रिव्हरडेल शहराशी नातं सांगणारं आर हे अद्याक्षर पिवळया रंगात कोरलेलं होतं. वेदांगच्या या वर्सिटी जॅकेटने खरंतर फॅशन विश्वात या जुन्या जॅकेट प्रकाराची चर्चा सुरू झाली.  त्याच्याही आधी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या क्लासिक वर्सिटी जॅकेटमधल्या लुकचा फोटो पोस्ट केला होता. अभिनेता आदित्य रॉय कपूरनेही नेव्ही ब्लू रंगातील वर्सिटी जॅकेट, व्हाईट रंगाचा शर्ट आणि ब्ल्यू रंगाची डेनिम पेअर करत आपला लुक पूर्ण केला होता. आदित्यचा हा लुक तरुणाईला भलताच आवडून गेला.

वर्सिटी जॅकेट हे एकेकाळी क्लासिक फॅशन प्रकार म्हणूनच ओळखलं जात होतं. आत्ताही त्याकडे क्लासिक फॅशन प्रकार म्हणूनच पाहिलं जात असलं तरी सध्या गल्लीपासून जगभरातील महागडया ब्रॅण्ड स्टोअरमध्ये या जॅकेटचे वेगवेगळे अवतार सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच की काय जळी स्थळी हाच जॅकेटचा प्रकार तरुणाईच्या अंगावर दिसू लागला आहे. एखादी गोष्ट वारंवार दिसू लागली की त्याचा उबग येतो तसा काहीसा प्रकारही तरुण फॅशनप्रेमींच्या मनात वर्सिटी जॅकेटबाबत घडतो आहे. काहींनी या जुन्याच पण नव्याने लोकप्रिय झालेल्या जॅकेट ट्रेण्डचं स्वागत केलं आहे तर अनेकांनी काय तेच तेच म्हणत नाकं मुरडायला सुरुवात केली आहे. कारण काहीही असो.. कधीकाळी आठवणींमध्ये जमा झालेला हा जॅकेटचा प्रकार फॅशन डायरीत पुन्हा रूढ होऊ पाहतो आहे यात शंका नाही.

viva@expressindia.com